देवभोळ्या लोकांचा, भाबड्यांचा आणि मूर्खांचा फायदा कसा उठवायचा या कलेत अनेक जण निपुण आहेत. हे कलाकार अलगद लोकांना ठगवतात. गुण गायीचे अन वाण कसायाचे या वृत्तीचे हे लोक असतात. आपल्या अवतीभोवती असे नमुने आढळून येतात. आचार्य अत्रे यांनी 'बुवा तिथे बाया' ही अजरामर नाटक 50 वर्षापूर्वी लिहिले आहे. यातील बुवा किती चतुराईनेे बाया बापड्यांना आपल्या जाळ्यात ओढतो याचे सुंदर वर्णन या नाटकात आहे.
पन्नास वर्षानंतरही हे लिखाण आजही अनेकांना जसेच्या तसे लागू पडते. त्याच पद्धतीने गंडवणारे, लोकांना फसवणारे, त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेणारे, वाण गायीचे अन गुण खाटकाचे असलेले बाबा, बुवा, भय्या, काका, दादा यांच्या रूपात आजही अस्तित्त्वात आहेत. लोकही त्यांच्यावर अंधपणे विश्वास ठेवतात . विजय चव्हाण, प्रदीप पटवर्धन, किशोरी अंबिये, जगन्नाथ लवंगारे या कलावंतांनी हे नाटक मंचावर आणून ते अजरामर ठरवले.
आज हे आठवण्याचे कारण म्हणजे अशाच एका बुवाला मी जवळून बघतोय. आपल्या गोड बोलण्यातून तो बाया बापड्यांना सहज गंडवू शकतो. 'मी नाही त्यातली, कडी...' या पठडीतल्या बाया आणि स्वतःच्या बुद्धीचा कधीच वापर करायचाच नाही, अशी शपथ घेतलेले बापडे बेमालुमपणे त्याच्या प्रभावाखाली येतात. हा बुवा घरातून बाहेर पडला की त्याच्याभोवती पाच-सहा बायाबापडे फिरतात. आपले बुद्धिचातुर्य आणि गोड बोलून हा बुवा त्यांच्याकडून नकळत आपले इप्सित साधून घेतो. हा बुवा तसा घरंदाज वगैरे नसला तरी त्याच्या राहणीमानाचाही या बाया-बापड्यांवर प्रचंड प्रभाव पडतो. वैवाहिक जीवनात पुरता अपयशी ठरलेला हा बुवा स्वत:ला व्यावसायिक जीवनात यशस्वी आहोत, हे पटवून देण्यात मात्र यशस्वी ठरला. बरं व्यवसायही कोणता तर आठ आण्याची वस्तू घेऊन बारा आण्यांना विकायची. अशा या स्वयंघोषित लक्षाधिशाच्या हॉलपर्यंतचा प्रवास त्याच्या बेडरूमपर्यंत कधी पोहोचला हे एका बयेला तर कळलेच नाही. या बुवाला बापडे नसले तरी चालेल पण बाया अवतीभोवती लागतातच. तसं बघितलं तर हा बुवा या बायांना बहीण म्हणून बोलावतो. पण हे त्याचे बाहेरचे संबोधन. घराच्या आत नाते बदलून जाते.
हा बुवा नुसता दांभिकच नव्हे तर तितकाच कपटीही आहे, हे मात्र अजून या बायाबापड्यांना कळालेले नाही. दुसऱ्यांचा फायदा आपल्या स्वार्थासाठी कसा करून घ्यायचा, याचे कसब या कसाबच्या अंगी चांगलेलच आहे. मुळात तोकडे ज्ञान असलेला हा प्राणी केवळ वक्त्तृवाच्या बळावर खोटंही खरं असल्याचे सिद्ध करू शकतो. कुणाला राम ठरवायचे आणि कुणाला रावण, अशा डावपेचातही हा गडी तरबेज. त्याच्या कटकारस्थानांची पोलखोल करू पाहणाऱ्यांना कुठे कसे बदनाम करता येईल, याचे ए आणि बी प्लॅन त्याच्याकडे तयार असतात. या योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी स्वीकारायला एक बापडी २४ तास सज्जच असते.
मंडळी सांगायचे तात्पर्य असे की, लोकांच्या भोळेपणाचा फायदा घेत स्वत:चा स्वार्थ साधणाऱ्यांचे पितळ कधी ना कधी उघडे पडतेच. त्यांचा बुरखा कधी ना कधी फाटतोच, जसा बुवा तिथे बायामधील दांभिक बुवाचा फाटला. अनेकांच्या आजूबाजूला असे बुवा वावरत असतात. खरी गरज आहे ती त्यांना ओळखण्याची आणि वेळीच बायाबापड्यांनी सावध होण्याची...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा