मंगळवार, २६ जून, २०१८

एक अधुरी प्रेमकहाणी (भाग ४)

छायानं अजून प्रेमाची कबुली दिली नसली तरी दिनेशला तीनं पूर्ण संकेत दिले होते. पण चित्र पूर्ण स्पष्ट झालं नव्हतं. दिनेशनंही आपल्या मनातलं बोलण्याऐवजी अनेक संधी दवडल्या होत्या. आज मात्र त्यानं कोणत्याही परिस्थितीत मनातलं बोलायचं ठरवलं. पण छायाच्या घरी जाऊन असं काही बोलणं जमणार नव्हतं. तिला कॉलेजातच गाठलं पाहिजे, असा विचार करून तो आपलं कॉलेज बुडवून तिच्या ज्युनिअर कॉलेजच्या दिशेनं निघाला. तो कॉलेजच्या प्रवेशद्वारावच थांबून तिची वाट पाहू लागला. बराच वेळ झाला तरी छाया काही दिसेना. तासभर वाट पाहिली तरी ती आली नाही. म्हणून दिनेशनं तिच्या घराकडे मोर्चा वळवला. छायाच्या घरात सर्वच हजर होते. पण स्मशान शांतता पसरली होती. रामराव काका डोक्याला हात लावून बसले होते. अाशाबाई रडक्या चेहऱ्यानं दाराकडं बघत होत्या. मुलं एका कोपऱ्यात चिडीचूप बसली होती. हसतमुखानं छायाच्या घरात शिरलेल्या दिनेशला त्या दिवशी 'ये दिनेश बस' असं म्हणायलाही कोणाचं तोंड उघडलं नाही. सगळ्यांचे चेहरे गंभीर होते. त्यामुळे त्यांच्याकडे बघून दिनेशच्या मनात एकाच वेळी अनेक प्रश्नांनी गर्दी केली. 'माझ्यामुळं तर घरात काही घडलं नाही ना', असा पहिलाच प्रश्न त्याला पडला. 'नाही नाही मी तर अजून कुणाला काहीच बोललो नाही',  'काका-काकूचं भांडण तर झालं नाही ना', दुसरा प्रश्न. छाया तर त्यांना काही बोलली नसावी ना, तिसरा प्रश्न. अशा अनेक प्रश्नांच्या चक्रव्युहात सापडलेल्या दिनेशनं आशाबाईंकडं बघत 'काय झालं काकू? तुम्ही सगळे असे शांत का?' असे एकाच वेळी दोन प्रश्न केले. 'काही नाही रे.. तू बैस सांगते सगळं' म्हणत आशाबाईनं दिनेशला खुर्चीवर बसण्याचा इशारा केला. 'आज कॉलेजला गेला नाही का?'  आशाबाई हळू स्वरातच बोलल्या. 'नाही काकू कंटाळा आला' एवढं उत्तर देऊन दिनेश आशाबाई पुढे काय बोलतात याची दिनेशला उत्कंठा लागली होती. बराच वेळ कोणी काहीच बोलले नाही. त्यामुळं गूढ आणखीच वाढलं होतं.
  'आज सगळे असे शांत का?' दिनेशनं शांतता मोडली. 'अरे मायानं आमचं नाक कापलं रे' आशाबाईंच्या आवाजात कंप होता. 'म्हणजे..' दिनेशनं दचकून विचारलं. 'तुला काय सांगू.. आमचं नशिबच फुटकं!' एक दीर्घ उसासा टाकत आशाबाई बोलल्या. सस्पेन्स अजून कायमच होता. पण मायानं काही तरी भानगड केली, हे आशाबाईंच्या बोलण्यावरून दिनेशला कळून चुकलं होतं. पण दहावीत शिकणाऱ्या मायानं केलं तरी काय, हा प्रश्न अनुत्तरीत होता. 'काय झालं काकू सांगाना?' दिनेशनं प्रतिप्रश्न केला. 'तुला सांगून काय फायदा रे..' रामराव काका मध्येच गुरगुरले. दिनेश जागीच थंडावला. कारण तो रामराव काकांना खूप घाबरायचा. दिनेश शांतच बसला. अचानक रामरावांनीच पुढे बोलायला सुरुवात केली. 'अरे दिनेश तुझे मामा पोलिस खात्यातच नोकरीला आहेत ना.? मला त्यांची मदत हवी आहे.' 'हो काका' एवढंच उत्तर देऊन दिनेश रामराव काकांकडे उत्सुकतेनं बघू लागला. अजून त्याला काय घडलं ते नीट कळालं नव्हतं.
'मायाला त्या अशोकनं पळवून नेलं रे..' रामराव काकांनी बॉम्ब टाकावा तसा सस्पेन्स फोडला.  या बॉम्बस्फोटानं दिनेशही दचकला. 'काय सांगताय?' दिनेशच्या तोंडून अपसुकच शब्द फुटले. 'माया पळाली त्याच्यासोबत..' रामराव काकांनी तीनच शब्दांत सर्व चित्र स्पष्ट करून टाकलं.  'मग आता?' दिनेश चिंतातुर होत बोलला. 'पोलिसांनी पकडलं दोघांनाही', रामरावांनी आणखी स्पष्ट केलं. 'त्या अशक्याला जेल झाली पाहिजे. पण माझी पोरंगी सुटली पाहिजे..' रामरावांनी मोठा श्वास घेत पुढे काय करायचं ते सांगितलं.'हो काका.. मी आत्ताच मामांना बोलतो.. तुम्ही चलता का माझ्यासोबत ठाण्यात?' दिनेशनं विचारणा केली. 'चल जाऊ' म्हणत रामराव जागेवरून उठले. 'दोनच मिनिटं हं.. ' म्हणत रामराव बाथरुमकडे गेले. तोपर्यंत छायाकडं बघून दिनेश घराबाहेर पडला. या प्रकरणामुळं छायाही अबोल झाली होती. दिनेश आणि तिच्या प्रवासात या प्रकरणानं अडथळा आला होता. आजही तो छायाला मनातलं बोलू शकला नाही.
माया ही छायाच्या पाठीवर जन्मलेली लहान बहीण.. ती छायासारखीच दिसायला सुंदर होती. दिनेशप्रमाणंच अशोकचीही रामरावांच्या घरी ये-जा होती तो दिनेशचाही मित्र होता. अशोक तसा वयानं दिनेशच्याच बरोबरीचा. छाया आणि दिनेशमध्ये नजरानजर होत असल्याचे अशोकच्या नजरेतून सुटलं नव्हतं. त्यानं दिनेशशी स्पर्धा न करता मायाला जाळ्यात ओढलं होतं. माया  छायापेक्षा दोन-अडीच वर्षांनी लहान होती. पण तिनं छायापेक्षाही लांब उडी घेतली होती. तिचं अशोकवर प्रेम असेल, असं दिनेशलाच काय तर कोणीही स्वप्नातही असा विचार करू शकले नसते. पण हे वास्तव होतं. नववीत शिकणारी माया त्याच्या प्रेमात गुरफटून पळून जाण्याएवढं मोठं पाऊल उचलू शकते, हा विचारच करून दिनेश थक्क झाला होता. तो छायावर प्रेम करत असताना अजूनही उघडपणे एक शब्दहू बोलू शकला नव्हता. त्याचं हे अबोल प्रेम व्यक्तच होत नव्हतं.
रामराव आणि दिनेश ठाण्यात पोहोचले होते. दिनेशनं ठाण्यात पोहोचताच मामा बसत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या खोलीत प्रवेश केला. दिनेशनं त्यांना काम असल्याचं सांगत बाहेर आणलं. रामरावांची भेट घालून देत 'माझ्या मैत्रिणीचे वडील' अशी ओळख करून देऊन सर्व प्रकरण त्यांच्या कानावर घातलं. ठाण्यातल्या एका कोपऱ्यातच माया आणि अशोक अपराधी म्हणून बसले होते. काल रात्रीच दोघे पळून जाताना छोट्या भावाने बघितले होते. त्यानं आशाबाईला वर्दी दिल्यानं अाशाबाई आणि रामरावांनी पोलिसांना कळवले आणि पोलिसांनी सहा तासांतच म्हणजे मध्यरात्रीला दोघांना पकडून आणले होते. हे प्रकरण अजून चौकशीवर होतं. सकाळी रामराव एकदा मायाला भेटूनही आले होते. पण मायानं घरी येण्यास नकार दिल्यानं रामराव घरी येऊन आशाबाईंशी खल घालत होते. एका वकिलाचाही त्यांनी सल्ला घेतला होता. रात्रीतून एवढं रामायण घडलं होतं, याचा दिनेशला थांगपत्ताही नव्हता. अंतिम निर्णयासाठी रामराव दिनेशसोबत ठाण्यात गेले होते. मुलगी अल्पवयीन असल्यानं त्यांना कायदेशीर लग्नाची परवानगी मिळूच शकत नसल्याचं मामानं रामरावांकडे स्पष्ट केलं होतं. प्रश्न होता तो तिला घरी नेण्याचा आणि अशोकचं काय करायचं एवढाच. वरिष्ठ पोलिस अधिकारी, वकील, दिनेशचे मामा आणि रामराव यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. अशोकवर अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची केस करण्याचा आणि मायाचा ताबा रामरावांकडे देण्याचा निर्णय झाला. पण माया अशोकला सोडायला तयार नव्हती. 'मी मेले तरी चालेल पण मला अशोकसोबतच राहायचं' अशी तिची ठाम भूमिका होती. त्यामुळं रामरावांची मोठीच पंचाइत झालेली होती. हिला समजवायचे कसे, हाही यक्ष प्रश्न होता. तिला समजावण्याची जबाबदारी वकिलानं घेतली. वकिलानं मायाला सांगितलं की आता अशोक अनेक वर्षे जेलात राहणार आहे. त्याची सुटका होणारच नाही. तुलाही जेलमध्ये राहायचे का? बर तुम्हाला सोबत एका जेलमध्येही ठेवणार नाहीत. तो जेलमधून सुटला अन तू वयाची अठरा वर्षे पूर्ण केली की पोलिसच तुमचं लग्न लावून देतील, अशा शब्दांत समजावल्यानं ती रडतच रामरावच्या गळ्यात येऊन पडली. तिचं हे प्रेम अधुरं राहील.
माया पळून गेल्याची वार्ता अख्ख्या कॉलनीत झाली होती. त्यामुळं रामराव, आशाबाईसह छायाला घराबाहेर पडणं अपमानास्पद वाटू लागलं. रामरावरही चार दिवस ड्युटीला गेले नाही. छायाही कॉलेजला गेली नाही. अधूनमधून दिनेशच्या त्यांच्याकडं जायचा. मायाची मोठीच भानगड झाल्यानं दिनेश आत्ता काही दिवस तरी आपल्या प्रेमाविषयी बोलूच शकत नव्हता. दिवसांमागून दिवस लोटत गेले. छायाच्या घरचे वातावरण सामान्य झालं होतं. मायाही झालं गेलं विसरून नियमित शाळेत जाऊ लागली. पण शाळेत ती शांत शांत राहू लागली. तिची शाळा दूर असल्याने तिच्या कृत्याची शाळेतील कुणालाही भनक लागली नव्हती. त्यामुळं सगळं सुरळीत होतं.
बरेच दिवस लोटले. पण दिनेश आणि छायाचं अबोल प्रेम जागीच थिजलं होतं. तीसुद्धा पूर्वीप्रमाणं दिनेशशी मोकळेपणांनं बोलत नव्हती. जणू मायाच्या प्रेमप्रकरणामुळं यांच्या प्रेमाला द्रिष्ट लागली होती. छायाही मनातून दिनेशसाठी झुरत होती. पण मायानं दिलेला आघात वडिलांसाठी मोठा होता. त्यातच आपणही असं काही केल्यास त्यांच्यावर काय गुजरेल, या विचारानं ती अबोल झाली होती. तद्वतच दिनेशचीही अवस्था होती. आपल्यामुळेही छायाच्या आईवडिलांना त्रास होऊ शकतो, याची त्याला जाणीव झाली होती. तरीही तो छायाला विसरू शकत नव्हता. काही तरी मार्ग सापडेल, अशी दोघांनाही आशा होती.. परंतु सध्या तरी सर्व मार्ग बंद होते.
विद्यापीठानं पदवी, पदव्युत्तर परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. परीक्षा २० दिवसांतच सुरू होणार होत्या. दिनेशचं पदवी परीक्षेचं अंतिम वर्ष होतं. अभ्यास म्हणावा तसा झालेला नव्हता. त्यामुळं त्यानं आता तरी अभ्यास करायलाच पाहिजे, असा गांभीर्यानं निर्णय घेतला. घरी अभ्यासात अडथळा होतो म्हणून घरापासून जवळच असलेल्या नदीपलीकडच्या शेतात एका झाडाखाली नियमित जाऊन बसू लागला. छायाच्या घरीही तो क्वचितच जाऊ लागला. छायाची परीक्षा सुरू होती. त्यामुळं तीही अभ्यासत व्यग्र झाली. बरेच दिवस त्यांची एकमेकांची भेट नव्हती.
