शनिवार, १६ जून, २०१८

भेट तिची नि माझी (दीर्घ कथा)


ती सध्या काय करत होती, याची दीपकला कल्पनाच नव्हती. तिचं तारुण्यातलं पदार्पण मात्र त्याला आठवत होतं. शिक्षणासाठी खेड्यातून शहरात गेलेल्या दीपकला तिनं भुरळ घातली होती. घराच्या बाजूने मुलींच्या हसण्याचा आवाज आला की दीपाली आली हे त्याला कळायचं. कारण दीपकच्या घराजवळूनच तिच्या शाळेचा रस्ता होता. ती दहावीत शिकत होती तर दीपक बी.ए. प्रथम वर्षात. तसं बघितलं तर दीपक वयात आलेला होता. पण दीपाली मात्र तारुण्याच्या उंबरठ्यावर होती. सर्वसामान्य तरुणांपैकी एक मात्र चार-चौघांत देखणा असलेल्या दीपकचे तिला आकर्षण हाेतं. प्रेमात पडण्याचं वय नसतानाही ती कदाचित त्याच्या प्रेमात पडली असावी. मैत्रिणींसोबत जाताना दीपकचं घर जवळ आलं की मुद्दाम मोठ्यानं हसणं हा दीपकसाठी ती आल्याचे संकेत होते.
दीपाली एका मध्यमवर्गीय ब्राह्मण  कुटुंबातील होती. वडील कुठल्या तरी सरकारी कार्यालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी. दीपाली हीच घरातील थोरली मुलगी. एक लहान भाऊ तिच्या पाठीवर होता. ती ज्या कन्या शाळेत शिकत होती त्या शाळेचा रस्ता दीपकच्याच घराजवळून जात होता. त्यामुळे ती आणि दीपक अनेकदा समाेरासमोर येत. पण ती वयानं लहान असल्यानं दीपकनं कधी तिच्याकडं वेगळ्या नजरेनं बघितलं नव्हतं. पण तिचं सौंदर्य डोळ्यांत भरण्यासारखं होतं. बऱ्याचदा तिनं दीपकच्या डोळ्यांत रोखून पाहण्याचा प्रयत्न केला. पण दीपक प्रेमाच्या गावचा नव्हताच.  एक-दोन वेळा तिनं मुद्दाम दीपकला बोलण्याचं निमित्त साधत 'किती वाजले?' असा प्रश्नही केला. पण शाळेला उशीर झाला असेल म्हणून तिनं वेळ विचारला असावा असा त्याचा समज होता. पण ती बोलण्याचं निमित्त शोधत होती, हे दीपकला कळलं नाही.
दुपारची वेळ होती.   घरात उकडू लागल्यानं दीपक घरासमोरील पिंपळाच्या झाडाखाली  कट्ट्यावर एकटाच बसला होता. समोरून दीपाली एकटीच रुमालानं घाम टिपत आली होती. दीपकला एकटं बघून तिनं संधीचं सोनं केलं. ती थेट दीपकजवळच गेली. 'मला ग्लासभर पाणी देना.. खूप तहान लागली?' असा आदेश केला.  ती दीपकसाठी नवखी नव्हतीच.  'हो देतो' म्हणत दीपक घरात शिरला. तांब्यात पाणी आणि ग्लास घेऊन तो परतला. दीपालीनं ढसाढसा दोन ग्लास पाणी पिलं. एक सुस्कारा टाकून 'तू आज कॉलेजला गेला नाही का?' असा प्रश्न केला.   'कंटाळा आला म्हणून गेलो नाही' असं उत्तर देऊन दीपक मोकळा झाला. 'पण तू आज एकटी कशी?' असं दीपकनं विचारलं. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर लॉटरी लागावी तसा आनंद झळकला. 'अरे आमच्या दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. मी सगळयांच्या आधी पेपर देऊन बाहेर पडले' असं उत्तर तिनं दिलं.  तिला दीपकशी बरंच काही बोलण्याची इच्छा असावी. पण ती पुढचं बोलण्याआधीच दीपक तांब्या नि ग्लास ठेवण्यासाठी घरात गेला. बाहेर येईपर्यंत ती तेथेच उभी होती. न राहवल्याने दीपकनं तिला  'आज तुला घरी जायचं नाही का?' असा प्रश्न केला. 'मी मैत्रिणीची वाट बघतेय' असं तिचं उत्तर होतं. 'ओके' म्हणत दीपक घराकडे वळत असतानाच 'ए थांबना..का माझ्यासोबत बोलायचं नाही का तुला?' या दीपालीच्या प्रश्नानं दीपक   हबकून गेला. उगीच लोकांचा गैरसमज होईल, अशी दीपकला भीती होती. तरीही का कुणास ठाऊक दीपकलाही तिच्याशी बोलावसं वाटत होतं. तरीही त्यानं आपण नंतर बोलू म्हणत तिला पाठ दाखवली. दीपक घरात गेला. दोन मिनिटांनी तो बाहेर आला. पण दीपाली तेथे नव्हती. ती तर मैत्रिणीची वाट बघणार होती. मग गेली कशी? असा प्रश्न त्याला पडला. पण ती मैत्रिणीसाठी नव्हे तर आपल्यासाठीच थांबली होती, असं उत्तरही त्याला  सापडलं. ती पेपरला जाण्याच्या वेळी दीपक तिच्या वाटेवर नजर ठेवून होता. ती घराजवळ आली की तो तिला कधी मानेनं तर कधी डोळ्यांनी खुणवायचा. तीसुद्धा स्मित हास्य देत  तितकाच प्रतिसाद द्याची. त्या दोघांचं हे मनोमीलन तिच्या मैत्रिणींना कळायला वेळ लागला नाही. त्यापण चावटपणानं 'बघ तुझा हीरो समोरच उभा आहे', असं चिडवत होत्या.
एका दिवशी दीपकची नजर दीपालीच्या रस्त्यावरच होती. पण बराच वेळ झाला तरी ती आलीच नाही. तीच काय तर तिच्या शाळेतील एकही मुलगी रस्त्यानं जाताना दिसली नाही. म्हणून दीपकनं शाळेकडं मोर्चा वळवला. शाळेचं गेट बंद होतं. एक चौकीदार तेवढा गेटच्या बाजूला तंबाखू मळत बसलेला दिसला. दीपकनं 'काय काका, आज शाळेला सुटी आहे की काय?' असा प्रश्न केला. 'बाबू सुट्या  लागल्यात ना.  परीक्षा झाली'. असं काकाचं उत्तर ऐकून दीपक निराश झाला. आता कुठं दीपालीविषयी त्याच्या मनात प्रेमभावना जागृत होत असताना मध्येच सुट्या कशा लागल्या, याचा त्याला प्रचंड राग आला. दीपाली कुठे भेटेल, केव्हा भेटेल, या प्रश्नांचं तेव्हा तरी दीपककडे उत्तर नव्हतं. कारण ती ज्या कन्या शाळेत शिकत होती ती शाळा दहावीपर्यंतच होती. पण एकदा दीपालीनं बोलता बोलता तिच्या घराचा पत्ता सांगितला होता, हे दीपकला आठवलं.
ऊन उतरलं होतं. दीपालीच्या घराचा पत्ता शोधणं, एवढंच काम दीपकच्या यादीत होतं.  सायकलवर टांग मारून  तो  दीपालीनं सांगितलेल्या वस्तीकडं वेगानं निघाला. वस्ती काही दाट नव्हती. त्यानं एका आजीकडे 'आजीबाई दीपाली जोशी' कुठे राहते हो? असा प्रश्न केला. आजीबाईनं बोट दाखवत 'ते लिंबाच्या झाडाला लागून असलेलं घर' एवढच उत्तर दिलं. दीपक थोडा पुढे गेला. पण घराला मोठं कुलूप लावलेलं होतं. ते पाहून 'सालं माझं नशीबच गांडू' असं स्वत:शी पुटपुटत पुन्हा आजीबाईजवळ गेला. 'आजी... घराला तर कुलूप आहे.. कुठं गेले जोशी काका?' आजीनं दीपकला खालपासून वरपर्यंत न्याहाळलं. 'तू काय त्यांचा पाहुणा हाईस का?  अरं बाबा त्या जोश्याची बदली झाल्याचं आईकलं व्हतं. गेला असंल घर सोडून' आजीचे ते शब्द ऐकून दीपकला आपल्या कानात कोणी तरी गरम पाणी ओतावं तसं वाटलं.  हताश होऊन तो घरी परतला. एक-दिवसा आड त्याच्या सायकलची चाके दीपालीच्या घराच्या दिशेने धावत होती. परंतु दरवेळी त्याला निराशच होऊ परतावं लागलं होतं. दीपालीच्या वडिलांची बदली झाली होती हे मात्र पक्कं होतं. ती कधीच भेटणार नाही, याची दीपकला जाणीव झाली. दीपक काही दिवस हताश, निराश राहिला. पण आयुष्याचे गाणे कधी न संपणारे आहे, याची त्याला जाणीव होती.
