१९७९ सालची ही गोष्ट. तेव्हा मी आठ -नऊ वर्षांचा असेल. जयदेव पहाटंच झोपेतून उठला तसा त्यानं रेडिओचा कान पिळला. रेडिओनं खर्रर्रर्र असा आवाज देऊन सुरात गायला सुरुवात केली. गाणं एैकतच त्यानं एका हाता टमरेल आणि दुसऱ्या हातात रेडिओ घेऊन हागणदारी गाठली. गाण्याच्या तालावर त्याचा पोट साफ करण्याचा कार्यक्रम बराच वेळ सुरू होता. दोन गाणी ऐकेपर्यंत त्याने हे सुखद क्षण अनुभवले. जीव हलका झाल्यावर धोतराची गाठ बांधून तो गावात परतला. तोपर्यंत रेडिओवर बातम्यांची वेळ झाली होती. 'ये विविध भारती है, अब आप थोडी ही देर में समाचार सुनेंगे' असं रेडिओतल्या बाबानं सांगितल्यानंतर १५ ते २० सेकंद रेडिओ 'टूक टूक टूक' असा सूर लावून बसला नि त्यानंतर दिल्लीतला बाबा घोगऱ्या आवाजात सपाटून बातम्या वाचू लागला. पहिलीच बातमी त्याला चक्रावून सोडणारी ठरली. तसा जयदेव फार शिकला सवरलेला नव्हता. तो हिंदी बोलताना एखाद्या हिंदी साहित्यिकानं ऐकलं तर एक तर त्यानं कपडे फाडून घ्यावे, नाही तर डोकं गरागरा फिरून तो बेशुद्ध तरी व्हावा. जयदेवला हिंदी बोलता येत नसलं तरी काही हिंदी सिनेमे बघितल्यानं त्याला हिंदी नाही म्हटलं तरी ९० टक्के कळत होती. रेडिओतल्या बाबानं सांगितल्यानुसार अमेरिकेच्या नासानं अंतराळ संशोधनासाठी अवकाशात स्थापित केलेली स्कायलॅब ही अंतराळ प्रयोगशाळा आपल्या कक्षेतून घसरल्यानं ती पृथ्वीवर कोसळणार होती. ही स्कायलॅब कधी, कोठे आणि कोणत्या शहरावर पडणार, याचा काहीच नेम नव्हता. त्यामुळे भारतावर हे मोठेच संकट असल्याचा त्या बातम्या सांगणाराचा सूर होता. हे बातमीपत्र जयदेवसह गावातल्या काही तरुणांनी एकलं अन् चर्चा सुरू झाली हे स्कायलॅब आपल्याच गावावर तर पडणार नाही ना, याची!
दोन-चार दिवस रेडिओवर हीच बातमी तेल-मीठ लावून सांगितली जात होती. त्यामुळं गावकऱ्यांत मात्र या स्कायलॅबची मोठीच दशहत निर्माण झाली. काही मंडळींच्या लेखी हे जगबुडीचंच लक्षण होतं. आता हे जग फार काळ राहणार नाही. आपण सगळेच मरणार, इथपर्यंत लोकांची विचारशक्ती जागृत झाली. दररोज कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून अफवांचं पीक उगवू लागलं. तसतशी लोकांतील भीती वाढू लागली. उठता, बसता लोकांच्या मस्तकात स्कायलॅबच घिरट्या घालत होता. आता सगळ्यांचं मरण निश्चित या निष्कर्षापर्यंत गावकरी पोहोचले होते. मग मरायचंच तर खाऊन मरू, अशी भावना प्रत्येकाच्या मनात बाळसं धरू लागली होती. १९७० मध्ये प्रदर्शित राजकुमार आणि प्रिया राजवंश यांच्या 'हीर रांझा' या चित्रपटातलं 'ये दुनिया, ये महफील मेरे काम की नही', या गटातले काही गमभरे गाणेही अनेकांच्या ओठी रुळू लागले. दुखण्याला वैतागलेल्या म्हाताऱ्या 'आता देवच मरण देणार' असं म्हणत होत्या. तरुणाई मात्र प्रचंड धास्तावलेली होती. गावात जे काही दोन-तीन प्रेमीयुगुलं होती, त्यांनी आता आपण जगू तर सोबतच अन् मरू तर सोबतच, अशा पटापट शपथा खाऊन टाकल्या. कधी मटण-मांसाला हात न लावणारे किलो-किलो मटण घरात आणून शिजवू लागले. ज्यांनी अगदी खायचंच नाही, असं ठरवलं त्यांच्या घरात पुरणपोळीसाठी पुरण खदखदत होतं. एकमेकींकडे ढुंकून न पाहणाऱ्या सासू-सुनांचं प्रेम ऊतू चाललं होतं. एकमेकांच्या उरावर बसून हाणामारी केलेले कारटे 'जाऊ दे ना लेका. आता आपण मरणारच हाव. कामून भांडायचं', असं म्हणत दोस्तीचा प्रस्ताव मांडत होते. एकूणच काय तर या स्कायलॅबनं भारतभर एकोपा निर्माण केला होता. एखाद्या तरुणानं आपण लाइन मारत असलेल्या मुलीला तेव्हा ताई किंवा बाई म्हटलं तरी नवल वाटलं नसतं, असं वातावरण होतं.
आपण सगळेच मरणार, असा सर्वांचा ठाम समज झाला असला तरी सर्वांनाच जगण्याची ओढ मात्र अधिक होतीच. देव न मानणाऱ्यांचा देवावर विश्वास बसू लागला होता. हे ब्रम्हांड देवानंच निर्माण केलं अन् तोच आता ते नेस्तनाबूत करणार, असा अनेकांना साक्षात्कार झाला. मरणार म्हणून काही देवमार्गी लागले तर काही खाऊन पिऊन घेण्याच्या मार्गी होते. गावालगतच्या ओढ्यावर असली मोहाची दारूही गाळणं सुरू होतं. अनेक जण ढोसून लोळताना दिसू लागले. दारू गाळणाऱ्यांनी कधी नव्हे ते फ्री सर्व्हिस देऊ केली होती. म्हणून पिणारेही 'आपल्या काय बापाचं जातंय' म्हणून सोमरसात न्हाऊन निघत होते. देवमार्गी मंडळी रात्ररात्र टाळ कुटत बसू लागली. यातून देवच तारणार, असा त्यांचा ठाम विश्वास होता.
एकदाचं त्याच रेडिओनं सांगून टाकलं की स्कायलॅब ११ जुलै रोजी पृथ्वीवर कोसळणार. बस्स.. सगळ्यांची पाचावर धारण. आज सर्वांचा मृत्यू अटळ, अशी सगळ्यांचीच धारणा. दिवसभर सर्वांचे डोळे आभाळाकडं होते. अधूनमधून रेडिओचा कान पिळला जायचा. तो काय सांगतो, याची भीतीयुक्त उत्सुकता होती. मास्तरही गावात आला नाही. शाळंला अघोषित सुटी होती. रात्रभर टाळ कुटणारे दिवभर त्याच कामात पुन्हा रमले होते. खाणारे पिणारे पोट फुटायला येईपर्यंत खाऊ लागले. एक एक मिनिटाचा ठोका सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवत होता. दिवस गेला. पुन्हा रात्रीचं खाऊन पिऊन लोक अगा काहीच झालं नाही, म्हणत गोळप्याने रेडिओभाेवती जाऊन बसले. कुणी पारावर तर कुणी शाळंच्या पटांगणात जाऊन बसले. अनेक जण दगडाच्या भिंती असलेल्या घरात दडून बसले. रात्री स्कायलॅब पडली तर आपण वाचू, असा त्यांचा समज. एकदाची रात्र झालीङ रेडिओतला बाबा पुन्हा बडबड करू लागला होता. मायबापाचा शब्दही न ऐकणारे श्वास रोखून तो बाबा काय सांगतो, हे कान टवकारून ऐकू लागले. भारतावरील संकट एकदाचं टळलं, असं त्या बाबानं सांगताच म्हाताऱ्या कोथाऱ्यापासून ते शेंबड्या लेकरापर्यंत सर्वच उड्या मारू लागले. काहींना तर गहिवरून आलं. त्यांनी आनंदाश्रूंना वाट करून दिली. भरकटलेली ही प्रयोगशाळा एकदाची हिंद महासागरात पाडण्यात शास्त्रज्ञांना यश आलं होतं. त्यामुळं लोकांचा जीव आनंदात पडला होता.हुश्श वाचलो बुवा, एवढीच सगळ्यांची प्रतिक्रिया होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा