शुक्रवार, ३० मार्च, २०१८

चोरट्यांची भीती आणि गावकऱ्यांची फजिती


चोर म्हटलं की अनेकांच्या काळजात धडकी भरते. घरात चोर शिरला तर त्याला बघणाऱ्यांचा थरकाप होतो. एखादीच व्यक्ती चोराला घाबरत नसावी. माझ्या मते शंभरपैकी सत्यान्नव लोकांना चोराची भीती वाटत असणार. आता चोर म्हणजे कोण, हे अधिक स्पष्ट करण्याची गरजच नाही. शेंबडं लेकरूही चोर म्हणजे कोण, हे सांगू शकेल. येथे मुद्दा मांडायचा हा की, चोराची माणसाच्या मनात किती दहशत असते.
ही गोष्ट आहे १९९७ सालची.  ११ मे रोजी सायंकाळी औरंगाबाद येथेच माझे लग्न झाले. ठीक ५.५५ वाजता आमच्या लग्नाचा बार उडाला. त्यानंतर रीतीप्रमाणे पाहुण्यांच्या भेटी, गिफ्ट आणि शुभेच्छा स्वीकारणे आणि जेवणावळ यात रात्रीचे ११ वाजले. नंतर बिदाई वगैरे वगैरे..  अर्धांगिनीला घरी नेले. काही वेळ पाहुणे मंडळीसोबत गप्पा मारल्यानंतर जांभया येऊ लागल्या. दिवसभराचा थकवा असल्याने घोडे विकून झोपावं तशी कधी झोप लागली हे कळलंच नाही. सकाळी पाहुण्या मंडळीची कलकल ऐकून डोळे उघडले. मुक्कामी थांबलेले पाहुणे घरी निघण्याची तयारी करीत होते. मलाही माझ्या अर्धांगिनीला माझं मूळ गाव म्हणजे आमदरी (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) दाखवण्यासाठी न्यायचं होतं. पण त्यापूर्वी पुसदला वास्तव्यास असलेल्या भावाकडे प्रथम जाण्याची योजना होती. कारण मूळ गाव आम्ही सर्व भावंडांनी कधीच सोडलं होतं. गावाकडं शेती आणि घर मात्र होतं. वडील दरवर्षी शेती बटाईनं गावातच राहणाऱ्या आतेभावाला देत. वऱ्हाडातील एका जत्थ्यासोबत माझ्या कुटुंबातील सर्व मंडळी   रेल्वेने नांदेड आणि तेथून पुसदला गेलो. पुसदला तीन मुक्काम केल्यानंतर  पत्नीला माझं जन्मगाव, माझं घर आणि शेती दाखवण्याची प्रचंड ओढ लागली होती. पण सकाळचे जेवण-खावण उरकण्यातच दुपार झाली. पुसदपासून माझे गाव फार तर सत्तर-पंच्याहत्तर कि.मी. वर. पण मधले ५ ते ६ किलोमीटर अंतर पायी जावे लागणार होते. त्यासाठी मरसूळ फाट्यावरच उतरावं लागतं. फाट्यापासून मरसूळ गाव दोन किलोमीटर आणि तेथून माझं गाव तीन किलोमीटरवर. अर्धा किलोमीटर वगळता उर्वरित सर्व रस्ता जंगलाचाच.
माझी पत्नी, पुतणी आणि मी असे तिघंच गावाकडे जाण्यास निघालो.  हात दाखवा गाडी थांबवा स्वरूपाच्या एसटीत आम्ही बसलो. तेव्हा साधारणत: साडेतीन वाजले असावेत. त्यादिवशी बस मात्र गोगलगायीसारखी हळू चालली होती. चालकाने कितीही करकचून अॅक्सिलेटरवर पाय दाबला तरी गाडी ४० कि.मी. प्रतितासाच्या वर धावायला तयार नव्हती. दीडच तासांचा प्रवास मला दीड दिवसांचा वाटू लागला. त्यादिवशी मात्र मी एसटी महामंडळाचा मनोमन उद्धार केला. कधी एकदा गावी पोहोचतो आणि माझ्या जन्मभूमीवर पाय ठेवतो, याची प्रचंड उत्सुकता लागून होती. मरसूळ-बेलखेड फाटा येताच एकदाची वाहकाने दोरी ओढली अन् गचकन चालकाने ब्रेक दाबून बस थांबवली. शिवाजी महाराजांना अागऱ्याहून सुटका झाली तेव्हा जेवढा आनंद झाला नसेल तेवढा मला त्या टपऱ्या बसमधून खाली पाय ठेवल्यानंतर झाला होता.
आमच्या तिघांकडं फारसं सामान नव्हतं. एका आंघोळीचे तेवढे कपडे एका बॅगेत कोंबून आम्ही निघालो होतो. फाट्यावर उतरताच माझे पाय तरातरा गावाच्या दिशेनं चालू लागले. दिवस पूर्णपणे कलला होता. तासाभरात अंधार पडणार याची पूर्ण कल्पना आली होती. त्यामुळंच माझ्या पायांना गती आली होती. पण पुतणीनं  'तात्या थोडं हळू चलाना' असं म्हणताच गती थोडी मंदावली. 'बेटा जरा पटपट चल. दिवस मावळला तर अंधार होईल. आपल्याला जंगलातून जायचं आहे.', असं मी त्यांना समजावताच दोघींच्या पायांना गती मिळाली. माझ्या पत्नीने बहुदा पहिल्यांदाच विदर्भात पाय ठेवलेला होता. कुठं जायचं, कसं जायचं, हे तिला काय ठाऊक. पुतणीचा हात धरून ती माझ्या पावलावर पाऊल ठेवत निघाली होती. 'किती दूर आहे हो गाव' असा प्रश्नत तिनं केला. 'हे काय जवळचआहे' असं सांगून तिचं मी सांत्वन केलं. अर्ध्या पाऊणतासात मरसूळ गाठलं. तोवर सूर्य डोंगराच्या कुशीत दडू पाहत होता. गावातून न जाता गावाच्या बाहेरून जाणाऱ्या पाणंद रस्त्यानंच गाव जवळ करण्याचा माझा प्रयत्न होता. पाणंद रस्त्याने चालताना मात्र पत्नीचा जीव कासावीस झाला. तिने नाकाला पदर लावला. त्यावेळी हागणदारीमुक्त गाव, अशी योजना कोठेच अस्तित्वात नव्हती. त्यामुळे अख्खं गाव या पाणदेतच उलटायचं. त्याचा जो परिणाम झाला  होता तो भोगत आम्ही त्या रस्त्याने निघालो. डोंगराच्या कुशीत शेती करणारे शेतकरी गायी, म्हशी आणि आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांसह घरी परतत होते. आम्ही झपाझप पावलं टाकत निघालो असतानाच पुढून   बैलगाडी घेऊन येत असलेल्या शेतकऱ्याने शेतकऱ्याने बैलांचा कासरा ओढला तसे बैल थबकले. 'काय सोयरे हो आमदरीला चालले का?' असा प्रश्न त्याने केला. 'हो' माझं उत्तर एवढंच होतं. 'लवकर जा, तुमच्या जंगलात चोर हायेत. कोणालाबी मारायलेत, लुटायलेत. पटकन जा नाय तर मरसुळातच मुक्कामाला थांबा', असा सल्ला त्यानं दिला. त्याचा सल्ला ऐकून काय करावं काय नाही, हे मला सुचंनासं झालं. बरं मरसुळात थांबायचं तर कोणाकडं थांबावं, हाही प्रश्न होता. अनेक वर्षांपासून गाव सुटल्यानं फारशी कोणाची ओळखही नव्हती. त्यामुळं लवकरच जावं, असं ठरवून त्या शेतकऱ्याला 'हो काका.. लवकर जाऊ', असं उत्तर देऊन पुतणी वर्षा आणि पत्नी  संगीताला 'चला पळा', असं म्हणत आधीच्या पेक्षा पायांना अधिक गती देऊन मी पुढे निघालो. त्याचवेळी मी संगीताच्या तोंडाकडे बघितलं तेव्हा तिच्या डोळ्यांत प्रचंड भीती दिसत होती. वर्षाही भयभीत झाल्याचं जाणवलं.
बघता बघता आम्ही मरसूळची वेस ओलांडली होती. सूर्यही काळोखाच्या कुशीत विसावू पाहत होता. अर्ध्याच तासांत काळोख पसरणार होता. त्याआधी गाव गाठणं गरजेचं होतं. आता जंगलाच्या रस्त्याला सुरुवात झाली होती. फक्त दूरवर चारा शोधायला गेलेले काही पक्षीच आकाशातून आपल्या घरट्याच्या दिशेने उडताना दिसत होते. थोड्याच वेळाने एक चिटपाखरूही दिसायला तयार नव्हतं. सगळी कशी शांतता होती. आम्ही गतीनं चालू लागल्यानं आमच्या पावलांचा आणि श्वासाचा आवाजही स्पष्ट एकमेकांना ऐकू येत होता. संगीता तर पूर्णपणे भांबावलेली होती. अधूनमधून दोघी बोलत होत्या. मी दबक्या आवाजात दोघींनाही बोलू नका, असा सल्ला दिला. तशा दोघी शांत चालू लागल्या. वर्षाच्या पायातील पैंजण छणछण आवाज करीत होते. ते शांततेचा भंग करू लागल्याने मी तिला ते पैंजण काढण्यास सांगितले. त्याच वेळी मी संगीताला तिच्या गळ्यातील सोन्याची पोत, कानातले डूलही काढून देण्यास सांगितले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता दागदागिने माझ्याकडं काढून दिले.  जर चोरटे आलेच तर सर्व सोनंनाणं त्यांच्या स्वाधीन करायचं. पण माझ्या लेकीच्या अन् पत्नीच्या अंगाला त्यांना हात लावू द्यायचा नाही, हा निर्धार मी मनोमन केला होता. चालता चालताच मी रस्त्याच्या कडेला पडलेलं एक लाकूड उचलून हाती धरलं. दोघींना पायांचा आवाज येऊ देऊ नका की बोलू नका. चोरांना आपली चाहूलही लागायला नको, असं मी बजावून टाकलं. हळूहळू अंधार पडत होता. तेवढ्यात शंभर सव्वाशे मीटरवर कोणी तरी आपल्याच दिशेनं येत असल्याचं मला दिसलं. प्रथम मी थबकलो. अधिक निरखून बघितलं तेव्हा डोक्यावर फेटा बांधलेला वृद्ध येत असल्याचा अंदाज आला. आमच्या पावलांना पुन्हा गती आली. ती वृद्ध व्यक्ती जसजशी जवळ आली तसंतसं त्याचा चेहरा दिसू लागला. तो चेहरा ओळखीचा असल्याचं जाणवत होतं. ती व्यक्ती काही अंतरावर येताच माझ्या आनंदाला तर सीमाच राहिली नव्हती. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हे तर माझे वडीलच होते. 'अगं आपले बापूच आहेत,' असं म्हणत मी शांततेचा भंग केला. बापू जवळ येताच त्यांनीही आम्हाला बघितलं. 'अरं बाबा तू व्हस' म्हणत त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद झळकला. पण काही क्षणातच त्यांचा चेहरा गंभीर झाला. 'एवढ्या रात्रीचं कशाला आलात बाबा.. आपल्या गावात चोर आले.' असं म्हणत ते माघारी फिरले. 'तुम्ही कुठं निघाले होते', असा प्रश्न मी केला. 'उमरखेडाला चाललो व्हतो', असं उत्तर देऊन ते आमच्याबरोबर गावाच्या दिशेनं चालू लागले. बापू आमच्याबरोबरच औरंगाबादहून निघाले होते. पण पुसदला न येता ते उमरखेडला उतरून मूळ गावी गेले होते. आई मात्र पुसदला आमच्यासोबत आलेली होती.
 'आता बोलू नका.. घरी गेल्यावर बोलू', असं बापूंनी सुचवलं. पुन्हा आम्ही श्वास रोखून गावाच्या दिशेनं निघालो. अजून गाव जवळ आलं नव्हतं. सूर्य पूर्ण बुडाला होता. तरी अंधूक का होईना, आम्हाला रस्ता दिसत होता. गावात पोहोचेपर्यंत पूर्ण काळोख पसरला होता. एकदाचे आम्ही घरी पोहोचलो. आमचं घर वडिलांनी आत्याच्या मुलाला राहण्यासाठी दिलं होतं. धृपतबाई (मामाच्या मुलाची पत्नी) स्वयंपाक करत होती. दाजी बाहेरच बाजंवर बसला होता.   नवरी पाहण्यासाठी गावातील बरीच मंडळी जमली होती. म्हाताऱ्या कोताऱ्या संगीताकडं डोळे नि तोंड वासून निरखून पाहत होत्या. तीसुद्धा या थोरांचा चरणस्पर्श करीत होती. काही म्हाताऱ्या बायांनी संगीताचे पटापट मुकेही घेतले.
