गेल्या काही महिन्यांपासून कंगना हिने मीडियात विशेषत: गोदी मीडियात विशेष स्थान मिळवले आहे. कोराेना विषाणूची वळवळ सुरू होण्यापूर्वीच काही प्रसिद्धीपिपासूंची वळवळ सुरू झाली होती. त्यातीलच एक म्हणजे कंगना. तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने वादाला तोंड फुटले. त्याचबरोबर कंगनाचेही तोंड सुटले. कंगनाने सुशातसिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केल्याने सरकारी रोषालाही तिला सामोरे जावे लागले. तिच्या मुंबईतील बंगल्याचा एक भाग अतिक्रमण म्हणून बीएमसीने पाडला. त्यानंतर कंगनाचे जे तोंड सुटले ते अजून बंद झालेले नाही. तिला गोदी मीडियाने चांगलेच उचलून धरले. कंगना शिंकली तरी त्याचे कव्हरेज गोदी मीडियात यावे, इतपत या मीडियाने तिला 'गोद' घेतले.
विषय कुठलाही असो कंगना बोलणार हे गणित पक्के झाले. मग अमेरिकेत जे बायडेन सत्तेवर येवोत की तिकडेकर्नाटकमधील आयपीएस डी. रुपा यांचा फटाक्यांसंदर्भातील वाद असो, कंगना ट्विटरवर फटाके फोडणार हे ठरलेलेच. एवढेच काय तर जल्लीकट्टू या मल्याळम सिनेमाला २०२१ च्या ऑस्कर पुरस्काराचे नॉमिनेशन मिळाल्यावरही कंगना बोलली. तिने जल्लीकट्टूच्या टीमचे अभिनंदन करतानाच बॉलिवूडच्या निर्मात्या, अभिनेत्यांवर तोंडसुख घेण्याचा मोह टाळला नाही. शेवटी बॉलिवूडवाल्याने मैदान रिकामे केले आणि ज्युरींना आपले काम करू दिले. भारतीय सिनेमाचा अर्थ केवळ ४ कुटुंब नव्हे. मुव्ही माफिया आपल्या घरात बसले आहेत. आणि ज्युरींनी आपले काम केले आहे, असे ट्विट कंगनाने केले.
अमेरिकेचे नूतन अध्यक्ष जो बायडेन यांना गझनी उद्देशून कंगनाने अकलेचे तारे तोडले. तिने आपल्या ट्विटमध्ये मी गझनी बायडेनबाबत आश्वस्त नाहीय, ज्यांचा डाटा प्रत्येक ५ मिनिटांना क्रॅश होतो. इतकी सारी औषधे त्यांच्यात इंजेक्ट झाली आहेत की ते एक वर्षपासून जास्त टिकू शकणार नाही. एक मात्र निश्चित की कमला हॅरिस याच शो पुढे नेतील. जेव्हा एखादी महिला उठते तर ती दुसऱ्या महिलांसाठीही मार्ग तयार करत असते, असे ट्विट तिने केले.
कंगना कुणाविषयी काहीही बोलू शकते, हे तिने एकदाचे सिद्ध केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकेरी बोलण्यापासून ते अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांना गझनी म्हणेपर्यंत तिची मजल तर गेलीच आहे. उद्या न जानो आमच्या आदरणीय पंतप्रधानांविषयीही ती काही बोलली तर नवल वाटायला नको. तसे पंतप्रधानाविषयी असं आचरटपणे बोलण्याची शक्यता कमीच आहे. कारण त्यांचे चेलेचपाटे कंगनाचेही भक्त आहेत, हे येथे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. दिल्लीत कान फुंकल्यानंतरच कंगना मुंबईला पीओके म्हणतेय, असा सर्वांनाच संशय आहे.
बॉलिवूडमधील अनेक आदरणीय, सन्माननीय लोकांविषयीही कंगना सुसाटपणे बोलत सुटलीय. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कोर्टात कंगनाविरुद्ध अपराधिक स्वरूपाची तक्रार दाखल केली. कंगनाने टीव्हीवरील मुलाखतीत आपल्याविरोधात मानहानीकारक आणि निराधार टिपण्णी केल्याचे जावेद अख्तर यांनी याचिकेत नमूद केले. कंगनाने सुशातसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आपलेही नाव घेतले, असेही याचिकेत म्हटले.
कंगना बॉलिवूड, राजकारणी मंडळीवर बोलूनच थांबली नाही तर तिचा आरक्षणविरोधी चेहराही भारतवासीयांना बघायला मिळाला. कर्नाटकमधील आयपीएस डी. रुपा यांनी फेसबुकवर दिवाळीत फटाक्यांवर बंदी आणल्यावर लोकांना काय अडचण आहे, असा प्रश्न उपस्थित केला होता. डी. रुपा यांच्या प्रश्नावर लोकांनी त्यांना इतर धर्माशी निगडित परंपरांबाबतही तुम्ही प्रश्न उपस्थित करणार का, असे प्रश्न करून डी. रुपा यांना चांगलेच ट्रोल केले होते. या वादातही कंगनाने उडी घेतली. डी. रुपा यांच्याबाबत तिने टिपण्णी करत हे आरक्षणाचे साईड इफेक्ट्स आहेत. जेव्हा अयोग्य लोकांना पॉवर मिळते तेव्हा ते काही ठीक करत नाहीत. केवळ इजा पोहोचवतात, असे टि्वट करत कंगनाने आरक्षणविरोधी भूमिकाही जाहीर केली.
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्याविषयी बोलताना कंगनाने खालची पातळी गाठली. उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्न स्टार आहे, असे सांगून कंगनाने आणखी एका वादाला तोंड फोडले होते.
एकूणच कंगना अभिनेत्री आहे, राजकारणी आहे, तत्वज्ञानी आहे की आणखी कोण? असे अनेक प्रश्न माझ्यासह अनेकांना पडणे साहजिक आहे. २००४ पासून बॉलिवूडमध्ये आलेल्या कंगनाला २०२० मध्ये इतकी ज्ञानप्राप्ती कशी झाली, हाही एक प्रश्न उपस्थित होत आहे. कंगनाला २०२० मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरवित केले. या पुरस्कारानंतर मात्र कंगना मीडियात सारखी झळकू लागली आहे. कंगनाच्या या बोलक्या 'अॅक्टिव्हिटी'चे गुपित पद्मश्री पुरस्कारात तर दडले नाही ना?
(वाचकहो मला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा)
सर वास्तव ब्लॉग झाला . चिवचीव मागील कारण मिमांशा परफेक्ट केली .प्रथमच निर्भीड ब्लॉग वाचायला मिळाला
उत्तर द्याहटवा