पहाटेचे तीन वाजले होते. गण्या गाढ झोपेतही अंथरुणात बुळबुळ करत होता. 'मला माफ कर.. मी चुकलो.. ' असे काही तरी बरळत होता. त्याच्या हा असंबद्ध बोलण्यामुळे पत्नी मालतीला जाग आली. ती गण्याचा असा झोपेतला अवतार पहिल्यांदाच बघत होती. त्यांच्या लग्नाला २० वर्षे झाली होती. पण हा प्रकार तिला प्रथमच अनुभवायला मिळाला. गणू महाराज स्वप्नात असावेत, याची तिला खात्री पटली. म्हणून तिने गणूला आवाज न देता चुपचाप तो झोपेत काय काय करू शकतो, हे उत्सुकतेनं बघत होती. 'संध्या मला माफ कर.. मी खरंच चुकलो गं!', असे म्हणत झोपेतच हात जोडून गण्याने एक लोळण घेतली आणि धडाम करत तो पलंगावरून फरशीवर आपटला. गण्याची झोप पुरती उडाली होती. पण मालतीच्या डोक्यात तारे चमकू लागले होते. गण्यानं झोपेत केलेल्या संध्याच्या उल्लेखामुळे मालतीच्या डोक्यात काजवे चमकू लागले होते.
'काय गणू महाराज! काय सुरू आहे तुमचं! आज तारे जमिनीवर कसे?' मालती फरशीवर लोळत असलेल्या गणूला म्हणाली.
मालतीनं आपल्याला फरशीवर पडल्याचं बघितलेलं दिसतं याची जाणीव झाल्यानं गणू ओशाळून गेला.
'संध्यानं धक्का दिला वाटतं?' मालती कुचितपणे बोलली.
'कोण संध्या? मी नाही ओळखत!' झोपेचे सोंग घेत गण्या बोलला.
'तीच हो.. आता तुम्हाला पलंगावरून धक्का देणारी!' मालती थट्टेच्या सुरात बोलली.
'अगं मी पलंगाच्या कडेवर झोपलो होतो. कुस बदलताना तोल गेला माझा!' गणू सावरासावर करत बोलला.
'असा कितीदा गेलाय तोल तुमचा?' मालती त्याचा पिच्छा सोडण्यास तयार नव्हती. मालतीला काय सांगावं, हेच त्याला सुचेना.
'आता मुकाट्यानं झोप.. सकाळी बोलू', म्हणत गण्या फरशीवरून उठला आणि पुन्हा पलंगावर अंगावर घेऊन झोपला. मालती त्याला बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण गण्या झोपेच्या सोंगात होता. त्याला आता उठवणं मालतीसाठी कठीण होतं.
दिवस उजाडला. किचनमधून आज भांड्याचा जरा जास्तच आवाज येत होता. मालती भांडी धुत होती की आपटत होती, हे गणूला कळत नव्हतं. रात्रीचं सोंग अजूनही सरलं नव्हतं. मालती भांडी अशी आपटत होती जणू ते गण्याचं डोकंच होतं. गणू अंगावरचं पांघरुण बाजूला सारून हळूच किचनमध्ये गेला. त्याची दोन मुलं दुसऱ्या खोलीत अजूनही झोपलेलीच होती. संध्या रात्री आलेला राग सकाळी सकाळी भांड्यावर काढत होती, हे उघड होतं. गणू हळूच मालतीच्या मागे गेला आणि तिला अलगद मिठी मारली. पण मालतीच्या हातातल्या भांड्यानं गणूच्या हाताच्या कोपऱ्याचा अचूक वेध घेतला, तशी गणूची मिठी सैल झाली आणि तो वेदनेनं विव्हळू लागला.कोपरावर पडलेल्या भांड्याचा टण.. असा आवाज येताच गणूच्या हाताच्या मुंग्या मस्तकापर्यंत गेल्या.
'आई गं..मेलो..!' असा आवाज गणूच्या तोंडून निघाला.
'काय झालं बाबा..' गणूचा मोठा मुलगा प्रतीक यानं बाजूच्या खोलीतून आवाज दिला.
'अरे काही नाही बाळा तू झोप.. भिंतीचा कोपरा लागला!' गणूनं ओरडूनच सांगितलं.
'चहा बनवून देऊ की संध्या येणार बनवायला?' मालती विक्रम-वेताळ्याच्या कथेतील वेताळासारखी अडून बसली होती.
'माझे आई सांगतो तुला सगळं..! पण आता नाही हं', मालतीच्या कपाळावर डोकावणारी बट बाजूला सारत गणू बोलला.
'हात नका लावू मला!' मालती खेकसली.
'कुठं लावला?' खांदे उडवत गणू बोलला.
'माझ्या केसांनाही नाही!' मालती पुन्हा खेकसली.
'बरं..' विश्राम मुद्रेत असलेला गणू सावधान होत बोलला.
'बरं त्या संध्याचं काय?' मालतीची सुई पुन्हा संध्यावरच येऊन अडकली.
'अगं काही नाही... मी स्वप्नं बघितलं. संध्या नावाची माझी कॉलेजची मैत्रिण माझ्या स्वप्नात आली.आमची केवळ फ्रेंडशिप होती. अफेअर वगैरे काहीच नाही बरं का.' गणू सांगत होता.
'अफेअर नव्हतं तर ती स्वप्नात आलीच कशी?' मालतीनं वकिली पाॅइंट हाणला.
'अगं स्वप्नं काय मी रचलं होतं का?' गण्या चिडून बोलला.
'बघितलं तर तुम्हीच ना!' चिडक्या सुरात मालती बोलली.
'तू आधी नीट ऐकून घेणार असशील तर पुढचं बोलतो. नाही तर ती संध्याही गेली चुलीत अन् तुही जा', म्हणत गणू पाय आपटून वळला.
'बरं बरं... या इकडं.. मी नाही बोलत आता,' संध्यानं तह केला.
'अगं स्वप्नात मी तिच्यावर..', अवंढा गिळून गणू थांबला.
'काय केलं तुम्ही..' मालती पुन्हा एकदा बोलली.
'तू थोबाड बंद ठेवलं तर मी उघडतो..!' गणू पुन्हा चिडला.
'बरं बाई.. नाही तरी तुम्ही पुरुष मंडळी बायकांना बोलूच कुठं देता!' त्रागा करत मालती बोलली.
'आता वीस वर्षांपासून तूच बोलतीना.. मी आज कुठे बोलतोय तर तोंड घालू नकोस मधेमधे', गणू वैतागून बोलला.
'बरं जाऊ द्या.. सांगाना काय केलं तुम्ही...'
'अगं मी तिच्यावर बळजबरी केली..'
'अच्छा तर हे पुण्यकर्मही तुम्ही करता म्हणायचं!', मालती पुन्हा एकदा बरळली.
'अगं पूर्ण ऐकून तर घे...' गण्या वसकला.
'बरं बाई..' म्हणत मालती भांड्यावर हळूवार हात फिरवत बोलली.
'आम्ही पिकनिकला गौताळा अभयारण्यात गेलो होतो. संध्याला झाडावरचे पोपट दाखवत आम्ही इतरांना पुढे जाऊ दिले आणि मी तिचे तोंड दाबून अत्याचार केला. संध्या या प्रकाराविषयी कोणाला काहीच बोलली नाही. पण दुसऱ्या दिवशी ती माझ्या घरी आली. तिनं माझ्याकडे लग्नाचा प्रस्ताव मांडला. पण माझं आणि तुझं (गणू-मालती) अफेअर असल्यानं मी लग्न करूच शकत असं सांगून स्पष्ट नकार दिला. तिसऱ्याच दिवशी तिनं तिच्या फेसबुक अकाउंटवर 'ME TOO' पोस्ट केली. मी अकबर, नाना, अलोकबाबू यांच्या रांगेत जाऊन बसतो की काय याची भीती वाटू लागली. बरं मी एक चाकरमान्या माणूस. माझ्या दिमतीला ९० वकीलही येऊ शकत नाहीत. की मी संध्यावर कोट्यवधी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावाही करू शकत नाही. तरीही मी स्वत:ला दोषी समजून संध्याला फोन करून घरी बोलावलं. मी तिला मालतीवरच प्रेम करतो, असं बेंबीच्या देठापासून सांगण्याचा प्रयत्न केला. पणी ती माझ्याशी लग्न कर नाही तर तुला आत्ताच खल्लास करते, अशी धमकावत होती. मी शेवटी मेलो तरी चालेल पण तुझ्याशी लग्न करणार नाहीच, असं शेवटचं सांगून टाकलं. त्यावर तिनं पर्समधून पिस्तुल काढून माझ्यावर रोखलं. जिवाच्या भीतीनं मी 'मला माफ कर.. मी चुकलो.. ' असं सारखं विनवत होतो. पण तिनं एक गोळी झाडलीच. ती थेट माझ्या छाताडात घुसली. मी जमिनीवर कोसळलो. ती जमीन आपल्या घरातली फरशी होती गं.' गणूनं आपलं पूर्ण स्वप्न सांगून टाकलं.
'वाचले गं बाई...हे स्वप्नं होतं तर..', मालती मोठा श्वास घेत बोलली.
'होय गं..' गणूही मोठा श्वास घेत बोलला.
मालतीचं आता पूर्ण समाधान झालेलं होतं. पण गणूला असं स्वप्नं पडण्याचं कारण काय? असा प्रश्न तिला भेडसावत होता. शेवटचं भांडं नळाखाली खंगाळून मालतीनं चहा मांडला. तिनं मुलांनाही चहा घेण्यासाठी आवाज दिला. सगळी मंडळी सोफ्यावर बसून चहाचा आस्वाद घेत होती. कधी पेपर न वाचणाऱ्या मालतीनं टी पॉयवर पडलेला पेपर हातात घेतला. त्यातील शीर्षकांवर ती नजर फिरवत होती. तिची नजर पेपरमध्ये छापून आलेल्या 'ME TOO' च्या तीन प्रकरणांवर नजर पडली आणि मालतीही भूतकाळात पोहोचली. चहाचे घोट घेत ती सोफ्यावरून उठली. नकळतच गॅलरीत पोहोचली. घरामागील झाडावर बसलेला एक 'मिटू' तिला वाकुल्या दाखवत होता...