छायाचित्र सौजन्य : https://www.alamy.com/
सामाजिक न्याय देण्यासाठी सत्ता असणे गरजेचे नाही. पक्ष किंवा संघटनेचे काम करतानाही आपण सामाजिक न्याय देऊ शकतो, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. आता हेच बघाना इंद्राने त्याची ह हा हि ही हु हू पार्टी सत्तेत नसतानाही अनेकांना सामाजिक न्याय दिला आहे. किंबहुना इंद्राने स्वत:ला सामाजिक न्यायासाठीच वाहून घेतले आहे. अनाथ मुले, विधवांना इंद्राने सामाजिक न्याय दिला. त्यांना राजाश्रयही दिला. आपल्या एकमेव द्वितय अशा ह हा हि ही हु हू पार्टीत त्यांना मानाची पदे दिली. इंद्राचा सामाजिक न्याय एवढ्यावरच थांबत नाही. प्रेमभंग झालेल्या महिलांनाही इंद्र तेवढ्याच आपुलकीने वागवतो. याचे सर्वोत्तम उदाहरण कविता भाभी.
ह हा हि ही हु हू पार्टीची राष्ट्रीय प्रवक्ती असलेल्या नारदीने दिलेल्या माहितीनुसार, कविता भाभीचे आपल्या नात्यातीलच एका रांगड्या तरुणाशी प्रेम जुळले होते. कविता भाभीचा पती अत्यंत सोज्वळ माणूस. पण कविता भाभीला रांगडा तरुण आवडला म्हटल्यावर काय? पतिदेव कामावर गेल्यानंतर कविता भाभीला अख्खे आटपाट नगर मोकळे होते. त्या रांगड्याची कविता भाभीच्या घरी नेहमीची उठ-बैस सुरू असायची. 'जिकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे' असे वातावरण. कविता भाभीला त्या तरुणाची संगत कायम हवी हवीशी वाटत होती. त्याच्या दुचाकीवर मागे बसून अनेक दिवस ती भटकत राहिली. पण दुसऱ्याच्या बागेतील फळे किती दिवस चोरून खायची. आपलीही बाग असावी, या उद्देशाने त्या रांगड्या तरुणाने आपली स्वत:ची बाग उभारण्याची म्हणजे लग्न करण्याचा विचार केला. त्याचा एका सुंदर तरुणीशी विवाह जुळला. पण ही गोष्ट कविता भाभीला खटकू लागली. कारण त्याने लग्न केले तर त्याची साथ सुटेल, अशी कविता भाभीला पक्की खात्री होती. त्यामुळे त्याने लग्नच करू नये, यासाठी कविता भाभीचा आटापिटा सुरू झाला. तिने त्याला लग्न करण्याच्या इच्छेपासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्नही केला. त्याला फोन करून धायमोकलून रडलीही. कविता भाभीचा कोणताच फंडा कामी नाही आला. पण त्या रांगड्याने लग्नाच्या बेडीत अडकायचेच अशी पक्की खूणगाठ बांधल्याने कविता भाभीच्या जाळ्यातले सावज जाळ्यातून निसटले. शेवटी तो एका सुंदर बागेचा धनी झाला. त्याच्या लग्नाला कविता भाभी काळजावर दगड ठेवूनच उपस्थित राहिली होती. कविता भाभीच्या प्रेमभंगाची खबर नारदीने इंद्रापर्यंत कधीचीच पोहोचती केली होती. इंद्रच नव्हे तर तिने ही वार्ता गावभरही पसरवली.
रांगड्या तरुणाची साथ सुटल्यानंतर कविता भाभी अस्वस्थ झाली. तिचा प्रेमभंग झाला. अशा वेळी इंद्र आणि नारदीलाच तिची दया आली. इंद्राने सामाजिक न्यायाच्या भूमिकेतूनच कविता भाभीला आपल्या ह हा हि ही पार्टीत सामील करून घेतले. इंद्राच्या पार्टीत पहिल्या दिवसापासून नारदी प्रवेशकर्ती झाली होती. तिने कविता भाभीचे मन हलके व्हावे, तिला रांगड्या तरुणाचा विरह जाणवू नये, यासाठी तिला आपल्या हे है हो हौ हं ह: क्लबचे सदस्यत्व दिले. क्लबचा गप्पांचा फड, कविसंमेलने, शेरो-'शायरी आणि हास्यजत्रेत कविता भाभीचे मन रमून गेले. तिला त्या रांगड्या तरुणाचा हळूहळू विसरही पडला.
ह हा हि ही हु हू पार्टी आणि हे है हो हौ हं ह: क्लबच्या कार्यक्रमांना नियमित हजेरीमुळे कविता भाभी इंद्राच्या खास बैठकीतील पदाधिकारी बनली होती. घराला कोणता रंग द्यावा इथपासून ते सकाळच्या नाश्त्यात काय पदार्थ असावेत तिथपर्यंतचा सल्ला कविता भाभी इंद्राकडून घेऊ लागली. इंद्र नेहमीच सामाजिक न्यायाच्या भूमिकेत वावरणारा असल्याने तो ही दिलखुलासपणे कविता भाभीला सल्ले देत होता. कदाचित कविता भाभीला छोटे बाळ असते तर त्याचे डायपर कोणत्या ब्रँडचे असावे, साईज काय असायला हवी असे विचारायला कविता भाभी मागे हटली नसती. एरवी परपुरुष भुतासमान मानणारी कविता भाभी इंद्राशी एकट्यात बोलण्यासही संकोच करत नव्हती. गोडबोल्या इंद्रालाही कविता भाभीचा सहवास जणू आवडू लागला होता.
इंद्राच्या देशाची राजकीय गादी सांभाळण्याच्या इच्छेला कविता भाभी तन, मन आणि धनानेही साथ देत होती. तर नारदी तन आणि मनाने प्रचंड स्फूर्तीने कामाला लागली होती. घरची आणि दारची कामे झाली नाही तरी चालतील पण इंद्राचा प्रत्येक शब्द खाली पडला नाही पाहिजे याची ती प्रचंड दक्षता घेऊ लागली. पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते समर्पित भावनेतून पक्षाचे कार्य पुढे रेटत असल्याने इंद्र जाम खूश होता. तो त्यांना आपल्या धनाच्या जोरावर खूश ठेवू लागला. इंद्रासारखा दुसरा कोणीच नाही, असा प्रचार संपूर्ण आटपाट नगरीत सुरू झाला. त्यामुळे इंद्र तर आणखीच हुरळून गेला होता. पक्ष कार्यालयात नियमित बैठकांचे सत्र सुरू होते. सामाजिक न्याय मंत्री ज्या प्रमाणे जनता दरबार भरवतात अगदी तसाच दरबार इंद्रही भरवू लागला. महिला पदाधिकाऱ्यांसोबतच त्यांच्या पतिराजांचाही इंद्राला जोरदार पाठिंबा मिळू लागला. नारदीकडे तर पक्षाचे मोठेच पद होते. त्यामुळे ती स्वत:ला आटपाट नगराची नगराध्यक्ष असल्याच्या तोऱ्यात वावरू लागली. नारदी आणि कविता भाभीने तर इंद्रावर जीवच ओवाळून टाकला होता. सामाजिक न्यायात उणिवा राहू नयेत, याची इंद्रही मोठी काळजी घेत होता. त्याने आपल्या पक्ष पदाधिकाऱ्यांना कधीच कशाची झळ पोहोचू दिली नाही. नारदी आणि कविता भाभीची बाजू खरी असो वा खोटी, इंद्र त्यांच्या प्रत्येकच गोष्टींसाठी त्यांच्या मागे उभा ठाकला होता.
नारदीला अख्ख्या आटपाट नगरातील खबरी असायच्या. थोडक्यात नारदीला अ ला काना आ असे भलेही वाचता येत नसले तरी तिची कल्पनाशक्ती प्रचंड होती. रस्त्याने एखादा तरुण आणि तरुणी सोबत जात असतील आणि ते नात्याने भाऊ-बहीण असले तरी ते प्रेमियुगुलच असावे, इतकी प्रचंड तिच्या कल्पना शक्तीची भरारी होती. आनंदीबाईनी राजकारणात ध चा मा केल्याचे इतिहास सांगतो. पण नारदीने अख्खी बाराखडीच बदलून टाकली. कुठले उकार कुठे आणि इकडची वेलांटी तिकडे देऊन इतिहासाचा भूगोल करून टाकला. कविता भाभीच्या प्रेमभंगाचे प्रकरण नारदीने अख्ख्या आटपाट नगरात व्हायरल करून टाकले. फक्त बॅनर, होर्डिंग लागणेच बाकी राहिले होते. पण बिच्चाऱ्या कविता भाभीला नारदीच्या या अफाट कर्तृत्वाची काडीमात्रही कल्पना नाही. नारदीचे हे कर्तृत्व इंद्राला ठाऊक होते. पण आपली पार्टी फुटेल, देशाची राजगादी सांभाळण्याचे स्वप्न धुळीला मिळेल म्हणून तो नारदीला मोठ्या अंत:करणाने सहन करत होता. 'प्यार और जंग मे सब जायज हे' या उक्तीनुसार आणि सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून इंद्र सर्व गोष्टी 'नजरअंदाज' करत होता.. करत राहणार... कारण सामाजिक न्याय!