रात्रीचं जेवण झालं. आता निवांत झोपावं, असा आमचा बेत होता. पण एकएक माणूस आमच्या घरी येऊ लागला. लोकं का जमताहेत, असा प्रश्न आम्हा तिघांनाही पडला. गुणा मामाचा सुखदेव पेटी (हर्मोनियम) अन उकंडदादा ढोलकी घेऊन आला तेव्हा लोकं आमच्या घरी जमण्याच्या कारणांचा उलगडा झाला. आमच्या घरी भजनाचा कार्यक्रम होता. जंगलात चोर आल्यामुळं जागरण म्हणून ही मंडळी गावात दररोज भजन करीत असल्याची माहिती कळाली. काही तरुण मुलं गावाच्या चारही बाजूंनी पहारा देत आहेत, हेही एकानं सांगितलं. मला तसा भजनाचा छंद होताच. दोन-तीन तास मी भजनात रमलो. पण संगीता नि वर्षा तासाभरातच मधल्या खोलीत आडव्या झाल्या. एकानंतर एक भीमगीताचे सादरीकरण होत होते. गायकांचे आवाज, ढोलकीचा टणटणाट आणि टाळांचा मंजूळ आवाज काळोखाला चिरत होता. पहारा देणाऱ्यांची अधूनमधून हाळी ऐकू येत होती. एक भीमगीत संपलं होतं. भजनी मंडळाला आता चहाची तलफ लागली होती. धृपतबाईने चुलीवर चहा मांडला होता. काही जण तोंडातला तंबाखूचा तोबरा अंगणात जाऊन थुकत पाण्याचा गुळणा करत होते. मीही पाय मोकळे करण्यासाठी अंगणात गेलो, तसा कुत्र्यांचा दूरवरून जोरात भुंकण्याचा आवाज कानी पडला. तसे पहारे देणारे तरुण 'अरे खोरीकडे चला रे' (खोरी म्हणजे दामू मनवर याचे शेतातील घर) असा एकच गलका त्यांनी केला. काठ्या, कुऱ्हाडी, सुरे घेऊन पहारेकरी तरुण आणि भजनात बसलेले काही जण खोरीच्या दिशेनं पळत सुटले. दामूच्या शेतावर चोरांनी नक्कीच हल्ला केला, असं सर्वांनाच वाटू लागलं. कुत्र्यांचा आवाज आणि त्यात दामूच्या मायचं जोरजोरानं ओरडणं ऐकू येत होतं. पाचच मिनिटांत सगळे जण खोरीच्या शेतात गेले. त्यांच्याबरोबर हातात रुमणं घेऊन मीही पळत सुटलो होतो. खोरीत पोहोचलो तर काय, तिथं कुत्र्यांची कवंडळ लागलेली आणि दामूची माय ती कवंडळ सोडवण्यासाठी ओरडत होती. चोरवगैरे कोणीच नव्हते. धावलेल्या तरुणांनी त्या म्हातारीलाच चार शिव्या हासडून गाव गाठलं. उत्तर रात्रीला भजनाचा कार्यक्रम संपला. अंग टाकताच मला मेल्यासारखी झोप लागली. दिवस निघल्यावर धृपतबाईनंच चहा घेण्यासाठी आवाज दिला अन डोळे उघडले.  उठताच रात्रीचं चित्र पुन्हा डोळ्यांसमोर तरळलं. दाम्याच्या मायनं पोरांची केलेली फजिती आठवली अन हसतच मी पांघरून बाजूला सारलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अंधभक्ती

देशी अप्सरांसाठी इंद्रपुरीतून खाली उतरलेल्या राजा इंद्राने पृथ्वीवरआटपाटनगरात स्थापन केलेले राज्य चांगले  सुरू होते. त्याचे  पृथ्वीतलावर आपल...