देशी अप्सरांसाठी इंद्रपुरीतून खाली उतरलेल्या राजा इंद्राने पृथ्वीवरआटपाटनगरात स्थापन केलेले राज्य चांगले सुरू होते. त्याचे पृथ्वीतलावर आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्याचे प्रयत्न सुरूच होते. आटपटनगरातील राजधानी त्याने बडनगरला हलवली होती. पण त्याचे मन तिकडे रमेना.. कारण अद्याप त्याला तिथे देशी अप्सरा मिळाल्या नव्हत्या. प्रजा तशी आनंदी होती. पण इंद्र आणि त्याचा अंधभक्त सहायक किशनला (हा स्वत पृथ्वीतलावरील सर्वात बुद्धिमान व्यक्ती समजतो) हा आनंद बघवेना झाला. जनता इतकी खूश का आहे, सगळे बंधूभावाने कसे वागत आहेत, याचेही या दोघांना कोडे पडले. आटपाटनगरातील जनता आपल्याविरोधात बंड तर पुकारत नाही ना? आपले महत्त्व कमीहोऊन सेनापती वरचढ तर ठरत नाही ना? असे एक नव्हे अनेक प्रश्न इंद्राला पडले. या संशयातून त्याचे आटपाटनगरातील फेरफटके वाढले. कुणी आपल्याविरोधात बंड तर केले नाही ना, याची शहानिशा करण्यास किशनला आदेशित केले. किशनला आपल्या ( नसलेल्या) बुद्धिमत्तेवर गर्व होताच. त्याने दोन दिवसांतच इंद्राला आटपाटनगरातील सद्यपरिस्थितीचा अहवाल देण्याचे मान्य केले. इंद्राच्या चुकीच्या निर्णयांचेही कट्टर समर्थन करणाऱ्या किशनला अहवाल देण्याचे काम सोपे वाटले. पण किशनला इंद्राच्या चाकरीशिवाय दुसऱ्या एका प्रांतातील दिवाबत्ती आणि शेतसारा वसुली अधिकारी म्हणूनही नियुक्ती मिळालेली होती. या कामासाठी किशनला बराच वेळ द्यावा लागत होता. अनेकदा दुसऱ्या प्रांतात किशनला मुक्कामी जावे लागत होते. किशन दुसऱ्या प्रांतातील कामगिरीवर गेल्यावर इंद्राच्या आटपाटनगरातील फेऱ्या जास्तच वाढत असत. अनेकांना राजा इंद्राला राज्याची व प्रजेची खूप काळजी आहे, असे वाटत होते. मात्र गुपित वेगळेच होते. ते किशनलाही माहीत नव्हते. किशनची अर्धांगिनी (कविता) देशी अप्सरांपैकीच एक होती. इंद्र आटपाटनगरीत येण्याची ती सारखी वाट पाहायची. त्याच्या आगमनासाठी ती प्रचंड अतुर राहत असे. इंद्र आटपाटनगरीत आल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर जो आनंद, जे हास्य खुलायचे ते स्वर्गप्राप्तीच्याही पुढचे होते... मात्र ही बाब आटपाटनगरातील जनतेच्या निरीक्षणातून सुटली नव्हती. मांजर कितीही डोळे मिटून दूध प्यायले तरी ते जनतेला दिसतेच, याचा विसर त्या देशी अप्सरेला पडला होता.
तिकडे दोन दिवसांऐवजी महिनाभरात किशनने अहवाल सादर केला. इंद्र खूश होईल, असाच अहवाल त्याने दिला. जनता नव्हे पण आपला सेनापतीच तुमच्याविरोधात बंड पुकारत असल्याचे त्याने अहवालात नमूद केले. इंद्र खवळला. त्या सेनापतीला पदावरून कसे दूर करायचे, असा विचार इंद्राच्या मनात आला. पण सेनापती काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता. जनताही राजाइतकीच सेनापतीलाही मानायची. सेनापतीचा शब्दही पाळला जायचा. त्यामुळे सेनापतीला सहज पदावरून दूर करणे इंद्रासाठी तेवढे सोपे नव्हते. तसे केले तर प्रजेची नाराजी पत्करावी लागली असती. तसेही सेनापतीची नियुक्ती दिल्ली दरबारातून झालेली होती. अशा स्थितीत सेनापतीला हटवणे सोपे नव्हतेच. पण सेनापती स्वत:हून पद सोडेल, असे काही तरी केले पाहिजे, असा विचार इंद्राने केला. यासाठी मानसिक त्रास देण्याचे अस्त्र तो चालवू लागला. चालताबोलता अपमानित करून सेनापतीला आटपाटनगरी सोडायला भाग पाडायचे, असे इंद्राने किशनच्या मदतीने ठरवले. दरबार भरल्यानंतर स्वत: केलेल्या चुका इंद्र सेनापतीवर थोपवू लागला. किशन अंधभक्तीतून त्याला जोरदार समर्थन करू लागला. तर इंद्राची दासी जनतेत सेनापतीविषयी अफवा पसरवू लागली. स्वत:च्या चैन-विलासासाठी आटपाटनगरातून मिळणारा महसूल तिजोरीत जमा न करता त्याची परस्पर विल्हेवाट लावण्याचे काम इंद्राने अनेकदा केले. पण त्याचे खापरही सेनापतीवर फोडण्याचे षडयंत्र त्याने रचले. दरबारातील काही लोकांना यासाठी हाताशी धरले. दरबारातील काल्पनिक कथा बाहेर सांगण्याचे काम दासीवर सोपवलेले होते. मात्र, आपल्याविरोधात षडयंत्र रचले गेलेय, याची जाणीव सेनापतीला कधीच झाली होतीङ सेनापतीही तितकाच ताकदवान. सेनापतीचा भर दरबारात अपमान करूनही तो काही पदावरून हटायला तयार नव्हता. शेवटी त्यालाही प्रजेची काळजी होती. इंद्र फक्त स्वत:च्या फायद्यासाठी आणि विलासासाठीच इंद्रपुरीतून खाली आला, हे सेनापतीला पक्के माहीत होते. त्यामुळे इंद्राचे मनसुबे खरे होण्यात अडचणी येऊ लागल्या.
इकडे पृथ्वीतलावर तंत्रज्ञानाने मोठी झेप घेतली होती. चोरी, दरोडे, खून अशा घटनांची उकल करण्यासाठी जनता आणि सुरक्षा यंत्रणांना तंत्रज्ञानरूपी एका तिसऱ्या डोळ्याची मोठीच मदत होत होती. इंद्राच्या आटपाटनगरीतही हे तंत्रज्ञान पोहोचले होते. या तिसऱ्या डोळ्यामुळे मात्र त्याच्या विलास आणि प्रणयात बाधा येण्याची भीती निर्माण झाली. यापूर्वी इंद्राने हे तंत्रज्ञानच आटपाटनगरीत पोहोचू नये, यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. पण जनतेच्या प्रबळ इच्छेसमोर इंद्राला नाइलाजाने हे तंत्रज्ञान आटपाटनगरीत लागू करावे लागले. मात्र, आपल्या परवानगीशिवाय हे या तंत्रज्ञानाचा वापर करता कामा नये, असा आदेश दरबारात मांडून तो पारित करून घेतला.
इंद्राने दरबारात तंत्रज्ञानावर मर्यादा आणण्याचा घेतलेला निर्णय जनतेला कळाला आणि कानोकानी गप्पा सुरू झाल्या. मांजरीने अनेक वेळा डोळे मिटून दूध प्यायल्याचे जनतेने उघड्या डाेळ्यांनी बघितले होतेच. पण इंद्र आणि त्या मांजरीला याची खबर नव्हती. पण लपून दूध पिण्याचे कारस्थान हा तिसरा डोळा बघतच होता. इंद्र आटपाटनगरीत आल्यानंतर देशी अप्सरा उर्फ मांजरीला आवर्जून भेटत असे. शिवाय अधूनमधून तिच्या मैत्रिणीसह दासीलाही भेटल्याशिवाय कधीच बडनगरला परतत नव्हता. पण या भेटीगाठी जनतेला पुरावा स्वरूपात मिळू नये, याची खबरदारी म्हणून इंद्राने तो तिसरा डोळा इतरांनी बघूच नये, यासाठी मर्यादा आणल्या. इंद्राला आणि त्याच्या अंधभक्ताला तिसऱ्या डोळ्याची भीती का वाटते, हे किंबहुना सर्वांनाच कळून चुकले होते. पण किशन या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ होता. फक्त इंद्र म्हणतो म्हणून त्याचा या तिसऱ्या डोळ्याला विरोध होता. या तंत्रज्ञानाचे फायदे कमी आणि तोटे कसे जास्त आहेत, हे किशनच्या अंधभक्तीने ग्रासलेल्या मनावर बिंबवण्यात इंद्राला आधीच यश आले होते. वास्तविक इंद्राने किशनच्या अंधभक्तीचा पूर्वीही लाभ घेतला होता आणि तो बडनगरला गेल्यानंतरही अधूनमधून घेणे सुरूच होते. पण अंधभक्तीची पट्टी डोळ्यांवर बांधल्याने त्याला काहीच दिसत नव्हते. इंद्र सेनापतीचा तिरस्कार करतो म्हणून किशनही सेनापतीचा तिरस्कार करू लागला. पण यात एकट्या इंद्राचेच सर्व बाजूंनी फावत होते, हे किशनच नव्हे तर दरबाऱ्यांच्या लक्षातही येत नव्हते. .
मोरल ऑफ द स्टोरी : अंधभक्ती ही काही काळापुरतीच लाभदायक असते. पण सर्वकाळ त्यामुळे तोटाच होतो. म्हणून डोळसपणे जगाकडे बघितले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा