दिनेशच्या छायाच्या घराकडील घिरट्या वाढल्या होत्या. एव्हाना त्याची सारखी ये-जा आशाबाईंनाही खटकू लागली होती. पण दिनेश-छायाची जुनीच मैत्री असल्यानं त्या उघडपणे काहीच बोलल्या नाही. कॉलेजला जाण्याआधी दिनेश त्यांच्या घरी टपकला होता. न राहवल्याने आशाबाईंनी त्याला थोडे डिवचले. 'काय रे दिन्या कॉलेजला जातो की नाही? अभ्यास वगैरे काही दिसत नाही?' दिनेश काहीच बोलला नाही. 'यांना माझ्या अभ्यासाची काय चिंता पडलीय. आधी पोरीचं बघ म्हणावं!' तो मनातल्या मनात पुटपुटला. 'काय रे मी काय म्हणतेय. अभ्यास करतो की नाही?' आशाबाईंनी पुन्हा प्रश्न केला. 'हो ना काकू.. करतो ना!' दिनेश हळू आवाजात बोलला. 'अभ्यास केला तर चांगल्या मार्कांनी पास होशील. पुढं चांगली नोकरी मिळंल. नंतर चांगली बायकोही मिळंल. नाही का?' आशाबाईंनी आपली वाक्ये पूर्ण केली. 'हो काकू!' दिनेशचं एवढंच उत्तर होतं. 'आज कॉलेज नाही का तुला?' आशाबाईंनी प्रश्न केला. 'जायचंय ना..' एवढंच तो म्हणाला. 'बरं बैस थोडा वेळ.. मी गिरवणीवरचं दळण घेऊन येते. अन् छाया तू तेवढे कपडे धुवून घे मी येईपर्यंत', एवढं बोलून आशाबाई घराबाहेर पडल्या. पीठाची गिरणी तशी हाकेच्या अंतरावरच होती. पण तिथं गर्दी होती. आशाबाईचं दळण अजून दळलेलं नव्हत. त्या तेथेच ओळखीच्या बाईशी गप्पा मारत थांबल्या. दिनेशसाठी हीच संधी होती. घरातील चिल्लर पार्टी शाळंत गेली होती. घरात एकटी छाया आणि दिनेश एवढेच... पण छाया न्हाणीत कपड्यांना साबण मळत होती.
'छाया मला तुझ्याशी काही बोलायचं आहे...' दिनेशने अर्जव केली. 'हं बोलना..' कपड्यांवर पाणी शिंपडत छाया म्हणाली. 'इकडं ये ना..' दिेनेशची दुसरी अर्जव. हातातला कपडा टाकून छाया दिनेशजवळ आली. 'हं बोल.. काय म्हणतोस..' असं म्हणत ती दिनेशच्या डोळ्यांत डोकावली. पण तिच्या या कटाक्षानं दिनेशला कसं तरी वाटलं. सुरुवात कशी करावी हे त्याला कळेना. 'अरे बोलना पटकन.. आई येतच असेल.' छायानं टोकलं. पण दिनेशच्या तोंडून शब्दच फुटेनात. सुरुवातच करायची म्हणून तो म्हणाला. 'तुझे बाबा सकाळी लवकरच जातात नाही?' तो उगीच बोलला. 'हो रे.. काही काम होतं तुझं त्यांच्याकडं?' छायाचा प्रश्न. 'नाही नाही.. सहज विचारल!' बुचकाळ्यात पडत दिनेश म्हणाला. 'मग काय?' छायानं प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडं बघून विचारलं. 'तुला काय बोलायचं ते नंबर बोल. आधी मला कपडे धुवू दे. आई रागावेल माझी!' असं म्हणत ती न्हाणीकड वळत असतानाच दिनेशनं तिचा हात धरला. तशी छाया हिरमुसली. 'सोड.. आई आली!' असे उद्गार तिच्या तोंडून निघाले. त्याच क्षणी दिनेशची पकड ढिल्ली झाली आणि छाया हात सोडवून घेत न्हाणीत शिरली. तिनं गंमत केली होती. आशाबाई अजूनही गिरणीवरच होत्या. दिनेश स्वत:वरच चिडला. 'मी किती घाबरलो गं.. तू ना..' असं म्हणत तो छायाच्या मागे धावला. पण तोपर्यंत छायानं हातात साबण धरला होता. 'हिच्याशी कधी बोलावं..' थोडं डोकं खाजवत दिनेश विचारात गढून गेला. आजच्यासारखी संधी परत मिळणार नाही. याच संधीचं सोनं केलच पाहिजे, असा त्यानं ठाम निर्धारच केला होता. 'अगं माझ्याशी दोनच मिनिटे बोल.. नंतर तुझं काम कर..' अशी विनंतीच त्यानं छायाला केली. एक कपडा पाण्यात बुचकळून छाया पुन्हा उठली. दोघेही आशाबाई येताना दिसेल, अशा दिशेने समोरासमोर उभे राहिले. 'पटकन बोलना.. कशाला वेळ खातोस?' छायानेच सुरुवात केली. 'तू लग्न करणार आहेस का?' दिनेशनं विचारलं. 'कुणाशी?' छायाचा प्रतिप्रश्न होता. 'मी सहज विचारलं?' दिनेश बोलला. 'बारावी झाल्यावर करायचं आहे.. पण मला नाही हं आईला.' छाया बोलून मोकळी झाली. 'आयला.. तुझी आई लग्न करतेय व्हय..!' दिनेशला मध्येच खोडी सूचली. 'ए येड्या माझंच म्हणतेय...आई पुढच्या वर्षी करायचं म्हणतेय.. पण मला करायचं नाही. कळलं ना?' छाया त्वेशानं बोलली. 'हो गं बाई.. तुझंच...तुझ्या आईला आता कोण पसंद करणार?' दिनेशनं दुसरी खोडी काढली. पण आता छाया संतापली होती. 'तुला असंच बोलायचं असेल तर निघ आता!' म्हणत छाया दुसऱ्यांदा न्हाणीकडे वळली. 'थांब कुठं निघालीस? तुला माझ्यासारखा नवरा हवा होता ना?' दिनेशनं थेट मुद्द्यालाच हात घातला. तसे छायाचे पाय जागीच थांबले. तिनं आशाळभूत नजरेनं दिनेशकडं बघितलं. दोघे पुढे काही बोलायच्या आतच दारात आशाबाई येण्याची चाहूल लागली. तशी छाया न्हाणीत जाऊन कपडे बडवू लागली. दिनेश जागीच पुतळ्यासारखा उभा होता. घरात शिरताच आशाबाईंनी दिनेशकडे बघत 'काय रे उभा का आहेस? बैस!' अशी अज्ञा केली. 'येतो काकू... किती वेळचा एकटाच बसलो.. कंटाळा आला म्हणून उभा राहिलो. छाया किती कपडे धुतेय माहीत नाही?' असं म्हणत तो उगीच न्हाणीकडे वाकून बघण्याची चेष्टा करू लागला. 'छाया ऐ छाया.. दिनेश निघाला गं..' आशाबाईंनी आवाज दिला. 'आले आई.. ' म्हणत छाया न्हाणीतून बाहेर आली. 'दिनेश तू इथेच होता. मला वाटलं तू केव्हाच गेला?' बाहेर येताच छायानं नाटक केलं. छायाच्या बोलण्यावर मात्र आशाबाईच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्या काही बोलायच्या आतच 'येतो काकू... बाय छाया..' म्हणत दिनेश दारातून बाहेर पडला.
(क्रमश:)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा