ब्रह्मदेव दरबारात बसले होते. 'नारायण नारायण..' एैसा आवाज त्यांच्या कानी पडला. ब्रह्मदेवाच्या चेहऱ्यावर हास्याच्या छटा उमटल्या. दरबारात एंट्री करण्यापूर्वी नारदमुनी 'नारायण नारायण' असा गजर देत. त्यामुळे या वेळी नारदमुनी काही तरी वेगळी खबर देतील, हे ब्रह्मदेवाला ठाऊक होते. थेट ब्रह्मदेवासमोर नारदमुनी प्रकटले.
'वंदन करतो ब्रह्मदेवा..' नारदमुनींनी वाकून ब्रह्मदेवाला नमस्कार केला.
'आयुष्यमान भव मुनीवर..' ब्रह्मदेवानं नारदमुनींना आशीर्वाद दिला.
'सांगा मुनीवर, काय खबरबात आणलीय आज? या वेळी आपल्या भेटीत एवढा खंड का? ' ब्रह्मदेवांनीच बोलायला सुरुवात केली.
'क्षमा मान्यवर.. या वेळी मी पृथ्वीतलावर गेलो होतो. त्यामुळे आपल्या भेटीत खंड पडला. पृथ्वीवर सध्या अनेक घडामोडींचे वादळ उठल्यानं तेथील परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो देवा.' नारदांनी स्पष्ट केलं.
'काय म्हणताय मुनीवर कळलं नाही.' ब्रह्मदेवानं मध्येच टोकलं.
' घटना घडामोडी प्रचंड आहेत. विशेषत: भारत देशात अधिकच आहेत. हे सगळं इथं सांगत बसलो तर खूप वेळ जाईल आपला. काही गोष्टी तर मलाही कळाल्या नाहीत. भारतात काही दिवसांपूर्वीच म्हणे तेथील न्यायदेवेतनं कलम ३७७ मधून समलैंगिकतेला वगळलेय. त्यानंतर काही दिवसांतच व्याभिचाराला गुन्हा ठरवणारं भारतीय दंड संहितेचं कलम ४९७ अवैध ठरवलं आहे. महाराज मला तर कायद्याचं अजिबात ज्ञान नाहीय. तुम्हीच जर हे विस्तारानं जाणून घेतलं तर बरं होईल ' नारदमुंनीनी आपलं बोलणं पूर्ण केलं.
कलम ३७७, ४९७ ही भानगड ब्रह्मदेवालाही कळाली नाही. ब्रह्मदेवाची उत्सुकता प्रचंड ताणली गेली. भारतात चालले तरी काय? हे जाणून घेतलंच पाहिजे, असा निर्धार ब्रह्मदेवांनी केला.
'मुनीवर... पुन्हा पृथ्वीतलावर जाण्याची तयारी करा. मी जरा फ्रेश होऊन प्रवासाची तयारी करतो.' ब्रह्मदेवाने आदेश केला.
'होय महाराज...पण एक परंतु आहे. भारतात जायचं असेल तर मोठा धोका पत्करावा लागणार आपल्याला.' नारदमुनी चिंतीत मुद्रेत बोलले.
'काय किंतू आणि परंतु.. कसला धोका मुनीवर?', ब्रह्मदेव तडकाफडकी बोलले.
'त्याचं काय महाराज भारतात सध्या मॉब लिंचिंग नावाचा एक विचित्र प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोणताही अनोळखी माणूस दिसला की भारतातले लोक अंगात सैतान शिरल्यासारखी मारहाण करतात. '
'बापरे.. हा काय प्रकार?' ब्रह्मदेवाच्या आवाजात भीतीचे कंपण होते.
'देवा हे तर काहीच नाही.. नोटबंदी, शेतकरी आत्महत्या, रफाल घोटाळा, शबरीमाला मंदिर अशा कितीतरी भानगडी मी भारतात बघितल्या. त्यामुळे आपल्याला सामान्य माणूस म्हणून भारतात जगता येणार नाही. थोडं हायफाय गेटअप करावं लागेल. '
'ठीक आहे मुनीवर.. तुम्ही म्हणाल तसं!', असे बोलून ब्रह्मदेव सिंहासनावरून उठले. जाताना त्यांनी सेवकांना 'माझी बॅग भरारे. वाहनही तयार ठेवा', असा आदेश दिला. नारदमुनीही अदृश्य झाले.
ब्रह्मदेवाची पृथ्वीवर अर्थात भारताकडे कूच करण्याची तयारी पूर्ण झाली होती. दैनंदिन गरजांसाठी लागणारं साहित्य त्यांनी आपल्या वाहनात कोंबले होते. ब्रह्मदेवांनी मनगटावरील घड्याळीकडं बघितलं. 'हे नारदमुनी ना कधीच वेळेत येत नाही.' असे स्वत:शी पुटपुटले. तेवढ्यात 'नारायण नारायण'चा गजर त्यांच्या कानी पडला. पुन्हा ब्रह्मदेवांच्या चेहऱ्यावर हास्यछटा उमटल्या. काही क्षणातच मुनी त्यांच्यासमोर प्रकटले.
'महाराज निघण्याची तयारी झालीय ना?' मुनींनी प्रश्न केला.
'होय मुनीवर...' ब्रह्मदेवाचे उत्तर.
'सोन्याची नाणी, माणिक मोती, पवळे हे सर्व सोबत घेतले ना?' मुनींनी प्रश्न केला.
'मुनीवर याची काय गरज?' ब्रह्मदेवाचा प्रश्न.
'महाराज.. भारतात पैशांची खूप गरज आहे. तेथील सरकार कधीही नोटबंदी करू शकते. सोन्याच्या बदल्यात नोटा आपल्याला सहज मिळवता येतील.शिवाय फोर व्हिलर, अॅपल नाही तर अॅन्ड्रॉईडफोन, थ्री बीएचकेडी घर इत्यादी इत्यादी खरेदी करण्यासाठी आपल्याकडे धन असणे गरजेचे आहे.' मुनींनी बोलणे पूर्ण केले.
'सेवक... त्या कुबेरजींना मुनी सांगितील तेवढे धन द्यायला सांगा!' ब्रह्मदेवाने आदेश दिला.
'जी देवा!' सेवकाने आदबीने होकार देत नारदमुनींना सोबत चलण्याचे संकेत दिले. थोड्याच वेळात एक मोठी पोटली घेऊन सेवक आणि मुनी परतले.
ब्रह्मदेव आणि मुनींचा भारतभूमीच्या दिशेने प्रवास सुरू झाला. अनेक ग्रहताऱ्यांचा प्रवास करत त्यांची स्वारी भारतभूमीवर प्रकटली. भारतभर पसरलेल्या 'सुलभ' नावाच्या संस्थेच्या एका स्नानगृहात अंघोळ करून देव आणि मुनींनी भरजरी वस्त्रांऐवजी भारतातील उच्च भ्रू मंडळी परिधान करतात तशी वेशभूषा केली. नंतर ते वास्तव्याचे ठिकाण शोधू लागले. अनेक वस्त्या, गल्ल्या पालथ्या घातल्यानंतर देव आणि मुनींनी आटपाटनगरातच वास्तव्यास राहणे पसंद केले. तेथेच त्यांनी सेकंड सेलचा वन बीएचके फ्लॅट खरेदी केला. कारण हे आटपाटनगर म्हणजे 'कोणीही यावे अन् राहून जावे', अशी ख्याती असलेले होते. या नगरीत अगदी हुशार माणसापासून ते बुद्धीचं दिवाळं निघालेल्या व्यक्तीही राहत होत्या, याची नारदमुनींनी आधीच कल्पना दिली होती. त्यामुळं 'वासरात लंगडी गाय शहाणी' असा आपल्याला दर्जा मिळू शकतो. शिवाय थोडी पैशांची फुशारकी मारली की काही बाई माणसं गोंडा घोळत मागे येतात, याचीही नारदमुंनीनी ब्रह्मदेवाला कल्पना दिली होती. ब्रह्मदेवानं सोबत आणलेली पोटली आधी सुरक्षित ठिकाणी ठेवली. भारतात दरोड्याचे प्रकार खूप घडतात हे त्यांना नारदांनीच सांगितलं होतं. उर्वरित सर्व सामानसुमान नीटनेटकं लावून ब्रह्मदेव आणि मुनी अंथरुणात पहुडले. पण त्यांना त्यांच्या फ्लॅटच्या खाली कोणी तरी जोरात खिदळत असल्याचा आणि मोठ्यानं बोलत असल्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांचा निद्रानाश झाला. अशा शांत परिसरात रात्री अकरा वाजता कोण खिदळत असणार, याची देवांबरोबरच मुनींनाही उत्कंठा होती. त्यांनी स्लायडिंग विंडो उघडून बाहेर बघितले असता तीन महिला एकमेकींत खुसूरफुसूर करत मध्येच मोठ्याने खिदळत असल्याचे लक्षात आले. तिघींपैकी दोन महिला शरीराने प्रचंड असल्याचे आणि त्यातीलच एक आवाजानेही प्रचंड असल्याचे मुनींनी हेरले. एक महिला सर्वसाधारण अंगकाठीची होती, मात्र ती चेहऱ्यावरून प्रचंड धूर्त जाणवत होती. मंथारा, कैकयीलाही लाजवणारी तिची मुद्रा भासत होती. या नेमक्या काय बोलत असाव्यात याची मुनीवरांची उत्कंठा प्रचंड शिगेला पोहोचली होती.
'देवा...तुम्ही खिडकीतच थांबा मी आलोच' म्हणत नारदमुनी अदृश्य झाले. या तीन महिला जेथे बसल्या होत्या तेथील पिंपळाच्या झाडावर मुनीवर पोहोचले. मुनीवर सर्वसामान्य माणसाला दिसत नसले तरी ब्रह्मदेवाला मात्र दिसत होते. तेथे बसून मुनीवरांना तिघींचं बोलणं स्पष्ट ऐकू येत होतं. त्यांचं बोलणं ऐकून मुनीवरांना गरगरायला लागलं. तरीही ते कान टवकारून बोलणं ऐकत होते. लोकांची निद्रेची वेळ असताना या तिघींसाठी दिवस उगवला होता. त्यांचं बोलणं ऐकत असताना मुनींना कलम ३७७ ची आठवण झाली. सोमरसाच्या आधीन होत नवरे झोपी गेल्यानंतर या तिघींचा हाच दैनंदिन उपक्रम असावा, अशी पुसटशी शंका, मुनींच्या मनाला चाटून गेली. आता भोवळ येऊन पडायच्या आधी आपण देवांकडे जावे, असं ठरवून मुनी फ्लॅटमध्ये दाखल झाले. त्यांनी त्या तीन महिलांत काय खुसूरपुसूर चालली याचे वार्तांकन दिले. नंतर कानात कापसाचे बोळे घालून देव आणि मुनीवर झोपी गेले. अधूनमधून त्या प्रचंड महिलेचा खिदळण्याचा आवाज दोघांच्याही कानी घुमत होता. पण त्याची पर्वा न करता दोघेही शांत झोपले. दुसऱ्या दिवशी त्यांच्यासमोर अनेक कामं होती.
सकाळ झाली. देव आणि मुनीवरांनी योगासनं केली. सोबत आणलेले तहानलाडू-भूक लाडू खाऊन दोघांनी अदृश्य रूपात घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भारतात एखाद्या व्यक्तीच्या तोंडावर वेगळे आणि माघारी वेगळे बोलण्याची पद्धत असल्याचे त्या तीन महिलांच्या बोलण्यातून मुनी आणि देवाच्या लक्षात आले होते.
दुसऱ्या दिवशी नवरे घरी नसताना आलटून-पालटून या तिघी एकमेकींच्या घरी ये-जा करताना दिसल्यानंतर मुनीवरांना कलम ३७७ आहे तरी काय, हे जाणून घेण्याची इच्छा झाली. ३७७ हे एक चावटपणावर बंधन घालणारं कलम आहे, हे एकूण अनुभवावरून दोघांच्याही लक्षात आलं. पण सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी दोघेही एका निष्णात वकिलाच्या शोधात निघाले.
काही वेळ शोध घेतल्यानंतर नको तिथे घाण कर वकील सापडला. या वकिलानं समाजात घाण केली असली तरी तो हुशार होता याची नारदांना कल्पना होतीच. या वकिलाची अपॉइंटमेंट घेऊन त्याने दिलेल्या वेळेत मुनी आणि देव हजर झाले.
'वकील साहेब कलम ३७७ आम्हाला सविस्तरपणे सांगाल का?' मुनींनी पहिलाच प्रश्न केला.
'हो सांगतो... पण त्या आधी माझी फी लागेल' वकील म्हणाला.
'हे घ्या', म्हणत ब्रह्मदेवाने एक सोन्याचं नाणंच वकिलाच्या हातावर ठेवलं.
'अरे बापरे... याची किमत तर लाखात आहे. एवढी माझी फी नाहीय हो.' डोळे विस्फारत वकील म्हणाला.
'असू द्या वकील साहेब.. आधी आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या'
'पुरुषाचे पुरुषाशी लैंगिक संबंध असतील तर त्यांना ‘गे’ म्हटले जातं. तर स्त्रीचे स्त्रीशी लैंगिक संबंध असतील, तर अशा महिलांना ‘लेस्बियन’ म्हटलं जातं. काही पुरुषांना पुरुषांचेच आणि काही स्त्रियांना फक्त स्त्रियांचेच आकर्षण वाटते. त्यामुळे भारतीय समाज व्यवस्थेत हा गुन्हा मानला जात होता. त्यासाठीच कायदा करून त्यातील ३७७ कलमान्वये हा अपराध ठरवला गेला.' वकील साहेबांनी दोनच मिनिटांत हे कलम समजावून सांगितलं.
'असं व्हय...' सुस्कारा टाकत नारदमुनी म्हणाले.
'धन्यवाद वकील साहेब... एवढा किचकट विषय तुम्ही अगदी सोप्या भाषेत आणि आमचा वेळ न दवडता सांगितला.. पुन्हा एकदा धन्यवाद..' म्हणत ब्रह्मदेवाने नारदमुनींना पुढील मोहिमेवर निघण्याचा इशारा केला. नारदमुनींच्या डोळ्यांसमोर मात्र त्या तीन भटक भवान्या अर्थात दोन प्रचंड महिला आणि एक धूर्त महिलांच तरळत राहिल्या.
...........................
छायाचित्र सौजन्य : https://365psd.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा