शुक्रवार, ५ ऑक्टोबर, २०१८

चारित्र्यवाण कविता भाभी


सकाळचे नऊ वाजले होते. मोहनराव अजूनही अंथरुणातच होते. आजूबाजूला कल्ला सुरू झाल्याने त्यांची झोप उडाली. त्यांच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये बच्चेकंपनीचा गाेंधळ सुरू होता. कुणी जोराने ओरडत होते तर कुणी किंचाळत होते. 'पकडा पकडा' अशी ओरडही त्यांच्या कानावर पडली. त्याच वेळी 'रंग बरसे भिगे चुनरवाली, रंग बरसे' हे अमिताभच्या आवाजातील सुरेल गीतही मोहनरावांच्या कानी पडली. आज होळीचा धुळवड सण आहे, हे त्यांना लगेच कळून चुकले. तसेही मोहनरावांचा आवडीचा सण मुळी नव्हताच. पण एखादा उत्साही मित्र त्यांना रंगवल्याशिवाय सोडत नव्हता. मित्रांच्या आग्रहाखातर ईच्छा नसतानाही गालावर नकोसा रंग लावून घेणे त्यांना भाग पडायचे.  तसेही शहरी धुळवडीपेक्षा त्यांना खेड्यात साजरी होणारी धुळवडच अधिक पसंद होती. शहरी धुळवडीत वापरले जाणारे केमिकलयुक्त गडद रंग ताेंडाला लावल्यास माकड तरी बरे दिसावे, अशी म्हणण्याची वेळ. त्यामुळे मोहनराव स्वत:हून या सणापासून चार हात दूरच राहणे पसंद करायचे. खेड्यात पळसाची फुले कुटून त्यापासून बनवलेला गुलाबी रंग खेळण्याची मज्जाच काही और असायची.
मोहनरावांची कन्या झोपेतून उठताच मैत्रिणींसोबत धुळवड खेण्यासाठी गेली होती. मोहनराव अंथरुणातून उठले. डोळेचोळत घड्याळीकडे पाहिले. नऊचा टोल पडण्यास काही मिनिटीचे उरली होती.
'छकुली.. ए छकुली...' मोहनरावांनी हातपाय ताठत हाडांचा आवाज येईपर्यंत शरीर ताणून आळस देतच आवाज दिला.
'अहो ती आत्ताच बाहेर गेलीय. मैत्रिणीकडे!' केशरचा किचनमधून आवाज आला.
'आयला.. सकाळीच पळाली का ही कारटी.. आता बघ भुतासारखं तोंड घेऊन घरी येणार ती..' मोहनराव पुटपुटले.
'जाऊ द्या हो. लेकरूच ते.. खेळेल मैत्रिणीसोबत. वर्षातून एकदाच तर होळी असते ना!' हातात लसणाचा गाठा घेऊन उभ्या केशरने मोहनरावांना समजावले.
'खेळू दे.. पण आजकालचे रंग चांगले नसतात गं. स्किन इन्फेक्शनची जास्त भीती असते. ' मोहनरावांनी एक जांभळी देत म्हटले.
'तुमचं आपलं नेहमींचंच... असो चहा घेताय ना?' केशरने मध्येच प्रश्न केला.
'चहा नको.. आज दारूचा मूड आहे  माझा!' मोहनरावांना थट्टा सूचली.
'हो का... कधी चमचाभर तरी प्यालात का?' केशरने बाऊन्सर टाकला. त्यावरच मोहनराव क्लिन बोल्ड.
'पित नाही म्हणून काय झालं.. आज घ्यावीच लागेल!' मोहनराव पुन्हा थट्टेच्या मूडमध्ये आले.
'ठीक आहे.. पप्पांनाच आणून द्यायला सांगते तुम्हाला खंबा', केशरने गुगली टाकली. यावर मात्र मोहनराव पायचित झाले.
'बरं बाई... बागुलबुवाचं नाव सांगून मला घाबरवण्याचं तू सोडणार नाहीसच ', म्हणत मोहनराव बाथरुममध्ये बंदिस्त झाले.
मोहनराव बाथरुममधून बाहेर येईपर्यंत केशरने अद्रकीचा चहा तयार ठेवला. दोघेही एकाच सोप्यावर चहाचे गोड घोट चाखत बसले.
'तुम्ही आज कुठे जाणार नाहीत ना?' केशरने प्रश्न केला.
'कुठे जायचेय?' मोहनरावांनी प्रतिप्रश्न केला.
'रंग खेळायला म्हणतेय मी!' केशरने स्पष्ट केले.
'लेकरं बाहेर... आपण घरातच खेळूत ना रंग!' मोहनरावांना पुन्हा थट्टा सूचली. 
'तुमच्या जिभेला काही हाड... ' केशर लाजून म्हणाली.
'मी रंगच खेळायचो म्हटलो.तुम्हा बायकांना ना कुठल्या वेळी काहीही सूचते!' केशरच्या डिवचत मोहनराव बोलले.
' तुमचं दादा कोंडक्यासारखं बोलणं कळते म्हटलं मला', केशरने मोहनरावांचा चावटपण ओळखत उत्तर दिले.
'असो.. कुणी मित्र आलाच तर लावून घेईन एखादा टिळा. बाहेर जाण्याचा बेत नाही. ' मोहनरावांनी स्पष्ट केले.
'आज जेवायला काय करायचं?' केशर म्हणाली.
'मटण आणतो की!',  मोहनरावांनी ताबडतोब उत्तर दिले.
'आणा.. मी कामं आवरून मसाला भाजते', म्हणत केशर चहाचे रिकामे कप घेऊन किचनमध्ये दाखल झाली.
पारोशा अंगातच मोहनरावांनी कपडे चढवून घर सोडले. थोड्याच वेळात ते मटण, कोथिंबीर आणि काही भाज्या घेऊन घरी दाखल झाले. सोबत आणलेली रंगाची पुडीही त्यांनी उघडली. 'औपचारिकपणे पत्नी केशरला 'हॅप्पी होली' म्हणत लाडीवाळपणे केशरच्या गालावर रंगाचा ठिपका लावला.  केशरनेही कोरडाच हात त्यांच्या गालावर फिरवून 'हॅपी होली डिअर' म्हणत प्रेमाचा चौकार लगावला.
 मोहनरावांनी अंगावरील शर्ट-पँट काढल्यानंतर केशरने त्यांना नेहमीप्रेमाणे अंघोळीला जाण्याचा सल्ला दिला. पण  एखादा मित्र टपकलाच तर तो रंगवणार असे गृहित धरून दुपारपर्यंत तरी अंघोळीची गोळी घेण्याचे मोहनरावांनी ठरवले होते. 
'केशर तो होम थिएटरचा छोटा रिमोट दिसलाय का तुला? मोहनराव टेबलवर शोधाशोध करत म्हणाले.
'तो काय खिडकीत! एवढे मोठे डोळे असून काहीच कामाचे नाहीत!' केशरने नेहमीचा डायलॉग फेकला.
'मी काय अंधळा नाही. पण दिसला नाही एवढंच!', खजील होत मोहनराव म्हणाले.
'आत्ता काय गाणे लावून साहेबांना नाचायचं की काय?' केशर मस्करी करत म्हणाले.
'नाचायचं नाही नाचवायचं आहे... खाली सोसायटीतले लेकरं जमलेत त्यांना नाचवायचंय!' मोहनरावांनी स्पष्ट केले.
'अच्च्छा तर घरातली वस्तू सार्वजनिक करायचीय वाटतं तुम्हाला.' केशर खोचकपणे बोलली.
'अग लावतो तासभर गाणी. रंग खेळत लेकरं नाचतील काही वेळ' मोहनरावांनी समजुतीच्या सुरात सांगितलं.
'तुम्ही माझे ऐकणार थोडी आहात. न्या ते होमथटर..' केशर मटणाची कॅरिबॅग पातलेल्या ओतत म्हणाली.
पुढे काहीच न बोलता मोहनरावांनी होम थिएटर, वायर वगैरे सर्व वस्तू कवेत घेत पार्किंग गाठले. शेजारच्या खोलीतून करंट घेऊन होम थिएटरवर गाणी वाजवायला सुरुवात केली. बच्चे कंपनी रंगात रंगत गाण्याच्या तालावर नाचू लागली.  थोडा वेळ मुलांचा डान्स बघून मोहनराव घरात परतले. तोपर्यंत केशरने मटण शिजायला घातले होते.
'मी काही मदत करू का तुला?', मोहनरावांनी केशरला विचारले.
'जास्त काम तर नाही.. पण मिक्सरवर मसाला वाटून दिला तर सोपं होईल.' केशर अज्ञेच्या स्वरात बोलली.
'भाजणं झाला ना मसाला.. दे तर..' म्हणत स्वत:च मोहनराव किचन ओट्याकडे गेले. थाळीत भाजून ठेवलेला मसाला मिक्सर पॉटमध्ये ओतला आणि मसाल्यात पाणी ओतून तो मिक्सरवर गरगरा फिरवला. नुसत्या मसाल्याच्याच वासाने मोहनरावांना जास्त भूक लागल्यासारखे झाले.
'भाजीला किती वेळ लागेल?' मोहनरावांनी प्रश्न केला.
'मटण शिजायलाच अजून पंधरा मिनिटे लागतील. तोपर्यंत मी पोळ्या करून घेते', म्हणत मळून ठेवलेला कणकीचा उंडा केशरने किचन ओट्यावर ठेवला.
'बरं मी खाली एक चक्कर मारून येतो. कारटे होम थिएटरमध्ये पाणी सोडायचे', असे सांगून मोहनराव घराबाहेर पडले. मोहनराव एकाच मिनिटात खाली गेले. पार्किंगमध्ये मुलांची धमाल सुरू होती. रंग खेळत नाचणाऱ्या एका मुलाची आई अर्थात कविता भाभीही उत्सुकतेने मुलांचे नृत्य बघत उभी होती.
ही कविता भाभी म्हणजे एक अजबच नमुना.. अंगकाठीनं शिडशिडीत. मात्र दिसायला सर्वसामान्यच. पण तिची स्पर्धा ऐश्वर्या रायशी होती. आपण दिसायला ऐश्वर्यापेक्षाही सुंदर आहोत, असा तिचा समज. तिचा नवरा अभिषेक नसला तरी तो सज्जन पुरुष. मात्र रात्र झाली की त्यालाही कविता भाभी ऐश्वर्याच काय तर एखाद्या अप्सरेपेक्षाही सुंदर वाटायची. त्याचे कारणही तसेच. ड्युटीवरून घरी येतानाच कविता भाभीच्या नवऱ्याचा एखाद्या बार अॅण्ड रेस्टॉरेंटमध्ये तासाभराचा थांबा असायचा.  बारमध्ये येथेच्छ ढोसल्यानंतर झिंग येताच तो घराकडे निघणार. घरी पोहोचल्यावर कविता भाभी त्याला ऐश्वर्याच वाटायची.
त्या दिवशी मोहनरावांना कुठून दुर्बुद्धी सुचली देव जाणे. बच्चेकंपनी 'रंग बरसे भिगे चुनर वाली' गाण्यावर बच्चेकंपनी नाचत असताना मोहनरावही थोडे रंगात आले. पाठमोऱ्या उभ्या कविता भाभीच्या समोर जाऊन अचानक त्यांनी 'हॅपी होली' म्हणत दुरूनच कविता भाभीला रंग लावण्याची अॅक्टिंग केली. वास्तविक मोहनरावांच्या हाताला ना रंग होता ना त्यांनी कविता भाभीला स्पर्श केला. चौकीदाराची बकुळाही बाजूलाच उभी होती. पण  दुरूनच हॅपी होली म्हणणे मोहनरावांना बाराच्या नव्हे तर तेरा-चौदाच्या भावात पडले. त्या क्षणी कविता भाभीनेही हसून मोहनरावांना प्रतिसाद दला. पण  हॅपी होलीचा तो क्षण चार तासांनंतर सॅड होलीमध्ये रूपांतिरत होणार हे मोहनरावांनाच काय तर ब्रह्मदेवालाही कळणारे नव्हते. कविता भाभीने मुलांची मौजमजा पाहत अर्धा तास घालवला. तासाभरानंतर ती घरीही गेली. शेजारच्या घरी होळीच्याच दिवशी आयोजित कार्यक्रमाला तिने  हजेरी  लावली. तेथे मिळालेली खीर मोहनरावांसमक्ष वरपली.शेजारपाजारच्या महिलांसोबत ती बराच वेळ खिदळत होती. जणू काही ती गोकुळात होती.
मुलांची धुळवड खेळणे संपले होते. मोहनरावांना होम थिएटर घरी घेऊन जायची आठवण झाली. त्यासाठी ते खाली गेले. पण तेथील नजारा वेगळाच होता. कविता भाभीच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. पदराने डोळे पुसताना तोंडावर लावलेला पावडरचा लेपही मिटत होता. मोहनराव दिसताच कविता भाभी त्यांच्याकडे डिवऱ्या म्हशीसारखी बघू लागली. चौकीदाराची बायको बकुळाही धावतच त्यांच्याकडे गेली.
'साहेब आता तुम्हीच भाभीला समजवा. तुमच्यामुळंच त्या रडू  लागल्यात बघा.'
बकुळाचे बोल मोहनरावांचे कान चिरतच मेंदूपर्यंत पोहोचले होते.
'काय.. काय म्हणतीस बकुळा', मोहनरावांचा कानावर विश्वास बसला नाही म्हणून त्यांनी पुन्हा विचारले.
'हो साहेब... तुम्ही मजाक केलेली भाभीला आवडली नाही. त्या अर्ध्या घंट्यापासून रडायल्यात बघा' बकुळानं पुन्हा मोहनरावांच्या कानात गरम तेल ओतलं.
काही क्षण तर मोहनरावांना बकुळा काय बोलतेय हे लक्षात येईना. कविता भाभीची आपण काय मजाक केली, हेही त्यांना आठवेना. कविता भाभीसोबत दोनच मिनिटे बोलल्याचे त्यांना आठवत होते. पण बकुळा तर 'मजाक' केल्याचे सांगत होती. या दोघी आपलीच तर 'मजाक' करीत नाही ना, असाही प्रश्न त्यांना पडला. पण कविता भाभीच्या एका डोळ्यातून गंगा तर दुसऱ्या डोळ्यातून जमुना वाहत होती. हे पाहून मोहनरावांना कोरड्या विहिरीत पडल्याचा भास झाला. तरीही कविता भाभी का रडतेय, हे जाणून घेण्याची मोहनरावांना उत्सुकता होती. ते भाभीजवळ गेले.
'काय झालं ताई?' मोहनराव भाबडेपणाने म्हणाले.
'भाऊ तुम्ही मजाक केली ते मला आवडली नाही' कविता भाभी अश्रू ढाळतच बोलली.
'मी काय मजाक केली बुवा', मेंदूला ताण देत मोहनराव म्हणाले.
'तुम्ही सकाळी मला हॅप्पी होली म्हणत मजाक केली ते...' जोराचा हुंदका देत कविता भाभीने आठवण करून दिली.
'हो.. म्हणालो होतो हॅप्पी होली.. मग काय बिघडलं', मोहनराव सहज बोलून गेले.
'मजाक करायच्या आधी तुम्ही मला एकदा विचारयचं तर ना..' गंगा-जमुनांचा पाट पदराने अडवत कविता भाभी बोलली.
'हॅप्पी होली म्हणणं मजाक वाटतेय तुम्हाला?', मोहनरावांनी प्रश्न करत खातरजमा केली.
'हो.. मजाकच.. मला नाही आवडली ती मजाक', भाभी रडक्या सुरातच बोलली.
मजाक शब्द वापरून कविता भाभी आपली क्रूरपणे थट्टा करत असल्याचा भास मोहनरावांना झाला. 'हॅप्पी होळी' म्हणणे कोणत्या अँगलने मजाक ठरू शकते, हे मोहनरावांच्या मेंदूलाच काय तर मनालाही पटेना. तरीही कविता भाभीसाठी हे दोन शब्द शिवी वाटत असावेत, अशी स्वत:ची समजूत करून त्यांनी भाभीची माफी मागायची ठरवले.
'हे बघा ताई.. तुमचं मन दुखावण्याचा किंवा तुमची मजाक करण्याचा माझा इरदा नव्हता. तरीही तुम्हाला इतकं वाईट वाटत असेल तर मला माफ करा', मोहनराव सडेतोडपणे बोलले.
'नाही तरी तुम्ही मजाक करायच्या आधी मला विचाराचं होतं!' कविता भाभीची सुई अजूनही तिथेच अडकून पडलेली होती.
'मी माफी मागतोय ना तुमची!' मोहनराव थोडे चिडूनच बोलले.
'मला नाही मजाक केलेली आवडत.. !' कविता भाभी एकाच सुरात गात होती.
'आता लोकं गोळा करून तुमची माफी मागू का? मी तुम्हाला एकट्यातही बोललो नाही. काय गं बकुळा.. मी काय वाईट वागलो ' मोहनराव भडकून बोलले.
'नाही साहेब.. तुम्ही काही वाईट बोलले नाही.. पण यांना तुमची मजाक आवडली नाही', बकुळानेही मोहनरावांची एकप्रकारे मजाकच केली.
'बरं ताई अजून एकदा माफी मागतो. तुम्हाला तुमचे मिस्टर काही बोलले असतील तर त्यांचीही माफी मागतो. त्यांना समजावून सांगतो', चिडलेले मोहनराव तेवढ्याच नम्रपणे बोलले.
'नाही पण.. तुमची मजाक..'
'नाही आवडली तर नाही आवडली. मी काही तुमच्या अंगाला हात लावला नाही की काही वाईट बोललो. तरीही एकदा नाही तिनदा माफी मागतो. त्यावरही तुम्हाला काय समजायचे ते समजा. मला अशा फालतू बाबींकडे लक्ष द्यायला आवडत नाही',  सविता भाभीचे बोलणे मध्येच तोडून मोहनराव बोलले.
आता तर गंगा-जमुनेला पूरच आला होता. या पुरात कोण वाहून जाणार होते, हे कोणालाही ठाऊक नव्हते. बकुळा चोमडेपणा करत कविता भाभीचे डोळे पुसत होती. मोहनरावांना आता तेथे थांबणे धोक्याचे वाटले. त्यांना बाई आणि बाटलीपासून काय धोका मिळू शकतो, याचा अंदाज होता. वेड्याच्या नादी लागलो तर दगड अंगावर येऊ शकतो, याची कल्पना आल्याने मोहनरावांनीही एकदा डिवऱ्या बैलासारखे चारित्र्यवाण भाभीकडे  बघत ते ठिकाण सोडले. घरी जाऊन मटणावर ताव मारत केशरसोबत मजाक करू लागले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अंधभक्ती

देशी अप्सरांसाठी इंद्रपुरीतून खाली उतरलेल्या राजा इंद्राने पृथ्वीवरआटपाटनगरात स्थापन केलेले राज्य चांगले  सुरू होते. त्याचे  पृथ्वीतलावर आपल...