शुक्रवार, ३० मार्च, २०१८

चोरट्यांची भीती आणि गावकऱ्यांची फजिती


चोर म्हटलं की अनेकांच्या काळजात धडकी भरते. घरात चोर शिरला तर त्याला बघणाऱ्यांचा थरकाप होतो. एखादीच व्यक्ती चोराला घाबरत नसावी. माझ्या मते शंभरपैकी सत्यान्नव लोकांना चोराची भीती वाटत असणार. आता चोर म्हणजे कोण, हे अधिक स्पष्ट करण्याची गरजच नाही. शेंबडं लेकरूही चोर म्हणजे कोण, हे सांगू शकेल. येथे मुद्दा मांडायचा हा की, चोराची माणसाच्या मनात किती दहशत असते.
ही गोष्ट आहे १९९७ सालची.  ११ मे रोजी सायंकाळी औरंगाबाद येथेच माझे लग्न झाले. ठीक ५.५५ वाजता आमच्या लग्नाचा बार उडाला. त्यानंतर रीतीप्रमाणे पाहुण्यांच्या भेटी, गिफ्ट आणि शुभेच्छा स्वीकारणे आणि जेवणावळ यात रात्रीचे ११ वाजले. नंतर बिदाई वगैरे वगैरे..  अर्धांगिनीला घरी नेले. काही वेळ पाहुणे मंडळीसोबत गप्पा मारल्यानंतर जांभया येऊ लागल्या. दिवसभराचा थकवा असल्याने घोडे विकून झोपावं तशी कधी झोप लागली हे कळलंच नाही. सकाळी पाहुण्या मंडळीची कलकल ऐकून डोळे उघडले. मुक्कामी थांबलेले पाहुणे घरी निघण्याची तयारी करीत होते. मलाही माझ्या अर्धांगिनीला माझं मूळ गाव म्हणजे आमदरी (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) दाखवण्यासाठी न्यायचं होतं. पण त्यापूर्वी पुसदला वास्तव्यास असलेल्या भावाकडे प्रथम जाण्याची योजना होती. कारण मूळ गाव आम्ही सर्व भावंडांनी कधीच सोडलं होतं. गावाकडं शेती आणि घर मात्र होतं. वडील दरवर्षी शेती बटाईनं गावातच राहणाऱ्या आतेभावाला देत. वऱ्हाडातील एका जत्थ्यासोबत माझ्या कुटुंबातील सर्व मंडळी   रेल्वेने नांदेड आणि तेथून पुसदला गेलो. पुसदला तीन मुक्काम केल्यानंतर  पत्नीला माझं जन्मगाव, माझं घर आणि शेती दाखवण्याची प्रचंड ओढ लागली होती. पण सकाळचे जेवण-खावण उरकण्यातच दुपार झाली. पुसदपासून माझे गाव फार तर सत्तर-पंच्याहत्तर कि.मी. वर. पण मधले ५ ते ६ किलोमीटर अंतर पायी जावे लागणार होते. त्यासाठी मरसूळ फाट्यावरच उतरावं लागतं. फाट्यापासून मरसूळ गाव दोन किलोमीटर आणि तेथून माझं गाव तीन किलोमीटरवर. अर्धा किलोमीटर वगळता उर्वरित सर्व रस्ता जंगलाचाच.
माझी पत्नी, पुतणी आणि मी असे तिघंच गावाकडे जाण्यास निघालो.  हात दाखवा गाडी थांबवा स्वरूपाच्या एसटीत आम्ही बसलो. तेव्हा साधारणत: साडेतीन वाजले असावेत. त्यादिवशी बस मात्र गोगलगायीसारखी हळू चालली होती. चालकाने कितीही करकचून अॅक्सिलेटरवर पाय दाबला तरी गाडी ४० कि.मी. प्रतितासाच्या वर धावायला तयार नव्हती. दीडच तासांचा प्रवास मला दीड दिवसांचा वाटू लागला. त्यादिवशी मात्र मी एसटी महामंडळाचा मनोमन उद्धार केला. कधी एकदा गावी पोहोचतो आणि माझ्या जन्मभूमीवर पाय ठेवतो, याची प्रचंड उत्सुकता लागून होती. मरसूळ-बेलखेड फाटा येताच एकदाची वाहकाने दोरी ओढली अन् गचकन चालकाने ब्रेक दाबून बस थांबवली. शिवाजी महाराजांना अागऱ्याहून सुटका झाली तेव्हा जेवढा आनंद झाला नसेल तेवढा मला त्या टपऱ्या बसमधून खाली पाय ठेवल्यानंतर झाला होता.
आमच्या तिघांकडं फारसं सामान नव्हतं. एका आंघोळीचे तेवढे कपडे एका बॅगेत कोंबून आम्ही निघालो होतो. फाट्यावर उतरताच माझे पाय तरातरा गावाच्या दिशेनं चालू लागले. दिवस पूर्णपणे कलला होता. तासाभरात अंधार पडणार याची पूर्ण कल्पना आली होती. त्यामुळंच माझ्या पायांना गती आली होती. पण पुतणीनं  'तात्या थोडं हळू चलाना' असं म्हणताच गती थोडी मंदावली. 'बेटा जरा पटपट चल. दिवस मावळला तर अंधार होईल. आपल्याला जंगलातून जायचं आहे.', असं मी त्यांना समजावताच दोघींच्या पायांना गती मिळाली. माझ्या पत्नीने बहुदा पहिल्यांदाच विदर्भात पाय ठेवलेला होता. कुठं जायचं, कसं जायचं, हे तिला काय ठाऊक. पुतणीचा हात धरून ती माझ्या पावलावर पाऊल ठेवत निघाली होती. 'किती दूर आहे हो गाव' असा प्रश्नत तिनं केला. 'हे काय जवळचआहे' असं सांगून तिचं मी सांत्वन केलं. अर्ध्या पाऊणतासात मरसूळ गाठलं. तोवर सूर्य डोंगराच्या कुशीत दडू पाहत होता. गावातून न जाता गावाच्या बाहेरून जाणाऱ्या पाणंद रस्त्यानंच गाव जवळ करण्याचा माझा प्रयत्न होता. पाणंद रस्त्याने चालताना मात्र पत्नीचा जीव कासावीस झाला. तिने नाकाला पदर लावला. त्यावेळी हागणदारीमुक्त गाव, अशी योजना कोठेच अस्तित्वात नव्हती. त्यामुळे अख्खं गाव या पाणदेतच उलटायचं. त्याचा जो परिणाम झाला  होता तो भोगत आम्ही त्या रस्त्याने निघालो. डोंगराच्या कुशीत शेती करणारे शेतकरी गायी, म्हशी आणि आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांसह घरी परतत होते. आम्ही झपाझप पावलं टाकत निघालो असतानाच पुढून   बैलगाडी घेऊन येत असलेल्या शेतकऱ्याने शेतकऱ्याने बैलांचा कासरा ओढला तसे बैल थबकले. 'काय सोयरे हो आमदरीला चालले का?' असा प्रश्न त्याने केला. 'हो' माझं उत्तर एवढंच होतं. 'लवकर जा, तुमच्या जंगलात चोर हायेत. कोणालाबी मारायलेत, लुटायलेत. पटकन जा नाय तर मरसुळातच मुक्कामाला थांबा', असा सल्ला त्यानं दिला. त्याचा सल्ला ऐकून काय करावं काय नाही, हे मला सुचंनासं झालं. बरं मरसुळात थांबायचं तर कोणाकडं थांबावं, हाही प्रश्न होता. अनेक वर्षांपासून गाव सुटल्यानं फारशी कोणाची ओळखही नव्हती. त्यामुळं लवकरच जावं, असं ठरवून त्या शेतकऱ्याला 'हो काका.. लवकर जाऊ', असं उत्तर देऊन पुतणी वर्षा आणि पत्नी  संगीताला 'चला पळा', असं म्हणत आधीच्या पेक्षा पायांना अधिक गती देऊन मी पुढे निघालो. त्याचवेळी मी संगीताच्या तोंडाकडे बघितलं तेव्हा तिच्या डोळ्यांत प्रचंड भीती दिसत होती. वर्षाही भयभीत झाल्याचं जाणवलं.
बघता बघता आम्ही मरसूळची वेस ओलांडली होती. सूर्यही काळोखाच्या कुशीत विसावू पाहत होता. अर्ध्याच तासांत काळोख पसरणार होता. त्याआधी गाव गाठणं गरजेचं होतं. आता जंगलाच्या रस्त्याला सुरुवात झाली होती. फक्त दूरवर चारा शोधायला गेलेले काही पक्षीच आकाशातून आपल्या घरट्याच्या दिशेने उडताना दिसत होते. थोड्याच वेळाने एक चिटपाखरूही दिसायला तयार नव्हतं. सगळी कशी शांतता होती. आम्ही गतीनं चालू लागल्यानं आमच्या पावलांचा आणि श्वासाचा आवाजही स्पष्ट एकमेकांना ऐकू येत होता. संगीता तर पूर्णपणे भांबावलेली होती. अधूनमधून दोघी बोलत होत्या. मी दबक्या आवाजात दोघींनाही बोलू नका, असा सल्ला दिला. तशा दोघी शांत चालू लागल्या. वर्षाच्या पायातील पैंजण छणछण आवाज करीत होते. ते शांततेचा भंग करू लागल्याने मी तिला ते पैंजण काढण्यास सांगितले. त्याच वेळी मी संगीताला तिच्या गळ्यातील सोन्याची पोत, कानातले डूलही काढून देण्यास सांगितले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता दागदागिने माझ्याकडं काढून दिले.  जर चोरटे आलेच तर सर्व सोनंनाणं त्यांच्या स्वाधीन करायचं. पण माझ्या लेकीच्या अन् पत्नीच्या अंगाला त्यांना हात लावू द्यायचा नाही, हा निर्धार मी मनोमन केला होता. चालता चालताच मी रस्त्याच्या कडेला पडलेलं एक लाकूड उचलून हाती धरलं. दोघींना पायांचा आवाज येऊ देऊ नका की बोलू नका. चोरांना आपली चाहूलही लागायला नको, असं मी बजावून टाकलं. हळूहळू अंधार पडत होता. तेवढ्यात शंभर सव्वाशे मीटरवर कोणी तरी आपल्याच दिशेनं येत असल्याचं मला दिसलं. प्रथम मी थबकलो. अधिक निरखून बघितलं तेव्हा डोक्यावर फेटा बांधलेला वृद्ध येत असल्याचा अंदाज आला. आमच्या पावलांना पुन्हा गती आली. ती वृद्ध व्यक्ती जसजशी जवळ आली तसंतसं त्याचा चेहरा दिसू लागला. तो चेहरा ओळखीचा असल्याचं जाणवत होतं. ती व्यक्ती काही अंतरावर येताच माझ्या आनंदाला तर सीमाच राहिली नव्हती. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हे तर माझे वडीलच होते. 'अगं आपले बापूच आहेत,' असं म्हणत मी शांततेचा भंग केला. बापू जवळ येताच त्यांनीही आम्हाला बघितलं. 'अरं बाबा तू व्हस' म्हणत त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद झळकला. पण काही क्षणातच त्यांचा चेहरा गंभीर झाला. 'एवढ्या रात्रीचं कशाला आलात बाबा.. आपल्या गावात चोर आले.' असं म्हणत ते माघारी फिरले. 'तुम्ही कुठं निघाले होते', असा प्रश्न मी केला. 'उमरखेडाला चाललो व्हतो', असं उत्तर देऊन ते आमच्याबरोबर गावाच्या दिशेनं चालू लागले. बापू आमच्याबरोबरच औरंगाबादहून निघाले होते. पण पुसदला न येता ते उमरखेडला उतरून मूळ गावी गेले होते. आई मात्र पुसदला आमच्यासोबत आलेली होती.
