शनिवार, १९ जून, २०२१

चाचा नेहरू तुम्ही चुकलात!


www.molitics.in च्या सौजन्यानेॅ

आज भारतात बेरोजगारी, गरिबी, महामारी अशा एक नव्हे तर डझनभर समस्या उभ्या आहेत. देशाची आर्थिक स्थिती ढबघाईला आली आहे. जीडीपी गटांगळ्या खात आहे. या सर्व परिस्थितीला चाचा नेहरू तुम्हाला आणि तुमच्या काँग्रेसला का जबाबदार धरू नये? स्वातंत्र्योतर भारताच्या निर्मितीत तुम्ही खूप मोलाचं योगदान दिलं, हे आम्ही पुस्तकांतून वाचलं. तुमचाच पक्ष असलेल्या काँग्रेसनं ७० वर्षे सत्ता उभोगली. तुम्ही आणि काँग्रेसच्या पुढच्या सर्व सरकारांनी देशात मोठमोठे हॉस्पिटल उभारले, आयआयटी, एम्स, विमानतळं, बंदरं, डोंगर-दऱ्यांतून लांबच लांब रस्तेही बनवले. तुमचे ‘व्हिजन’ खूप चांगले होते, असेही आम्ही ऐकले, वाचले. तरीही चाचा तुम्ही चुकलातच.  तुमच्या ‘व्हिजन’मध्ये २०१४ नंतरच्या भारतातील प्रगतीचा ‘मॅप’ नव्हताच. तुम्ही फक्त तुमच्या सत्ता काळापुरताच विचार केला. तुम्ही आणि तुमची काँग्रेस जोपर्यंत सत्तेत होती तितक्याच काळासाठी विकास करायचा, असं कुठं असतं का. आजच्या पिढीसाठी तुमचे एम्स, आयआयटी, एनडीए, विमानतळं काय कामाची. यातून आम्हाला ‘विवेक’ मिळालाच नाही.  

तुमचा कुचकामी विकास पाहूनच आम्ही आमचा आधुनिक उद्धारकर्ता सत्तेत आणला. 

चाचा जी, इंदिरा जी, राजीव जी आणि त्या नंतरच्या सर्व काँग्रेसी सरकारांनी या ७० वर्षे केलेला विकास आज काय कामाचा? भावी पिढीसाठी तुम्ही काय कमावून ठेवलं? आज आम्हाला हॉस्पिटलमध्ये गेलो तर ऑक्सिजन मिळत नाहीत. बेड मिळत नाहीत. रेमडेसिविर नावाचं इंजेक्शनही मिळत नाही. काय चाटायचीत का तुमची एम्स, हॉस्पिटलं आणि गावखेड्यापर्यंत बांधलेली आरोग्य केंद्रे न रुग्णालये! चाचा जी तुम्ही आणि तुमच्या काँग्रेसनं अशा टोलेजंग इमारतींवर पैसा व्यर्थ घालावला. तुम्ही ‘विकासा’च्या नावावर, जगद्गुरू बनण्याची स्वप्न दाखवून आमची मनं प्रसन्न ठेवली असती तरी आमचा आज श्वास गुदमरला नसता. आज धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचीही आम्हाला भीती वाटली नसती. तसं पाहिलं तर आमच्या बापजादांनीच चूक केली. ते  ७० वर्षांपासून तुमच्या काँग्रेसला मतदान करत होते. तुम्ही केलेल्या तोकड्या विकासावर ते समाधानी होते. तुम्ही मर्यादित स्वरूपातच देशाचा विकास केला, हा माझा दुसरा आरोप. देशभरात रुग्णालयांचे जाळे निर्माण करताना तुमच्या दूरदृष्टीला आज कोरोना कसा दिसला नसेल? तुम्ही त्याच वेळी भारतातील सर्व जनता भरती होऊ शकेल अशी रुग्णालये का उभारली नाहीत. पुरून उरेल एवढ्या ऑक्सिजनची निर्मितीचे प्लांट का उभारले नाहीत?  तुमच्या या विकासावर आम्ही कायम असमाधानी राहिलो, 

म्हणूनच आम्ही आमचा आधुनिक उद्धारकर्ता सत्तेत आणला. 

इंदिरा गांधीना आपले शत्रू राष्ट्र असलेल्या पाकिस्तानचे दोन तुकडे करत बांग्लादेश निर्माण करून अशी मोठी जखम देण्याची कायच गरज होती? पाकिस्तानसोबत युद्ध करण्याचीही काही गरज नव्हती. हा पराक्रम आमच्या काय उपयोगी? आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही पाकिस्तानचे इतके सैनिक मारले, तितके अतिरेकी खल्लास केले, अशी ओरड केली असती तरी आम्ही आज आहोत तितकेच आनंदी राहिलो नसतो का? उगीच युद्धावर पैसा आणि आमच्या सैनिकांचे बलिदान व्यर्थ घालवले. १९७४ मध्ये पोखरणला अणुचाचणीची काय गरज होती. नुसती ‘आम्ही शत्रूंना घरात घुसून मारू’ अशी गर्जना केली असती तरी ती पुरेशी होती. आर्थिक समानतेला चालना देण्यासाठी १९६९ मध्ये भारतातील प्रमुख १४ बँकांचे राष्ट्रीयकरण करण्याची काय गरज होती. खासगी मालकीच्या या बँकांनी सामाजिक हिताऐवजी स्वत:चे हित साधले असते तरी आमच्या बाजजाद्यांनी तुम्हाला नाही म्हटलेच नसते. तुम्हाला सामाजिक हितासाठी या बँकांच्या विलिनीकरणाची गरजच का जाणवली? कदाचित यात तुमचाच काही स्वार्थ होता, असा आमचा समज आहे. 

म्हणूनच आम्ही आमचा आधुनिक उद्धारकर्ता सत्तेत आणला. 

राजीव गांधींनी २१ व्या शतकातील आधुनिक भारताची स्वप्नं देशवासीयांना का दाखवली.  त्यांनी पंतप्रधान असताना माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासाची योजना का आखली. आम्ही आज आनंदानं सर्व तंत्रज्ञान, यंत्र सामुग्री, मोबाइल, लॅपटॉप, मोठमोठ्या यंत्रांचा वापर भलेही करत असू, पण त्यामुळे देशाचं काही अडणार थोडीच होतं. राजीव गांधींनी दिलेल्या वैज्ञानिक दृष्टीचा आम्हाला काय लाभ झाला? आम्ही आजही आमच्या अंधश्रद्धा पाळून आनंदी आहोतच ना! भारतात विदेशी गुंतवणुकीला चालना, पंचायत राजमध्ये ‘पावर टू द पीपल’, सत्तेचे विकेंद्रीकरण असे जनमाणसाच्या हिताची उदारमतवादी धोरणं राबवली असली तरी आमच्या पिढीला त्याच्याशी काय? आम्ही हाती पैसा आणि सत्ता नसतानाही आनंदी आहोतच ना! 

म्हणूनच आम्ही आमचा आधुनिक उद्धारकर्ता सत्तेत आणला. 

खरं सांगू चाचा जी... भारताच्या स्वांतत्र्यानंतरचा ९० टक्के विकास हा काँग्रेसने केला, असं आम्ही वाचलं, ऐकलं. पण मला तर यावर अजिबात विश्वास नाही. चाचा जी तुमच्या पक्षाची २०१४ मध्ये सत्ता गेल्यानंतर संपूर्ण भारतवासी किती आनंदी आहेत, हे तुम्हाला आता केसे सांगू. सिकंदर जसा जग जिंकायला निघाला तसा आमचा नेता जगाची मनं जिकायला निघाला आहे. आम्हाला तुमच्या काळात जशी युद्ध लढली गेली तशी युद्ध लढायची गरजच नाही. ‘आमच्या नेत्यानं सांगितलं आणि आम्ही ऐकलं’ असाच आम्ही परिपाठ सुरू ठेवलाय. आम्हाला खरं काय नि खोटं काय, समजून घेण्यात काहीच स्वारस्य नाही. उगीच का यात ‘एनर्जी’ वाया घालवायची. दोन जातींमध्ये भांडणं लावण्याचा आनंदच काही औरच असतो. आनंदापेक्षा जगात मोठे काय आहे, सांगाना चाचा जी? संत, महात्म्यांनी समस्त जगाला आनंदी राहण्याचा संदेश दिला. जो आनंदी आहे तो सुखी आहे, हे संतांनी सांगितलं सूत्र तपासलं तर आज आम्ही सुखी आहोत, हा माझा दावा आहे. कारण चाचा जी... आमच्या पिढीवर कशाचा काहीच परिणाम नाही. देशाची अर्थव्यवस्था बुडाली काय आणि उभरली आहे, याचं आम्हाला काहीच देणं-घेणं नाही. आम्ही नुसता विकास शब्द कानी पडला तरी प्रचंड ‘आनंदी’ होतो. भारत जगाचं नेतृत्व करीत आहे, असे चित्र तरळून जातं. चाचा जी.. असं आनंदी राहणाऱ्यांची संख्या अधिक आहे बरं का! आज कोरोना-बिरोनाला जुमानत नाही. आम्ही गोमुत्र पिलं  आणि अंगाला शेण माखलं तरी आमचे आजार १०० टक्के पळून जातात. चाचा जी अशा वेळी तुम्ही आणि तुमच्या काँग्रेसनं उभारलेली रुग्णालयं काय कामाची? आमचं नेतृत्व आम्हाला देवाचा, धर्माचा आणि जातीचा कधीच विसर पडू देत नाही. त्यामुळं आम्ही आनंदी आणि सुखीच आहोत. तुम्ही विकास केला असेल किंवा नसेल ते माहीत नाही. पण आमची पिढी प्रचंड आशावादी आहे. आज आम्हाला नुसता ‘विकास’ शब्द ऐकला तरी आमचा आनंद गगनात मावेनासा होतो.  चाचा जी कुणी तुम्हाला शिव्या दिल्या तरी आम्हाला आनंदाची प्राप्ती होते.  असा आनंद लुण्यासाठीच ....

आम्ही आमचा आधुनिक उद्धारकर्ता सत्तेत आणला. 

आमचे अजोबा, वडील शिकून मोठा हो, असं म्हणायचे. पण आम्हाला या शिक्षणाचा उपयोग तो काय? न शिकता ही आमचं नेतृत्व आम्हाला आत्मनिर्भर बनवत आहे. नाल्याच्या गॅसवर स्वयंपाकाचं तंत्र आम्ही येथेच शिकलो ते ही कोणत्याही विद्यापीठाची डिग्री न घेता. कोणतीही डिग्री न घेता आम्ही देशाच्या सर्वोच्च पदावरही जाऊ शकतो, हे ही आम्हाला कळून चुकले. तेव्हा आमच्या बापजाद्यांनी शिकून मोठं होण्याचा सल्ला दिलाच कसा? यावर मंथन व्हायला नको का? काही शिकलेल्या लोकांच्या मते आम्ही २०१४ नंतर दारिद्र्याच्या गर्तेत ढकलले जात आहोत. आजच्या शिकलेल्या पिढीकडे चांगले-वाईट जाणून घेण्याची बुद्धी नाही वगैरे वगैरे आक्षेप येत आहेत. आम्ही पकौडे विकून आत्मनिर्भर होऊन आनंदी होत असू तर तर शिकण्याची गरज ती काय? हे सगळे आक्षेप निखालस चुकीचे आहेम. मला तर वाटते काही मूठभर लोकांचा आमच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा हा डावच आहे, असं माझं मत आहे. आम्ही आमच्या बुद्धीनुसारच ना भूतो न भविष्यती अशा प्रचंड बहुमतावर आम्ही आमचा उद्धारकर्ता निवडला. आम्ही आनंदी आहोत, यातच सर्व सौख्य सामावलेलं आहे. अशा स्थिती हे आक्षेप आपोआपच खोटे ठरतात, नाही का? लोकशाहीत जे बहुमत तेच सत्य असते ना. मग यांना आमच्या बुद्धीवर शंका घेण्याचा अधिकारच नाही. पेट्रोल महागलं, जीडीपी तळाला गेला, बेरोजगारी वाढली, कोरोनात उपाययोजना केल्या नाहीत, हुकमी पद्धतीनं राज्यकारभार चालवला जातो, यांना फक्त सत्तेची लालसा आहे, असे अनेक आरोप होत असले तरी आम्ही बहुमतानं निवडलेलं सरकार चुकीचं असू शकतं. ‘विकास’ हा इतका चमत्कारी शब्द आम्हाला आमच्या नेतृत्वानं दिला. या शब्दामुळं आमच्या दु:खांचे हरण होतेय. चाचा जी तुमच्या नि तुमच्या काँग्रेसने ७० वर्षांत केलेल्या भारताच्या ९० टक्के विकासानंतरही आम्हाला आनंद मिळाला नाही. पण गेल्या सात-अाठ वर्षांत मिळणाऱ्या आनंदाच्या अनुभूतीमुळं आम्ही धन्य झालो आहोत. २०१४ ते २०२० या काळात आम्हाला याच आनंदाची चटक लागली. म्हणूनच  दुसऱ्यांदा...

आम्ही आमचा आधुनिक उद्धारकर्ता सत्तेत आणला.   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अंधभक्ती

देशी अप्सरांसाठी इंद्रपुरीतून खाली उतरलेल्या राजा इंद्राने पृथ्वीवरआटपाटनगरात स्थापन केलेले राज्य चांगले  सुरू होते. त्याचे  पृथ्वीतलावर आपल...