शुक्रवार, २० जुलै, २०१८

एक अधुरी प्रेमकहाणी (अंतिम भाग)

आज स्वत:च्या लग्नाचा विषय भावाकडे बोलून दाखवायचाच, अशी दिनेशची मनाची तयारी झाली होती. 'लग्न करायला निघालास.. काही कामधंदा करतो का? तिला काय खाऊ घालशील? लग्नासाठी कुणाकडं पैसा आहे?' इत्यादी इत्यादी प्रश्न भाऊ विचारणारच, याचीही दिनेशला जाणीव होती. पण छायाचं प्रेम मिळण्यासाठी हा विषय बोलावा तर लागणारच होता. नोकरी, कामधंदा, पैसा या गोष्टी त्याला लगेच मिळणार नव्हत्या. पण आता कुठं छायाचं प्रेम मिळालं होतं. तिला गमावण्याचा विचारच तो करू शकत नव्हता.  काही तरी मार्ग निघेल, अशी त्याला आशा होती.
'दादा मला तुमच्याशी काही बोलायचंय!' पेपर वाचण्याच्या तंद्रीत बुडालेल्या बंधराजांसमोर उभा राहत दिेनेश पुटपुटला. काहीच न बोलता दादांनी पेपर तोंडापासून बाजूला करत दिनेशवर एक कटाक्ष टाकून ते पुन्हा पेपर वाचनात रमले.
'दादा मी काय म्हणतो..' दिनेशला शब्द फुटत नव्हते.
'बोलना..' दादा पेपरवर नजर फिरवत बोलले.
'त्याचं काय की मी..छ..छ..छ..' दिनेशची जीभच जड पडली होती.
'काय छ..छ.?' दादांनी प्रश्न केला.
'ती छ..छ.. छाया नाही का..ती की नाही मम मम...'
'अबे काय छछ मम लावलयेस.. नीट बोलना गाढवा. काय झालं छायाला.. ?' दादांचा आवाज उंचावला होता.
'काही नाही तिच्या घरी चलता का? रामराव काकांनी तुम्हाला बोलावलं!' दिनेश थाप मारून मोकळा झाला.
'कशाला?' दादांचा प्रतिप्रश्न.
मला माहीत नाही.. पण बोलावलं... नाही बोलावलं. दिनेशचं हो-नाही सुरूं होतं.
'मला कोणीच नाही बोलावलं दिन्या...तुलाच ती कारटी आवडते ना. हे बघ.. मी सांगतो ते नीट ऐक. नसत्या भानगडीत पडू नको. अरं लेका तू आहेसच केवढा?' दादाला दिनेशचा सर्व इतिहास माहीत होता.
'पण दादा ती मलाही आवडते..' दिनेश घाबरतच बोलला. दोघा भावांचं बोलणं भावजय आतून कान देऊन ऐकत होती.
'बघा बघा... मी सांगितलं होतं ना तुम्हाला!' मधूनच वहिणींनं सूर लावला होता.
'ए बाई तू तुझं काम कर.. मी आहे ना इथं!' दादानं वहिणीला एकाच आवाजात गप्प केलं.
'बरं आवडते.. मग काय?' दादाचा प्रश्न.
'तिचे वडील लग्न करताहेत तिचं!' दिनेश चिंतेच्या सुरात बोलला.
'कुणाशी.. तुझ्याशी का?' दादा कोड्यात बोलले.
'एक मास्तर आहे..!' दिनेशचं एका वाक्यात उत्तर.
'मग तुला करायचं का तिच्याशी?' दादा दिनेशच्या मनातलं बोलला होता.
'हो' दिनेशचं एका शब्दात उत्तर. दादांनी दिनेशला पायाच्या बोटापासून ते डोक्याच्या केसापर्यंत न्याहाळलं.
'लग्न म्हणजे तुला गंमत वाटली का?' दादा म्हणाले.
'तिला काय खाऊ घालशील, कुठं ठेवशील, तुला नोकरी आहे का? किती कमावतोस? असे संगळे प्रश्न तुम्ही मला विचारणार आहात, हे मला माहीत आहे दादा. पण दादा ती मला खूप आवडते हो..' दिनेश अगदीच धीटपणे बोलला.
'म्हणजे तुझा निर्धार पक्का.. छायावरच मारला शिक्का! असं एकूण आहे तर..' दादा शांत होत म्हणाले.
'हो दादा..' दिनेशचं तडकाफडकी उत्तर.
'लेका तुला कळत नाही.. ती पोरगी चांगली आहे मलाही मान्य.. पण तुझं अजून कशात काहीच नाही. ग्रॅज्युएटही झाला नाहीस. नोकरी नाही. दुसऱ्याचं लेकरू कशाच्या बळावर घरात आणायचं. बरं घरात मी एकटा नोकरीवाला. तुझ्यासकट माझ्या लेकरांचं शिक्षण, सुखदुख, मायबापही माझ्याकडंच.  यातच माझ्या पगाराची वाट लागते. त्यात तू घरात बायको आणलीस तर तिचंही मीच  करायचं का?' दादा अगदी सरळ आणि स्पष्ट बोलत होते. दिनेशलाही त्यांचं बोलणं पटत होतं. पण त्याच्याकडे नोकरी करण्याचा आणि सेटल होण्यासाठी वेळच नव्हता. मायाच्या प्रकरणात पोळून निघाल्यानं रामरावांनी छायाच्या लग्नाची घाई केली होती. चार महिन्यांच्या आत हालचाली केल्या नाही तर छायाच्या प्रेमाला मुकावं लागणार होतं. 'इकडं आड तिकडं विहीर' अशा कचाट्यात दिनेश सापडला होता. अभिमन्यूसारखा तो च्रव्युहात अडकला होता. त्याला चक्रव्युहात प्रवेश तर करता आला.   पण त्यातून सुखरूप बाहेर येण्याचा मार्ग सापडत नव्हता.
'रामराव-आशाबाईंना माहीत आहे का तुमचं हे अजब प्रेम?' पुतळा बनलेल्या दिनेशला दादानं खोदून विचारलं.
'रामराव काकांना नाही पण काकूंना थोडीशी शंका आली आहे.' दिनेशनं स्पष्ट केलं.
'एक काम करू.. उद्या मी, बापू आणि तू जाऊयात तिच्या घरी.. बघू काय होतं ते!' दादानं दिनेशला दिलासा देत एकदाची रामरावांशी चर्चा करण्याची तयारी दाखवली. तसा दिनेशचा चेहरा खुलला. पुढे काय होणार, याचं भविष्य तूर्तास तरी कोणी सांगणारं नव्हतं. पण चार दिवस उलटूनही दादांचा 'उद्या' उगवला नव्हता.
 रविवारचा दिवस होता. सकाळीच अवकाळी पावसाचा शिडकावा येऊन गेला. दिवसभरातून मोठं वादळ उठण्याची लक्षणं होतं. दादांनी आॅफिसला सुटी टाकली होती. त्यांचा बेत काय होता हे कुणालाही ठाऊक नव्हता. पाऊस थांबताच ते कामानिमित्त घराबाहेर पडले. तासाभरातच ते घरी परतले. जेवण करून त्यांनी दिनेशला आवाज दिला. परीक्षा आटोपल्यानं तो थोडासा रिलॅक्स झाला होता. पण नोकरी करावा की एखादा छोटा-मोठा व्यवसाय, याचा विचार त्याच्या मनात घोळत होता.  जीवनसाथी मिळवण्यासाठी नोकरी किंवा व्यवसायाची साथ तर अावश्यक होती. दादांनी आवाज दिल्यानं तो काळजीतून बाहेर आला.
'काय दादा..' भावाला सामोरे जात दिनेश उत्तरला.
'आज आपण तिघं दुपारी रामारावांच्या घरी जाऊयात.!' दादांनी अनपेक्षितपणे दिनेशसमोर प्रस्ताव मांडला.
'कोण कोण?' दिनेशचा तातडीचा प्रश्न?
'अरे बापूंना घेऊन जाऊयात..' दादांनी स्पष्ट केलं. तसे दिनेशच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलं. कारण दिनेशला वहिणी सोबत नकोच होती. चांगल्या कामात वहिणी बिब्बा घालण्यात माहीर होती. तसंही दिनेशचं आणि वहिनीची फारसं जमत नव्हतं. वहिनी येणार नाही, हाही दिनेशला मोठा दिलासासच होता.  दादांनी दिनेशच्या मनाप्रमाणेच करण्याचं ठरवलं होतं. 'अब मंजिल दुर नही'चा आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता. त्याला प्रतीक्षा होती ती दुपार होण्याची.
दिनेश वडील आणि भावासोबत रामरावांच्या घरी पोहोचले. तसं त्या दिवशी छायाच्या घरी प्रसन्न वातावरण होतं. नेहमी तणावात राहणारे रामराव आज हसतमुख दिसत होते. त्याचं कारणही तसंच होतं. येऊन गेलेल्या पाहुण्यांनी सायंकाळी बैठकीला येत असल्याचा निरोप धाडला होता. लवकरच मुलीच्या  लग्नाची तारीख पक्की होणार याचा रामरावांना आनंद वाटत होता. मात्र या प्रसन्न वातावरणाही छायाच्या जिवाची घालमेल सुरू होती.  दिनेशच्या कुटुंबीयांना पाहून तर रामरावांना आश्चर्याचा धक्का बसला.
'या या मधुकरराव...आज अचानक आणि तिघंही!' रामरावांच्या तोंडून शब्द उमटले.
'आलो होतो तुम्हाला भेटायला', दादांनी म्हणजे मधुकररावांनी स्पष्ट केलं.
'आज आमच्याकडं काय काम काढलं बुवा?' प्रश्नार्थक चेहरा करीत रामरावांनी विचारलं.
'बरं बसा..' म्हणत रामारावांनी आशाबाईंना आवाज दिला. आशाबाई स्वयंपाक खोलीत नेहमीच्या कामात गुंतल्या होत्या. रामारावांनी आवाज देताच त्या पुढच्या खोलीत आल्या. तिघांना अचानक बघून त्यांच्याही चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले.
'अरे बापरे.. आज तिघं!' आशाबाईंनीही आश्चर्यानं विचारलं.
'या लेकरांसाठी यावं लागलं!' मधुकररावांनी कोड्यात उत्तर दिलं होतं.
'म्हणजे?' रामरावांचा प्रतिप्रश्न.
'सांगतो सगळं... तेच तर बोलायला आलो आज तुमच्याकडं!' म्हणत दादांनी बोलायला सुरुवात केली.
'त्याचं काय रामराव साहेब... तुमची छाया आणि आमचा दिनेश हे दोघं एकमेकांना पसंद करतात. गेल्या काही दिवसांत यांची जोडी चांगलीच जमली बघा. कदाचित तुम्हाला यातलं काही माहीत नसेल. पण माझ्या सगळं कानावर आलं आहे. या दोघांनी लग्न करायचं ठरवलंय!' दादांनी आपलं वाक्य पूर्ण केलं.
'काय बोलताय तुम्ही मधुकर साहेब.. हे कसं शक्य आहे?' रामरावांना मायानंतरचा छाया प्रकरणानं दुसरा धक्का बसला होता.
'शक्य अशक्य मला माहिती नाही.. तुम्हीच विचारा या दोघांना..' म्हणत दादांनी चेंडू टोलावून लावला. त्याचवेळी रामरावांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट जाणवत होता. पण दादा आणि त्यांच्या वडिलांसमोर त्यांनी तो व्यक्त होऊ दिला नाही.
'हे तर वेगळंच घडतंय.. अहो मधुकरराव आज हिचं स्थळ आम्ही पक्कं करणार आहोत. चांगलं सोईरपण भेटलं आम्हाला. मुलगा शिक्षक आहे. तुम्ही मध्येच हे काय आणलंय?' रामराव आपल्या रागाला आवर घालत बोलले.
'तुमच्याकडं काय सुरू होतं हे मला कुठं ठाऊक होतं. पण दिनेशला छायासोबत लग्न करायचं आहे. म्हणून हा प्रपंच तुमच्यासमोर मांडतोय. तुम्हाला काय म्हणायचं तेवढं कळू द्या.' दादा नम्रतेनं बोलले.
'हो तुमचं खरंही असेल.. पण आता ते शक्यच नाही मधुकरराव..आम्ही हिची सोयरिक जमवलीय. आज पाहुणे पुढचं पक्कं करण्यासाठी येताहेत. नाही नाही... हे जमणारच नाही!' रामरावांनी दुसऱ्यांदा नकारघंटा वाजवली.
'हे बघा.. या दोघांचं प्रेम आहे म्हणूनच तर मी इथपर्यंत आलो.. लेकरांचं मन मोडायचं नाही असा माझा विचार..!'
'मी पण तुमच्यासारख्याच विचारांचा आहे मधुकरराव पण.. असं स्थळ पुन्हा हिला भेटणार नाही. बरं दिनेशही दिसायला चांगला आहे. स्वभावही चांगला आहे.. पण साहेब त्याच्याकडं कमाईचं साधन काय? मी आज दिली तुम्हाला मुलगी.. पण त्यांचं पोट कसं भरणार? या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्या अन् सांगा मी काय करायचं ते?' रामराव प्रश्न निर्माण करून शांत झाले.
'मला हे बाबा बरोबर बोलतो असं वाटतं. आता याचं लग्न करायची वेळच नाही. अजून रुपयाही कमावला नाही. लग्न कसं करायचं ?, दिनेशच्या वडिलांनीही रामरावांच्या सुरात सूर मिसळला. दादाही त्या दोघांच्या विचारांशी सहमत होतेच, पण दिनेशची मर्जी राखण्यासाठी त्यांनी हा सगळा प्रपंच घडवून आणला होता. सगळ्यांच्या तोंडून नकारच उमटू लागल्यानं एका कोपऱ्यात बसलेल्या छायाच्या डोळ्यांतून आपोआप आश्रूंचे पाट वाहत होते. दिनेशच्या डोळ्याच्याही कडा पाणावल्या होत्या. घरात बैठक सुरू असतानाच बाहेर वादळी पावसाला सुरुवात झाली होती. या वादळातच या दोघांची स्वप्नं विरत चालली होती. दिनेश कमावता नसल्यानं त्या दोघांच्या लग्नाला कुणाकडूनही सहमती मिळणं अशक्यच होतं. पण तरीही आशावादी दिनेशनं सहमतीसाठी शेवटचा प्रयत्न केला.
'आता नोकरी नाही म्हणून काय झालं? मी काही तरी करेनच ना. रिकामा बसणार नाही. वाट्टेल ते काम करीत पण छायाला कुठल्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही!' दिनेश रामरावांना ग्वाही देत बोलला.
'तू करशील रे काहीही.. पण मी माझी पोरगी बेकार माणसाला का म्हणून द्यायची?' रामरावांनी रागातच दिनेशला फटकारलं. तशी छायानं मध्यस्थी केली.
'बाबा..मला दिनेशशीच लग्न करायचं आहे. त्या मास्तरड्याला येऊ नको म्हणून सांगा', एवढा वेळ शांत बसलेल्या छायाचा संयम सुटला होता.
'थोबाड फोडीन तुझं...' रामराव रागानं लालबुंद होत बोलले. एवढा वेळ शांतपणे सुरू असलेल्या बैठकीला गालबोट लागलं होतं.
'थोबाड फोडा की मारून टाका.. पण मी त्या मास्तरड्याशी लग्न कराणारच नाही...!' छायानं निर्वाणीचा इशारा देताच रामरावांनी जागेवरून उठून छायाच्या कानशिलात लगावली. तशा आशाबाई जागून हलल्या आणि त्यांनी रामरावांना आवरत 'तुम्ही शांत राहा... या कारटीचं डोकं सध्या ठिकाणावर नाही.. तुम्ही उगीच मारझोड नका करू' म्हणत आशाबाईंनी रामरावांना आवरलं. रामरावांनी छायाला मारलं असलं तरी इकडं दिनेशच्या अंगाची रागानं लाहीलाही झाली होती. पण मारहाण करणारा तिचा वडीलच असल्यानं दिनेशला राग गिळावाच लागला. त्यांच्या ठिकाणी दुसरा कोणी असता तर दिनेश असा खुर्चीवर बसून राहिला नसता, हे उघड होतं.
'रामराव तुमचं बरोबर नाही.. का उगीच लेकराला मारलं?' दादा चिडून बोलले.
'हो मारलं.. तुमचं काय गेलं?' चवतळालेल्या रामरावांनी दादांचाही मुलाहिजा बाळगला नाही.
'मारून टाका... आमचं काय जातं?' दादांचं प्रत्युत्तर होतं.
'हे बघा.. मी कुणाचं वाईट करण्यासाठी इथं आलो नाही. तुमच्या पत्नीचं, तुमचं मत काय, हे मला बघायचं होतं. विनाकारण तमशा नको. मला तुमचा स्वभाव माहीत आहे. लकरं अजून नादान आहेत. उगीच काही चुकीचं पाऊल उचलू नयेत म्हणूनही मी आलो. तुमच्या मायानं काय चांगलं केलं? ' दादानं रामरावांच्या मर्मावर बोट ठेवलं होतं.
'तिचा या विषयाशी काय संबंध?' रामराव चिडून बोलले.
'संबंध आहे म्हणूनच तर बोललो.. आमच्या दिनेशनं छायाला पळवून नेलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? हे दोघे अल्पवयीन नाहीत ना?' दादांनी अचूक टोला हाणला होता. यावर रामरावांची बोलती बंद झाली होती. त्यांचं सगळं अवसान गळून गेलं होतं. दादा पुढे बोलू लागले...
'मायासारखं छायानं करू नये म्हणून तर मी इथो आलो रामराव.. काही गोष्टी समजून घ्या.. खरं तर आम्हालाही दिनेशचं लग्न करायचं नाही. पण समोरासमोर बसून या दोघांना परिस्थितीची जाणीव व्हावी, हाही माझ्या येण्याचा उद्देश होता. याला नोकरी लागली की छप्पन पोरी मिळतील. पण त्यांच्या प्रेमाचा सन्मान करायचा होता, हाही एक माझा उद्देश. बाकी तुम्ही अन् तुमची पोरगी काय ते ठरवा...' असं म्हणत जागेवरून उठले. पन पुन्हा जागेवर बसले.
'एक शेवटचं सांगतो... अजून काहीच बिघडलेलं नाही.. माझ्या भावाला वर्ष-सहा महिने लागतील नोकरी लागायला. तुमची ईच्छा असेल तर एवढं स्थळ सोडा हातचं. वर्षभरानं लावून देऊत दोघांचं लग्न!' एवढं बोलून दादा जागेवरून उठले नि तडक बाहेर पडले. वडीलही त्यांच्यो मागे होते. कानाने फारसं ऐकू येत नसल्यानं त्यांनी चर्चेत फारसा सहभागही घेतला नव्हता. छायाकडे एक कटाक्ष टाकत 'येतो गं' म्हणत घरातून बाहेर पाऊल ठेवलं. दारात एक तरुण, दोन महिला आणि तीन पुरुष उभे होते. ते दिनेशच्या परिचयाचे नव्हते. दिनेश त्यांच्याकडे आणि ते दिनेशकडे बघत होते. त्या तरुणाने मात्र दिनेशकडे रागानंच बघितलं. त्यामुळे दिनेशला थोडं अवघडल्यागत वाटलं. पण असतील कोणी रामारावांचे नातलग, असा समज करून दिनेश वडील आणि भावाच्या मागे घराच्या दिशेनं चालू लागला. बाहेरचं वादळ थांबलं होतं. पण दिनेशच्या मनात काहूर माजलं होतं.
रामरावांकडे आलेली पाहुणेमंडळी दुसरे कोणी नव्हे तर छायाचं स्थळ पक्कं करण्यासाठी आलेले पाहुणे होते. तो तरुण तिचा नियोजित वर होता. त्यानं दारावर उभं राहून दिनेश आणि रामरावांच्या कुटुंबीयांचं बरंचसं संभाषण ऐकलं होतं. ही पाहुणे मंडळी आल्याचं कुणालाही कळलं नव्हतं. त्या तरुणानं घरच्यांना बाजूला उभं करून चोरून संभाषण ऐकल्यानं छाया-दिनेशचं प्रकरण चव्हाट्यावर आलं होतं. रामरावांनी 'तसं काहीच नाही' असा सांगण्याचा वारंवार प्रयत्न केला होता. पण पाहुणे त्यांचं ऐकायला तयार नव्हते. त्यांनी छायाला 'वाईट मुलगी' ठरवून लग्न मोडलं आणि आल्या पावली परत गेले. रामरावांना मात्र धरती दुभंगल्याचा भास झाला. पाहुणे जाताच त्यांच्या छातीत कळा सुरू झाल्या. मोठी मुलगी असलेल्या छायानंच चौकातून रिक्षा बोलावून त्यांना रुग्णालयात दाखल केलं. वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्यानं रामरावांचे प्राण वाचले. आणखी उशीर झाला असता तर सर्व संपलं असतं, असं डॉक्टरांनी सांगितलं. वडिलांच्या या अवस्थेला आपणच जबाबदार अाहोत, असं मानून छाया स्वत:ला दोष देऊ लागली होती. इकडं रामरावांच्या घरी काय रामायण झालं, याची दिनेशला तीळमात्र कल्पना नव्हती. तो पुढचे काही दिवस छायाच्या घराकडेही फिरकला नाही. त्याला रामरावांची प्रचंड भीती वाटत होती. छायाचं प्रेम मिळवण्यासाठी तो अनेक युक्त्यांवर चाचपणी करत होता. पण शेवटी प्रश्न होता तो त्याच्या बेरोजगारीचा. सर्व योजना, कल्पनांचा शेवट तेथेच होत होता.
दिनेशच्या परीक्षेचा निकाल लागला होता. तो पदवी परीक्षेत एका विषयात नापास झाला होता.  त्यामुळे कोणत्या तोंडानं घरी जावं , असा विचार त्याच्या मनात घोळत होता. बरेच दिवस तो छायाच्या घरी गेला नव्हता. पण रामराव काका काय म्हणतील, याची त्याला भीती होतीच. शिवाय आपल्यामुळं छायाच्या घरातील वातावरण गढूळ झालं होतं. काकांनी काय निर्णय घेतला असेल, याचीही त्याला उत्कंठा होतीच. रामरावांनी छायाला आलेलं स्थळ स्वीकारलं असावं किंबहुना लग्नाची तारीखही निश्चित केली असणार, असा त्याचा अंदाज होता. पण छायाचं अजून लग्न झालेलं नाही, हा त्याला मोठा दिलासा होता. छायाला पळवून नेण्याचा विचारही त्याच्या डोक्यात अनेकदा डोकावून गेला होता, त्याची बेरोजगारी या विचारांवर विजय मिळवू देत नव्हती. तरीही तो छायाला विसरायला तयारच नव्हता.  जे होईल ते बघू, असा निर्धार करून तो छायाच्या घरी पोहोचला. घरातलं वातावरण शांत होतं. ड्युटीची वेळ होती तरी रामराव घरीच दिसल्याने तो दचकला. पण रामराव पलंगावर पहुडलेले होते. ते प्रचंड अशक्त जाणवत असल्याने ते आजारीच असणार, याची दिनेशला कल्पना आली. दिनेशला घरात बघताच रामराव तणावात दिसले. पण त्यांच्या शेजारी बसलेल्या आशाबाईंनी त्यांचा खांद्यावर हात ठेवून शांत राहण्याचे संकेत दिले. आज रामरावांचे चार शब्द ऐकून घेण्याची दिनेशची तयारी होतीच. घरात प्रवेश करूनही त्याला कोणीही काहीच बोलले नाही. छायाही शांतपणे शून्यात एकटक लावून बसली होती. तिची भावंडं घरासमोरच खेळत होती.
 'काका आजारी आहेत का?' दिनेशनं प्रश्न केला. पण त्याच्या प्रश्नाचं उत्तर कुणीच दिलं नाही. छायाही दिनेशकडं नुसती बघत होती. तिनंही त्याचं पूर्वीसारखं स्वागत केलेलं नव्हतं. सगळेच एकदम परक्यासारखे  वागत होते. आपण असा काय अपराध केला, असं काही क्षण दिनेशला वाटलं. कारण या कुटुंबाला त्यानं जाणीवपूर्वक कोणतीही हानी पोहोचवली नव्हतीच. तरीही हा अबोला का? हा प्रश्न त्याला पडला. 'आई मी सांगते याला...' असं म्हणत छाया जागेवरून हलली.