बघता बघता दोन वर्षे लोटली. दीपकने ग्रॅज्युएटची परीक्षा दिली.  सुट्यांत तो बहिणीला औरंगाबादला भेटायला गेला.  परीक्षेचा निकाल काय लागणार याची त्याला कल्पना होतीच. ऐन परीक्षेत तो आजारी पडल्यामुळे त्याचा एक पेपर हुकला होता.   वर्षच वाया जाणार यामुळे बहीण राहत असलेल्या शहरातच काही तरी काम करावे, असं त्यानं ठरवलं. बहिणीच्या मदतीने त्यानं चहा-नाष्ट्याची टपरी उघडली. त्याचा व्यवसायात चांगला जम बसला. ग्राहक नसेल त्या वेळी तो अभ्यास करू लागला. पुरवणी परीक्षा देऊन त्यानं आपलं पदवी शिक्षण पूर्ण केलं. पुढे शहरातच शिक्षण घेण्याचा मनोदय केला.  अर्धवेळ व्यवसाय आणि सायंकाळी दुसऱ्या पदवीचे शिक्षण असा त्याचा क्रम सुरू होता. व्यवसाय चांगला चांगला चालत असला तरी  स्वत:ची जागा नसल्याने हा व्यवसाय कधी ना कधी सोडावाच लागणार याची त्याला कल्पना होती. त्यामुळे शिकूनच  नोकरी करावी, असंच दीपकनं ठरवलं.   दीपक आपलं गाव, मित्र, मैत्रिणी यांना हळूहळू विसरत चालला होता. शहराच्या ठिकाणी त्याला नवे मित्र मिळाले होते.  दीपालीचाही त्याला विसर पडला होता.
दुपार झाली होती. रस्त्यावरची वाहतूकही विरळ होती. दीपक आपल्या कामात आणि ग्राहकांत अडकून पडलेला होता. अचानक त्याच्या टपरीसमोर एक ऑटोरिक्षा येऊन थांबला. त्याची टपरी हमरस्त्यावरच असल्याने दररोज शेकडो येणारे-जाणारे होते. पण हा ऑटोरिक्षा टपरीसमोरच थांबल्यानं दीपकचे लक्ष जाणं साहजिक  होतं. रिक्षात रुबाबदार, देखणी तरुणी होती. तिनं रिक्षाचालकाचं भाडं अदा करून रिक्षातून बाहेर पाऊल ठेवलं. तोवर दीपक बुचकाळ्यात पडलेला होता. हिला कुठं तरी बघितलय.. पण कुठं.. असा क्षणभर विचार त्याच्या डोक्यात घुमला. पण ती दीपालीच होती, हे कळायला त्याला वेळ लागला नाही. ती हसतमुखाने दीपककडे बघत होती. पण तिला अचानक बघून काय बोलावे नि काय नाही, हेच दीपकला सूचत नव्हतं. अखेर 'दीपाली तू..' एवढेच शब्द त्याच्या तोंडून फुटले. साधारणत: तीन वर्षांनंतर दीपाली त्याच्या पुढ्यात उभी होती. ती पूर्वीपेक्षा अधिकच सुंदर दिसत होती. अंगातही बऱ्यापैकी भरली होती. शाळेच्या गणवेशात पाहिलेली दीपाली  आज साडी नेसून होती. तिच्या व्यक्तिमत्त्वात जमीन-अस्मानाचा फरक पडला होता. जिच्यावर आपण तीन वर्षांपूर्वी जिवापाड प्रेम करत होतो तीच दीपाली आज समोर बघून दीपकच्या आनंदाचा ठावठिकाणा नव्हता. तिची भेट त्याला स्वप्नवत वाटत होती. बराच वेळ तो तिच्याकडे टक लावून पाहत राहिला. टपरीवर चहा ढोसत बसलेल्या ग्राहकांचा चहाचा घोट त्यांच्या नरड्यात अडकून पडावा तसे ते या दोघांकडे डोळे विस्फरून बघत होते. शेवटी दीपालीनेच "कसा आहेस तू" म्हणत शांततेचा भंग केला. दीपकनेही "मी बरा आहे.. तू इथे कधी, केव्हा आलीस. तू कशी आहेस', अशा अनेक प्रश्नांचा एकाच वेळी भडीमार केला. दीपकच्या प्रश्नांपुढे ती थोडी थबकली. 'अरे सांगते बाबा...बस म्हणशील की नाही', असं तिनं म्हणताच दीपक भानावर आला. 'सॉरी हं... बसना', असं म्हणत त्यानं तिला खुर्चीवर बसण्याचा इशारा केला. तिला ग्लासभर पाणी दिलं.  ती आरामात खुर्चीवर विसावली. दीपकच्या हातावर अजून दोन-तीन ग्राहक होते. 'तू बस.. अापण जरा या लोकांकडे बघतो'  असं म्हणत दीपकने ग्राहकांना जे हवं ते देऊन टपरी बंद करण्यासाठी आवराआवर सुरू केली. 'तू दुकान बंद करतोयेस का?' मध्येच दीपालीने प्रश्न केला. 'हो गं... दुकान सुरू ठेवलं तर तुझ्यासोबत एक मिनिटही बोलता येणार नाही मला. आपण कुठं तरी निवांत बोलत बसूयात ना.' त्यावर दीपालीनंही मान डोलावली.
तसं पाहिलं तर दीपकच्या बहिणीचं घर त्याच्या टपरीच्या लागूनच होतं. पण बहीण आणि मेव्हण्याला उगाच गैरसमज व्हायला नको म्हणून त्यानं तिला दुसरीकडे  बोलत बसण्याचं ठरवलं होतं. झपाट्यानं दुकानातील सामान, खुर्च्यांची आवराअवर केली. 'चल आपण बाजूलाच गार्डन आहे तिथं बसू' असं म्हणत दीपकनं तिला सोबत चालण्यास सांगितले. ती निमूटपणे त्याच्यासोबत चालू लागली. रस्याने चालताना दीपालीनं हळूच दीपकचा हात हाती घेतला तेव्हा त्याला अगदी शहारून आलं. अंगात वेगळाच कैफ संचारला. भर रहदारीच्या रस्त्यावर तिनं दीपकचा हात धरला होता. तो सोडवण्याचं बळ कधीच गळून पडलं होतं. हातात हात देऊन दीपालीनं जणू आपलं सर्वस्वच अर्पण केल्याची भावना दीपकच्या मनात निर्माण झाली होती. दोघांच्याही तोंडून शब्दही उमटत नव्हता.   पाचच मिनिटांच्या अंतरावर गार्डन होतं. ते गार्डनमध्ये शिरले. आपण इतरांना दिसू नये, अशी एक जागा निवडून दोघांनी बैठक मांडली.
  'तू कुठे होती इतके दिवस. मी तुझ्या घराकडे सारखा चकरा मारत होतो. अचानक कुठं गायब झाली होती.' दीपक बोलता झाला. 'माझ्या बाबांची बदली झालीय चंद्रपूरला. तिकडंच हाेते.' दीपाली उत्तरली. 'मग आज इथे कशी?' न राहवून दीपकने विचारले. 'ती एक मोठी कहाणी आहे. तुला निवांत सांगते. मी येथे दुसऱ्या कामासाठी आलेय. तुला जवाहर कॉलनी  माहिती आहे ना?' दीपालीने सर्व विषयांना बगल देत प्रश्न केला. 'हो.. पण तिथं कोण राहतं. तुझं काय काम?' दीपकनं उत्सुकतेनं विचारलं. 'अरे माझा एक मित्र तिथं राहतो. त्याला भेटायचंय.' दीपाली सहज बोलून गेली. पण तिचं हे बोलणं ऐकून दीपक थोडा दचकलाच. "म्हणजे?' दीपकने भुवया उंचावत उत्कंठेनं विचारलं. 'म्हणजे काय.. माझा कोणी मित्र असू नये का?' दीपालीचा हा उपरोधिक प्रश्न दीपकचे काळीज चिरून गेला. 'का नाही.. असू शकतो. पण तो कोण, कुठला काही तरी सांगशील ना?' दीपकने स्वत:च्या भावनांना आवर घालत प्रश्न केला. 'माझं त्याच्यावर प्रेम आहे. आमची महिनाभराखालीच भेट झाली होती. मला त्याला भेटायचंय', दीपालीनं स्पष्ट केलं.
दीपालीचं हे बोलणं दीपकचं काळीज चिरणारं ठरलं. थोड्याच वेळापूर्वी दीपालीनं हातात हात घातल्यानंतर दीपकला जो स्वर्गप्राप्तीचा आनंद झाला होता तो क्षणात नरकात गेला होता. तीन वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मिळालेलं प्रेम क्षणार्धात हिरावलं गेलं होतं.    दीपक निशब्द झाला. काय बोलावं नि काय नाही, हेच त्याला सुचेना. काही वेळापूर्वी चेहऱ्यावर उगवलेला अानंद कधीच अस्ताला गेला होता. तो एकटक तिच्याकडे बघत होता. दीपाली आपल्याच प्रेमापोटी इथे आली असावी, असं त्याला वाटलं होतं. पण ती  दुसऱ्या कोणासाठी आलीय, याचा उलगडा झाल्याने दीपकला स्वत:चाच भयंकर राग आला. पण राग येऊन तो करणार तरी काय होता. कारण तीन वर्षांपूर्वीची दीपाली आता राहिलेली नव्हती. सगळंच बदलून गेलेलं होतं. तिचं ते अल्लड प्रेम, शाळेत जातानाच्या खाणाखुणा आता सर्व पुसून गेल्या होत्या.   शिवाय दोघांपैकी कोणीही कोणाला प्रेमाची कबुली दिलेली नव्हती. मग मुळात प्रेम होतं की नाही, या पहिल्या पायरीच्या विचारापर्यंत दीपक पोहोचला. तो विचारांच्या तंद्रीत हरवलेला असतानाच दीपालीनं त्याच्या हातात हात देत 'दीपक सांगना.. माझी नि त्याची भेट घालून देशील का? तू माझा चांगला मित्र अाहेस ना' असं म्हणताच दीपक तंद्रीतून बाहेर आला. 'हो हो... बिल्कूल..  आपण आताच जाऊयात जवाहर कॉलनीत.', असं अाश्वासित करत दीपक जागेवरून ताडकन उठला. 'हो रे बाबा.. जाऊयात. पण थोडा बसना...मला तुझ्याशीही काही बोलायचं आहे. तू उगीच गैरसमज करून घेऊ नकोस..' दीपालीनं बसल्या जागूनच शांतपणे म्हणत दीपकचा हात ओढून त्याला पुन्हा जागेवर बसवलं.
दगडाप्रमाणं बसलेल्या दीपकसोबत अत्यंत शांतपणे दीपाली बोलत राहिली. 'दीपक खरं सांगू... तू मला खूप आवडत होता. पण बाबांची बदली झाली नि आम्ही तुझं गाव सोडलं. चंद्रपूरला गेलो. बाबांचा एका अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या जाण्यानं आम्ही पूर्ण कोलमडून गेलो. शिक्षणही पूर्ण करता आलं नाही. बाबांच्या पेन्शवर घर चालत होतं. आई सारखी आजारी राहत होती. लहान भाऊ अजून शिकतोय. मी नोकरी शोधत नागपूर, औरंगाबाद सर्व ठिकाणी फिरले. पण बारावीच्या शिक्षणावर मोठी नोकरी मिळत नव्हती. औरंगाबादला आले असताना माझी सुनीलशी ओळख झाली.' दीपाली तिच्या आयुष्यातील घडामोडी सांगत होती. त्या ऐकून दीपकला वाईटही वाटत होतं. पण तो काहीच न बोलता तिचं बोलणं ऐकत होता. दीपाली मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो, असे शब्द अनेकदा त्याच्या ओठापर्यंत येत होते. पण का उगीच तिचा अपेक्षाभंग करायचा म्हणून दीपक ओठापर्यंत आलेले शब्द आवंढ्यासोबत गिळून घेत होता. आता तिला नवी वाट, नवा जोडीदार मिळाला आहे. उगीच तिच्या आनंदावर विरजन घालायचे नाही, असं ठरवून दीपकनं स्वत:हून तिचा हात हातात घेत दिलासा देत म्हटलं, "दीपाली आधीचं सगळं जाऊ दे.. मित्र म्हणून मी तुला जी मदत लागेल ती करण्यास तयार आहे. चल आता.. आपण सुनीलच्या घरी जाऊयात. ', असं म्हणत जड अंत:करणाने उठला. दीपालीही त्याच्या हाताचा आधार घेऊन उठली.
दोघं गार्डनमधून बाहेर आले. समोरच तीन-चार ऑटोरिक्षा उभ्या होत्या. त्यापैकी एकाला आवाज देऊन दीपकने त्यांना जवाहर कॉलनीत जायचं, असं सांगितले. रिक्षाचालकानेही बसा म्हणत, रिक्षा सुरू केली. दोघे रिक्षात बसले. दीपाली दीपकला बिलगुनच बसली. एकदोन वेळा तिने पुन्हा त्याचा हात हाती धरला. जवाहर कॉलनीत पोहोचल्यानंतर दीपकनं दीपालीला सुनीलचा पत्ता विचारला. तिनं पुढच्या गल्लीतच घर आहे. मी रात्रीच्या वेळी आले होते म्हणून फारसं लक्षात राहिलं नसल्याचं सांगितलं. तिनं अंदाजानच बहुतेक पुढच्या गल्लीत घर असावं, असं रिक्षाचालकाला सांगितलं. रिक्षाचालकानं रिक्षा वळवला. तसं पुढचंच घर सुनीलचं असल्याचं तिच्या लक्षात आलं. तिनं रिक्षाचालकाला घरापासून ५० फुटांच्या अलीकडेच रिक्षा थांबवण्यास सांगितलं.  ती दीपकला म्हणाली, 'तू एक काम कर.. तूच त्याच्या घरी जा आणि सुनील आहे का विचार. मी रिक्षातच बसून राहते. तो घरी असेल तर त्याला इकडेच बोलव. त्याचे वडील किंवा आई असेल तर मी त्याचा मित्र आहे, असं सांग. ' दीपालीचं हे फर्मान दीपकला बुचकाळ्यात टाकणारं होतं. पण दीपाली बहुदा तिच्या आईवडिलांना घाबरत असेल असा समज करून तो सुनीलच्या घराकडे पायी निघाला. त्यानं दरवाजा ठोठावला. साधारणत: सत्तावन ते साठीच्या घरात असलेल्या सुनीलच्या वडिलांनीच दार उघडलं. दीपकनं सुनील आहे का, अशी विचारणा केली असता तो कामाला गेला. रात्री येईल, असं सांगितलं. 'पण तुम्ही कोण?' असा प्रश्न त्यांनी विचारलाच. 'मी दीपक.. औरंगाबादचाच आहे. मित्र आहे सुनीलचा. काम होतं. कधी येईल तो?' असा प्रश्न केल्यावर त्याच्या वडिलांनी साडेसातपर्यंत येईल, असे उत्तर देत नंतर या, असे म्हणत दार लावलं. त्या वडीलधाऱ्याचं वागणंही दीपकला थोडं खटकलं.
दोघंही रिक्षात बसले. पण आता जायचं कुठं. आता कुठं सायंकाळचे पाच वाजले होते. सुनील साडेसातला येणार होता. अडीच तास कुठे घालवायचे हा प्रश्न होता. बरं इकडं दीपकनं टपरीही बंद केली होती. ती पुन्हा उघडायची होती. दीपालीला थांबवायचं कुठं? हाही एक प्रश्न होता. शेवटी त्यानं दीपालीला आपल्या बहिणीकडेच थांबवावं. ती नातलगाकडे आलीय. पण त्यांच्या घराला कुलूप आहे. सायंकाळपर्यंत परततील, असं सांगण्याची कथा रचली. दोघेही बहिणीकडे परतले. पण पुन्हा साडेसात वाजता सुनीलला गाठायचे म्हणून आज टपरी बंदच ठेवायची, असा दीपकनं निर्णय घेतला. दरम्यान दीपाली  फ्रेश झाली. थोडा नट्टापट्टाही केला. फ्रेश झाल्यानंतर तर ती आणखीच सुंदर दिसत होती. तिला बघून दीपकच्या काळजात नुसती घालमेल सुरू होती. त्या सुनीलला मार गोळी अन् माझ्याशीच लग्न कर, असा विचार वारंवार त्याच्या डोक्यात घिरट्या घालत होता. पण दीपालीचं आपल्यावर प्रेम नाहीच मुळी,  हा एकटा विचार इतर विचारांवर मात करीत होता.
सव्वासात वाजले. दीपालीला तिच्या नातलगांकडे (प्रियकराकडे) घेऊन जाण्याची वेळ झाली होती. दोघं घराबाहेर पडले. रिक्षा पकडून थेट सुनीलचं घर गाठलं. १५ मिनिटांच्या प्रवासात 'तू लग्न करणार आहेस का सुनीलसोबत' एवढाच एकच प्रश्न दीपकने दीपालीला विचारला. त्यावर तिचं 'बघूयात' एवढंच उत्तर होतं. 'बघूयात' हे उत्तरच मुळात गूढ होतं. म्हणजे दीपालीच्या मनात नेमकं काय आहे, याचा अंदाजच दीपकला लागत नव्हता. ही बया काय ठरवून इथं आली. तीन वर्षांपूर्वी रस्त्यावर स्मित हास्य देणारी,  खाणाखुणा करणारी, आपल्या एकतर्फी प्रेमात पडलेली पण प्रेमाविषयी चकार शब्दही न काढणारी दीपाली आत्ता हातात हात देतेय, बिलगून काय बसतेय, पण प्रेम सुनीलवर करतेय म्हणून सांगतेय. मुली एवढ्या बिनधास्त कशा असू शकतात, अशा चक्रव्युहात तो सापडला होता. रिक्षाचालकाने सांगितलेल्या ठिकाणी रिक्षा थांबवला. पुन्हा दीपालीने तूच जाऊ ये, असं सांगितलं. दीपक रिक्षातून उतरला. त्यानं दीपकच्या घराचं दार वाजवलं. या वेळी सुनीलच दारावर होता. 'आपण सुनीलच ना...' दीपकनं विचारलं. 'हो... पण आपण?' सुनीलचा प्रतिप्रश्न. 'मी दीपक.. औरंगाबादचाच आहे. दीपालीचा मित्र आहे. ती तुम्हाला भेटायला आलीय.' दीपकने वेळ वाया न घालता सांगून टाकले. दीपकचं सांगून होताच सुनीलच्या तोंडून 'काय.....?' एवढा एकच शब्द फुटला. त्याचा चेहरा एकदम उतरला. चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे जाणवू लागला. सुनीलनं दीपकला घरात न घेता चल आपण बाहेरच बोलू म्हणत दीपकच्या पाठीवर हात ठेवत त्याला ढगलतच घराच्या बाजूला नेलं. 'ती इथं कशाला आलीय. हलकट साली!' सुनीलनं पहिलीच तोफ डागली. त्याच्या चेहरा रागाने लाल झाला होता. दीपक त्याच्या चेहऱ्यावरचा प्रत्येक भाव टिपत होता. हे काही तरी वेगळंच घडतय याची त्याला स्पष्ट कल्पना आली. सुनीलच्या बोलण्यावर दीपकचा चेहरा प्रश्नार्थक झाला होता. हा काय सांगणार याचीच त्याला उत्कंठा होती. सुनील बोलू लागला. 'हे बघ दीपक.. तू चांगल्या घरचा दिसतोस. तुला ही अवदसा कुठं भेटली. तिचा अन् माझा काहीच संबंध नाही. तिला आत्ताच इथून जायला सांग!'  सुनील रागानं फणफणत होता. 'अरे पण ती तुझ्यावर प्रेम करते अन‌् तू?' दीपक त्वरेने म्हणाला. 'हे बघ मला आत्ता तुझ्याशी काहीच बोलता येणार नाही. मी तुला उद्या सर्व सांगतो. माझे आईवडील, भाऊ घरीच आहेत. उगीच लोचा नको. तू तिला घेऊन लागलीच जा. मी तुला उद्या भेटतो' सुनील घाईघाईत आणि दबक्या आवाजात बोलत होता. 'उद्या नाही.. आत्ताच काय सांगायचे ते सांग.' दीपकने आग्रह केला. 'बरं ठीक आहे... चल तू तिला आधी तुझ्या घरी सोड. आपण कुठं तरी बसू.' असं म्हणत तो घरात शिरला. दीपक जागेवरच पुतळा बनून उभा होता. काय होतंय ते त्याला उमजंना. पाचव्या मिनिटाला सुनील अंगात सदरा घालून बाहेर आला. त्याने दीपकला तुम्ही रिक्षानं पुढे चला, मी गाडीवर तुमच्या मागंच येतो, असं सांगून तो दुचाकीच्या दिशेने झेपावला.   प्रथम दीपकने दीपालीला बहिणीकडे सोडलं आणि दोघं दहाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या त्या गार्डनमध्ये जाऊन बसले. सुनील काय सांगणार, याची दीपकची उत्सुकता प्रचंड शिगेला पोहोचली होती.
'बोल काय भानगड आहे?' दीपकने पहिलाच प्रश्न केला. 'हे बघ दीपक थोडं समजून घे.. शांतपणे.. ती मला सिडको बसस्टॅंडवर महिनाभरापूर्वी भेटली होती.. रात्री बारा वाजता. ती एकटीच होती. त्यावेळी मी तेथील कॅन्टिनवर चहा प्यायला गेलो होतो. बसस्टँडवर दोन-तीनच लोक होते. ही सुंदर दिसली म्हणून मी तिच्याकडे बिघितलं. तीसुद्धा माझ्याकडंच बघत होती. मी तिला इशारा करून माझ्या मागं येण्यास सांगितलं आणि बाईकवर जाऊन बसलो. ती गाडीवर मागे येऊन बसली. मी तिला घरी घेऊन गेलो. माझ्या घरचे सगळे बाहेरगावी गेले होते. सकाळीच तिला मी बसस्टँडला आणून सोडलं. तिला नागपूरच्या गाडीतही बसवून दिलं. तिकीटही काढून दिलं होतं. तिला मी दोन हजार रुपयेही दिले. बस्स आमचा एवढाच काय तो संबंध'
सुनीलने सांगितल्या वास्तवामुळे दीपकच्या मेंदूला मुंग्या आल्या होत्या. मनापासून प्रेम करणाऱ्या दीपालीचा त्याला तिरस्कार वाटू लागला. कधी एकदा घरी पोहोचतो आणि दीपालीची खरडपट्टी काढतो, असं त्याला वाटू लागलं. पण तसं तो करू शकत नव्हता. ती त्याच्याकडं पाहुणी होती. शिवाय घरातील इतरांसमोर या गोष्टीचा तमाशाही झाला असता. सुनीलचा निरोप घेऊन दीपक घरी गेला. त्यानं दीपालीवर रागानेच एक कटाक्ष टाकला. पण दीपालीला काहीच वाटलं नाही. ती दीपकच्या बहिणीसोबत, भाच्यांसोबत चांगलीच मिसळली होती. सुनीलने भंडाफोड केला असणार याची तिला पूर्ण कल्पना होती. तरीही तिच्या चेहऱ्यावर तसूभरही तणाव नव्हता. रात्र झाली होती. जेवण झालं. तिच्यासाठी स्वतंत्र बेड लावला गेला. दीपक आणि दीपाली दोघेच हॉलमध्ये होते. घरची इतर मंडळी बेडरूमध्ये विसावली होती. दीपकचं डोकं बधीर झालं होतं. दीपालीला काय बोलावे नि काय नाही, हेच सूचत नव्हतं. न राहवल्याने त्यानं मूळ समस्येला हात घातला. 'तर तू असं काम करतीस नाही का? सुनीलनं सगळं सांगितलं मला'. दीपकच्या या बोलण्यावर दीपाली म्हणाली, 'होय.. मी हेच करते. पण तो मला माझ्याशी लग्न करणार आहे, असं म्हणाला होता. त्यानं माझी खूप तारीफ केली होती. पुन्हा भेटायला येण्याचा निरोपही दिला होता. त्यामुळे मी नशीब अजमावयला सुनीलकडे आले होते. दीपक मी तुझ्यावर प्रेम करते. तूसुद्धा करतोस हे मला माहिती आहे. पण मला तुला धोका द्यायचाच नाही. मला तुला उष्टी बोरं खाऊ द्यायची नाहीत. मी परिस्थिीसमोर हतबल झाले होते. आईच्या आजारासाठी पैसे कमी पडू लागले. त्यामुळे मी स्वत:हूनच हा नरक निवडला. आता आईही या जगात नाही. माझं विश्व हेच आहे.   मी उद्याच नागपूरला जाणार आहे.  तू खूप चांगला आहेस. असं म्हणत दीपालींनं तोंडावर पदर घेतला. तिच्या डोळ्यांत अश्रू होते. अधून-मधून ती सुस्कारे टाकत होती. ती अगदी मनातून रडत होती. रडतच ती निद्रेच्या आधीन झाली. पण दीपकचा डोळ्याला डोळा लागत नव्हता. रात्रभर तो कडा बदलत होता.
दिवस उजाडला. दीपकला पहाटेपहाटे झोप लागली होती. तोवर दीपालीनं आंघोळ करून बॅग तयार ठेवली होती. तिची परतीच्या प्रवासाची वेळ आली होती. बहिणीच्या आवाजाने त्याला जाग आली. तोही तयार झाला.  दीपालीला दुचाकीवरून बसस्थानकात नेले. बस लागलेलीच होती. दीपकनेच तिकीट काढून दिले. दीपालीच्या हातात पाचशे रुपयेही ठेवले. डबल बेल वाजली.. तशी गाडी धकली. खिडकीतून दीपालीने अलगद हात वर केला. आपोआपच दीपकनेही तिला प्रतिसाद दिला. गाडी मार्गस्थ झाली.
दीपाली  गेली. पण दीपकला तिची आठवणही येत होती. पण पहिली दीपाली आता राहिली नव्हती. तिचं विश्व वेगळं होतं.  अजून एकदा सुनीलला बोलून तिच्याशी लग्न करायला राजी करावं का? असा विचार त्याच्या मनात  घोळत होता. पण क्षणिक सुखासाठी त्यानं तिला आशेला लावलं होतं. शेवटी सुनील तरी कोण? तोही अय्याश. अशा वृत्तीमुळेच त्याची आणि दीपालीची भेट झालेली.  त्याचं लग्न लावून देण्याचा विचारही निरर्थकच होता. त्यामुळं दीपकनेही हे सर्व विचार टाकून द्याचे ठरवलं. तो सर्व विसरून आपला व्यवसाय, शिक्षणाकडे वळला.  हळूहळू या सर्व गोष्टींचा त्याला विसर पडला. अचानक एकेदिवशी त्याच्या टपरीसमोर रिक्षा थांबला. रिक्षात दीपालीच होती. सोबत आणखी दोन मुलीही होत्या.  पण या वेळी दीपकला तिच्या येण्याचा आनंद वाटला नाही. पण आश्चर्य जरूर वाटले. दीपाली रिक्षातून उतरून काही न बोलता खुर्चीवर विसावली. पण दीपक आता प्रेमाच्या गावचा नव्हताच. 'आता का आलीस परतून' एवढाच प्रश्न त्याने तिला केला. 'अरे मी आता औरंगाबादलाच राहायला आलेय. मी जवाहर कॉलनीतच राहतेय. पण सुनीलकडे नाही. आता माझाही स्वत:चा व्यवसाय आहे. ', एवढं बोलून ती पुन्हा रिक्षात बसली. दीपकनेही तिला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. ती जशी आली तशीच परतली. पुन्हा ती दीपकला कधीच भेटली नाही.  दीपकने टपरीचा व्यवसाय सोडून नोकरी पत्करली होती. तो चांगल्या हुद्द्यावर कामाला लागला होता. त्याच्या संसारवेलीवर दोन फुलेही उमलली. जवाहर कॉलनीच्या रस्त्यावरूनच त्याच्या घराचा रस्ता. पण दीपाली त्याला पुन्हा दिसलीच नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अंधभक्ती

देशी अप्सरांसाठी इंद्रपुरीतून खाली उतरलेल्या राजा इंद्राने पृथ्वीवरआटपाटनगरात स्थापन केलेले राज्य चांगले  सुरू होते. त्याचे  पृथ्वीतलावर आपल...