गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२

आम्ही सगळे फुकटे..

भारतात सल्ले  फुकट दिले जातात. देणाऱ्यांची संख्याही विपुल आहे. पण आपला भारत नुसत्या सल्ल्यावरच नाही. इथं बऱ्याच गोष्टी फुकट मिळतात आणि त्याचे लाभार्थीही असंख्य आहेत. 

आता फुकट विषयावर मी फुकटपणे का लिहितोय याचे संदर्भ मात्र वेगळे आहेत. हे लिहिण्यामागील कारण म्हणजे मी काही वर्षांपूर्वी द. मा. मिरासदार यांचा "फुकट" हा कथासंग्रह वाचला होता. राम गणेश गडकरी, श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर, पु. ल. देशपांडे यांचा विनोदी लेखनाचा वारसा जोपसणारे द. मा. आपल्यात नाहीत. पण त्यांचे साहित्य अजरामर झाले आहे. मिरासदारांचा "फुकट" हा कथासंग्रह मला प्रामुख्याने भावलेला. आता प्रामाणिकपणेच सांगतो की, मी हा कथासंग्रह फुकटच वाचला. अर्थात पैसे न मोजता! एक मित्र पदरचे पैसे खर्चून पुस्तके खरेदी करताे आणि वाचनाचा छंद भागवताे. तो तंगीतही पैसे खर्च करून पुस्तके विकत घेतो.. म्हणजे त्याचा व्यासंग अफाटच म्हणायचा. पण  माझ्यासारख्या फुकट्याने त्यांच्याकडून हे पुस्तक फुकट वाचायला घ्यावे, याला काय म्हणायचे.. पण या फुकटच्या माळेतला मी एकटाच मणी नाही. माझ्यासारखे शेकडो, हजारो, लाखो लोक आपली वाचनाची हौस अशीच भागवतात. मी एकटाच या जगात फुकट्या नाही.. हा विचारच मनाला समाधान देऊन जातो. पण एक गोष्ट तेवढ्याच प्रामाणिकपणे सांगतो, मी पुस्तके फुकट वाचत असलो तरी तेवढीच विकतही घेतो आणि दुसऱ्यांनाही फुकट वाचायला देतो. त्यामुळे वाचन चळवळीत माझा फुकटचा वाटा तसा मोठाच म्हणा..

तर हा फुकटचा प्रपंच पुढे नेऊ या... 

या फुकटच्या प्रपंचाला आज द. मा. मिरासदारांची आठवण कारणीभूत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १९२७ मध्ये जन्मेले द. मा. मिरासदार आपल्याला ऑक्टोबर २०२१ म्हणजे दहाच महिन्यांपूर्वी सोडून गेले. त्यांची साहित्य संपदा खूप मोठी असली तरी फुकट हा कथासंग्रह माझ्या लक्षात राहिला. तोही मी फुकट वाचला म्हणून... या देशाला फुकट्यांची मोठी परंपरा आहे. आम्ही ज्या स्वातंत्र्यात राहतो तेही आम्हाला आमच्या स्वातंत्र्यसेनानींनी फुकटच दिले आहे. निसर्गानेही सर्व गोष्टी आम्हाला फुकटच दिल्यात. एवढेच काय तर पाच-पन्नास लोकांना डोंगुर, झाडी, हाटीलही फुकटच मिळते. देवा शपथ खरं सांगतो, फुकट हा शब्द ऐकूनच मनाला किती हायसं वाटते. काहीही फुकट मिळाले की ते ओरबडल्याशिवाय कोण राहतो?  

आता फुकटाचं एक उदाहरण सांगतो... माझा एक नातलग आहे. (अगदी जवळचा) त्याचे वडील नोकरीत होते. त्यांना नोकरीतून घरी वेळच देता येत नव्हता.  हा गडी त्यांचा ज्येष्ठ चिरंजीव आणि एकुलता एक. आईनेही लाड केले. हा लाडोबा कसाबसा शिकला. नाही शिकला म्हणून नोकरीपासून हुकला. घरी सर्वच सुविधा मिळत असल्याने जीवन अगदी आरामात जगू लागला. पण पाेरगा कामधंदा करत नाही, याची आईवडिलांना सल होती. बायको आल्यावर हा कामधंदा करेल, म्हणून त्याचे लग्नही उरकले. रात्री सज्जा आणि दिवसभर मज्जा, असेच सुरू राहिले. बाप नोकरीतून निवृत्त झाला. ज्येष्ठ चिरंजीव आता तरी काम करतील, या त्यांच्या अपेक्षेची या चिरंजीवांनी उपेक्षाच केली. हे चिरंजीव, त्याची तीन लेकरं, सून आणि आपली पत्नी अशा सात जणांच्या संसाराचा गाडा हा थकलेला बाप निवृत्तीवेतनावर आजही ओढत आहे. चिरंजीवाला लागलेल्या फुकटच्या सर्व सवयी आजही कायमच आहेत...

हिंदीत एक म्हण आहे, "मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन." या म्हणीची तुम्हाला जागोजाग प्रचिती येईल. रेल्वे आणि बसमध्ये अनेक जण फुकट प्रवास करतात.  मित्राच्या पार्टीत फुकट खायला मिळाल्यावर पोट फुटेपर्यंत खाल्ले जाते.  लग्न समारंभात नवरदेव नाही तर नवरीचे नातलग बनून जाणारे आणि तेथे फुकटात येथेच्छ ताव मारणारे हजारोंच्या संख्येने आहेत. एवढेच काय तर एखाद्याची गाडी म्हणजे कार म्हणा की बाईक पेट्रोल न टाकता वापरावयास मिळाली तर त्याचा आनंद मानणारे महाभागही कमी नाहीत. त्याचप्रमाणे दुसऱ्यांनी निर्माण केलेल्या संसाधनांचा, सुविधांचा, वास्तूंचा फुकट वापर करणारेही बरेच आहेत. तुम्ही अशी उदाहरणे शोधली तरी एक दोन नव्हे तर शेकडो उदारहणे सापडतील. तुम्ही राहत असलेल्या सोसायटी किंवा नगरातही अशी उदाहरणे दिसतील. 

मराठीत एक म्हण आहे, "आयजीच्या जिवावर बायजी उदार'. या म्हणीतील बायजी हे नेहमीच आयजींच्या  ताकदीवर, त्यांच्या पैशांवर, त्यांच्या संपत्तीवर, प्रतिष्ठेवर उड्या मारत असतात. आयजींनी आपल्या बुद्धीने, श्रीमाने हे मिळवलेले असते. त्यासाठी त्यांना आपला पैसाही ओतावा लागलेला असतो. पण बायजी हे सर्व माझंच, असे सांगायला थोडंही लाजत नाही. याचाच अर्थ असा की हा बायजी फुकट्याच असतो.. माझ्या बघण्यात असे बरेच बायजी आहेत. त्यांना फक्त स्वार्थ साधायचा असतो. परमार्थाशी तर यांचा दूरपर्यंत संबंध दिसत नाही. आयत्या पिठावर रेघोट्या मारण्यात ते नेहमीच सज्ज असतात. भारतात दिल्लीपासून ते शहरातील सोसायट्यांपर्यंत अशा आयजींचा राबता आहे. त्यांना सर्व काही फुकट हवे असते. आपला पैसा दडवून ठेवत दुसऱ्यांच्या पैशांवर मौज करायची असते. दुसऱ्यांच्या सुविधांचा लाभ घेताना हे बायजी बनतात. निर्लज्जपणे आणि उजळमाथ्याने देशभरात आणि शहरात वावरतात. अशा फुकट्यांना निर्लज्ज असेही म्हणता येईल. माझ्यासारखे फुकटे अगदी गल्लोगल्ली आणि सोसायट्यांतही आहेत बरं का!
.. समाप्त...

वैधानिक इशारा : फुकटाची सवय नसलेल्यांनी मनाला लावून घेण्याची गरज नाही. 

चला तर तुमचं फुकट विषयावर आणखी मनोरंजन..

पुढील लिंक कॉपी करून जरूर बघा...

https://www.youtube.com/watch?v=vJT_3OU2D3I

https://www.youtube.com/watch?v=eGq7Hnn8voc

अंधभक्ती

देशी अप्सरांसाठी इंद्रपुरीतून खाली उतरलेल्या राजा इंद्राने पृथ्वीवरआटपाटनगरात स्थापन केलेले राज्य चांगले  सुरू होते. त्याचे  पृथ्वीतलावर आपल...