शनिवार, २७ एप्रिल, २०१९

कविताभाभीचा प्रेमभंग

 (छायाचित्र सौजन्य : https://res-3.cloudinary.com )
*********************************************************************
रात्रीचे बारा वाजले होते. सगळीकडे शांतता होती. रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद-दोन वाहनांमुळे या शांततेचा भंग होत होता. पण पुरुषद्वेष्ट्या कविताभाभीला झोप येत नव्हती. तिचा देह अंथरुणावर होता. मात्र चित्त दुसरीकडेच होते.  कविताचा  पती मात्र  घोरत पडला होता. नोकरीवरून घरी परतताना त्याने  विदेशी औषध घेतलेले होते. त्यामुळे त्याला जगाची चिंताच नव्हती. पती शेजारीच झोपला असतानाही  कविता  इतकी अस्वस्थ का होती?. समाजात सोज्वळतेचा, पतीव्रतेचा बुरखा पांघरून वावरणारी, दोन लेकरांची माता कविता एका तरुणाच्या प्रेमात पडली होती. तो तिच्यापेक्षा २ वर्षांनी लहान. पण प्रेम हे आंधळे असते, या उक्तीनुसार कविता  आणि त्या तरुणाचे प्रेम कविताच्या लग्नानंतर जुळले होते. पण आता त्या तरुणाचे लग्न होणार होते. त्याचे लग्न होत असल्याने कविता अस्वस्थ होती. सकाळीच ती त्या तरुणाला फोनवर भांड भांड भांडली होती. रडून रडून डोळे सुजवून घेतले होते. पण त्या तरुणाचीही आपली स्वप्ने होती. त्याला कविताशिवाय आयुष्य आनंदात घालवायचे होते.  सुखी संसार थाटून कविताच्या प्रेमाच्या जोखडातून मुक्त व्हायचे होते. किती दिवस तो विवाहित कविताची ईच्छापूर्ती करणार होता?
कविता ज्या तरुणावर प्रेम करत होती तो कोणी बाहेरचा नव्हता. तो तिच्या मामाचा मुलगाच होता. कविताचा पती रोज मद्यप्राशन करून येत असल्याने आणि घरी येताच दोन घास पोटात ढकलून निद्रादेवीच्या आधीन होत असल्याने कविता सुखापासून वंचित राहत होती. ही उणीव भरून काढण्यासाठी तिने त्या तरुणाला म्हणजे अंगदला हेरले होते.  अंगद  कविताच्या प्रेमात कसा पडला हे त्यालाही कळाले नाही. 
खेड्यात राहणारा अंगद १२ उत्तीर्ण झाला होता. त्याला पुढील उच्च शिक्षण घेण्याची इच्छा होती. पण तो राहत असलेल्या गावात जेमतेम १२ वीपर्यंतच शिक्षणाची सोय होती. त्यामुळे अंगदने आपल्या  आईवडिलांकडे शहरात शिकण्यासाठी जाण्याची इच्छा व्यक्त केली. आईवडिलांनी त्याची इच्छा पूर्ण केली. त्यापूर्वी त्यांनी  जवळच्या नात्यातून असलेल्या व अंगदने ज्या शहरात शिकायला जाण्याची इच्छा व्यक्त केली त्याच शहरात राहणाऱ्या  कविताच्या कानावर ही गोष्ट टाकली होती. कवितानेही 'लेकराला शिकू दे मामी. इथं राहिला तर आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवू. वेळप्रसंगी पैशाची मदतही करू' असा शब्द दिल्याने अंगदला शहरात शिकायला पाठवण्याचा निर्णय पक्का झाला होता.
अंगदने  शहरात पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतला. हॉस्टेलला राहून तो तीन वर्षे शिकला. शिकत असताना त्याचे आठवड्यातून एक-दोन वेळेस तरी कविताच्या घरी जाणं-येणं असायचं. कविताचा पती काकासाहेब  सामाजिक जबाबदारी जाणणारा. पण काकासाहेबांना दारूचे व्यसन होते. काकासाहेब दारू प्यायला तरी त्याचा कुणाला तीळमात्र त्रास नव्हता. नोकरीवरून घरी परतताना रस्त्यातच बारची वारी करत असे. घरी गेल्यावर ना चिडचिड, ना कुणाला रागावणे. त्यामुळे काकासाहेबाचे मद्यपी असणे कुणासही त्रासदायक नव्हते.  काकासाहेब यानेही अंगदला आवश्यक ती शैक्षणिक मदत केल्याने अंगदचे शिक्षण विनाविघ्न पार पडले. आता ग्रॅज्युऐट झालेला अंगद नोकरीच्या शोधात होता. शिक्षण पूर्ण झाल्याने तो नोकरीच्या शोधात होता. काकासाहेबाने त्याला काही दिवसांसाठी आपल्या  घरी आश्रय दिला. काही दिवस तो नोकरीसाठी भटकला. एका ठिकाणी होकार मिळाला, पण   तुटपुंजा पगार ऑफर केल्याने अंगदनेच ही नोकरी नाकारली.
नोकरीच्या शोधात अंगदचा महिना लोटला होता.  कविता आणि काकासाहेबकडे किती दिवस राहायचे, या विचाराने तो बेजार झाला होता. एका ठिकाणी मुलाखत देऊन तो घरी (काकासाहेबच्या) परतला. दार उघडेच होते. पण घरात सामसूम होती. कविताची मुलं मित्राकडे खेळायला दार उघडेच ठेवून गेली होती. तो घरात शिरला. कागदपत्रांची फाईल टीपॉयवर ठेवून  खोलीत गेला.  शर्ट काढून तो थेट बाथरूमकडे फ्रेश होण्यासाठी वळला. त्याने बाथरुमचे दार ढकलले. पण बाथरुममधील दृश्य पाहून तो एकदम चमकला. काय बोलावे, हेही त्याला सुचेना. कविता  अंघोळीला गेेलेली होती. शॉवरच्या पाण्याच्या आवाजात कविताला अंगद घरात आल्याची कुणकुणही लागली नव्हती.  अंगदचे डोळे काही क्षण विस्फारून गेले. पण तो लगेचच भानावर आला.
'सॉरी ताई' म्हणत त्याने दरवाजा ओढून घेतला. एव्हाना अंगदने आपल्याला अंघोळ करताना बघितल्याची जाणीव कविताला झाली. तिनंही तातडीनं आतून कडी लावली.
कविता अंघोळीहून परतली. . 'काय रे अंगद कधी आलास?,  खोलीच्या दरवाजावर उभ्या कविताने केसांना टॉवेल गुंडाळत विचारले. ' आत्ताच आलो.' अंगद पुटपुटला. त्याला आपली जीभ जड झाल्यासारखे वाटले. 'झाला का इंटरव्ह्यू?' कविताने प्रश्न केला. जड जिभेने खाली बघत अंगद 'हो' एवढंच म्हणाला. त्याची कविताच्या नजरेला नजर भिडून बोलण्याची हिंमत हाेत नव्हती. मनोमनी त्याला अपराध्यासारखे वाटत होते. 'का रे एवढा शांत का?' कविताने विचारणा केली. 'काही नाही.. सॉरी बरं का ताई.. मला माहीतच नव्हतं तू अंघोळीला गेल्याचं..शप्पथ ताई!' कविताकडे क्षमायाचना करत अंगद बोलला. 'अरे त्यात काय.. मला तरी कुठं माहीत होतं तू येणार म्हणून. मी पण किती वेंधळी.. कडी लावायचेच  विसरले!' कविता सहज बोलून गेली. 'नाही पण ताई माझं चुकलच...' अंगद बोलला.  'ते जाऊ दे रे.. तू माझ्यापेक्षा मोठा असता तर मामानं माझं लग्न तुझ्याशीच लावून दिलं असतं',  कविता गमतीनं बोलली तसे अंगदवरच दडपण कमी झाले. 'तू फ्रेश हो, आपण चहा घेऊ', म्हणत कविता  किचनकडे वळली.  अंगद फ्रेश होऊन हॉलमध्ये येऊन बसला. चहा प्यायल्यानंतर तो फ्रेश झाला. आता त्याच्या मनावरील दडपण बरेच कमी झाले होते.
सकाळचे अकरा वाजले होते. रविवारचा दिवस होता. आज अंगदला कोठेही जायचे नव्हते. मंगळवारीच त्यानं इंटरव्ह्यू दिला होता.   टीव्ही सुरू करण्यासाठी रिमोटला हात लावताच दार वाजलं. कविता किचनमध्ये होती. अंगदनंच दार उघडलं. खासगी कुरिअरवाला दारात उभा होता. त्याने 'अंगद नरवडे कोण आहे?', अशी विचारणा करताच 'मीच' म्हणत अंगदने लिफाफा स्वीकारला. सोमवारी त्याने दिलेल्या इंटरव्ह्यूचे ते उत्तर होते. महिना १८ हजारांची नोकरीची त्याला ऑफर होती. ऑफर मंजूर असल्यास चार दिवसांत कंपनीत रिपोर्टिंग करायचे होते.  पत्र वाचून अंगदचा आनंद गगनात मावेनासा झाला. 'ताई मला नोकरी मिळाली', असे जोराने ओरडला. एव्हाना कविता  किचनमधून हॉलमध्ये आली होती. 'व्वा... अभिनंदन अंगद', म्हणत कविताने अंगदकडे शेकहँडसाठी हात पुढे केला. पण शेकहँडऐवजी अत्यंत आनंदित झालेल्या अंगदने कविताला कडाडून मिठी मारली. काही क्षण कविता त्याच्या मिठीत होती. तिचे अंग शहारले. पण काही क्षणांनी तिने अंग चोरून घेत  त्याच्या मिठीतून  सुटका करून घेतली. 'खरंच सांगतो ताई तुझी नि भाऊची मदत माझ्या आयुष्यासाठी कामी आली. तुम्हा दोघांचे खूप उपकार आहेत माझ्यावर. ते कसे फेडू सांग', अंगद कृतज्ञतेने बोलला. 'अरे उपकार कसले.. आम्ही जेवढी मदत करता येईल ती केली. यात काय?' कविताने उत्तर दिले. 'ताई तुझं हे मोठेपण आहे... खरंच मी आज खूप खूश आहे. माझ्या पहिल्या पगारावर मी तुला छान साडी घेईल बघ..' कविताच्या उपकारातून उतराई होण्याच्या सुरात अंगद बोलला. 'ठीक आहे.. तुला उपकार तर फेडावेच लागतील. मी म्हणेल तसं तुला वागावे लागेल.' असे म्हणत कविताने त्याला उपकाराच्या बंधनात अडकवले.
 अंगदला नोकरीला लागून महिना होत आला होता. सध्या तरी तो कविताच्याच घरी राहत होता. पहिला पगार मिळाल्यानंतर किरायाने खोली घेऊन राहण्याचा मनोदय त्याने कविता नि काकासाहेबकडे बोलून दाखवला होता. आता नोकरी लागली म्हटल्यावर अंगदला  आपल्या घरी ठेवून घेण्याचे कविता आणि काकासाहेबकडे औचित्यही नव्हते.
अंगदच्या हाती पहिला पगार पडला.   भोंगा वाजताच हातातले काम उरकून अंगद कंपनीतून बाहेर पडला. त्याने ऑटोरिक्षा पकडून थेट मार्केट गाठले. कवितासाठी त्याने लाल रंगाची साडी आणि काकासाहेबसाठी शर्ट खरेदी केला. मुलांसाठीही काही कपडे खरेदी करून थेट घर गाठून   सर्वांना नवीन कापड्यांची भेट दिली.
रात्र व्हायला आली होती. अंगदने दिलेली साडी कविताने नेसली. मुले अभ्यासाला लागली होती.  साडी नेसून कविता अंगदसमोर उभी राहिली. 'बघ मी कशी दिसते?' कविताने प्रश्न केला. 'ऐश्वर्या रायच...!' अंगदच्या तोंडून उत्स्फूर्तपणे शब्द निघाले. तशी कविता थोडी लाजली. 'चल चावट कुठला' कविताने शेरा मारला. 'अगं खरंच.. तू खूपच सुंदर दिसतीस', अंगद बोलला. 'असू दे... साडी मात्र मला खूप आवडली', कवितानं अभिप्राय नोंदवला. 'थँक्यू ताई' म्हणत अंगद खोलीकडे वळला.
...........................
जेवण करून सर्व मंडळी झोपेच्या तयारीत होती. पण काकासाहेबांचा अजून पत्ता नव्हता. घड्याळाचा काटा बाराला स्पर्श करण्यासाठी धडपडत होता.  कविता बेचैन होती. तिने चार ते पाच वेळा काकासाहेबला फोन केला. पण फोन बंद होता. त्यामुळे ती अंगदच्या खोलीत जाऊन बसली. कविताचा मोबाइल खणाणला. काकासाहेबाचाच फोन होता. कविताने चटकन फोन रिसिव्ह केला. 'हॅलो कविता.. ' काकासाहेबांचा आवाज हेलकावे खात होता. साहजिकच कविताने काकासाहेब पार्टीत आहेत, हे ओळखून घेतले.
'मी आज रात्री घरी येणार नाही. दोस्तांबरोबर पार्टीत आहे.'  काकासाहेबांनी बोलणे पूर्ण केले.
'अहो पण लवकर सांगायचं ना हे...तुमचा फोनही लागत नव्हता. किती काळजी वाटत होती आम्हाला. ' रागात पण लाडीवाळ सुरात कविता बोलली. 'आता सांगितलय ना.. आता गप्प.' काकासाहेबांनी रागावून फोन ठेवला. अंगद कविताच्या शेजारीच उभा होता. 'काय म्हणाले गं काकासाहेब?' अंगदने प्रश्न केला. "त्यांचं हे नेहमीचंच. बसलेत मित्रांबरोबर. त्यांना माझी काळजी ना लेकरांची. ' कविता चिडून बोलली. तिच्या डोळ्यांत अजून चिंता जाणवत होती. 'का काळजी करतेस ताई.. आम्ही सगळे आहोत ना.. तू आता शांत झोप बघू..' अंगदने कविताच्या खांद्यावर हात ठेवून दिलासा देत म्हटले.
...........................
रात्रीचे बारा कधी वाजून गेले होते. काकासाहेब नसल्यामुळे कविताला झोप लागत नव्हती. किंबहुना काळजीमुळे तिची झोपमोड झाली होती. अंगदही त्याच्या खोलीत एक मासिक चाळत बसला होता. अंगदने अलगदच खोलीचे दार ढकलले होते. ते पूर्ण लागले नव्हते. कविताला झोपच येत नसल्याने किचनमध्ये पाणी प्यायला आली. अंगद मासिकातली कुठलीतरी कथा वाचण्यात व्यग्र होता. अर्धवट उघड्या दारातून कविताला तो अजूनही झोपला नसल्याचे लक्षात आले. तिची पावले नकळतच अंगदच्या खोलीकडे वळली. तिने हलकेच दार ढकलले. तशी अंगदची वाचनातील तंद्री सुटली. 'अगं ताई तू झोपली नाहीस?' अंगदनंच पहिला प्रश्न केला. 'नाही रे झोपच येत नाहीये. काकासाहेब नसल्यानं बेड रिकामा वाटतोय.' कविता बोलली.
"आपण थोडा वेळ गप्पा मारू? ' कविता म्हणाली. 'हो' म्हणत अंगदने अनुमती दिली. गप्पांत बराच वेळ गेला. अंगदच्या डोळ्यांत झोप दाटली होती. पण कविता अंगदच्या बेडवरून उठायला तयार नव्हती. 'ताई तुला झोपायचं नाही का आज?' अंगदने प्रश्न केला. 'झोपमोड झालीय..पण तू मला का कटवत आहेस. मी काय तुझ्या बेडवर झोपणार नाही.. ' कविता विनोदाने बोलली. 'काय ताई.. हा बेड तुझाच आहे. मी काय खाली चटईवर झोपेन.', अंगद चातुर्याने बोलला आणि उलटे ठेवलेले पुस्तक डोळ्यांसमोर घेऊन वाचू लागला.  पण त्याचवेळी कविताच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक जाणवत होती. कविताने अंगदच्या हातातील पुस्तक हिसकावत 'मी इथं तुझ्यासमोर बसले अन् तू त्या पुस्तकात काय बघतोस?' कविता लाडीवाळपणे बोलली. 'अगं बोलतोय ना..  . शेवटच्या आठ-दहा ओळीच राहिल्या होत्या.' अंगद म्हणाला. 'बरं बोल बाई..' म्हणत अंगदने भिंतीला पाठ ठेकवली. 'थंडी वाढलेली दिसते', काही तरी बोलावं म्हणून अंगद बोलला. 'हो वाढलीय' कवितानं सुरात सूर मिसळला. 'काय विचार आहे तुझा?' कवितानं कोड्यात टाकणारा प्रश्न केला?' त्यावर प्रश्नार्थक नरजेने तो कविताकडे बघू लागला. 'अरे असा काय बघतोस माझ्याकडं..मला कधी बघितलं नव्हतं का?' कविताच्या दुसऱ्या अचानक प्रश्नानं अंगदने नजर दुसरीकडे वळवली. तेव्हा कविता गालातल्या गालात हसली. 'तू ना नुसता वेडपट आहेस..एक सुंदर स्त्री तुझ्यासमोर बसली असताना तू उन वारा, थंडीवर बोलत आहेस?' कविताच्या या संवादावर अंगद आणखी बुचकाळ्यात पडला. 'मला राजकारणावर बोलता येत नाही', अंगद विनोदाने बोलला. 'प्रेमावर तर बोलता येतं ना?' असं कविता म्हणताच अंगद दचकला. 'माझा तोही विषय कच्चा आहे', अंगद बळेच हसत बोलला. 'अंगद तू कुणावर प्रेम केलं का रे?' कवितानं मूळ प्रश्नालाच हात घातला तसा अंगद पुन्हा दचकला. 'न न नाही..' अंगदच्या तोंडून शब्द उमटले. 'चल खोटारडा कुठला... काल त्या प्रीतीकडे कसा डोळे फाडून बघत होता?' कवितानं मुळावरच घाव घातला. तशी अंगदची आणखी  बोबडी वळली. 'त त त ताई... क क क कोण प्रीती? ', अंगद म्हणाला. 'चल खोटे बोलू नको.. मी माझ्या डोळ्यांनी बिघतलं काल तुला..' कविताने अंगदची पोल खोलली. 'ताई खरंच तसं काही नाही. ती छान दिसते म्हणून बघत होतो.. पण प्रेमवगैरे काही नाही बरं का. चार-पाच दिवसांपूर्वीच किराणा दुकानावर तिची ओळख झाली होती. ' अंगद एका श्वासात सर्व बोलून गेला. 'माझ्यापेक्षा सुंदर आहे ती?' कविताचा ताबडतोब प्रश्न होता. 'छे.. तू खूप सुंदर आहेस गं कविता.. सॉरी.. ताई.' अंगद म्हणाला. 'ताई नाही कविताच म्हण..' पलंगावर थोडं अंगदच्या दिशेने सरकत त्याच्या खांद्यावर हात ठेवत कविता म्हणाली. 'नाही नाही.. चुकून तोंडातून तुझं नाव आलं.' अंगद स्पष्टीकरण देत बोलला. 'नाही तू आजपासून मला कविताच म्हणायचं... नाही तर मी तुझ्याशी बोलणार नाही.. ' कविता रुसव्या स्वरात बोलली. 'बरं ताई.. आय मिन कविता..' अंगद राजी होत बोलला. 'बरं.. त्या प्रीतीचं काय?' कविता पहिल्या मुद्द्यावर आली. 'अगं काय त त.. कविता..तू उगीच मला कोंडीत पकडत आहेस.  'बरं माझ्याविषयी तुझं काय मत?' कवितानं पुन्हा एकदा अंगदला कोड्यात टाकलं. 'तू खरंच सुंदर आहेस गं.. तू माझ्यापेक्षा लहान असतीस तर...'  अंगद बोलता बोलता थांबला. 'तर काय रे अंगद.. बोलना..' कविताचा प्रश्न. 'तर मी..' अंगद पुन्हा थांबला. 'माझ्याशी लग्न केलं असतं ना..' कवितानं वाक्य पूर्ण केलं. 'हो.. पण आता परिस्थिती वेगळी आहे. ' अंगद विनम्रपणे बोलला. 'काही वेगळी नाही.. तू मला लहानपणापासूनच आवडत होतास.. पण मी तुझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी अन् लवकर लग्न झाल्याने दोन लेकरं झाली. तेवढाच काय बदल. बाकी काहीच बदललं नाही. मी आजही तुझ्यावर...' बोलता बोलता कविता अडखळली. पण कविताच्या सर्व भावना अंगदपर्यंत पोहोचल्या होत्या. 'पण कविता आता या गोष्टींचा काय फायदा? तुझा संसार चांगला आहे. सोन्यासारखा नवरा.. दोन मुलं आणखी काय पाहिजे?' अंगद कविताच्या खांद्यावर हात ठेवत बोलला. 'हो अंगद मी सुखी आहे. पण.. ',  'पण काय?' अंगद मध्येच बोलला.  'हेच की सुख आहे.. पण पुरेसं नाहीरे.. काकासाहेब हल्ली दारूच्या खूप आहारी गेलेत. दररोज दारू लागते. घरी आले की दोन घास खाऊन गार होतात. मी त्यांच्या सुखासाठी झुरते. पैसा, दागदागिने अशी सर्व सुखं ते मला देतात पण.. त्या सुखाचीच उणीव भासते रे...' कविता डोळ्यांत पाणी आणून सांगत होती. 'पण कविता..' अंगद बोलण्याच्या प्रयत्नात असतानाच 'पण बिन काही नाही. तू मला ते सुख देशील अंगद?' कविता मनातलं बोलून गेली. अंगदला काय बोलावं नि काय नाही, सूचेना. तो स्तब्ध झाला. त्याची नजर शून्यात होती. डोक्यात विचारांचं थैमान होतं. कविता लहानपणापासूनच अंगदवर प्रेम करत होती हे त्याला आता कळलं होतं. अंघोळ करताना कविताला बघितलं होतं तेव्हा अंगदच्या भावना उफाळल्या होत्या जरूर. मात्र, तो तातडीनं सावरलाही होता. तो कविताकडे अशा भावनेतून बघूही शकत नव्हता. त्याला शिक्षण आणि नोकरीसाठी काकासाहेब आणि कवितानं आश्रय देऊन जे उपकार केले ते तो कसा विसरणार होता. पण आता कवितानं तर त्याला मोठ्या धर्मसंकटात टाकले होते. काय करावे काय नाही.. असे एक ना अनेक विचार त्याच्या डोक्यात घोंघावत होते. अंगदने डोळे मिटले. कविता जवळच होती. तिनं डोळे मिटलेल्या अंगदच्या ओठांवर ओठ टेकवताच अंगद भानावर आला. पण तिला तो त्या क्षणी तरी नाही म्हणू शकला नाही. उफाळलेल्या लाटा किनाऱ्यावर आदळल्याशिवाय शांत होणार नव्हत्या. अंगद जणू भावनाहिन झाला होता. तो त्या क्षणाला तरी होकारही देऊ शकत नव्हता आणि नकारही...
............................
अंगदनं  काकासाहेबांचं घर सोडलं होतं.  तो कंपनी परिसरातच खोली करून राहू लागला. तो नोकरीतही बऱ्यापैकी रुळला होता. कविताच्या ईच्छापूर्तीसाठी तो कधी तिच्या घरी जायचा तर कधी कविता त्याच्या खोलीवर जात असे. सुमारे वर्षभर हा सिलसिला सुरू होता. कविताची अंगदबरोबरची उठबैस एव्हाना ती राहत असलेल्या अपार्टमेंटमधील लोकांना खटकत होती. पण काकासाहेब यापासून अनभिज्ञ होता. कविताच्या मामाचाच मुलगा आहे शिवाय तिच्यापेक्षा लहान म्हणून काकासाहेबला कधी संशयाने शिवलेच नाही. अगदी काकासाहेबसमोर कविता त्याच्या बाईकवर बसून खरेदी किंवा इतर कोणत्याही निमित्तानं बाहेर पडायची.
अंगदचा सहवास लाभल्यापासून कवितात मोठाच बदल झाला होता. तिला अंगद आणि अपार्टमेंटमध्ये राहणारा एक  पुरुष सोडला तर इतर पुरुषांचा प्रचंड तिटकारा करू लागली. अंगद आणि ती व्यक्ती सोडली तर इतर पुरुष म्हणजे तिच्यासाठी खलनायक. 
............................
एका दिवशी सकाळीच अंगद काकासाहेबांकडे एक निरोप घेऊन आला. अंगदचे लग्न ठरले होते. साखरपुड्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण  देण्यासाठीच तो आला होता. कविताही घरीच होती. अंगदने कविता आणि काकासाहेब यांना लग्न ठरल्याचे सांगताच कविताच्या चेहऱ्यावरील सर्व रंग उडाले.  डोळ्यांत पाणी तरळलं. अंगदची साथ सुटणार या भीतीनं कविता हादरून  गेली. काकासाहेब बोलता बोलता चार वेळेस अंगदचं अभिनंदन करून बसले. पण कविताच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. 'तुम्ही दोघंही या नरसापूरला', असा निरोप देऊन अंगद बाहेर पडला तो कविताच्या आयुष्यात परत यायचे नाही याच निर्धाराने.... हेच कारण होते पुरुषद्वेष्ट्या कविताभाभीच्या अस्वस्थतेचे...

अंधभक्ती

देशी अप्सरांसाठी इंद्रपुरीतून खाली उतरलेल्या राजा इंद्राने पृथ्वीवरआटपाटनगरात स्थापन केलेले राज्य चांगले  सुरू होते. त्याचे  पृथ्वीतलावर आपल...