रात्रीचे आठ वाजले होते. घरासमोर अलिशान कार येऊन थांबली. मी आपला स्वयंपाकात मग्न होतो. माझी पत्नी कुठं तरी बाहेरगावी गेली होती. ती नेमकं कुठं गेली होती हे मात्र आठवत नव्हतं. त्यामुळं पोळ्या लाटण्याची माझी बारी होती. किशोरदाचं 'मेरे सपनों की रानी कब आयेगी तू' हे गाणं भसाड्या आवाजात गुणगुणत माझं कुठल्या तरी विचित्र देशाचा नकाशा बनत चाललेल्या पोळीला एखाद्या गोल बेटाचा आकार देण्याचा माझा नेटानं प्रयत्न सुरू होता. ती वेळ रात्रीचीच होती. अचानक माझ्या घरासमोर एक वाहन येऊन थांबलं. त्या वाहनचालकानं करकचून ब्रेक दाबल्यानं टायरचा जो विव्हळण्याचा आवाज आला त्यावरून ही कारच असावी, याचा पुसटसा अंदाज मला आला. मी दारापर्यंत जाण्याआधीच दरवाजा जोरजोरानं वाजू लागला. बहुतेक आलेल्या व्यक्तीचा दार तोडून आत येण्याचा विचार दिसत होता. ' आलो रे बाबा... आता काय गरिबाचं दार तोडतो की काय?' असे रागीट उद्गार माझ्या तोंडून आपोआपच निघाले. मी लगबगीनं दारापर्यंत पोहोचलो. नसतो पोहोचलो तर 'दरवाजा ठोठावणाऱ्या व्यक्तीच्या अंगात सीआयडी सिरियलमधला दया शिरण्यास वेळ लागला नसता, याची पूर्ण कल्पना मला आलेली होती. मी दार तुटण्याच्या भीतीनं घाईतच दार उघडलं. बघतो काय तर समोर रंगनाथ पाटील उभा होता. आता हा रंगनाथ पाटील म्हणजे कुठला पिळदार मिशा, जबरदस्त व्यक्तीमत्त्वाचा धनी वगैरे कुणी नव्हता. त्याच्या बापजाद्यांना सरकारने गावचा पाटील म्हणून नियुक्त केलेलं होतं. घरची पिढीजात श्रीमंती होती. म्हणून हा माजलेला पाटील. होता माझ्याच नात्यातला. पण हे नातं कुठून, कसं याचा मलाही थांग लागलेला नव्हता. वडिलांनी हे बेणं आपल्याच नात्यातून आहे, एवढंच सांगितलेलं होतं. तर हा रंगनाथ साधारणत: वयाच्या तिशीतला. काटक बांधा, वय दिसावं म्हणून बळंच मिशा पांगवलेला. अंगात नेतेमंडळीसारखा पेहराव. एखाद्या धाकड माणसानं ताकदीनं कानपटीत वाजवली तर कपडे आेले व्हावेत, असं हे व्यक्तिमत्त्व.
घरात शिरताच रंगनाथनं आधी माझी मानगुटी पकडली. मला काय चाललंय, हाय होतंय याची पुसटशीही कल्पना नव्हती. 'अरं पाटील काय झालं?' एवढाच माझा प्रश्न होता. त्यानंही 'तो हरामखोर मिलिंद्या कुठं हाय?' असा उर्मठ प्रश्न केला. 'मला काय माहीत?' एवढंच त्याच्या उर्मठ प्रश्नावरील माझं शालीन उत्तर होतं. माझ्या उत्तरावर त्याचं समाधान झालं की नाही माहीत नाही, पण त्यानं माझी मानगुटी सोडली होती.'त्यानं माझ्या बहिणीला पळवून नेलं. साल्याला सोडणार नाही.', असं रागानं फणफणत तो घराबाहेर पडला. कारचा दरवाजा धप्पकन वाजला आणि कार आली तशी भुंगभुंग करत निघून गेली.
पिठानं माखलेल्या हातानंच मी गळा चोळत विचारात गढून गेलो. मिलिंद्यानं त्याची बहीण पळवल्यानं त्या पाटलाचा हात माझ्या मानंपर्यंत पोहोचला होता, याचा उलगडा झाला होता. हा मिलिंद कोण तर माझ्या बहिणीचा मुलगा. पण या गधड्यानं या पाटलाची बहीण कशापाई पळवली, हे कोडं मला सुटत नव्हतं. मी कोड्यात पडण्याचं कारण म्हणजे मिलिंद्याचं लग्न झालेलं होतं. चांगल एक लेकरूही त्याच्या गळ्याला होतं. मग कुठून या कारट्याला ही अवदसा सुचली, म्हणावं असं विचार माझ्या डोक्यात घोळू लागले. कुठल्या तरी करपट वासानं ते विचार खाक झाले. तव्यावर टाकलेल्या पोळीचा कोळसा झाल्यानं माझे विचार जळाले होते. पळतच जाऊन गॅस शेगडीचा कान पिळला. पाटलासारखा तापलेल्या तव्याला बाजूला भरलेल्या टोपल्यातील पाण्यात जलसमाधी दिली. ताव्याने छननन असा आवाज केला अन् तो शांत झाला. पण वाफ पाटलाच्या रागासारखीच कायम होती.
घडलेल्या नाट्यामुळे माझी भूक उडाली होती. शेवटी भानगड काय, याची उत्कंठा प्रचंड शिगेला पोहोचली होती. कधी एकदा बहिणीकडे जातो आणि काय प्रकार आहे, याची खातरजमा करतो, याची मला ओढ लागली होती. दुचाकीच्या कंबरड्यावर खणकन लाथ घालून मी तिच्या घराचा रस्ता धरला. नेहमीपेक्षा माझ्या दुचाकीचा वेग जास्तच होता. तिच्या घरी पोहोचलो. पण तेथील चित्र मात्र 'अगा काही घडलंच नाही' असं होतं. नेहमीप्रमाणे दाजी टीव्हीसमोर होता. बहिणीची सून घरातील सामानाची आवराआवर करत होती. तिचा नातू बंदूक घेऊन ढिशक्यांव ढिशक्यांव करत घरात उड्या मारत होता. माझा चिंताग्रस्त चेहरा पाहून तीच हडबडून गेली. 'काय रे आज असा रात्री तू इकडे कासा काय? ' असा पहिलाच प्रश्न तिनं मला केला. मी थोड्या वेळापूर्वी वाजलेली कॅसेट पुन्हा वाजवली. पण तिच्या चेहऱ्यावर काहीही भाव नव्हते. ना ताण होता ना तणाव. 'आयला हिला तर काहीच वाटत नाहीय', असं मनोमनी म्हणत मी 'तू आधी सांग मिलिंद कुठाय?' असा पहिला प्रश्न केला. 'सकाळीच तर पुण्याला गेला', असं उत्तर तिनं दिलं. तिच्या उत्तरानं मी पुरता गारद झालो होतो. 'बरं ठीक आहे. काय झालं ते मी बघतो', एवढंच पुटपुटून मी तिच्या घरातून बाहेर पडण्यासाठी वळलो. 'अरे खरं सांगना..काय केलं मिलिंदनं. तू खरं बोलतोय ना..' असं ती म्हणत असतानाच मी तिचं घर सोडलं. खरं काय अन् खोटं काय, मला तरी कुठं माहीत होतं.
मी पुन्हा घरी आलो. दार लावलं. पोटात कावळे ओरडत असल्याची जाणीव झाली. पण त्या पाटलानं डोस्कं फिरवून टाकलं होतं. माझ्या मानगुटीपर्यंत त्याचा पोहोचलेला हात मला माझ्या पुरुषत्वाला मोठं आव्हान देणारं ठरलं होतं. पण साला तो कुत्रा बापानं सांगितलं म्हणून नात्यातला होता. नाही तर त्याचा अफजल खानासारखा कोथळा मी कधीच बाहेर काढला असता. पण खरं काय नी खोटं काय, याचा पुरता उलगडा झालेला नव्हता. त्यामुळं करावं तरी काय? असा यक्ष प्रश्न आ वासून मला सतावत होता. याच विचारात मी पाठीच्या कण्याला आराम म्हणून खुर्चीवर लांब तंगडे करून पसरलो. कुणी तरी आजूबाजूला असल्याचा भास झाल्यानं मी भानावर आलो. बघतो तर काय साक्षात मिलिंद माझ्या समोर उभा होता. त्याच्या शेजारी पंचवीस-सव्वीस वर्षाची तरुणी उभी. दोघेही हास्यमुद्रेने माझ्याकडं बघत होते. भुताटकी वाटावी तसा मी ताडकन खुर्चीतून उठलो. 'अरे मिलिंद तू...' एवढेच शब्द माझ्या तोंडून फुटले. 'रिलॅक्स मामा..