शनिवार, २४ मार्च, २०१८

मायेची ऊब


सकाळीच माय जात्यावर दळण दळत होती. ती उंच स्वरात जातं ओढताना गाणं गात होती. ती कोणतं गाण गात होती, ते आठवत नाही. पण तिचा मंजूळ आवाज कानावर पडत होता. मी डोळ्याला आलेले चिपडं खरडत उठलो आणि जात्यावर दळण दळत असलेल्या मायच्या मांडीवर जाऊन झोपलो. मायनं गरगर फिरणारं जातं थांबवलं. हळूच माझ्या केसांत हात घातला. मायेनं बोटं फिरवली. तसा पुन्हा मी पेंगू लागलो. मी झोपल्याचं समजून मायचे हात जात्याचा खुंटा भराभरा गोल फिरवू लागला. ओठांवर पुन्हा तेच गीत गुणगुणू लागले. मी काही फार गाढ झोपलो नव्हतो. तिची गुणगुण ऐकत निपचित पडलो होतो. माझी झोप मोडू नये म्हणून तिनं हलक्या आवाजात गाणं गायला सुरुवात केली होती. तिचा मंजूळ आवाज एक वेगळाच आनंद देत होता. सगळं गाव शांत होतं. केवळ अधूनमधून एकाद दुसरी चिमणी चिवचिव करत होती. कदाचित मायला चिमण्यांच्या आधी जाग आली होती. जाग आलेल्या चिमण्या  जणू तिच्या सुरात सूर मिसळत होत्या. मला थंडी लागत होती. म्हणून मी माझे हातपाय आणि डोकं एकत्र जमवण्याचा प्रयत्न करत मायच्या मांडीवर पडून होतो. मला थंडी लागत असल्याचं तिला जाणवलं. तिनं हळूच खांद्यावरचा पदर काढून माझ्या अंगावर टाकला. तशी मला उब मिळाली. ही उब होती मायच्या पदराची आणि मायच्या मायेची. भरभर जातं ओढून मायला मात्र घाम फुटला होता. पण पदर माझ्या अंगावर होता म्हणून तिनं पदर उचलला नाही. बाजूलाच पडलेल्या कसल्या तरी चिंदकानं तिनं घाम टिपला. बघता बघता पायलीभर दळण तिनं दळलं होतं. मी अजूनही झोपलेलाच आहे असं तिला वाटलं. तिनं हळून मानेच्या खाली हात हात घालून माझं डोकं जमिनीवर ठेवलं आणि बाजूचा दळणाचा डबा घेऊन थेट चुलीकडं गेली. तिनं जसं माझं डोकं जमिनीवर ठेवलं तशी माझी झोप उडत गेली. असं वाटत होतं मायनं असंच अजून घंटाभर दळण दळत राहावं अन मी तिच्या मांडीवर असाच पडून राहावं. पण तिच्या पुढे कामाचा डोंगर उभा होता. माझं डोकं जमिनीवर अलगद टाकून ती उठली होती. दळणाचा डबा भानुसावर   ठेवून ती अंगणात काटकं मोडायला गेली. तुराट्या आणि वाळलेल्या लाकडांचा कटकट आवाज मला ऐकू येत होता. आता मात्र माझ्या डोळ्यांवरची झोपेची तंद्री पूर्णपणे उतरलेली होती.  तेवढ्यात बापूही उठला होता. लहाना दादाही उठला होता. त्याच्या मागं वहिणीही उठली होती. बापू खाकरतच अंगणात गेला. 'बहिरे झालं का दळण.लवकर भाकरी कर. कापसात लय तन झालं. रोजदार लावला. न्याहारीच्या येळंपर्यंत एक ढेलं झालं पायजे ', असं म्हणत बापू थेट घरासमोर बांधलेल्या गोठ्यात गेला. त्याच्या मागेच दादाही गेला. गोठ्याच्या दरवाजाजवळ ठेवलेलं टोपलं उचलून बापू  गोठ्यात शिरला. दादानं तुराट्यांच्या खराट्याने अंगणातला कचरा झाडायला सुरुवात केली. मी अंगणात आलो होतो. अंगणात एका कोपऱ्यात मी लघवी केली आणि अंगणात टाकलेल्या बाजंवर जाऊन बसलो. मायचं काटकं मोडणं झालं होतं. तशी ती पुन्हा चुलीजवळ गेली अन् चूल पेटवली. मी ज्या बाजेवर बसलो तिथंच स्वयंपाक घराची खिडकी होती. बका बका धूर खिडकीतून बाहेर येऊ लागला होता. माय स्वयंपाकाला लागली होती. तिने दोन चुली पेटवल्या होत्या. वहिणी सडा सारवण करत होती. मी हळूच जाऊन माय काय करत आहे, याचा कानोसा घेतला. मायनं एका जर्मनच्या डब्यात ठेवलेली तुरीची डाळ आणि एका कपड्यात बांधलेलं बसेणाचं पीठ काढलं होतं. मी उठलो हे बघून ती म्हणाली,  'बाबा तोंड धू...आता पिठलं अन् दाळ करतो'. तसा मी घराच्या बाजूलाच असलेल्या न्हानीकडं गेलो. तिथं एका खिडकीत ठेवलेली कुपी घेतली. त्यातलं काळं मंजन हातावर घेऊन दात चोळू लागलो. हे मंजन म्हणजे खास मायनं बनवलेलं. कोळसा कुटून अन् त्यात मीठ घालून तयार केलेलं हे मंजन. दात घासताना तोंडात जमलेला थुका मी अंगणात पचकन थुकत होतो. बापू गोठ्यातून गायी अन् बैलाचं शेण उचलून उकंड्यावर नेऊन टाकत होता. त्याच्या तीन-चार खेपा झाल्या होत्या. सगळं शेण उचलून त्यानं काल मायनं शेतातून आणलेला आणि गोठ्याजवळ ठेवलेला गवताचा भारा विस्कटून गायी आणि बैलांपुढे पसरला. तसे गायी व बैलं त्या गवतावर तुटून पडले. मी तोपर्यंत तोंड खंगळलं होतं. शर्ट वर करून तोंड पुसलं आणि न्हाणीतलं टंबरेल घेऊन हागणदारीत गेलो. पोट साफ करून घरी परतलो. टंबरेल उभ्यानेच फेकून घरात घुसलोङ स्वयंपाक घरात मायच्या पुढं जाऊन बसलो. एका चुलीवरची दाळ शिजत आली होती. मायनं विझत चाललेल्या लाकडावर फुंकर मारली तसा जाळ वाढला. दुसऱ्या चुलीवर माय भाकरी करत होती. एक एक करत तिनं भाकरीची उतरंड लावली. पकडीनं तवा उचलून तिनं बाजूला ठेवला. बाजूलाच ठेवलेलं भगोणं तिनं चुलीवर मांडलं. एक बारिक कांदा कापला. दोन-तीन लसणाच्या कळ्या आणि हिरव्या मिरच्या तिनं खलबत्त्यात कुठून पिठल्याला फोडणी दिली. दोन मिनिटांत पिठलं खदखद करून शिजलं.  इकडे दाळी शिजली होती. लगेच तिनं जर्मनच्या ताटात एक भाकर मोडली. पिठलं घातलं आणि शिजलेली दाळ टाकून त्यावर मीठ टाकलं. इकडं पूर्वेला दिवस उगवण्याच्या मार्गावर होता. अंधाराला चिरत सूर्य वर येऊ पाहत होता. मी पिटलं भाकरीवर तुटून पडलो होतो. बकाबका मी दीड भाकर खाल्ली. मायनं अजून भाकर भाजी देऊ का, असं विचारलं. पण पोट डच भरल्यानं मी नको म्हणालो. ताटातच हात धुऊन मी तांब्याभर पाणी पिलं अन् जोरात ढेकर दिला. हे पाहून माय गालातल्या गालात हसली. माझं पोट भरल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर होतं. मी ओला हात मायच्या लुगड्याला पुसला अन् अंगणात गेलो. बापू शेणानं हात भरल्यामुळे अंघोळीला गेला होता. न्हाणीच्या बाजूची चूल धगधगत होती. त्यावर मोठ्या भगोण्यात ठेवलेलं पाणी वाफ देत होतं. बापू न्हाणीतून धोतर नेसून बाहेर येताच मी अंगातलं शर्ट अन् चड्डी काढून न्हाणीत शिरलो. भडाभड अंगावर पाणी ओतू लागलो. कारण मला शाळंची तयारी करायची होती.
सूर्य चार हात वर आभाळात आला होता. बापू गायी आणि बैलं घेऊन शेताकडं पांदीनं निघाला होता. मायनं पालवात भाकरी, एका चपटलेल्या भगोण्यात पिठलं, दुसऱ्या भगोण्यात वरण घातलं होतं. हे सगळं एका मोठ्या पालवात बांधून ठेवलं. घराची झाडझुड व सडासारवण करून माय आणि वहिनीनं घर आवरण्यापासून सर्व तयारी केली. माझा शाळंचा डब्बाही तयार होता. एका पालवात माझा डबा बांधलेला होता. सकाळचे आठ-साडेआठ वाजले असतील. मी शाळंला निघेपर्यंत मायचा पाय घरातून निघत नव्हता. माझीही शाळंची तयारी झाली होती. अंगणातूनच मी यशवंत्याला आवाज दिला. 'यशवंत्या चलना बे.. गोतम्या निघालं. चल बिगीनं' असं म्हणताच यशवंत्यानं 'हे पहा निघालोच' असा होकार दिला.
भिंतीत कोरलेल्या लाकडाच्या आलमारीतून मी दप्तर काढलं. दप्तर म्हणजे काय, तर कापसाच्या बियाणाची ती पिशवी होती. त्याला मायनं चिंदकाचे दोन नाडे लावून झोऱ्या तयार केलेला. मायनं पालवात बांधलेली भाकर आणि त्यात भाकरीत घातलेलं पिठलं असा डब्बा मी झोऱ्यात भरला. 'माय मी चाललो. तू वावरात जाय' असं म्हणत मी दप्तर पाठीवर घेतलं अन यशवंत्याच्या घराकडं निघालो. तसं मायनं 'दमानं जाय बाबा.. कोणाशी भांडण करू नको' असा सल्ला दिला. 'हो' एवढंच उत्तर देऊन मी पळतच यशवत्याचं घर गाठलं. तो तयारच होऊन बसला होता. तिकडं सुधी, गोतम्या,  जयश्री पाराजवळ येऊन थांबले होते. गावातल्या लोकांचीही वावरात जायची गडबड सुरू होती. कचरू काका दुसऱ्याच्या रोजानं जायला निघाला होता. त्यानं चावटपणा करत 'शाळंतच जा रे गाभडे हो.. नाही तर माळातच फिरत बसशाल' असा टोमणा मारला. आम्ही सगळ्यांनी त्याच्याकडं डिवऱ्या नजरेनं बघितलं. पण दात काढत काका निघून गेला होता.
आम्ही चौघं हागणदारीतून शाळेच्या वाटेला लागलो. बरेच लहान पाेरं रस्त्याच्या कडेला हागत बसले होते. एक पोरगं तर रस्याच्या मधोमध बसल्यानं यशवंत्यानं त्याला  ढकललं. तसं त्यानं भेकांड पसरल. त्याचा बाप मारंल म्हणून आम्ही सगळ्यांनी धूम ठोकली. पळता पळता यशवंत्याची चप्पल भरली. तसं त्याचं तोंड आणि नाक बघण्यासारखं झालं. त्यानं जेवढी जमली तेवढी घाण दगडानं खरडून काढली. शाळा गावापासून साडेतीन ते चार किलो मीटरवर होती. रस्त्यात लागणाऱ्या पाणवठ्यावर त्यानं चप्पल धुवून घेतली. चप्पल धुतानाही त्याचं तोंड वेडवाकडं होत होतं. वास त्याच्या जणू मस्तकात जाऊन बसला होता. त्याला कसं मळमळून येत होतं. आम्ही मात्र त्याला अरे रे याचा पाय गुव्हानं भरला.. असं चिडवत होतो. त्यामुळे यशवंत्या आम्हाला खाऊ की गिळू, या नजरंनं बघत होता. आता हा आम्हाला मारणार, असा अंदाज येताच आम्ही नमते घेतले आणि जंगलातून जाणारी शाळेची वाट तुडवत मार्गस्थ झालो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अंधभक्ती

देशी अप्सरांसाठी इंद्रपुरीतून खाली उतरलेल्या राजा इंद्राने पृथ्वीवरआटपाटनगरात स्थापन केलेले राज्य चांगले  सुरू होते. त्याचे  पृथ्वीतलावर आपल...