मंगळवार, १९ जून, २०१८

एक अधुरी प्रेमकहाणी (भाग 2)

आता मात्र दिनेशच्या हृदयात छायानं घर केलं होतं. पण खरंच ती माझ्यावर प्रेम करत असेल का? असा प्रश्न त्यानं स्वत:लाच विचारला. प्रेम करत नसती तर तिनं 'मला तुझ्यासारखाच नवरा पाहिजे..तूच पाहिजे' असं म्हटलंच नसतं. छाया सहज आपल्या मनातलं बोलून गेली. पण तिचं प्रेम व्यवहार्य, उचित आहे का. तिच्या प्रेमासाठी मी पात्र आहे का? तिचे वडील, माझा भाऊ, वडील, आई राजी होतील का? अशा एक नव्हे तर अनेक प्रश्नांच्या चक्रव्युहात दिनेश अडकला होता.  त्याचं अभ्यासातूनही मन उडालं होतं. छायाला खरंच मी इतका कसा आवडतो. आत्ताच नाही तर ती  तीन वर्षांपूर्वीही 'मला की नाही तुझ्यासारखाच नवरा पाहिजे!' असं अल्लडपणात बोलून गेली होती. तसं तर ती तेव्हा लहानच होती. अजूनही ती तशी लहानच. पण तिला तेव्हा प्रेमाचा अर्थ उमगला होता का? ती तेव्हापासूनच तर माझ्यावर प्रेम करीत असावी का? अशा प्रश्नांच्या गर्दीतच तो हरवून गेला होता. घरातही तो कुणाशी फारसा बोलत नव्हता. भाऊ-भावजयीनंही त्याच्या वागण्यातील बदल हेरला होता.
त्या दिवशी दिनेशच्या आवडीचं जेवण घरात बनलं होतं. त्याला बेसणवड्या खूप आवडायच्या. त्याची  आई दोनच दिवसांपूर्वी मधल्या मुलाकडून इकडं आली होती. आईनं त्याला 'बाळ दिनू जेवून घे रे', असा आवाज दिला. पण तिचा आवाज त्याच्या कानवरून निघून गेला. मुलाचा काहीच प्रतिसाद मिळत नसल्यानं थकलेली आई तो पहुडलेल्या खोलीत गेली. दिनेश शून्यात गेला होता. डोळे उघडे मात्र तो स्वप्न आणि विचारांत रमला होता. त्याच्या डोळ्यांसमोर फक्त छायाच होती. आईनं खोलीत शिरताच दुसऱ्यांदा आवाज दिला. पण दिनेश भान हरवून छायाच्या आठवणींत रमला होता. आई त्याच्या खाटेजवळ उभी राहिली. हे कारटं बहिरं झालं काय, असं एक क्षण तिला वाटलं. पण त्याचे तर सताड उघडे होते. हा छताकड का टकलावून पाहतोय म्हणून आईनं एकदा छतावरही नजर मारली. तिकडं जाळी, जळमट आणि लाल कौलारू एवढच चित्र होतं. आई शेजारील उभी राहून त्याचा चेहरा न्याहाळत उभी होती. दिनेशच्या चेहऱ्यावरील भाव क्षणाक्षणाला बदलत होते. त्याच्या चेहऱ्यावर कधी गंभीर तर कधी हास्य छटा होत्या. 'बाप रे... हे पोरगं येडंबिडं तर झालं नाही ना?' आई स्वत:शीच पुटपुटली. खरंच हा वेडा होतो की काय चिंतेनं तिनं दिनेशला गदागदा हलवलं. 'आरं पोरा.. बहिरा झालास की काय? केव्हापासून तुला आवाज देतेय. आहेस कुठे?' आई चिडली होती. दिनेश भानावर आला. 'क क काय गं?' अलगदच त्याच्या तोंडून शब्द फुटले. 'अरं माझ्या लेका जेवून घे... त्या छतावरच्या काय कातीन मोजू लागला का ' आई पुटपुटली. 'मला भूक नाही.. नंतर जेवीन. तू जेव.' म्हणत दिनेश खाटेवरून उठला. आई त्याला दोन घास तरी खा म्हणत त्याच्या मागे लागली तरी दिनेश घरात थांबला नाही. सरळ त्याची पावले छायाच्या घराकडे पडू लागली.
छायाचं घर उघडंच होतं. तिची आई आणि वडिलांचं कुठल्या तरी कारणावरून वाजलं होतं. छायासकट सर्व भावंडं एका कोपऱ्यात चिडीचूप बसले होते. छायाचे वडील शांत स्वभावाचे. पण चिडल्यावर हिटलरही घाबरावा असा त्यांचा अवतार व्हायचा. दिनेश आल्याचं त्यांच्या लक्षात आलं नव्हतं. छायानं हळूच दिनेशला इशारा करून तिथून निघून जाण्याचा इशारा केला. काही तरी गडबड झालीय, हे हेरून दिनेशनं तिथून काढता पाय घेतला. छायाच्या आई-वडिलांची बराच वेळ कुरबूर सुरू होती. शेवटी त्या दोघांत तह झाला आणि घर शांत झालं. इकड दिनेश भारीच टेंशनमध्ये होता. आपल्यामुळं तर त्यांच्या घरात भांडणं झाली नसावीत ना, ही शंका त्याला सतावत होती. काही अंशी ही शंका खरीही होती. छायाच्या अभ्यासावरून पहिल्यांदाच तिचे वडील चिडलेले होते. पोरगी अभ्यास न करता का इकडं-तिकडं हिंडत राहते. वारंवार का दिनेशच्या घरी जाते, असा त्यांचा सवाल होता. पण छाया आणि दिनेशमध्ये सध्या काय सुरू आहे, याची त्यांना कल्पना नव्हती. कारण त्यांचं प्रकरण म्हणावं तेवढं पुढं गेलेलं नव्हता. पण दिनेशला उगीचच भीती वाटत होती. छायालाही तसंच वाटत होतं. पण दोघांची भीती त्यावेळी तरी निरर्थक होती.
दिनेश सकाळीच उठला. पण रात्री बराच वेळ विचारात गढून गेल्यानं त्याला नीट झोप लागली नव्हती. त्यामुळं डोळ्यांवरची झोपेची झापड पूर्ण गेली नव्हती. चिपडं पुसतच त्यानं भिंतीच्या घड्याळीवर नजर टाकली. सकाळचे ७ वाजले होते. एरवी सूर्यनारायणाचा हा भक्त साठेआठ नऊशिवाय झोपतून उठणारा नव्हता. पण काल छायाच्या घरी काय रामायण-महाभारत घडलं, याची उत्कंठा त्याला लागलेली होती. ब्रश करून तो थेट बाथरुमध्ये शिरला. भडाभड  पाणी सांडवून पाचच मिनिटांत बाहेरही आला. कपडे घालून तो बाहेरच्या जाण्याच्या तयारीत असतानाच भावाने त्याला हटकले. 'साहेब आज सकाळी सकाळीच कुठं निघालात?' मोठ्या भावाच्या पहिल्याच प्रश्नावर दिनेश गांगरून गेला. 'कुठ नाही... जरा मित्राकडं जाऊन येतो' दिनेश दबक्या आवाजातच बोलला. 'मित्राकडं की मैत्रिणीकडं',  भावानं त्याची विकेट घेतली होती. भाव्या या गुगलीनं दिनेश थोडा चपापला होता. पण 'कोण मैत्रिण..? काही पण का दादा ?' दिनेश मी त्या गावचा नाहीच, या अविर्भावात बोलला. 'तीच रे छाया...' भावानं अचूकपणे बॉल टाकला होता. पण तो टोलवून लावण्याची ताकद दिनेशला झाली नाही. 'मी जाऊ का?' म्हणत तो भावासमोरून गायब झाला. भावानंही त्याला थांबवलं नाही.फक्त त्याला पाठमोरा बघून तो गालातल्या गालात हसला.
अजूनही आमच्यात काहीच घडलं नाही, अजूनही आम्ही एकमेकांना कोणतीही गोष्ट स्पष्टपणे बोललोही नाही तरीही  आमच्या घरचे असे का बोलू लागलेत, याचा दिनेशला अंदाजच येत नव्हता. मित्राकडे जातो म्हणून घरातून बाहेर पडलेल्या दिनेशने आपला मोर्चा मैत्रिण छायाच्या घराकडेच वळवला होता. छायाच्या घरातील वातावरण सामान्य होतं. तिची भावंडं सकाळीच शाळेत गेली होती. तिची शाळा अकरानंतर असल्यानं ती आईला मदत करत होती. दिनेश थेट घरात शिरला. त्याला बघून छायाची आशाबाई यांनीच  बोलायला सुरुवात केली. 'काय रे दोन दिवस झाले आलाच नाहीस?' आशाबाईंनी चौकशी केली. 'कालच आलो होतो. पण तुमच्या घरातून गरम हवा येत होती म्हणून पळालो?' खोडी करत दिनेश म्हणाला. 'तूना दिनेश आगाव झालास बघ? ' आशाबाई प्रेमानं रागावल्या. 'काय झालं होतं काकू काल?' दिनेशनं उत्सुकतेनं विचारलं. 'काही नाही रे हिचं आता बारावीचं वर्ष आहेना. ती अभ्यासात मागे पडत असल्यानं तिच्या बाबाचं टाळकं सरकलं होतं?' आशाबाईंनी स्पष्टीकरण दिलं. त्यांच्या स्पष्टीकरणानंतर दिनेशनं मात्र सुटकेचा श्वास घेतला. 'मग ही अभ्यास का करत नाही?' असा खोचक प्रश्न त्यानं छायाकडं बघत केला. 'तू काय बारावीला मेरिटमध्ये आला होतास का रे?' छायानं चेंडू टोलवला. तसं दिनेशच्या तोंडाला कुलूप लागलं. थोडा वेळ दोघींशी गप्पा मारून त्यानं आपलं घर गाठलं. काल झालेल्या काकू-काकांच्या ताणतणावाचं कारण कळल्यानं दिनेश रिलॅक्स झाला होता. आपल्यावर कोणतंच बालंट आलं नाही, याचा त्याला आनंद वाटला.
छाया आपल्याला पसंद करते, याची त्याला पूर्णपणे खात्री झाली होती. परंतु पुढे करायचं काय? एकदा मनातलं सगळं बोलून टाकयचं, असा निर्धार दिनेशनं केला होता. पण कधी, कुठं व्यक्त व्हावं, हा यक्षप्रश्न होता. छायाच्या घरी किंवा आपल्या घरी या विषयावर बोलणं परवडणारं नव्हतं.  आपल्या भावाला संशय आला असणार याची जाणीवही त्याला झाली होती. मग तिच्याशी बोलायचं कुठं, या संधीच्या शोधात तो होता.
(क्रमश:)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अंधभक्ती

देशी अप्सरांसाठी इंद्रपुरीतून खाली उतरलेल्या राजा इंद्राने पृथ्वीवरआटपाटनगरात स्थापन केलेले राज्य चांगले  सुरू होते. त्याचे  पृथ्वीतलावर आपल...