शनिवार, १४ जुलै, २०१८

विश्वास


 छायाचित्र सौजन्य http://pragativadi.com
................................................................................................................................................



शहराला एक गती प्राप्त झाली होती. कुणाची उद्योग, व्यवसाय सुरू करण्याची लगबग तर कुणाची नोकरीवर जाण्याची तयारी सुरू होती. रस्त्यावरही चहलपहल वाढली होती. वाहनांचा गोंगाट वाढत होता.  महेशही ऑफिसला जाण्याच्या तयारीला लागला होता. स्नेहा मुलांच्या डब्याबरोबरच महेशचाही डबा तयार करत होती. मुले शाळेत आणि नवरा ऑफिसात वेळेत पोहोचला पाहिजे याची काळजी स्नेहा नेहमीच घ्यायची. पण का कोणास ठाऊक स्नेहा एवढी आपली काळजी का करते याचीच महेशला काळजी वाटत होती. महेशच्या या काळजीचं कारण मात्र वेगळं होतं.  स्नेहानं गप्पांच्या ओघांत लग्नापूर्वी अशोक आपल्यावर कसा लट्टू झाला होता हे महेशला सांगितलं होतं. तेव्हापासून महेशला स्नेहाची अधिकच काळजी वाटत होती. काळजीबरोबरच  स्नेहाच्या वागण्यावर त्याला संशयही येत होता. आपल्या माघारी ही त्याला भेटत तर नसावी ना, एवढ्याच एका संशयाने महेश काळजीत पडला होता. पण स्नेहा मुलांसह आपल्यावर जिवापाड प्रेम करते. आपण उगीच तिच्यावर संशय घेतो, असं महेशचे मन त्याला नेहमीच सांगायचं. पण अजाणतेपणेच त्याला स्नेहाचं प्रकरण अस्वस्थ करायचं.

स्नेहाने आधी मुलांची तयारी केली.  अंघोळीपासून ते त्यांना स्कुल युनिफॉर्म घालणं, त्यांची पुस्तकं, कंपास, पेन, पेन्सील, डब्बा अशी सगळी तयारी केली होती.महेशची तयारी मात्र निम्म्यावरच होती. तोंड धुणं आणि दाढी करणे यापुढे त्याची तयारी झाली नव्हती.
'अहो.. आवरा आता.. मुलांना उशीर होतोय..' स्नेहा महेशला आवाज देत पुटपुटली.
'झालंय माझं.. आधी मुलांना सोडतो नंतरच अंघोळ करीन..' महेशनं केसांना पाणी लावतच उत्तर दिलं.
'येताना त्या अग्रवालच्या दुकानावरून किलोभर तांदूळ आणता का?' मुलाच्या बुटावरून कपडा फिरवत स्नेहा उद्गरली.
'हो आणतो.. आणखी काही आणयचं का?' महेशचा प्रश्न होता.
'किराणा भरायचाच राहिला बाई.. रविवारी जाऊयात आपण बाजाराला..' स्नेहा म्हणाली.
'हो हो.. ' एवढेच उत्तर देऊन महेश केसांतून कंगवा फिरवू लागला.
'पप्पा चला ना..' चिमुरड्या प्रयागनं महेशला आवाज दिला.
'अरे हो बाबा... प्रणवही तयार झालाय ना?' महेशनं प्रयागकडे विचारणा केली.
'हो दादाही तयार आहे.. तुम्ही चला ना लवकर.. प्रिन्सिपल सर शाळेचं गेट बंद करतात. उगीच तुमच्यामुळं आम्हाला शिक्षा होते.' प्रयाग थोडा चिडूनच बोलला.
'अरे हो रे बाबा..' म्हणत महशेनं अंगावर कपडले चढवले. पायात स्लिपर चप्पल घालून त्याने दोन्ही मुलांच्या बॅग सावरल्या.
'स्नेहा.. दोघांच्याही वाॅटर बॉटल दिल्यास ना?' महेशनं स्नेहाला प्रश्न केला.
'हो दिल्यात.. तुम्ही नुसतंच विचारत चला.. एक दिवस तरी केली का मुलांची तयारी?' स्नेहा चिडक्या स्वरात बोलली.
'मी नोकरी करू की तुझ्या लेकरांचं?' महेशही चिडलेल्या सुरात बोलला.
'एकदा दोन्ही करून बघा.. मग कळेल सगळं?' स्नेहा हसतच म्हणाली. त्यावर महेशही हसला. मुलंही हसू लागली.
'बाय मम्मी.. शाळेत घ्यायला लवकर ये', मोठा मुलगा प्रणवनं स्नेहाला फर्मान सोडलं.
'बाय बेटा.. बाय प्रयाग..' म्हणत स्नेहा गॅलरीत पोहोचली. तोपर्यंत महेश आणि मुलं खाली कारपर्यंत पोहोचले होते. महेशने कार सुरू करण्यापूर्वी स्नेहानं त्याला तांदूळ आणण्याची पुन्हा आठवण करून दिली. त्याचबरोबर मुलांनाही टिफीन पूर्ण संपवण्याचा सल्ला दिला. काही क्षणातच कार रस्यावर धावू लागली.
महेश वीस मिनिटांतच घरी परतला. त्याच्या हातातल्या थैलीत तांदळाबरोबरच बिस्किटे, खारी, वेपर्सचे पुडे, हेअर डाय असं बरचसं सामान होतं. महेश येईपर्यंत स्नेहाची अंघोळ झाली होती.
'हिला कुठं जायचं असेल?' महेश स्वत:शीच बोलला. महेश ऑफिसला गेल्यानंतरच स्नेहा स्वत:ची तयारी करत होती. पण गेल्या काही दिवसांपासून ती लवकर अंघोळ अाणि नट्टपट्टाही करू लागल्यानं महेशच्या मनातील संशयाची पाल अधिकच चुकचुकत होती.
'तू कुठं जाणार आहेस का?' न राहवल्याने महेशने स्नेहाला प्रश्न केला.
'नाही.. कुठच नाही.. का बरं?' स्नेहानं आश्चर्यानं उलट प्रश्न केला.
'काही नाही.. तू हल्ली माझ्याबरोबरीनं तयार होत आहेस म्हणून विचारलं!' महेश सहज बोलला.
'म्हणजे.. मी अंघोळही करू नये का?' महेशच्या तोंडाकडे बघत स्नेहा बोलली.
'माझी काय हरकत.. पहाटे पाच वाजता कर..' महेश थोडं रागातच बोलला.
'आज तुमचा मूड ठीक नाही का?.. सुट्टी घ्या आज!' स्नेहानं महेशच्या खांद्यावर हात ठेवत सल्ला दिला.
'माझा बॉस कच्चा खाईल ना मला?' महेश त्वेशाने बोलला.
'खरंच घ्याना आज सुटी... शनिवार, रविवार दोन दिवस सुट्टी होईल. आज आपण शॉपिंग करू, किराणा भरू आणि उद्या मुलांना बागेत घेऊन जाऊ!' स्नेहानं एका दमात सर्व प्लॅन सांगून टाकला. त्यावर महेश स्वत:च चपापून गेला. आपण उगीच तर हिच्यावर संशय घेत नाही ना? यावर तो पुनर्विचार करू लागला. पण स्नेहा नाटक तर करत नाही ना? असाही प्रश्न त्याला पडला होता. स्नेहाचा प्लॅन त्यालाही पटला होता. अजून ऑफिसला निघण्यासाठी बराच वेळ होता. खरेच आज सुटीच घ्यायची, या निर्णयावर महेश पोहोचला. पण बॉसला सुटीचं कारण काय सांगावं हा प्रश्न होता.
'स्नेहा.. माझं डोकं दुखतंय गं..' महेशनं स्नेहाकडे तक्रार केली.
'मग कुलकर्णी साहेबांना सांगा ना फोन करून', स्नेहा महेशच्या मनातलं बोलली होती.
'अरेच्चा.. हेच कारण सांगतो ना त्या कुलकर्ण्याला...' महेश आनंदित होत पुटपुटला. क्षणाचाही विलंब न करता तो फोनच्या दिशेनं धावला. कुलकर्णींचा नंबर डायल करून त्यानं रजेची भीक मागितली. रजा मंजूर करण्यात कुलकर्णी आढेवेढे घेत होता. पण 'मेलो तरी ऑफिसला यायचं का साहेब?' या महेशच्या प्रश्नानं कुलकर्ण्याची विकेट घेतली होती. महेशला सुटी मंजूर झाली होती. ऑफिसला जायचंच नसल्यानं महेश पुन्हा बेडरुमध्ये शिरला. टीव्ही लावून तो डिस्कव्हरी चॅनलवरील प्राण्यांमध्ये हरवून गेला. इकडे स्नेहा कामवाल्या बाईला धुवायची भांडी, कपडे काढून देत होती. सर्वच कामे मोलकरणीवर न सोडता ती झाडलोटीसह घराची आवराआवर करू लागली. बघता बघता घरातील कामे आवरता आवरता सकाळचे ११ वाजले. स्नेहानं महेशला अंघोळीला जाण्याचा सल्ला दिला. पण महेश गादीवर नुसता लोळत पडला होता. पण मुलं शाळेतून परतल्यानंतर त्यांना तयार करून दुपारीच शॉपिंगला जाण्याची स्नेहाची तयारी होती. ती घरातली सर्व कामे आटोपून तयार होती. पण महेश पूर्णपणे सुटीच्या मूडमध्ये होता. त्याला तयार हो सांगण्यासाठी तिसऱ्यांदा स्नेहा बेडरुमध्ये पोहोचली.
'आज साहेबांना काय झालं?' बेडवर आडवा पडलेल्या महेशजवळ बसत स्नेहा म्हणाली.
'साहेबांची आज सुटी आहे ना?' पडल्या पडल्याच स्नेहाच्या कंबरेवर हात ठेवून तिला कसून आपल्याकडे ओढत महेश उद्गरला.
'साहेबांचा मूड ठीक झालेला दिसतोय!' स्नेहा लाडात बोलली.
'नाही तर...' स्नेहाला आणखी जवळ ओढत महेशनं तिच्या पाठीचं चुंबन घेतलं.
'चला...' असं म्हणत घरकाम करणारी शांता घरातच असल्याने महेशच्या तावडीतून स्नेहा निसटली.  महेश तिला पाठमोरा बघतच राहिला.
सुटी घेतल्यानं महेशनंच मुलांना शाळेतून आणलं. शाळेत टिफीन खाल्ला तरी प्रणव आणि प्रयागला स्नेहानं पुन्हा जेवण करण्यास भाग पाडले. दोघांचे कपडे बदलून त्याला शॉपिंगसाठी तयार केले. पण इकडे महेशचे अजूनही आवरले नव्हते. अंघोळ झाली तरी कोणते कपडे घालायचे, यासाठी तो अख्खे कपाट पालथे घालत होता. शेवटी स्नेहालाच त्यात हस्तक्षेप करावा लागला. पांढरा सदरा आणि निळी पँट हे फॉर्मल कपडेच तुम्हाला शोभून दिसतात, हे स्नेहाने त्याला पटवून दिले. त्यामुळे एकदाचा महेशही तयार झाला. 'हम दो हमारे दो' टाइपचं हे कुटुंब शॉपिंगला निघालं.
मोठ्या मॉलमध्ये पोहोचलेल्या या कुटुुंबांनी बऱ्याच वस्तू खरेदी केल्या. शेवटी ते कापडांच्या दालनात शिरले. स्नेहाने मुलांच्या पसंतीनं त्यांचे कपडे घेतले. स्वत:साठीही काही कापडं घेतली. महेशसाठी मात्र तीच कपडे निवडायची. महेशची पसंती तिला चांगली ठाऊक होती. साधारणपणे महेश फॉर्मल कपड्यांबरोबरच जिन्स आणि टी शर्ट नेसत असे. स्नेहानं त्याच्यासाठी दोन टी शर्ट, दोन शर्ट, एक जिन्स, एक फॉर्मल पँट  अशा वस्त्रांची निवड केली. पण ती सारखी मॉलमध्ये टांगलेल्या जोधपुरी पोशाखाकडे बघत होती. जोधपुरी पोशाख महेशच काय पण स्नेहालाही आवडत नव्हता. पण स्नेहानं मॉलमधील सर्व्हंटला यात आणखी कलर आहेत का, किंमत वगैरे सर्व चौकशी केली. महेशनं तिला 'अगं मला जोधपुरी आवडत नाही', असे स्पष्टपणे बजावलं होतं. तरीही स्नेहा वारंवार त्या पोशाखाकडे बघत होती, हे महेशच्या नजरेतून सुटलं नाही. 'ही कुणासाठी जोधपुरी पोशाख बघतेय?' असा प्रश्न महेशला पडला होता. पण उगीचच पुन्हा संशय घ्यायला नको, म्हणून त्यानं स्वत:ची समजूत काढली.  शॉपिंगहून परतताना स्नेहानं किराणा सामानाची यादी एका होलसेल विक्रेत्या किराणा दुकानदाराला देऊन सामान घरपोच देण्यास सांगितले.
