एका जंगलात एक वाघिणीची सत्ता होती. जंगलात लोकशाही असल्याने पंचवार्षिक निवडणूक लागली होती. जंगलावर वाघाची किंवा सिंहाची सत्ता असती तर एक वेळ चालेल पण वाघीण आपल्यावर सत्ता गाजवते म्हणजे काय, असा एक विचार एका शु-भोंदू नामक लांडग्याच्या स्वार्थी मनाला चाटून गेला. त्याने वाघिणीशी गद्दारी करत तिची सत्ता उलथून लावण्याचा विडा उचलला. यासाठी तो इतर जंगलातील लांडग्यांना जाऊन भेटला व त्यांची मदत घेण्याचे ठरवले. भोंदू लांडग्याच्या मदतीला दोन मोठे लांडगे सर्व शक्तिनिशी धावून गेले. दोन मोठ्या लांडग्यांनी काही कुत्रेही आपल्यासोबत नेले. या कुत्र्यांवर वाघीण ज्या मार्गाने जाईल त्या मार्गावर 'जय जंगलराज' अशी घोषणा देण्याचे काम सोपवले गेले. कुत्रे इमानेइतबारे आपले काम चोख बजावू लागले. वाघीण दिसली रे दिसली की 'जय जंगलराज' अशा घोषणा निनादू लागल्या. इकदा तर घोषणाबाजी करत या कुत्र्यांनी अचानक वाघिणीवर हल्लाही केला. शेवटी कुत्रेच ते.. त्यांना काही वाघिणीच्या नरडीचा घोट घेता नाही आला. तिच्या पायाला चावून कुत्रे पसार झाले. वाघिणीचा पाय जायबंदी झाला. याचा फायदा घेत ते दोन मोठे लांडगे वाघिणीची सत्ता असलेल्या जंगलात पाय रोवून बसले. जंगलातील प्राण्यांना वाघिणीचा राज्य कारभार कसा अन्यायी आहे, किती भ्रष्टाचारी आहे हे पटवून देऊ लागले. पण आपल्या जंगल संभांना हजर राहण्यास या जंगलातील इतर प्राणी फारसे उत्सुक नाहीत हे पाहून दोन लांडग्यांनी आपल्या स्वत.च्या जंगलातील प्राणी या जंगलात घुसवले. यातही बहुतांश लांडगे आणि कुत्र्यांचा समावेश अधिक होता. आता मात्र त्या दोन मोठ्या लांडग्यांच्या सभांना गर्दी दिसू लागली होती. ही गर्दी पाहून वाघिणीच्या जंगलातील काही प्राणीही सभांना हजेरी लावू लागले. मग काय आळीपाळीने दोन्ही लांडगे प्राण्यांचे कान भरू लागले. आम्ही आमच्या जंगलात प्राण्यांसाठी किती सुविधा दिल्या, किती विकास केला याची उदाहरणे लाळ गळेपर्यंत सांगू लागले. विकासाच्या मोठमोठ्या थापा मारल्या जाऊ लागल्या. या लांडग्यांनी वाघिणीला सळो की पळो करून सोडले. पण वाघीणही हार मानणारी नव्हती. तिनेही लबाड लांडग्यांचे इरादे ओळखून ते कसे ढोंगी आहेत हे आपल्या जंगलातील प्राण्यांना पटवून दिले.
एकदाची निवडणूक पार पडली आणि निकालाचा दिवस उजाडला. सकाळपासूनच कोल्हेकुई सुरू झाली. हे जंगल आत्ता आपलेच अशा आविर्भावात लांडगे आणि त्यांच्यासोबतची कुत्रे भुंकून सांगू लागले. मात्र, जसजसे वाघिणीचे संख्याबळ वाढताना दिसले तसतसा लांडगे आणि कुत्र्यांनी पळ काढायला सुरुवात केली. वाघिणीला तीन आकडी संख्याबळ गाठता आले. पण जंगलातील काही प्राणी दोन लांडग्यांच्या भूलथापांना बळी पडले आणि त्यांचे संख्याबळही दोन आकड्यांवर आले. हा पराभव जिव्हारी लागल्याने उंदरं बिळात लपावेत तसे ते दोन लांडगे आणि त्यांची कुत्र्यांची फौज लपून बसली.
मोरल ऑफ द स्टोरी : लोकशाहीवर ज्याचा दृढ विश्वास आहे, त्याला सत्तेतून कोणीच वंचित करू शकत नाही. अनेक वेळा भूलथापांना काही प्राणी बळी पडतीलही मात्र विजय नेहमीच सत्याचा आणि चांगल्या भावनांचाच होतो. आणि हो... वाघीण वाघीणच असते. लांडगे आणि कुत्रे तिचे काहीच बिघडवू शकत नाहीत.