रविवार, १७ जून, २०१८

एक अधुरी प्रेमकहाणी (भाग 1 )


दिवस उजाडला तरी दिनेश अंथरुणतून उठला नव्हता.  रात्री उशिरापर्यंत मित्रांसोबत टवाळक्या करून तो रात्री उशिरा झोपला होता. घरात उकडत असल्यानं तो अंगणातच खाटेवर झोपायचा. त्यामुळं मित्रांसोबत रात्री उशिरापर्यंत गप्पा मारण्याची सवड मिळायची. उन्हाळी सुट्या असल्यानं अभ्यासाचा लकडा लावणारंही कोणी नव्हतं. त्यामुळे उन्हाचे चटके बसेपर्यंत झोपण्याचा त्याचा नित्यक्रम. पण त्यादिवशी आजूबाजूला होणाऱ्या गलबल्यामुळं त्याची झोप उडाली. शेजारी राहणाऱ्या भावंडांत कुठल्यातरी कारणावरून वाद सुरू होता. झोपमोड झाल्यामुळं दिनेश तावातावानं उठला. 'अबे कोण बोंबलतय' म्हणत तो त्या लेकरांवर धावून गेला. पण छायाला बघून त्यानं राग आवरला. दोन भाऊ, तीन बहिणी अशा भावंडात छाया सर्वांत मोठी. ती नववीत शिकत होती. आपसात भांडणाऱ्या भावाबहिणीत तीच शहाणी होती. उरली चौघं भावंडं तिच्याकडे एकमेकांविरुद्ध कैफियत मांडत होते तर ती त्यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न करीत होती. पण त्यांच्यातील भांडण सुटता सुटत नव्हतं.  त्यामुळे हा गलका झालेला होता. दिनेश खवळल्यानं सगळेच शांत झाले. शेवटी हे भांडण दिनेशच्याच दरबारात आलं. दिनेश बारावीत शिकत होता. त्यामुळं तो वयानं छायापेक्षाही मोठा. त्यामुळं तिनच हा खटला दिनेशपुढे रेटला होता. 'दिनेश यांना तूच काही तर सांग. हे माझं ऐकतच नाहीत बघ' छायानं दिनेशसमोर प्रस्ताव मांडला. पण नेमकं काय झालं हे झोपेतल्या दिनेशला ठाऊक नव्हतं. 'अगं माऊली काय झालं ते आधी सांग. मगच या कारट्यांना बोलतो.' दिनेशनं सबुरीनं विचारलं. 'हे कारटे चॉकलेटसाठी भांडत आहेत. मी दुकानावर दूध घ्यायला गेले तेव्हा सहा चॉकलेट आणले. चौघांना एक-,एक चॉकलेट दिलं. मी एक खाल्लं. उरलेल्या एका चॉकलेटसाठी हे भांडण सुरू आहे. सगळ्यांनाच हे चॉकलेट पाहिजे'. छायानं खुलासा केला. प्रश्न तर बिकट होता. एक चॉकलेट चार जणांना कसं द्यायचं, हा छायाला पडलेला प्रश्न दिनेशलाही पडला होता. पण हुशार दिनेशनं हा प्रश्न चुटकीसरशी सोडवला. त्यानं आपल्या खिशातून दोन रुपयाचं नाणं काढलं आणि छायाच्या हातावर ठेवलं. 'एक काम कर.. हे दोन रुपये घे अन् आणखी चार चॉकलेट दुकानावर जाऊन आण. म्हणजे सगळ्यांना एक-एक चॉकलेट मिळंल.' झाले प्रश्नच मिटला.