'मी दहा लवकर येते गं', म्हणत तिनं दिनेशला बाहेर चलण्यास सांगितलं.  दोघे पायीच गणपती मंदिराच्या दिशेनं चालू लागले. वडील समोर असताना छाया आपल्यासोबत निघाली, याचं दिनेशला आश्चर्य वाटत होतं.  तोही न बोलता तिच्याबरोबर चालू लागला. दोघं पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन बसले. पण तेव्हाची आणि आजची परिस्थिती वेगळी होती. आज हवेत गारवा असला तरी कुणाचंही अंग शहारलं नव्हतं. दोघे सोबत होते पण  ती प्रेमभावना नव्हती. दोघांचेही कंठ दाटलेले होते. कुणी सुरुवात करायची, कुठून सुरुवात करायची, शेवट कुठं करायचा, हे दोघांनाही कळेना. छायापेक्षा दिनेशसमोरच अनेक प्रश्न, अनेक आव्हानं होती.
'काका आजारी आहेत का?' दिनेशनं सुरुवात केली.
'हो मीच पाडलंय आजारी त्यांना!' छाया स्वत:ला दोष देत म्हणाली.
'मला नाही कळलं?'  दिनेशनं विचारलं.
'माझं लग्न मोडलंय रे दिनेश...' छायानं अचानक सांगून टाकलं. तिच्या तोंडून हे शब्द ऐकताच दिनेशला हायसं वाटलं. पण छाया गंभीर होती. त्यामुळे पुन्हा दिनेशच्या चेहऱ्यावरील आनंदाचे भाव लोपले.
'लग्न मोडलं हे तर चांगलंच झालं ना?' चेहऱ्यावर उसणे हसू आणत दिनेश उद्गरला.
'काय चांगलं नि काय वाईट हे मला नाही माहीत.. पण लग्न मोडल्यानं बाबांना हार्ट अटॅक येऊन गेला..'
'काय सांगतीस...अरे बापरे... मग?' दिनेश किंचाळला.
'तुम्ही सगळे आला होता त्याच दिवशी तो मास्तर आला होता. तू बघितलस त्याला?' छायानं प्रश्न केला.
'हो.. त्या दिवशी मी जाताना दारावर आलेले तेच पाहुणे होत ना?' दिनेशनं होकार देत विचारलं.
'होय.. त्यांना आपल्याविषयी माहिती झालं अन् त्या मास्तरड्यानं लग्न मोडलं..' छाया निराश होत बोलली.
'हे तर चांगलंच झालं ना...तू आणि मी सुटलो की गं संकटातून..' दिनेशच्या चेहऱ्यावर पुन्हा उसणं हसू होतं.
'एका दृष्टीनं चांगलंच झालं म्हण.. तरीही आपलं काय होणार हा प्रश्न सुटत नाहीय बघ!' छाया निराशेतच बोलली. 'दिनेश तू मला हवा आहेस.. पण मी बाबांना मृत्यूच्या खाईत लोटू नाही शकत. अजूनही त्यांचा आपल्या लग्नाला विरोध आहे. त्यांचा विरोध झुगारण्याची शक्ती माझ्यात नाही रे..' म्हणत छायाला एकदम रडू कोसळलं. दिनेशच्या खांद्यावर डोकं ठेवून तिनं आश्रूंना वाट मोकळी करून दिली. दिनेशनं तिच्या केसांत हात फिरवत तिला दिलासा दिला.
'तू माझ्यावर खूप प्रेम करतेस याची जाणीव आहे मला.. पण शेवटी आपण वेळेच्या हातचे बाहुले आहोत. तो जसं नाचवेल तसंच आपल्याला नाचावे लागते. खरं सांगू छाया मला नोकरी असती तर तुझ्या बाबांनी एवढा विरोध नसताच केला आपल्या लग्नाला. त्यांनाही तुझी काळजी आहेना.. मायाची भानगड आता कुठं निस्तरली. त्यातच आपलं असं.. अंग वडील आहेत ते तुझे.. तुझ्या भविष्याचा विचार तेच करणार?' दिनेश गहिवरून बोलत होता.
'सांग नारे दिनू काय करू मी?' छायाच्या प्रश्नाचं उत्तर दिनेशकडेही नव्हतं. तिचे वडील असे आजारी असताना त्यांना आणखी एक धक्का देण्यांची दोघांचीही मानसिकता नव्हती. कोणताही उफराटा निर्णय ते घेऊ शकत नव्हते. दोघंही बराच वेळ काहीच बोलले नाही. दोघेही आपापल्या परीनं कशी परिस्थितीवर मात करायची, याचा विचार करत होते. अचानक दिनेशचा चेहरा चकाकला.
'आयडिया... ' तो आनंदित होत बोलला.
'कशाची?' छायानं उत्सुकतेनं विचारलं.
''तुझं लग्न असंही मोडलंच आहे.. देवच आपल्याला साथ देतोय बघ' दिनेश बोलत असतानाच 'काय म्हणतोस' म्हणत छायानं त्याला हटकलं.
'मी शपथ घेऊन सांगतो.. लग्न करीन तर तुझ्याशीच..!' दिनेश उत्साहातच बोलला. त्यावर छायाचाही चेहरा थोडा आनंदानं उजाळला. पण हे कसं शक्य, या प्रश्नानं ती पुन्हा शून्यात गेली.
'इथं तालुक्याच्या ठिकाणी तर नोकरी मिळणारच नाही. मी नाशिकला जातोय नोकरीच्या शोधात. नोकरी मिळताच तुझ्या बापाच्या नाकावर टिच्चून तुला घेऊन जातो की नाही बघ! नोकरी म्हटल्यावर तुझा बापच काय त्यांच्या बापाचा बापही मला नाही म्हणणार नाही.' दिनेश आता निराशेतून बाहेर आला होता. त्याला सुखाचं आणखी एक स्वप्न पुढं दिसत होतं. छायाही त्याच्या स्वप्नावर थोडी आनंदून गेली. तिलाही दिनेश म्हणतो तसं होऊ शकते, असा आशेचा किरण दिसला. ती नकळतच दिनेशच्या बाहुपाशांत पडली. स्वत:हून तिनंच दिनेशला करकटून मिठी मारली.
दिनेशला स्वप्नपूर्तीचा ध्यास होता.  त्यानं जड अंत:करणानेच छायाचा निरोप घेतला. आयुष्यभर साथ देण्याचे वचन देऊन आणि लवकरच भेटण्याची ग्वाही देऊन तो घराच्या दिशेनं निघाला. छाया मात्र जागीच स्तब्ध उभी होती. दिनेशला नवी दिशा  खुणावू लागली होती. गहिवरलेल्या अंत:करणाने तो छायापासून दूर चालला होता. पुढे चालत असला तरी तो वारंवार मागे पाहत होता. कदाचित अनेक दिवस त्यांची भेट होणारही  नव्हती. दिनेश जड पावलांनी घरी पोहोचला. छाया मात्र अजूनही तेथेच उभी होती. पाठमोऱ्या दिनेशला हात हलवत ती बायबाय करत होती. डोळ्यांत आश्रूंची एवढी गर्दी होती की त्यांना वाट मिळाली तर अंग चिंब व्हावं. पाणावलेल्या डोळ्यांमुळं तिला अंधारून आलं होतं.  दिनेश कधीच नजरेआड गेला हे तिच्या डोळ्यांना कळलंच नव्हतं.
दिनेश शहरात आला होता. नोकरीसाठी तो अनेक कार्यालये, कंपन्यांच्या चकरा मारू लागला. पण संधी काही त्याला हो म्हणेना. काही ठिकाणी तर त्यानं तुम्ही द्याल त्या पगारावर काम करतो, अशी विनंतीही केली. पण अकुशल म्हणून त्याला नाकारलं गेलं.  बी.ए. नापास म्हटल्यावर कोणी नोकरी देण्यास तयारच नव्हते. त्यामुळे छायाशी लग्नाची आशाही आता त्याला धुसर वाटू लागली. नोकरीच्या नादी न लागता स्वत:चा एखादा छोटासा व्यवसाय करण्याच्या निर्णयावर तो येऊन ठेपला. पण कोणताही व्यवसाय करण्यासाठी भांडवल तरी होत कुठं? बहिणीनं आश्रय दिल्यानं पोटाची आणि राहण्याची सोय होती. व्यवसाय करायचा कशातून. मोठं कुटुंब सांभाळणाऱ्या दादांकडूनही पैसे मिळण्याची संधी नव्हती. शेवटी बहिणीनेच त्याला पानठेला टाकून दिला. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत तो पानाला काथ-चुना लावू लागला. येणारी मिळकत मात्र बहिणीच्या पदरी जायची. यात दिनेशचं होतं तरी काय? सगळं भांडवल, जागा, ठेला बहिणीचा. दिनेशच्या वाट्याला दोन वेळ जेवण एवढंच होतं. दिवसेंदिवस त्याचा या व्यवसायात जम बसला. ग्राहकी वाढली, मिळकतही वाढली. पण ही मिळकत दिनेशला मिळणारी नव्हतीच. सर्व दिवसभराची कमाई तो बहीण-भावजीला देऊ लागला. त्यातला रुपयाही मागण्याची त्याची हिंमत हाेत नव्हती. थोडक्यात सांगायचं तर त्याचं हातावरच पोट होतं. आपलं पोट भरतेय, यातच तो धन्यता मानू लागला. पण छायासोबत सुखी आयुष्याचं बघितलेलं स्वप्न मात्र नुसतं पोट भरून पूर्ण होणार नव्हतं. शिक्षण अर्धवट म्हटल्यावर नोकरीची संधी नव्हतीच. 'नोकरी नाही तर छोकरी नाही' या रामरावांच्या धोरणामुळं दोघांचीही पुरती कोंडी झाली होती. प्रेमाचा गड जिंकताना एक एक करून सर्व मार्ग बंद झाले होते. 'पलायना'चा दोरखंड रामरावांच्या आजारपणामुळे कधीच कापला गेला होता. कोणत्याही रीतीने पलायन केलेच असते तर बेरोजगारीच्या शस्त्रानं दोघांचाही घात होणार होता. इतर कुठला मार्ग उरलेला असला तरी या दोघांना तरी तो सापडलेला नव्हता.
दिनेश शहरात आल्यापासून त्याचा प्रत्यक्ष संपर्क नव्हता. पोस्टाच्या चिठ्ठीच्या रूपात दोघांचा अप्रत्यक्ष संपर्क व्हायचा. प्रत्येक पत्राच्या मजकुरातून छाया दिनेशच्या भेटीसाठी प्रचंड उतावीळ असल्याचं जाणवत होतं. तिला दिनेशच्या भेटीची इतकी प्रचंड ओढ लागली होती की काही पत्रांत तिनं 'मी पाखरू असती तर आत्ताच उडून तुझ्यापर्यंत आले असते', अशी भेटीची आगतिकता बोलून दाखवली होती. दिनेशचीही अवस्था तिच्यासारखीच होती. दोन-तीन वेळेस त्यानं मित्राच्या घरी असलेल्या लँडलाइन फोनवर एसटीडी कॉल करून छायाशी बोलण्याची ईच्छा व्यक्त केली होती. तसं एकदा त्या दोघांचं बोलणंही झालं. या फोन भेटीवरही 'भेट कधी होणार', हाच एकमेव प्रश्न छाया विचारत होती. 
रामरावांचा आजार आणखी बळावला होता. काही दिवसांच्या अंतरानं त्यांना दुसरा अटॅक येऊन गेला होता. दुसऱ्यांदाही ते बालंबाल बचावले.  त्यांच्या आजारानं हे कुटुंब पुरतं खचून गेलं होतं. सरकारी नोकरीमुळं पैशांचे तेवढे वांधे नसले तरी थोडी आर्थिक परिस्थिती डामडौल झाली होती हे खरे होते. काही दिवस नोकरी आणि काही दिवस आराम, असेच सुरू होते. छाया आणि माया यांच्या लग्नाची चिंताही त्यांना सतावत होती. छायाचं एक स्थळ मोडल्यानं त्यांनी दुसरं स्थळ शोधणं सुरूच ठेवलं होतं. भेटायला येणाऱ्या प्रत्येक नातलगाकडे त्यांचा छायासाठी स्थळ बघण्याचा ते आग्रह धरत होते. 'नोकरीवाला जावई' ही व्याख्या त्यांनी पाठ करून ठेवली होती.
सुरुवातीला आठ-दहा दिवसांच्या अंतरानं छायाचं पत्र असे. पण त्यातील अंतर हळूहळू वाढत गेलं. दिनेशही नेटानं पत्रव्यवहार करत होता. पण काही दिवसांनंतर छायाचा पत्रव्यवहार एकदम थांबला. त्यामुळं दिनेशनं आठ दिवसांच्या अंतरानं दोन पत्रे लिहिली. पण त्याची उत्तरेही छायानं दिली नाही. दिनेशची धाकधूक प्रचंड वाढली. तिचं लग्न तर जुळले नसावे ना?, तिच्या वडिलांना आम्ही पत्रव्यवहार करतो याची भनक तर लागली नसेल ना? पण त्यांना कळणार कसं? आपण तर छायासाठी मित्राच्या पत्त्यावर पत्र पाठवत होतो. मग छायाचं आपल्यावरील प्रेम तर कमी झालं ना? अशा अनेक प्रश्नांनी त्याची कोंडी झाली होती.
दिनेशला बी.ए.चा राहिलेला विषय काढायचा होता. शहरात येण्यापूर्वीच त्यानं पुरवणी परीक्षेचा फॉर्म भरला होता. आता परीक्षा काही दिवसांवरच होती. मित्राला एसटीडी कॉल करून त्यानं परीक्षेची तारीखही मिळवली होती. सहा महिन्यांनी परीक्षेच्या निमित्तानं छायाची भेट होणार, या भावनेनंच दिनेश गदगदून गेला. दिनेशच्या प्रवासाचा दिवस उजाडला. प्रवास आठ तासांचा होता. पण हे आठ तासही त्याला आठदिवसांसारखे गेले. बस रात्री उशिरा पोहोचली. बसस्थानकावरून थेट छायाच्याच घरी जावं, असं दिनेशला वाटू लागलं. पण व्यावहारिकदृष्ट्या ते उचितच नव्हतं. त्यामुळं दिनेश तडक घराच्या दिशेनं निघाला.
आज छायाला भेटणे, दुसऱ्या दिवशी पेपर आणि तिसऱ्या दिवशी परतीचा प्रवास, असा दिनेशचा टाइमटेबल तयार होता. सकाळीच दादांना मित्राकडे जाऊन येतो, असं सांगून तो नीट छाच्या घराकडे निघाला. नेहमीप्रमाणं तो थेट घरात शिरला. पण त्या घराचा पूर्ण कायापालट झालेला होता. ते सरकारी निवासस्थान असले तरी महागडा सोफा, दिवाण, भिंतीवर महागडी पोर्टेट, मोठा टिव्ही, म्युझिक सिस्टम असं सगळंच नवीन होतं. हॉलमध्ये कोणीच नव्हतं. आपण चुकून दुसऱ्या तर घरात शिरलो नाही ना, या संभ्रमात दिनेश होता. पण शंभर वेळा आलेलं चुकणार नव्हतं. घर तर तेच होतं. पण इतका बदल कसा? चक्रावून गेलेल्या दिनेशनं 'काकू.. कुणी आहे का घरात?' असा आवाज दिला. 'कोण आहे?' स्वयंपाक घरातून नाजूक आवाज आला. हा आवाज तर आशाबाईंचा नव्हता, हे दिनेशच्या लगेच लक्षात आलं.  तरीही 'मी आहे काकू दिनेश!' दिनेश उंच स्वरात बोलला. 'कोण दिनेश?' असा पुन्हा आवाज आला. तेव्हा मात्र दिनेशला तो आशाबाईंचा आवाज नव्हताच, हे पूर्णपणे लक्षात आलं. तोपर्यंत एक  सुमारे २५ वर्षे वयाची विवाहित तरुणी दिनेशसमोर उभी होती. तिनं प्रश्नार्थक नजरेनं  दिनेशकडे बघत 'कोण हवंय तुम्हाला?' असा प्रश्न केला.
'माफ करा हं मी तुम्हाला ओळखलं नाही.. तुम्ही आशाबाईंच्या कोण लागता?'
'कोण आशाबाई?.. तुम्हाला कोण हवंय? ' त्या तरुणीचा प्रतिप्रश्न होता.
'या घरात आशाबाई राहत होत्या, त्यांनी घर बदललं का?' प्रसंगावधान राखत दिनेश बोलला.
'अच्छा इथे आधी राहत होत्या त्यांचं नाव आशाबाई होतं का?' त्या तरुणींनं चित्र स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.
'हो हो त्याच.. !' दिनेश जोर देऊन बोलला.
'तुम्ही त्यांचे कोण लागता?' तरुणीनं प्रश्न केला.
'नातेवाइक आहे मी!' दिनेश बोलला.
'हो का... बरं बरं.. बसा..मी पाणी आणते' म्हणत ती तरुणी स्वयंपाकघराकडं निघाली. तिचं चालणं एखाद्या चपळ नागिणीसारखं होतं. उंच, गोरीगोमटी, आकर्षक शरीरयष्टीची ती विवाहित तरुणी दिसायला  सुंदर होती.  तिचं रूप तरुणच काय एखाद्या वयस्कर व्यक्तीच्याही नजरेत ठसावं असं होतं. जणू अप्सराच त्या घरात अवतरली असावी, असं दिनेशला त्याक्षणी वाटलं. तो तिच्या सौँदर्यात हरवून गेला होता. पण त्याचवेळी छायाचा चेहराही त्याच्या नजरेसमोर तरळला.
'पाणी घ्या..' या आवाजानं दिनेश भानावर आला.
'हो..' म्हणत त्यानं समोर टीपॉयवर ठेवलेल्या तबकातील ग्लास उचलला. चोरट्या नजरेनं त्या तरुणीकडं बघतच त्यानं ग्लास रिता केला.
'बरं या आशाबाई कुठं राहायला गेल्यात तुम्हाला काही माहिती आहे का हो?' ग्लास ठेवत दिनेशनं प्रश्न केला.
'माहिती नाही.. पण त्यांच्या मिस्टरांची बदली झाल्यानं त्यांनी हे शहर सोडल्याचं मी शेजाऱ्यांकडून ऐकलं.कुठे गेलेत ते ठाऊक नाही. ' तरुणीनं पूर्ण वाक्यात उत्तर दिलं. लगेचच 'तुम्हाला कस माहिती नाही?' असा प्रश्नही केला.
'नाही... मी बाहेरगावी राहतो. त्यामुळं कळलं नाही', असे म्हणत दिनेश उठला. त्या तरुणीचे आभार मानून तो शेजारीच राहणाऱ्या पाटील काकूंच्या दारावर पोहोचला. नेहमीच येणं-जाणं असल्यानं दिनेशला तेथील चार-पाच घरची लोकं ओळखत होती. किंबहुना रामरावांचा होणारा जावई अशीही त्याची मोफत पब्लिसिटी झाली होती. दार वाजवता दुसऱ्याच क्षणी पाटील काकू दारात उभ्या होत्या. त्यांनी 'ये दिनेश.. बऱ्याच दिवसांनी आलास?'  म्हणत त्याला घरात बसण्यास सांगितलं. 'नको काकू.. ' म्हणत दिनेशनं दारात उभे राहूनच 'रामराव काकांची कुठं बादली झाली?' अशी विचारणा केली. पाटील काकूंनी ते अमरावतीला बदलून गेल्याचं सांगताच दिनेशला पायाखालची जमीन दुभंगल्याचा भास झाला.
'काय रे.. तू लग्न करणार होतास म्हणे छायासोबत?' पाटील काकूनं दिनेशच्या मर्मावरच बोट ठेवलं.
'हो.. पण नाही जमलं. पण करणारच आहे..!' दिनेश अडखळतच बोलला.
'काही कामधंदा, नोकरी करतोस की नाही आता?' पाटील काकूनं परत जखमेवर मीठ चोळलं.
'हो करतो ना... ' दिनेश थोडक्यातच बोलला.
'काय करतोस?' पाटील काकूनं पिच्छाच पुरवला होता. 'हिला काय करायचं माझ्या कामधंद्यावरून. ही तिची पोरगी देणार आहे का मला?' दिनेश मनातल्या मनात पुटपुटला.
'काही नाही काकू पानठेला चालवतो मी!' दिनेश म्हणाला.
'मला वाटलं काय कलेक्टर बिलेक्टर झालास की काय?' पाटील काकू उफराटं बोलत होत्या.
'काय काकू.. तुम्ही पण थट्टा करताय माझी', असं दिनेश हसतच बोलला. पण मनातून त्याला पाटील काकूंच्या कानाचं माप घेण्याची इच्छा प्रबळ झाली होती. दोनच मिनिटात काकूनं त्याचा मोठाच छळ केला होता.
'बरं येतो मी..' म्हणत पुढे विषय न लांबवता दिनेश मागे फिरला. जिच्या भेटीसाठी आपण सहा महिन्यांपासून उतावीळ होतो ती भेटली नव्हती. आता सगळं संपलं, या जगात काहीच खरं नाही.  प्रेमही नाही, असा विचार करत तो जड पावलांनी घराच्या दिशेनं चालू लागला. छाया मला विसरली तर नाही ना? बदली झाल्याचं तिनं का सांगितलं नाही? पत्राची उत्तरंही दिली नाहीत? ती अशी का वागली? तिला दुसरा तर कोणी भेटला नसेल ना? लग्न झालं असेल का, अशा अनेक प्रश्नांचं वादळ त्याच्या डोक्यात घाेंगावत होतं?
छाया नेमकी कुठे अाहे, याचा शोध घेण्याची दिनेशची इच्छा प्रबळ झाली. पण त्याचं दुसरं मन यासाठी तयार होईना. 'तू स्वत:हून तर तिला नाकारलं नाहीस ना! मग कशाला हिंडतोस तिच्या मागं' अशी हाक त्याचं दुसरं मन देऊ लागलं. दि्वधा मन:स्थितीतील दिनेशला काय करावं हेच सूचेना. अशा वेळी त्याला मित्र ओंकारला मोठाच दिलासा मिळाला. दिनेशनं आपल्या मनाची व्यथा त्याच्याजवळ कथन केली. आेंकारनं त्याची व्यथा अत्यंत शांतपणे ऐकून घेतली. शेवटी त्यानंच उपायही सूचवला. तो होता 'गेली उडत.'
दिनेश राहिलेल्या विषयाचा पेपर देऊन शहरात परतला.  ओंकारनं दिलेला 'फिकीर नॉट'चा मंत्र तो जपू लागला. मात्र छायाच्या आठवणी त्याचा पिच्छा सोडायला तयारच नव्हत्या. समोर खाकी पोषाखतला पोस्टमन दिसला तरी दिनेश भावनाविवश व्हायचा. परत तो 'फिकीर नॉट'चा मंत्र जपू लागे. हळूहळू त्याला छायाचा विसर पडू लागला. दिवसांमागून दिवस, महिने लोटू लागले. एका दिवशी अचानक खाकीतला पोस्टमन पानठेल्यासमोर उभा ठाकला. त्याच्या हातात पत्रांचा गठ्ठा होता. त्यातून तो एक पत्र शोधत होता. जस जसे तो एक एक पत्र शोधत होता, तस तसे दिनेशच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. कुणाचं पत्र असेल, छायाचंच असेल का, याची उत्कंठा त्याला लागली होती. होय ते पत्र छायानंच लिहिलेलं होतं. पत्रात मजकूर होता 'बाय बाय... पुढच्या जन्मी भेटू! तुझीच छाया.'
(समाप्त)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अंधभक्ती

देशी अप्सरांसाठी इंद्रपुरीतून खाली उतरलेल्या राजा इंद्राने पृथ्वीवरआटपाटनगरात स्थापन केलेले राज्य चांगले  सुरू होते. त्याचे  पृथ्वीतलावर आपल...