बुधवार, २८ मार्च, २०१८

खोटं बोलण्याची शिक्षा


माणूस खोटं बोलायला लागला की तो कधी तरी अडचणीत सापडतो, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. काही जण आयुष्यात कधी कधी तर काही जण नेहमीच खोटं बोलतात. अनेकांचा खोटारडेपणा कुणाला कळतही नाही. एखादी मारलेली थाप सहज पचून जाते. पण प्रत्येक थाप पचतेच, असा मात्र नियम नाही. खोटं बोलण्यापायी एखाद्याला मारही खावा लागतो. तो मी खाल्लाय, म्हणून खोटं बोलण्यापायी मारही खावा लागतो, असं विधान मी इथे अगदी आत्मविश्वासानं करतोय. ग्रामीण भागात 'खोट्याच्या पदरी गोटे' अशी म्हण आहे. माझ्या पदरी गोटे पडले नसले तरी पाठीवर लाकडी दांड्याचे फटके पडले, हे विनम्रपणे सांगायला मला लाज वाटत नाही.
शाळंला बुट्टी मारणं हा अनेकांचा छंद असतो. काही जण पोट दुखल्याचा बहाणा करून तर काही जण मास्तर रागावतो म्हणून घरीच रडूनपडून शाळंत जाणं टाळतात. तर काही जण घरून शाळंसाठी निघतात पण शाळंत जात नाहीत. लहानपणी मी या तीनपैकी तिसऱ्या गटात मोडत होतो.  खरं तर मी एकटाच या गटात नव्हतो. जयश्री, सुधा, यशवंता, गौतम अाणि मी असा आमचा पाच जणांचा गट. आम्ही पाचही जण चौथीत शिकत होतो.  जयश्री आणि सुधा मात्र शाळा बुडवायला घाबरत होत्या. पण आम्हा तिघाचं बहुमत असल्यानं या दोघींचं महिलाराज चालणं अवघडच होतं. जंगलाचा रस्ता असल्याने या दोघी आम्हाला सोडून शाळंत जाण्याची हिंमतच करू शकत नव्हत्या. घरून शाळंत जाण्यासाठी निघायचं आणि शाळंच्या वेळेपर्यंत जंगलात हिंडायचं, असा महिन्यातून  तीन-चार वेळा आमचा  बेत असायचा.
एका दिवशी ठरलेल्या वेळी आम्ही शाळंत जाण्यासाठी निघालो होतो. त्याच्या आदल्या दिवशी मास्तरनं गणित आलं नाही म्हणून माझा कान पिळून उद्या तयारी करून ये, असं फर्मान साेडलं होतं. बरं मास्तरनं कान पिळला म्हणून एखाद्या सज्जन पोरानं घरी गेल्यावर गणिताची तयारी तरी केली असती ना. पण मास्तर गेला उडत, म्हणत त्यादिवशी बेफिकीरपणे मी गावात गोट्या खेळत बसलो. दुसऱ्या दिवशी शाळंत जाण्याआधी मात्र मास्तरनं पिळलेल्या कानात त्याचीच वाणी ऐकू येऊ लागली. तेव्हा मात्र आज मार खावा लागणार, याचा साक्षात्कार झाला. मग आज शाळंत जायचंच नाही, असा प्रस्ताव मी आमच्या गटातील सभ्य मंडळीसमोर मांडला. हा प्रस्ताव पाच विरुद्ध तीन मतांनी संमतही झाला. दोन पोरींनी विरोधी पक्षाची भूमिका चोख बजावली. पण बहुमतात नेहमीप्रमाणंच आम्हीच होतो.  मग काय, शाळंला बुट्टी मारून जंगलात हुंदडायचा एक कलमी कार्यक्रम हाती घेतला गेला. पण संध्याकाळच्या पाच वाजेपर्यंत करायचे काय, असा तारांकित प्रश्न गौतमने उपस्थित केला. त्यावर मोहोळ शोधायचं, आवळे खायचे, तळ्यावर जायचं असे विविध प्रस्ताव मी सदनासमोर मांडले. हे सर्व प्रस्ताव अविरोधपणे मंजूर झाले.
ठरल्याप्रमाणं आम्ही प्रथम शाळंचा रस्ता बाजूला ठेवून तळ्याला जाऊन मिळणाऱ्या ओढ्याच्या कडंनं मोहोळ शोधत निघालो. थोडं पुढं जाताच गावातल्या दोन बाया (महिला) ओढ्यावर धुणं धुत असताना दिसल्या. आपली चोरी पकडली जाणार या भीतीनं आम्ही एकमेकांच्या तोंडाकडं बघत होतो. पण त्या बाया एकमेकींत गप्पा मारण्यात इतक्या मश्गुल होत्या की, त्यांचं आमच्याकडे लक्षही नव्हतं. त्यामुळं आम्ही हळूच एका झुडपाआड लपलो. यशवंता हळू आवाजात म्हणाला 'अरं त्या सासूच्या चुगल्या करत असतील.' यशवंत्याच्या या बोलण्यावर आम्ही सगळेच फिदीफिदी हसू लागलो. त्यामुळं त्या बायांना आमची चाहूल लागलीच. एकीनं मोठ्यानं आवाजात 'कोण हाय रं तिकडं', अशी हाक मारली. तेव्हा मात्र आम्ही सगळे मसनवट्यात शांत बसावं तसं गप्प झालो. पायाचा आवाज न येऊ देता आम्ही दुरून पुढचा टप्पा गाठला. आता मात्र आम्ही दाट झाडीत शिरलो होतो. आम्हाला दोन मोहोळं सापडली.  पण गौतमच्या ओठाला एक मधमाशी चावली. त्यामुळं त्याचा ओठ सुजला होता.  मनसोक्त मध खाऊन झाल्यावर आम्ही आवळे तोडले. पाण्यात खेळलो. तळ्याजवळ जाऊन त्यात दगडं मारले.
पाहता पाहता दिवस कलू लागला होता. संध्याकाळ होत चालली होती. शाळा सुटायला थोडाच वेळ बाकी असंल असा अंदाज बांधून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. आपापले दप्तर पाठीवर घेऊन आलो त्याच रस्त्यानं आम्ही घरी परतलो. नेहमी घरी पोहोचण्याची तीच वेळ होती. त्यामुळं आम्ही शाळंत गेलो होतो की मसनात, हे कोणाला काहीच कळायचं काम नव्हतं. घरात दप्तर फेकून मी हातपाय, तोंड धुतलं. दुरडीत ठेवलेली एक भाकर घेऊन तिला तूप लावून गपागप हाणली. माय अन् बापू अजून शेतातून आले नव्हते.  देवळीत ठेवलेल्या गोट्या घेऊन पाराजवळ खेळायला जाणार तेवढ्यात लहाना दादा डोक्यावर दळणाचं चुंगडं घेऊन दारावर उभा होता. गावात पिठाची गिरणी नसल्यामुळं आमची शाळा असलेल्या गावी  दळणासाठी जावं लागायचं. नाही तर घरी जात्यावर दळण दळावं लागायचं. दादानं उभ्या उभ्याच 'काय शिकवलं रं आज शाळंत?' असा प्रश्न केला. 'काही नाही.. मास्तरनं कविता शिकवली. अकरा ते १९ पर्यंत पाढे पाठ करून घेतले,' असं खोटं उत्तर मी त्याच्या प्रश्नावर देऊन टाकलं. दादानं शांतपणे माझं उत्तर ऐकून घेतलं. दळणाचं चुंगडं त्यानं खाली ठेवलं. त्यानं दुसरा कोणताच प्रश्न विचारला नाही म्हणजे आपली थाप पचली, या भ्रमात मी होतो. पण काही वेळातच माझा भ्रमाचा भोपळा फुटला. त्यानं चुंगडं खाली ठेवलं तसं बाजूला पडलेलं लाकडाचं दांडकं उचललं. मी आपला थाप पचल्याचा मनोमनी आनंद साजरा करत असतानाच ढुंगणावर रप्पकन दांडकं पडलं. तसं मी मेलो मेलो.. म्हणत जागेवर नाचू लागलो. तसे आणखी दोन तीन दांडके पाठीवर अन् ढुंगणावर पडले. अंगाची आग उठल्याने पाराच्या दिशेने धूम ठोकली. दादा मागे अन् मी पुढे, असा पाच मिनिटं खेळ रंगला. 'अजून पळालास तर जिवानं मारीन' अशा शब्दांत दादा खेकसला.  तरीही जिवाच्या आकांतानं शेताच्या दिशेनं पळ काढला. कारण दादाच्या तावडीतून मायच सुटका करू शकत होती. बापूकडं गेलो तर त्यानंही तुडवलं असतं, हे मला ठाऊक होतं.  दादानं का मारलं याचं उत्तरही मला मिळालं होतं. बहुतेक आपली थाप पचली नाही, याचा साक्षात्कार मला झाला होता. मी मार खात असल्याचं पाहून गौतम आणि यशवंताही घरातून निसटले होते. कदाचित आपला बापही आपल्याला असाच सोलून काढंल, याची त्यांना भीती होती.  मी पळतच शेत गाठलं दादा काही अंतरापर्यंत मागे लागला. पण मी जरा जास्तच जोरात पळाल्यामुळं तो माघारी फिरला होता. तो माघारी फिरल्याचं पाहून मी मार पडलेला भाग चोळत चोळत आणि रडत रडत शेत गाठलं. सुदैवानं या मारानं माझी कापडं ओली झाली नव्हती.
शेतात पोहोचून मायला मोठ्यानं आवाज दिला. सुदैवानं बापू आणि माय बऱ्याच अंतरावर काम करत होते. माझा रडण्याचा आवाज ऐकून मायला घाबरायला झालं. तिनं 'काय झालं बाबा.. कामून लडायला' असा प्रश्न केला. दादानं मारल्याचं सांगून मी मायला बिलगलो. 'कामून मारलं?' असा तिचा दुसरा प्रश्न होता. पण तिच्या प्रश्नाचं खरं उत्तर माहीत असूनही मी देऊ शकत नव्हतो. 'लडू नको.. लडू नको..' असं म्हणत ती माझं सांत्वन करत होती. तरी मी घंटाभर भेकांड पसरलं होतं. मी रडत असल्याचं बघून बापूही जवळ आला. त्यानंही कारण विचारलं. पण माझं रडणं थांबत नव्हतं. तसा 'मर' असं म्हणत बापू परत कामाला लागला.  मायनं लगबगीनं काम आटोपलं. 'चल घरी जाऊ' म्हणत तिनं टोपलं, विळा, न्याहारीचा पालव, भांडेकुंडे जमा केले. आम्ही घरी गेलो. बापू शेतातच थांबला होता. मायच्या मागं दडत  मी घरापर्यंत गेलो. मायनं दादाला पहिलाच प्रश्न केला. 'कामून मारलं रं लेकराला?' दादा म्हणाला 'आये माय हे पाेरं आज शाळंतच गेले नाहीत. मी दळण दळून झाल्यावर शाळंत गेलो होतो. मास्तरनं आमदरीचं एकही लेकरू आज शाळत आलं नाही असं सांगितलं. आता तूच इचार त्याला ते कोठं होतं?' दादा शाळंत गेला होता, हे कन्फर्म असल्याने आता मात्र मायसुद्धा मला हाणते की काय, याची भीती वाटत होती. पण मायनं  'जाऊ दे एक दिस गेला नाय तर काय व्हईल,' असा मला दिलासा देणारा प्रतिप्रश्न केल्याने सुटलो बुवा, म्हणत मी सुटकेचा श्वास घेतला. दादा रागात होता. तरी मायसमोर तो आणखी मारणार नाही, याची मला खात्री पटली. मायनं अंगावरचं शर्ट आणि चड्डी काढून मला किती मार लागला, हे बघितलं. तिनं माझ्या अंगावर उमटलेल्या वळांवरून अलगद हात फिरवला. तिच्या हातानं आणि मायेनं मलमाचं काम केलं होतं. अंगाच्या होणाऱ्या आगीवर तिनं मायेची फुंकर घातली होती. माझं दुखणं थांबलं होतं. या घटनेनंतर शाळंला दांडी मारण्याचं मला लागलेलं दुखणंही कायमचं बरं झालं होतं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अंधभक्ती

देशी अप्सरांसाठी इंद्रपुरीतून खाली उतरलेल्या राजा इंद्राने पृथ्वीवरआटपाटनगरात स्थापन केलेले राज्य चांगले  सुरू होते. त्याचे  पृथ्वीतलावर आपल...