दिनेशची ही हुशारी पाहून छायासह सगळेच प्रभावित झाले होते. छाया तर अधिकच प्रभावित झाली होती.  त्या पाच भावंडात पुढे काही वाद, समस्या निर्माण झाली तर ते दिनेशच्याच कोर्टात येऊ लागले. दिनेशही तेवढ्याच समजूतदारपणे त्यांच्या समस्येचे निराकरण करत होता. दिनेश मोठ्या भावाकडं शिकायला होता. तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. काही दिवसांनी भावाला सरकारी निवासस्थान मिळाल्यामुळं दिनेशही तिकडेच राहायला गेला. अधून-मधून त्याचं जुन्या घरी येणं होतच. त्या निमित्तान त्याची छायाशी भेट होत होती.
छाया तशी अभ्यासात कच्ची होती. तिचं अभ्यासात फारसं मन रमत नसे. तिची आई नेहमीच तिला 'तू शाळा शिकली नाहीस तर मॅट्रिक झाली की तुझं लग्नच करू देते.' अशा शब्दांत तिला खडसावत, घाबरवत होती. एकादिवशी तिच्या आईनं दिनेशसमोरच तिला अभ्यासावरून झापलं. तेव्हा मात्र ती ओशाळल्यागत झाली. हाच धागा पकडून दिनेश तिची थट्टा करू लागला. 'अभ्यास कर नाही तर तुला तुझी आई लंगडा नवरा करून देईल' असा तो तिला चिडवू लागला. त्यामुळं ती दिनेशवर थोडी नाराजही झाली. पण एकेदिवशी दिनेशनं तिला मस्करी करतच विचारलं 'सांग तुला कसा नवरा पाहिजे?.' दिनेशच्या प्रश्नावर छायानं अनपेक्षितपणे उत्तर दिलं. 'मला की नाही तुझ्यासारखाच नवरा पाहिजे!' छायाच्या उत्तरानं दिनेश गोंधळूनच गेला. 'अे तू येडी झाली का ? माझ्यासारखा म्हणजे?' दिनेशनं जोर देऊन विचारलं. 'हो हो तुझ्यासारखाच.. अन् तूच!' छायाच्या या उत्तरावर दिनेश निरुत्तर झाला. त्यानं तिच्या नजरेला नजर भिडवली तेव्हा ती  खर बोलतेय, असं जाणवताच त्यानं तिथून काढता पाय घेतला. पण छायाचे ते शब्द दिनेशच्या मनात घर करून बसले. पण मुळातच छायाचं आणि दिनेशचंही लग्नाचं ते वय नव्हतंच. 
योगायोगानं छायाच्या वडिलांनाही ते ज्या खात्यात काम करत होते त्या खात्याचे निवासस्थान मिळालं. आणखी एक दुग्धशर्करा योग म्हणजे दिनेशच्या भावाचं आणि छायाच्या वडिलांचं निवासस्थान दहा मिनिटे पायी जाण्याच्या अंतरावरच होतंं. छाया दिसली की दिनेशला  ती बोललेले शब्द आठवत. पण या कारटीला अजून शेंबूड पुसायची अक्कल नाही आली आणि लग्नाच्या गोष्टी करतेय अशी मनाची समजूत घालून दिनेशनं तिचं बोलणं फारसं मनावर घेतलं नाही. तिला काहीच कळत नसावं म्हणून ती बोलली, असा त्याचा पक्का समज झाला. छाया, तिची आई, तिची भावंडं सर्वांचं दिनेशच्या घरी येणं-जाणं होतं.
बघता बघता दोन वर्षे लोटली. छाया अकरावीत तर दिनेश बीए च्या वर्गात गेला. नववीत शेंबडी पोर वाटणारी छाया आता पूर्वीपेक्षाही अधिकच सुंदर दिसू लागली होती. तिच्या बोलण्यात, वागण्यातही समजूतदारपणा आला होता. पण जुनीच ओळख असल्यानं ती दिनेशशी मनमोकळेपणानं बोलत होती. सुटीच्या दिवशी ती दिनेशच्या घरी आली. दिनेश ओसरीतच खाटेवर बसून पुस्तक वाचत बसला होता. दिनेशचा भाऊ नोकरीवर गेलेला तर भावजय काही तरी कामानिमित्त शेजारच्या बाईकडे गेली होती. घरात दिनेशच्या लहान पुतण्यांचा गोंधळ सुरू होता. छाया दबक्या पावलांनीच दिनेशच्या दिशेने आली आणि पुस्तक वाचण्यात रमलेल्या दिनेशला 'भॉ' असा आवाज करून घाबरवले. दिनेश दचकलाही. पण लगेच ही छायाच आहे, असे लक्षात येताच त्यानं तिला  खाटेवर बसण्याचा इशारा करत 'बैस.. तुला काय मी घाबरट वाटलो का? मी तुझ्यासारख्या लहान लेकराला घाबरणारा नाही.' दिनेशनं लेकरू म्हटल्याचा छायाला थोडा रागच आला. 'ऐ... मी काय आता लेकरू-बिकरू राहिले नाही. मी मोठी झाले. अकरावीत गेले म्हटलं!' छाया थोडी रागातच बोलली. 'बरं बाई.. तू म्हातारी झालीस..' दिनेशनं पुन्हा तिला छेडलं. 'जा मला तुझ्याशी बोलायचंच नाही. मी चालले.. ', असं म्हणत छाया माघारी फिरली. तेव्हा मात्र दिनेशला आपण उगीच हिची मस्करी करतोय, याची जाणीव झाली. त्यानं आपली चूक लगेच सुधारत 'बरं बाबा आता नाही म्हणणार म्हातारी! ये बस..' अस म्हणत तिला खाटेवर बसण्यास सांगितलं. छायाही आढेवेढे न घेता खाटेच्या दुसऱ्या टोकाला बसली. 'काकू काय करतायत?' अशी छायानं विचारणा केली. काकू म्हणजे दिनेशची वहिणी. 'तू काकूला भेटायला आली की मला?', दिनेशचा प्रश्न. 'नाही रे मी सहज विचारलं. कुठे गेल्या त्या?' छायाचा प्रतिप्रश्न. 'बाजूच्या काकूकडे गेल्यात!' दिनेशनं स्पष्ट केलं. 'बरं निघते मी' म्हणत ती खाटेवरून उठली. तसाच दिनेशनं पटकन तिचा हात धरला अाणि 'मी काय तुला खाऊन राहिलो का? बस मुकाट्यानं' असं म्हणत तिला पुन्हा खाटेवर बसवलं. तेव्हा मात्र छाया लाजली. 'मी नंतर येते..' असं म्हणतच ती अत्यंत गतीने खाटेवरून उठली नी रस्त्याला लागली. ती अशी का लाजली आणि लगेच का पळाली, याचं कोडं दिनेशला पडलं होतं.
दोन-तीन वर्षांपूर्वी बडबड करताना न थकणारी छाया आता बोलणं विकत घ्यावं तसं बोलत होती. कधी चिडवलं तर रागानं लालबुंद होऊन चिमटे काढणारी छाया आता दिनेशला स्पर्श करायला किंवा दिनेशचा स्पर्श झाला तरी लाजत होती. तिच्यातील हा बदल म्हणजे तारुण्यातील बदल होता, हे दिनेशच्या आजवर लक्षात आलं नव्हतं. पण ती 'मी नंतर येते' असे म्हणत चपळाईने रस्त्यावरून जाणाऱ्या छायाला बघितल्यानंतर त्याचं डोकं काम करू लागलं. 'अरेच्चा.. ही तर आता मोठी झालीय. मीपण तरुण आहे. ती कशी काय एकटी माझ्याशी बोलणार.' असं स्वत:शी पुटपुटत दिनेश गालातल्या गालात हसला.
दोन दिवसांनंतर दिनेशच छायाच्या घरी गेला. त्याला अंगणातच बघून छायाला गोड हसू आलं. तिची आई स्वयंपाकात व्यग्र होती. बहिणी व इतर भावंडं बाहेर खेळायला गेली होती. दिनेशचा पुसटसा आवाज ऐकून तिच्या आईनं 'कोण आलंय गं?' असा किचनमधूनच आवाज दिला. 'आई दिनेश आलं गं?' असा बाहेरूनच छायानं आवाज दिला. 'बसा हं.. मी आत्ता चार पोळ्या लाटून येते.' असं म्हणत तिची आई पुन्हा कामात व्यग्र झाली. 'घरात नको.. आपण अंगणातच ओट्यावर बसू' म्हणत दिनेशनं तिला बाहेरच बसण्याचा आग्रह धरला. 'अरे पण आई घरीच आहे ना!' छायानं दिनेशच्या अाग्रहाचं खंडण करत म्हटलं. 'मी काय तुला पळवून न्यायलो का?... भेटायलाच आलो ना!' असे अपसूकच शब्द दिनेशच्या तोंडून निघाले अन् छायाचं लाजेनं पाणी पाणी झालं. हा आणखी काही मोठ्यानं बोलेल म्हणून छायानं 'बाहेरच बसू' असा सामंजस्य करार करत घरासमोरील ओट्यावर ठाण मांडलं. दिनेशनं तिच्याकडं निरखून पाहिलं. ती अजूनही लाजरीबुजरी दिसत होती. या लाजेनं ती आणखीच सुंदर दिसत होती. 'बस आता..' म्हणत तिनं ओट्यावरची धूळ हातानं झटकत दिनेशला जागा करून दिली. दिनेश अज्ञाधारकपणे तिने ऑफर केलेल्या जागेवर बसला.
'कसा काय आलास?' छायानं पहिलाच प्रश्न केला. 'काही नाही.. आपलं सहज..' दिनेश सहज बोलला. 'तू मलाच भेटायला आलास ना.. मला माहीत होतं येशीलच म्हणून!' छाया उद्गरली. 'मी तुला नाही... तुझ्या आईला भेटायला आलोय!' दिनेश म्हणाला. 'आईकडं माझा हात मागणार आहेस का?' छायानं मुद्दाम खोडी काढली. 'हो.. आज मागतोच' दिनेशही खोडकरपणावर आला. पण त्याच्या या खोडकरपणामुळे छायाच्या चेहऱ्यावर गंभीरतेचे भाव आले. 'हात मागितलास तर बरंच होईल. तसंही मला तुझ्यासारखाच... नाही तूच नवरा पाहिजेस', छाया अत्यंत गंभीरपणे बोलली. तेवढ्यात तिची आई अंगणात आली. 'काय चाललंय रे दिनेश तुझं? ताईंच काय चाललय?' छायाच्या आईनं बाहेर येताच प्रश्न केला. 'क क का काही नाही... मजेत.. वहिणीही मजेत..तुम्ही कशा आहात क क काकू!' दिनेश अडखळत बोलू लागला. 'तू बोबडा कधीपासून बोलू लागला?' आईनं लगेच प्रश्न केला. दिनेशनं स्वत:ला सावरत 'नाही नाही.. तोंडात फोड आलाय ना म्हणून स्पष्ट बोलता येत नाहीय'. दिनेशनं स्पष्टीकरण दिलं. 'बरं बाबा.. जेवलास का? बस आमच्याबरोबर', म्हणत तिच्या आईनं दिनेशला जेवण ऑफर केलं. 'नाही काकू मी जेवलो. तुम्ही आरामात जेवा.. मी येतो..!', असं म्हणत दिनेशनं धूम ठोकली. छाया पाठमोऱ्या दिनेशला बघून मनोमन आनंदी होती.
'हात मागितलास तर बरंच होईल. तसंही मला तुझ्यासारखाच... नाही तूच नवरा पाहिजेस' हे छायाचे शब्द दिनेशभोवती पिंगा घालत होते.                             (क्रमश:)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अंधभक्ती

देशी अप्सरांसाठी इंद्रपुरीतून खाली उतरलेल्या राजा इंद्राने पृथ्वीवरआटपाटनगरात स्थापन केलेले राज्य चांगले  सुरू होते. त्याचे  पृथ्वीतलावर आपल...