 छायाची परीक्षा संपली होती. मात्र दिनेशची परीक्षा आत्ताकुठे सुरू झाली होती. त्यामुळे तो छायाच्या घराकडे फिरकलाच नाही. त्यामुळे छाया अस्वस्थ होती. बऱ्याच दिवसानंतर सकाळीच ती दिनेशच्या घरी पोहोचली. दिनेश नेमकाच उठला होता. रात्री उशिरापर्यंत अभ्यास केल्यानं अजूनही त्याच्या डोळ्यांत झोपेची धुंदी होती. छायाला समोर बघताच झोपेची धुंदी उडाली. दिनेशची चौकशी करून ती घरात शिरली. काकू म्हणजे दिनेशच्या वहिनीशी बोलत बसली. वहिनीलाही माया प्रकरण कानी पडले होते. थोडक्यात हे प्रकरण छायानं स्पष्ट करून आता सगळं व्यवस्थित असल्याची ग्वाही दिली. काही वेळातच 'येते काकू' म्हणत ती घरातून बाहेर पडली. पण जाताना तिनं दिनेशला  'गणपती मंदिराजवळ ये' असं हळूच सांगून पाखरासारखी दिसेनाशी झाली. ताबडतोब तोंड धुवून दिनेश गणपत्तीबाप्पाच्या दर्शनाला पोहोचला. हे गणपती मंदिर छायाच्या घरापासून जवळच पण निवांत स्थळ होतं. छायानं मैत्रिणीकडे जाऊन येते असं सांगून दिनेशच्या घरी पोहोचली होती.
छाया गणपती मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या झाडाखाली बसली होती. दिनेश लगबगीनं तेथे पोहोचला. उन्हाळा सुरू झाला असला तरी हवा सुटलली होती. हवेमुळं तिच्या केसांची बट वारंवार डोळे आणि नाकावर येत असल्यानं ती एकसारखी ती बाजूला सारत होती. दिवसा चांदणं दिसावं तसं भर उन्हातही तिचं रूप चकाकत होतं. वेळ वाया न घालवता दिनेश तिच्या शेजारी जाऊन बसला.
 'कशाला बोलावलंस इथं?' दिनेशनं पहिलाच प्रश्न केला. 
'आता खूप झालं!' छाया एकदम पुटपुटली.
'काय झालं?  इतकी का वैतागलीस?' दिनेशनं चौकशी केली.
'काय सांगू तुला? तुला काहीच कळत नाही!' छाया रागातच बोलली.
'मी काय केलं? काय कळत नाही मला?' दिनेशचा चेहरा प्रश्नार्थक होता.
'तू माझ्यावर प्रेम करतो ना? करतोस ना....?' छायानं शब्दांवर जोर देऊन विचारलं.
'न न न.. हो.. पण?' दिनेश जागीच अडखळला.
'हो की नाही एवढच बोल?' छाया चिडूनच बोलली.
'अग हो... पण आज..'  दिनेशचं बोलणं अर्ध्यावरच थांबवून
'आजच तू माझ्या घरी ये.. भावाला आणि वडिलांना घेऊन!' छायानं फर्मान सोडलं.
'अरे पण कशासाठी?' दिनेश कोड्यात पडला.
'लग्न करू आपण!' छायानं थेट सांगून टाकलं.
'तुला कळतंय ना...दिनेश तू मला खूप आवडतोस.. माझे वडील माझ्यासाठी स्थळ शोधताहेत रे..खरचं तुला कळतंय ना मी काय म्हणते ते?' छाया बोलत होती, पण दिनेश विचारांत गढला होता.
'हे बघ लवकरात लवकर तू माझ्या वडलांना आईला बोल.. बघ नाही तर उशीर होईल.. येते मी..' म्हणत छाया निघाली. दिनेशनं क्षणातच तिचा रस्ता अडवला.
'हे बघ थोडा विचार करायला वेळ तर देशील ना? अचानक लग्न म्हणजे?' दिनेश भावना व्यक्त करण्याआधीच छायानं त्याला थांबवलं.
'तुझं प्रेम नाहीच माझ्यावर... ठीकय.. मी करते दुसरा नवरा!' छाया रागनं लाल होत बोलली.
'अगं मी कधी म्हटलं प्रेम करत नाही म्हणून! पण तू कधीच बोलली नाहीस!' दिनेश व्यक्त झाला.
'मी काय गावभर दवंडी देऊन सांगायचं होतं का?तुला कसं कळलं नाही? मी तर तुला तीन वर्षापूर्वीच तूच नवरा पाह्यजे म्हणून सांगितलं होतं ना?' छाया शांत होत म्हणाली.