काय झालंय. तुम्ही एवढं टेन्शनमध्ये का?' असा प्रतिप्रश्न त्याने उच्चारला. त्याच्या या प्रश्नानं मात्र माझ्या मेंदूला झिनझिन्या आल्या. या गाढवाच्या पेकाटत एक तरी लाथ घालण्याची माझी इच्छा प्रबळ झाली. पण त्याच्यासोबत ती मुलगी पाहून मी आलेल्या रागावर नियंत्रण मिळवलं. एव्हाना पाटलानं माझी मानगुटी का पकडली, त्याचं उत्तर मला मिळालं होतं. मी शांतपणे (शांत कसलं.. शांत होण्याचा प्रयत्न करत) त्याला 'बस बाबा.. कधी आलास,' असं औपचारिकपणे विचारत परत खुर्चीत बसलो. लगेच मूळ मुद्द्यालाच हात घातला. 'ही ती पाटलाचीच बहीण ना?' मी पहिलीच तोफ डागली. 'हो' एवढंच उत्तर मिलिंदनं अगदी शांत चित्तानं आणि हसत दिलं. पण त्याचं हसणं मला एखाद्यानं पोटात सुया टोचावं तसं टोचून गेलं. घरी सुंदर बायको, गोंडस लेकरू असताना या गाढवानं असं शेण खावं, याचा मला प्रचंड संताप आलेला होता. आता मात्र उठून त्याच्या थोबाडात दोन द्याव्यात, असं वाटू लागलं होतं. पुन्हा आवंढा गिळत मी त्याला 'काय झालं ते खरं सांग. नाही तर...' , असा दम भरला. माझा रागाचा पारा ४७ अंश सेल्सियसच्या जवळपास होता. मात्र, मिलिंदचं डोकं महाबळेश्वर किंवा चिखलदऱ्यात असावं. तो तेवढ्याच थंडपणानं माझ्याशी बोलत होता. त्यानं सर्व हकीकत शांतपणे सांगितली.
मिलिंदसोबतची तरुणी त्याची वर्गमैत्रिण होती. अनिता असं तिचे नाव. अकरावीपासून ते ग्रॅज्युएटपर्यंत दोघं सोबतच शिकले होते. जवळपास सहा-सात वर्षे जुनी त्यांची मैत्री होती. ग्रॅज्युएट झाल्यावर मिलिंद बँकेत नोकरी करत होता. नोकरी लागताच घरात सून पाहिजे म्हणून आईवडिलांनी घाईतच त्याला बोहल्यावर चढवलं होतं. वर्षभरातच त्याच्या घरी पाळणाही हलला. संसारही सुखाचा होता. पण मध्येच ही पाटलाची पोर त्याच्या आयुष्यात आली होती. बहरलेल्या संसारवेलीच्या मुळावरच घाव घालावा आणि वेली जागीच सुकून जावी, तसा हा प्रकार होता. तसा मिलिंद भर तारुण्यातच होता. ऐन पंचवीस-सव्वीसाव्या वर्षी तो संसाराच्या जोखडात अडकला होता. आता कुठे त्याला दाट मिसरूड फुटले होते. भावाला उद्योगासाठी कर्ज हवे होते म्हणून अनिता एक वेळ भावासोबत बँकेत गेली होती. तिथं तिची मिलिंदशी भेट झाली होती. आपला वर्गमित्रच बँकेत नोकरीला असल्यानं ती वारंवार 'भाऊ मी पण येते ना तुझ्यासोबत' म्हणत बँकेच्या चकरा वाढवायची. तसं पाहिलं तर सोबत शिकताना या दोघांत केवळ मैत्रीच होती. हे लफडं नंतरचं होतं. अनिता सुंदर असल्यानं मिलिंद नकळतच तिच्या प्रेमात गुरफटला गेला होता. आपण एका लेकराचा बाप आणि सुंदर तरुणीचा पती आहोत, याचा त्याला कसा विसर पडला, हेच त्याला कळलं नव्हतं. कर्जप्रकरणात हे प्रेमप्रकरण वाढत गेलं. पण आता या कर्जप्रकरण आणि प्रेमप्रकरणापोटी अख्ख्या कुटुंबाला पश्चातापाचे चक्रवाढ व्याज भरावे लागणार होतं, एवढं मात्र पक्कं होतं.
रात्रीचे साडेअकरा वाजले होते. मिलिंदचे प्रेमप्रकरण ऐकत असतानाच पुन्हा सीआयडीतला दया दारावर पोहोचला होता. या वेळी दार नक्कीच तुटणार याची खात्री पटली होती. रंगनाथच दारावर होता, हे निश्चित होतं. त्यामुळं पळत जाऊन दार काढणं मला जमणारं नव्हतं. या दोघांना लपवावं की त्या माजेल रंगनाथसमोर उभं करावं, असा मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा होता. शेवटी दार तुटलंच. रंगनाथ आणि त्याच्या तीन मित्रांचा घोळका मिलिंदच्या अंगावर धावून आला. हा प्रसंग मला पुन्हा अभिमन्यूसारखा चक्रव्युहात टाकणारा होता. रंगनाथचे मित्र शिव्यांची पुष्पांजली वाहत मिलिंदवर तुटून पडले होते. अनिताचा आक्रोश सुरू होता. शेजारी-पाजारी खडबडून उठले. जमेल तसं घरात डोकावून पाहण्याच्या प्रयत्नात होते. दाेघे-तिघे हिमतीने घरातही शिरले. घरातील परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यांनी शेपूट घालून बाहेर जाणं पसंद केलं. मिलिंदचा बचाव करावा की त्यांच्याशी दोन हात करावेत, असा अभिमन्यूला म्हणजे मला प्रश्न होता. शेवटी मिलिंदला जास्त मारहाण होत असल्यानं माझ्या रागाच्या पाऱ्यानं थर्मामीटर कधीच वितळून गेलं होतं. मिलिंदचाही प्रतिकार सुरूच होता. त्यानं एकाची बत्तीशी मोजली होती. किंबहुना एक दात वजाही केला होता. हे बघून माझ्यात हत्तीचं बळ आलं होतं. तीन तासांपूर्वी रंग्यानं माझी मानगुटी पकडली होती, त्याचा राग मनात होताच. पहिली लाथ मी रंग्याच्या छाताडावर घातली, तसा तो चार-पाच फुटापर्यंत मागे जाऊन कोसळला. रंग्या आडवा झाल्यानं त्याचे चमचे गांगरले. त्यांचे मिलिंदवर पडणारे हात थांबले. रंग्या पुन्हा उठला. 'हे बघा मामा तुम्ही मधे पडायचं काम नाही. परिणाम वाईट होतील.', असा दम त्यानं भरला. पण मी काही अशा मेंगटाडाला घाबरणाऱ्यांपैकी नव्हतोच. 'ये भडव्या इकडं. माझ्या घरात खुनखराबा करायला निघाला. मी काय हातात बांगड्या घातल्यात का साल्या?' अशी गर्जना करताच सगळेच चपापले. 'या मिलिंद्यानं माझी भैन पळवली. याला तर मी खतम करणार', अशी वल्गना त्यानं केली. 'मी जिवंत असेपर्यंत कोणी त्याच्या अंगाला हातही लावला तर त्याचा मुडदा येथंच पाडीन.. अन् येथंच गाडीन' अशी दुसरी डरकाळी मी देताच सर्व जण जागीच पुतळा झाले. भीतीनं थरथर कापणारी अनिताही आर्श्चयचकित होऊन माझ्याकडं प्रचंड अपेक्षेने टक लावून बघू लागली. शिव्या ओकणारी रंगनाथ आणि त्याच्या मित्रांची तोंडं चर्चेला तयार झाली. 'मामा तुम्हीच सांगा.. यानं माझी भैन पळवली. याची मी काय पूजा करू का? ' असा पहिला प्रश्न रंग्यानं केला. 'हे बघ रंग्या..माझी मानगुटी पकडण्याआधी तू मला हा प्रकार नीटपणे का सांगितला नाहीस. चक्क खून खराबा करायला निघालास. काही तरी मार्ग निघंलच ', असा अश्वासित दिलासा देताच रंग्या पूर्णपणे भानावर आला. आम्ही सर्व जण शांततेनं या भानगडीवर तोडगा काढण्यासाठी बसणार तेवढ्यात माझ्या डोक्यावर काही तरी जड वस्तूचा प्रहार झाला. डोळ्यांसमोर काजवे चमकले अन् मी शुद्ध हरवून बसलो.
तासाभराने मी शुद्धीवर आलो. मी फरशीवर अाडवा पडलो होतो. शेजारीच रक्त सांडलेले होते. डोक्याला जबर मार होता. ते सुन्न पडले होते. कसाबसा सावरून उठलो. घरात कोणीच नव्हते. शेजारीपाजारीही घराला कड्या लावून झोपेच्या सोंगात रमले होते. बहुदा मी मेलो समजून कोणीही दवाखान्यात नेण्याची तसदी घेतलेली नव्हती. वर पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून सर्वांनी अंगावर पांघरूण घेतले असावे. भिंतीवरल्या घड्याळीने दोन ठोके दिले होते. मी पूर्ण शुद्धीवर आलो होतो. मिलिंद, अनिताचं काय झालं असावं, असा पहिला प्रश्न डोक्यात घोळू लागला. रात्रीचे दोन वाजले होते. आजूबाजूला बघितले. इतर कोठेही रक्ताचे डाग नव्हते. त्यावरूनच अनिता व मिलिंद सुखरूप असावेत, अशी स्वत:ची समजूत घातली. घटना बहिणीला आणि पोलिसांना कळवली पाहिजे, या निर्णयाप्रत पोहोचलो. टेबलावरचा मोबाइल उचलून पहिल्यांदा बहिणीला कॉल केला. रिंग वाजत होती. पण कोणीही उचलला नाही. बहीण फोन उचलेना म्हणून दाजीचा नंबर डायल केला. पण तेही फोन उचलेनात. वारंवार दोघांचेही फोन लावून बघत होतो, पण प्रतिसाद काही मिळेना. आता पोलिसांना कळवावं असा विचार केला. पण कोणत्याच पोलिस ठाण्याचा नंबर मोबाइलमध्ये नव्हता. शेवटी शंभर नंबर आठवला. तो पोलिस नियंत्रण कक्षाचा असतो, हे पक्कं माहीत होतं. १०० नंबर डायल करताच तत्काळ फोन उचलला गेला. 'हॅलो पोलिस कंट्रोल रुम...' पुढून आवाजा आला 'बोला कोण बोलतंय' 'मी दिलीप पाईकराव बोलतोय.. प्रतापनगरहून' मी पत्ता सांगितला. 'कोणते प्रतापनगर.. कोण हवेय तुम्हाला' पुढून आवाज आला. 'पोलिस कंट्रो रूमचाच नंबर आहे ना हा' मी शहानिशा केली. 'अगदी बरोबर.. पण तुम्ही कुठून बोलताय. प्रतापनगर.. कुठले प्रतापगनर.. तुमचे पोलिस ठाणे कोणते?' अशा अनेक प्रश्नांची त्या पोलिसाने विचारपूस केली. मी म्हणालो 'अहो उस्मानपुरा ठाणे.. प्रतपानगर.' समोरच्या पोलिसाने 'साहेब.. अख्ख्या शहरात उस्मानपुरा, प्रतापनगर नाही हो.. तुम्हाला कोण पाहिजे. एवढ्या रात्री कशाला फोन केलाय. ' अशी विचारणा केली. मी सर्व हकिकत त्याला सांगितली. शेवटी त्यानं 'साहेब.. तुमचं खरंय.. पण अख्ख्या पुण्यात उस्मानपुरा पोलिस ठाणं आणि प्रतापनगर मी ऐकलं नाही हो' असं उत्तर देताच माझी ट्यूब लाईट पेटली. 'अरे बापरे फोन पुण्याला लागला की काय?' अशी मी विचारणा करताच त्याने 'हो' असे उत्तर दिलं. 'तुम्ही कोणत्या गावारून बोलताय?' असा प्रतिप्रश्न समोरच्या पोलिसानं केला. तेव्हा मी 'औरंगाबाद' असे उत्तर देताच त्यानं 'साहेब औरंगाबादच्या कंट्रोल रुमला फोन लावाना.. माझा वेळ कशासाठी घेताय?' असा प्रश्न करून रिसिव्हर ठेवला. मी मात्र आणखी पेचात पडलो. साला हा पुण्याचा नंबर कसा लागला? पण ती वेळ या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची नव्हतीच. मी कसाबसा स्वत:ला सावरत मोडक्या दारातून घराबाहेर पडलो. दुचाकी घेऊन थेट बहिणीचे घर गाठले.
अंगणात दुचाकी उभी करून झपाझप पायऱ्या चढत बहीण राहत असलेल्या वरच्या मजल्यावर चढलो. पाहतो तर बहिणीच्या घराला मोठे कुलूप लागलेलं होतं. एवढ्या रात्री हे लोक गेले तरी कुठे? असा प्रश्न पडला. हताश होऊन जिन्याच्या पायऱ्यांवर बसलो.
पुन्हा डोकं जड पडू लागलं. अंगातलं हत्तीचं बळ कधीच गळून पडलं होतं. सर्व अवसान गेलं होतं. मिलिंद, अनिता, रंग्या, त्याचे तीन मित्र सगळेच डोळ्यांसमोरून तरळून जात होते. रंग्याचं कुचित हसणं कानावर येत होतं. मिलिंद मोठ्यानं 'मामा... मामा..मला वाचवा ' असं ओरडत होता. अनिताचा जोरजोरानं किंचाळण्याचा आवाज कानावर पडत होता. तेवढ्यात 'अहो तुम्ही चहा घेणार का? उठा.. ब्रश करा', असा धर्मपत्नीचा आवाज कानी पडला अन् सैराट स्वप्नाचा 'दि एन्ड' झाला.