रविवारी हे कुटुंब सहलीवर निघालं. उद्यानात जाण्याऐवजी कुठं तरी आऊटडोअरला जायचा त्यांचा प्लॅन होता. ते जिथं जाणार होते ते एक हिल स्टेशनच होतं. महेश पूर्वी तेथे जाऊन आला होता. कार हिल स्टेशनच्या दिशेनं निघाली. डोंगररांगा चढून कार शिख्ररावर पोहोचली. मुलं निसर्गरम्य वातावरणात रमली होती. दोघं भावंडं हातात हात घेऊन महेश आणि स्नेहाच्या समोर धावत होती. हे दोघंही हातात हात धरून कौतुकानं कधी मुलांकडे तर कधी निसर्गाचं सौंदर्य न्याहळत होते. महेशला या हिल स्टेशनवरील सर्वच स्पॉट माहीत होते. तो स्नेहाला कुठं काय पाहण्यासारखं आहे, हे सांगत होता. स्नेहा शांतपणे त्याचं ऐकून घेत होती.
'स्नेहा.. त्या तिथं उभ राहिलं तर ढग अंगावर आल्यासारखे वाटतात.' महेश कौतुकानं सांगत होता.
'माहीत आहे हो!' स्नेहा अचानक म्हणाली. तसा महेश दचकला. कारण स्नेहानं हे हिल स्टेशन बघितलच नव्हतं, असं तिनं महेशला सांगितलं होतं. मग तिला या व्ह्यू पॉइंटविषयी कशी माहिती आहे, याचंच महेशला आश्चर्य वाटलं.
'माहिती आहे..?.. तू आली होती का इथं?' महेश आश्चर्यचकित होत म्हणाला.
'नव्हते आले... पण मला ढग दिसताहेत ना तिथं!' स्नेहा सहज बोलली. पण महेशच्या मनात पुन्हा संशयाचे ढग दाटून आले होते. तो काहीच बोलला नाही. तो एखादा रोबोटप्रमाणे त्या व्ह्यू पॉइंटच्या दिशेने चालू लागला. पण त्याच्या मनात वादळ उठलेलं होतं. स्नेहा या पूर्वी कुणासोबत तरी येऊन गेलीच असणार.. कुणासोबत काय तर त्या अशोकबरोबरच आली असणार.. असा विचार तो करत होता. महेश विचारात गढलेला होता. मात्र स्नेहा त्या अल्हाददायक वातावरणाचा मनस्वी आनंद लुटत होती. ती मुलांना सावरत त्यांना निसर्गाची माहिती देत होती. सोबत आणलेले खाद्यपदार्थ ती मुलांना भरवत होती. दिवसभर या कुटुंबाने भटकंती केली.
सोमवार उजाडला. स्नेहानं नेहमीसारखी सर्वांची तयारी केली. महेशनं मुलांना शाळेतही सोडलं. स्वत: तयारी करून तो ऑफिसला गेला. पण ऑफिसमध्ये त्याचे मन लागेचना. तो जोधपुरी पोशाख त्याच्या डोळ्यांसमोर येत होता. स्नेहा अजूनही अशोकला विसरली नाही, असे त्याला वाटू लागले. विचारांमुळं डोकं जड पडल्यानं त्यानं ते टेबलला टेकवलं. तेवढ्यात मागून बॉस कुलकर्णी अवतरला.
'महेश.. काय रे.. तुला अजून बरे वाटत नाही का?' कुलकर्णी यांनी विचारलं. तशी महेश तंद्रीतून बाहेर आला.
'नाही सर.. पण डोकं दुखतय!' महेशनं स्पष्ट केलं.
'अरे पण तुझा चेहरा किती पडलाय? तुला खरेच बरे वाटत नाही असं दिसतंय!' कुलकर्णी यांनी त्याच्या पाठीवर हात ठेवून दिलासा देत म्हटलं.
'तसं काही नाही.. पण..'
'हे बघ बरे वाटत नसेल ना तर आजही सुटी घेतलीस तरी माझी काही हरकत नाही.. तू घरी जा, आराम कर.' कुलकर्ण्यांनी महेशला सल्ला दिला. आयतीच सुटी मिळत असल्यानं महेशला हायसं वाटलं.
'ठीक आहे सर.. नाही तरी माझं कामात मनही लागेना.. उद्या सर्व कामे निपटतो..' म्हणत महेश जागेवरून उठला. त्यानं ऑफिस बॅग उचलली. बाजूला ठेवलेला टिफीन बॅगेत कोंबला. 'येतो सर' म्हणत तो आॅफिसच्या पायऱ्या उतरू लागला. महेश घरी परतला. घरासमोर त्याला एक अलिशान कार दिसली. कुणी तरी पाहुणा घरी आला हे स्पष्ट होतं. पण कोण असेल, याचा महेशला अंदाज आला नाही. तो दारावर पोहोचला. दाराजवळ कोल्हापुरी चपला दिसल्या. यावरून कोणीतरी पुरुष पाहुणाच घरी आला असणार, याचा महेशला अंदाज आला. दार अर्धवट बंद होतं. डोअर बेल न वाजता दार ढकलूनच महेश हॉलमध्ये शिरला. तिथं स्नेहा नव्हती. मुलं अजून शाळेतच होती. त्यांना यायलाही अजून तास-दीड तास बाकी होता. आवाज न करता महेश हॉलला लागून असलेल्या किचनमध्ये शिरला. तेथेही स्नेहा नव्हती. शांता सर्व कामे आटोपून गेलेली होती. महेश बेडरुमच्या दिशेने वळला. महेशनं बेडरुमचा दरवाजा ढकलला. बेडवर स्नेहासोबत महेशच्याच वयाची देखणी व्यक्ती बसून होती. स्नेहाचे विस्कटलेले केस, बेडवरील विस्कटलेली बेडशिट हे दृश्य पाहून महेशच्या हृदयाचे ठोके वाढले होते. रागाने तो थरथरत होता. 
'कोण हा हरामखोर ?' असा पहिलाच प्रश्न महेशनं केला.
'हा अशाेक', एवढेच शब्द स्नेहाच्या तोंडून फुटले. अशोक नाव ऐकताच महेशचा चेहरा रागानं आणखी लाल झाला.
'बेडरुमध्ये काय करतोय हा हरामखोर..!'  महेशचं तोंडावरील आणि रागावरील नियंत्रण सुटलं होतं. पण अशोक मात्र शांत चित्तानं महेशकडे बघत हसत होता. त्याच्या अंगात तोच जोधपुरी पेहराव होता. महेश अाणखीच बिथरला.
'मला शंका होतीच स्नेहा... तू तशीच निघाली...' म्हणत रागानं महेश किचनच्या दिशेनं वळला. रॅकमध्ये ठेवलेला सुरा घेऊन तो पुन्हा  बेडरुमध्ये पोहोचला. अशोक बेडवर बसूनच होता. स्नेहा मात्र भीतीनं थरथर कापत जागीच उभी होती. महेश सुरा घेऊन अशोकच्या दिशेने धावला. तशी स्नेहा आडवी आली.
'सोड मला.. या हरामखोराचे आज तुकडे करून टाकतो..' महेश चांगला भडकलेला होता. मात्र स्नेहाने त्याचा हात घट्ट पकडला होता. संतापाने फणफणत असलेल्या महेशची ताकदही स्नेहाच्या ताकदीसमोर कमी पडत होती. ती महेशला इंचभरही जागेवरून हलू देत नव्हती. अशोक मात्र बेडवर बसून अजूनही महेशकडे बघून हसत होता. त्याला कुठल्याही परिणामाची तीळमात्र भीती नव्हती. स्नेहा महेशला अशोकपर्यंत जाऊ देत नसल्याने महेशला तिचा प्रचंड राग आला. एका झटक्यात महेशन स्नेहानं पकडलेला हात तिच्या हातातून सोडवून घेत दुसऱ्याच क्षणी सुरा स्नेहाच्या पोटात खुपसला. तरीही अशोक हसत होता. स्नेहा जोराने किंचाळली.. तरीही महेश हातातील सुरा तिच्या पोटात आणखी खोलवर रुतवत होता. शेवटी स्नेहा जमिनीवर कोसळली..तसा महेशच्या डोक्यावर एक जोरदार प्रहार झाला. तो प्रहार अशोकनं केला होता..
महेश डोळे मिटून आणि डोकं धरूनच जमिनीवर कोसळला. पण एक थेंबही रक्त निघालं नव्हतं. त्याने डोळे उघडले. बाजूला स्नेहा शांतपणे झोपली होती. बाजूला प्रणव आणि प्रयागही शांतपणे झोपलेले होते. स्नेहाने झोपेतही महेशचा हात हातात धरला होता. ती महेशसोबतच्या गोड स्वप्नांत कधीच रमलेली होती. फक्त महेशला पडले होते ते वाईट स्वप्नं होतं. होय स्वप्नच... कारण स्वप्नांना कोण नियंत्रित करू शकणार होतं..





२ टिप्पण्या:

अंधभक्ती

देशी अप्सरांसाठी इंद्रपुरीतून खाली उतरलेल्या राजा इंद्राने पृथ्वीवरआटपाटनगरात स्थापन केलेले राज्य चांगले  सुरू होते. त्याचे  पृथ्वीतलावर आपल...