'अगं पण तेव्हा तू केवढी होतीस?' दिनेश समजावण्याच्या सुरात बोलला.
'मी तेव्हाही मोठी होते आताही आहे. सगळे मला लहान का समजतात?' छायाचा प्रश्न दिनेशला न उलगडणार होता.
'बरं ठीक आहे.. तू म्हणशील तसं.. पण लग्न एवढ्या घाईत होत असतं का?' दिनेश पुन्हा समजूतदारपणे बोलला.
'आता नाही तर कधीच होणार नाही.. तू लक्षात ठेव..' असं ठणकावत ती पुन्हा वळली. पुन्हा दिनंशनं तिला थांबवलं.
'थांब.. आजच काय तो निर्णय घेऊ.. तू थोडी शांत हो..' म्हणत दिनेश पुन्हा झाडाखाली जाऊन बसला. छायाही सावलीसारखी ताच्या मागेच गेली. दोन मिनिटे दोघेही स्तब्धपणे बसले. दोघांच्याही डोक्यात विचारांचं वादळ उठलं होतं. हळूच दिनेशनं तिचा हात हाती घेतला. तशी ती झाडाला वेली बिलगावी तशी दिनेशला बिलगली. नकळतच दोघांच्याही डोळ्यांतून आश्रूंच्या धारा होत्या. त्यांचं अबोल प्रेम आश्रूंच्या रूपानं व्यक्त होत होत. दोघेही एकमेकांची आश्रू पुसू लागले तसे ते आणखी दाटून येऊ लागले. त्यांच्या भावनांचा जणू बांध फुटला होता. तीन वर्षांत एकमेकांना स्पर्शही न करणारं हे युगुल भरदिवसा एकमेकांना बिलगून बसले होते. एकमेकांच्या श्वासही त्यांना जाणवत होता. काही वेळासाठी दोघेही अबोल झाले. वेळ कसा कापरासारखा उडून निघून जात होता, दोघांनाही कळले नाही. संदीपला समोर बघूनच दोघे भानावर आले. संदीप म्हणजे छायाचा लहान भाऊ. तो समोर दिसताच विजेचा धक्का बसावा तशी छाया दिनेशपासून दूर झाली.
 'ऐ ताई तू इथं दिनूदासोबत काय करतीय. आई तिकडं बोंबलतीय ना तुझ्या नावानं' मला शोधायला पाठवलं तिनं! एका श्वासात संदीप बोलून गेला.छाया मात्र मेल्याहून मेली झाली. पहिल्यांदाच ती  दिनेशला चोरून भेटली अन् तिची चोरी संदीपनं पकडली होती. संदीप सातवीलं पोर.. पण अशा गोष्टी त्याला त्याला त्या वयातही कळत होत्या. त्यामुळं छायाची पाचावर धारणा झाली. संदीप घरी सांगण्याची तिला प्रचंड भीती वाटली. तिचा भेदरलेला चेहरा पाहून दिनेशनच पुढाकार घेतला.
'संदीप एैक.. तू काहीच बघितलं नाहीस.. आजच आम्ही भेटलो रे.. तू बाबांना सांगशील तर सगळा गोंधळ होईल. आत्ता कुठं ते मायाच्या भानगडीतून सावरले. तू लहान आहेस पण समजदार आहेस. सर्वच गोष्टी घरी सांगायच्या नसतात. आम्ही अशोकसारखं करणारच नाही. तू फक्त काही दिवस चूप रहा. तू लहान असला तरी तुझी माफी मागतो बघ.. तुझी ताई मंदिरात दर्शनाला गेली होती म्हणून आईला सांग! ' दिनेशच्या प्रवचनानं संदीप पिघळला.
'बरं दिनूदा नाही सांगत.. ताई चल ना..' म्हणत संदीप घराकडं पळत सुटला.  दोघांच्याही चेहऱ्यावर संकटातून सुटल्याचा आनंद होता. जड अंत:करणाने छायानं दिनेशचा निरोप घेतला. ती घरी गेली. पण घरचं वातावरण सामान्य होतं. संदीपनं झाकली मूठ झाकूनच ठेवली होती. त्यानं दिनेशनं जसं सांगितलं, तसंच आईला सांगून दोघांना अभय दिलं होतं. (क्रमश:)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अंधभक्ती

देशी अप्सरांसाठी इंद्रपुरीतून खाली उतरलेल्या राजा इंद्राने पृथ्वीवरआटपाटनगरात स्थापन केलेले राज्य चांगले  सुरू होते. त्याचे  पृथ्वीतलावर आपल...