शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१८

भुताटकी




छायाचित्र सौजन्य : https://www.ufoinsight.com
-------------------------------------------------------------------------------------------------------------------

दीपक गडबडीतच विमानतळाच्या दिशेने निघाला  होता. त्याला कुठे जायचे होते हे त्यालाही माहीत  नव्हते. पण विमानतळाच्या लॉबीमध्ये तो शिरला. तिथे त्याची भेट अमितशी होणार होती. अमित हा दिनेशचा भाचा. विमानतळाच्या एका कोपऱ्यावरच अमितने त्याचे खासगी दहा आसनी विमान पार्क केले होते.  त्याने हे विमान नव्यानेच खरेदी केले होते.  अमितकडे थोडीही उसंत नव्हती.  एका विमानाचे लँडिंग होणार होते म्हणून तो ताटकळलेला होता.  कारण हे विमान उतरल्याशिवाय अमितच्या विमानाला क्लिअरन्स मिळणार नव्हते हे स्पष्ट होते. पंधरा मिनिटे आधीच तो आपल्या विमानात बसला होता. कानाला एव्हिएशन हेडसेट लावून तो काय कमांड मिळतात याची उत्सुकतेने वाट पाहत होता. दीपक विमानापासून थोड्याच अंतरावर उभा होता. एकदाचे कर्कश आवाज करत एक मोठे प्रवासी विमान रन वेवर उतरले. तसा अमित विमानातून खाली उतरला. धावतच तो दीपकच्या दिशेने आला.
'मामा चला बसा.. लवकर लवकर..' अमितने दीपकच्या खांद्यावर हात ठेवत घाई केली.
'अरे हो बाबा... पण हे विमान घेतलेस कधी?' दीपकने प्रश्न केला.
'आधी बसा तर.. नंतर बोलू ', म्हणत अमितने दीपकचा हात पकडून त्याला  चार्टर्ड विमानाच्या दिशेने अक्षरश: ओढतच नेले.   अमितने स्वत:हून कारसारखे दार उघडावे तसे त्या छोट्या विमानाचे दार उघडले आणि दीपकला 'बसा मामा' म्हणत विमानात बसण्याची अज्ञा केली. तसा दीपकही अज्ञाधारकपणे विमानात बसला. विमानात आधीच पाच जण बसलेले होते. यात त्याचा छोटा मुलगा, आई आणि गावाकडील दोन वृद्ध महिला व एक वृद्ध पुरुष बसलेला होता. अमितने घाईतच पुन्हा हेडसेट कानाला लावला. त्याला दीपकशी बोलण्याची उसंतही नव्हती. टेक ऑफसाठी टॉवर कन्ट्रोलकडून सिग्नल मिळण्याची त्याला प्रतीक्षा होती. अमित कुठे घेऊन जाणार होता, त्याचा काय बेत होता, हे कळत नव्हते. दीपकला विमानात कोंबून अमितने कॉकपिट पूर्णत: सांभाळलेहोते. कानाला 'एव्हिएशन हेडसेट' लावलेला असल्याने तो एअर ट्राफिक कंट्रोलर व्यतिरिक्त इतर कोणाशीही तो बोलू शकत नव्हता.
'औरंगाबाद टॉवर. थ्री सेव्हन चार्ली होल्डिंग शॉर्ट ऑफ टू थ्री राइट ' अमित रेडिओ फ्रिक्वेन्सिवर बोलत होता.
'थ्री सेव्हन चार्ली, औरंगाबाद टॉवर, रन वे टू थ्री राइट, क्लिअर्ड फॉर इमिजिएट टेकऑफ' अमितला टॉवरकडून उत्तर मिळाले.
'रॉजर, थ्री सेव्हन चार्ली, क्लिअर्ड फॉर इमिजिएट टेकऑफ, टू थ्री राइट.' अमितने प्रत्युत्तर देत कॉकपिटमधील वेगवेगळी बटने दाबत एकदा त्याने दीपकसह सर्वांकडे काचेतून वळून बघितले. रेडिओवरून सर्वांना आपापले सिट बेल्ट व्यवस्थित बांधण्यास सांगितले. काही सेकंदांतच विमानाचा आवाज वाढला. विमान झेपावण्याच्या मार्गावर होते. तसे दीपकसह सर्वांच्याच चेहऱ्यावर विमानात उत्सुकतेसह भीतीच्याही छटा होत्या. विशेषत: गावाकडच्या मंडळीच्या चेहऱ्यावर उत्सुकतेपेक्षा भीतीच जास्त होती. एकदाची विमानाने भरारी घेतली. तशी सर्वांच्याच पोटात खळबळ झाल्यागत झाले. दीपकसह सर्वांनीच डोळे मिटून घेतले. पण अमितचा छोटा मुलगा मात्र या विमान स्वारीचा पुरेपूर आनंद घेत होता. तो जागेवर उड्या मारत 'ये... ये.. वॉव वॉव' असे किंचाळत होता. बाकी सर्व जण मात्र चिडीचूप होते. एक-एक करत हिमतीने सर्वांनी डोळे उघडले तेव्हा विमान आकाशात नव्हे तर गर्द झाडीझुडपांतून वाट शोधत होते. कदाचित विमान भरकटले होते. अमितच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव होता. झाडाच्या मोठमोठ्या फांद्या चुकवत तो विमान पुढे नेत होता. विमानासमोरून मोठाले पक्षी झेप घेत होते. दगडांचा पाऊस पडावा तशी झाडांची फळे विमानाच्या आजूबाजूने पडत होती. ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाट सुरू होता. अमितला लॅडिंगसाठी जागाच मिळत नव्हती. त्याचा टॉवरशी संपर्कही होत नव्हता. अॅमॅझॉनच्या जंगलापेक्षाही विस्तीर्ण असे हे जंगल भासत होते. सर्वांचा जीव धोक्यात होता. पण अमितचा मुलगा आणि मागे बसलेली वृद्ध मंडळी यांना काय घडतेय, याची कल्पनाच नव्हती. दीपकला या प्रसंगाची पूर्ण कल्पना आली होती. त्याने सिट बेल्ट बाजूला सारून अमितच्या दिशेने धाव घेतली. विमान एकसारखे हेलकावे खात होते. त्यामुळे सगळेच जीव मुठीत घेऊन बसलेले होते.
'अमित काय होतेय हे?' अमितच्या खांद्यावर हात ठेवत दीपकने विचारले. तसा कानावरील हेडसेट बाजूला करत तो बोलला.
'मामा.. आज आपण जगणार की नाही हे सांगता येणार नाही!'
' अरे चिंता नको करू.. काही तरी मार्ग निघेलच बघ!' दीपक दिलासा देत म्हणाला. तेवढ्यात विमानाच्या काचेवर काही तरी मोठे जनावर धडकले. रक्ताच्या चिळकांड्या काचेवर पडल्या. अमितला वाटही दिसेनाशी झाली. तरीही त्याचे विमानावर पूर्ण नियंत्रण होते.
'मामा काळजी नका करू.. बसा.. शांत बसा ' म्हणत तो झाडाझुडपांतून विमानासाठी वाट काढत होता. दीपक आपल्या जागेवर जाऊन बसला.
विमानात मागे बसलेल्या वृद्धांमधील एक महिला खूप आजारी होती. तिला विदेशातील रुग्णालयात हलवण्यासाठी ही विमानवारी होती. तिला काय झाले हे डॉक्टरलाच ठाऊक होते. तातडीने तिला विदेशातील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याने ही उठाठेव होती. पण खराब हवामानामुळे अमितचे विमान भरकटले होते. विमान धड जमिनीवरही नेता येत नव्हते ना ते आकाशात उडायला  तयार नव्हते. ते झाडाझुडपांतूनच का चालले होते, याचे उत्तरच अमितला सापडत नव्हते. उतारात ब्रेक फेल झालेली कार प्रचंड अडथळे पार करत चालवावी तसा अमित हे विमान चालवत होता. पुढे येत असलेले प्रचंड अडथळे तो लिलया चुकवत होता.
आता विमानाची गती कमी झाली होती. अडथळेही दिसत नव्हते. पण विमानाला लँडिंगसाठी नीट जागाच सापडत नव्हती. अमितने सर्व अडथळे पार केले होते. पण तरीही विमान उंचीवर जाण्यास तयारच नव्हते. जमिनीपासून पन्नास फुटांवरूनच ते उडत होते. लँडिंगसाठी तो सपाट जमीन शोधत होता. पण खाली गर्द झाडी आणि मोठाल्या  दरी होत्या. विमान अधूनमधून हेलकावे खाऊ लागले. काळजी पुन्हा वाढली. पण तेवढ्यात त्या विस्तीर्ण जंगलातही अमितला मोकळी जागा सापडली आणि त्याने विमान लिलया लँड केले. तसा तो आनंदाने ओरडला. 'मामा.. आय हॅव डन इट'
दीपकही जागेवरून उठला.. भाच्याचे कोणत्या शब्दांत कौतुक करावे हे त्याला कळेना. 'शाब्बास रं माझ्या वाघा!' एवढेच शब्द दीपकच्या तोंडून फुटले.
विमान लँड तर झाले. पण त्या वृद्धेला विदेशातील रुग्णालयात हलवायचे कसे, हा यक्ष प्रश्न अमितला होताच. तो कॉकपिटमधून मागे आला पण विमानात दीपक आणि तो वगळता कोणीच नव्हते. छोटा मुलगाही नाही. दोघेही चक्रावून गेले.  त्या दोन म्हाताऱ्या, म्हातारा आणि मुलगा गेला कुठे? सगळं काही अनाकलनीय घडत होते. अमित गडबडून विमानातून खाली उतरला. पण त्याच्या पायाखाली जमीन नव्हतीच. तो हवेतच पावले टाकत होता. दीपकनेही काचेतून डोकावून बघितले तर विमान हवेतच तरंगत होते. तोही अमितच्या मागे उतरला. त्याच्याही पायाखाली जमीन नव्हते. जणू ते अंतराळात तरंगलेले होते. मुलगा, ती म्हातारी मंडळी

कोठेही दिसत नव्हती. आता दीपक आणि अमितच्या चेहऱ्यावर भय जाणवत होते. दोघेही एकमेकांकडे भयभीत नजरेने बघू लागले. तेवढ्यात अमितला त्या वृद्ध आजारी म्हातारीने जोरात धक्का मारला तसा तरंगत असलेला अमित खाली खोल दरीत कोसळताना दिसला. अमितपाठोपाठ त्या म्हाताऱ्याने दीपकला ढकलले.. तसा तोही खोल दरीत कोसळला. दरीत कोसळताना दीपकला जाणवले.. ही भुताटकीच आहे. आता आपला शेवट निश्चितच होणार.. तसा त्याने जोरजोराने हातपाय हलवण्यास सुरुवात केली. तेव्हा मात्र मोठा चमत्कार घडला. विमानासारखाच दीपक हवेत उडू लागला.  निम्मे दरीत कोसळत चाललेला दीपक विमानाच्या गतीने वर आला. अजून विमान जागेवरच तरंगत होते. विमानाला लाथ घालून तो आणखी वर गेला.. दूर दूर आकाशात..
अचानक थंड वारे वाहू लागल्याने दीपकला खोकला लागला. तसा तो जोराने खोकलला. तेवढ्यात त्याची पत्नी सुवर्णाने आवाज दिला.
'काय हो.. झोप येत नाहीय का?' सुवर्णाचा आवाज ऐकून दीपकला हायसे वाटले. चला तर सुवर्णाही आपल्या सोबतीला आहेच, या भावनेने तू खूप सुखावला. दीपकने हळूच सुवर्णाकडे बघितले. ती अंथरुणातूनच दीपकला बोलत होती. दीपक कुठल्या जंगलात नव्हे घरातच होता. तिच्याकडे बघत दीपक हसला. सुवर्णा अंथरुणातून उठली. दीपकच्या खाटेजवळ गेली. हळूवारपणे तिने दीपकच्या केसांत बोटे फिरवण्यास सुरुवात केली.
'तुम्हाला पाणी देऊ का?' सुवर्णाने विचारणा केली.
'हो दे बरं..' दीपक म्हणाला.तशी सुवर्णा किचनमध्ये जाऊन ग्लासभर पाणी घेऊन आली. दीपक पाणी प्यायला आणि पुन्हा स्वप्नांच्या आधीन झाला. पण भुताटकीच्या नव्हे तर गोड स्वप्नात......

अंधभक्ती

देशी अप्सरांसाठी इंद्रपुरीतून खाली उतरलेल्या राजा इंद्राने पृथ्वीवरआटपाटनगरात स्थापन केलेले राज्य चांगले  सुरू होते. त्याचे  पृथ्वीतलावर आपल...