 'आता बोलू नका.. घरी गेल्यावर बोलू', असं बापूंनी सुचवलं. पुन्हा आम्ही श्वास रोखून गावाच्या दिशेनं निघालो. अजून गाव जवळ आलं नव्हतं. सूर्य पूर्ण बुडाला होता. तरी अंधूक का होईना, आम्हाला रस्ता दिसत होता. गावात पोहोचेपर्यंत पूर्ण काळोख पसरला होता. एकदाचे आम्ही घरी पोहोचलो. आमचं घर वडिलांनी आत्याच्या मुलाला राहण्यासाठी दिलं होतं. धृपतबाई (मामाच्या मुलाची पत्नी) स्वयंपाक करत होती. दाजी बाहेरच बाजंवर बसला होता.   नवरी पाहण्यासाठी गावातील बरीच मंडळी जमली होती. म्हाताऱ्या कोताऱ्या संगीताकडं डोळे नि तोंड वासून निरखून पाहत होत्या. तीसुद्धा या थोरांचा चरणस्पर्श करीत होती. काही म्हाताऱ्या बायांनी संगीताचे पटापट मुकेही घेतले.
रात्रीचं जेवण झालं. आता निवांत झोपावं, असा आमचा बेत होता. पण एकएक माणूस आमच्या घरी येऊ लागला. लोकं का जमताहेत, असा प्रश्न आम्हा तिघांनाही पडला. गुणा मामाचा सुखदेव पेटी (हर्मोनियम) अन उकंडदादा ढोलकी घेऊन आला तेव्हा लोकं आमच्या घरी जमण्याच्या कारणांचा उलगडा झाला. आमच्या घरी भजनाचा कार्यक्रम होता. जंगलात चोर आल्यामुळं जागरण म्हणून ही मंडळी गावात दररोज भजन करीत असल्याची माहिती कळाली. काही तरुण मुलं गावाच्या चारही बाजूंनी पहारा देत आहेत, हेही एकानं सांगितलं. मला तसा भजनाचा छंद होताच. दोन-तीन तास मी भजनात रमलो. पण संगीता नि वर्षा तासाभरातच मधल्या खोलीत आडव्या झाल्या. एकानंतर एक भीमगीताचे सादरीकरण होत होते. गायकांचे आवाज, ढोलकीचा टणटणाट आणि टाळांचा मंजूळ आवाज काळोखाला चिरत होता. पहारा देणाऱ्यांची अधूनमधून हाळी ऐकू येत होती. एक भीमगीत संपलं होतं. भजनी मंडळाला आता चहाची तलफ लागली होती. धृपतबाईने चुलीवर चहा मांडला होता. काही जण तोंडातला तंबाखूचा तोबरा अंगणात जाऊन थुकत पाण्याचा गुळणा करत होते. मीही पाय मोकळे करण्यासाठी अंगणात गेलो, तसा कुत्र्यांचा दूरवरून जोरात भुंकण्याचा आवाज कानी पडला. तसे पहारे देणारे तरुण 'अरे खोरीकडे चला रे' (खोरी म्हणजे दामू मनवर याचे शेतातील घर) असा एकच गलका त्यांनी केला. काठ्या, कुऱ्हाडी, सुरे घेऊन पहारेकरी तरुण आणि भजनात बसलेले काही जण खोरीच्या दिशेनं पळत सुटले. दामूच्या शेतावर चोरांनी नक्कीच हल्ला केला, असं सर्वांनाच वाटू लागलं. कुत्र्यांचा आवाज आणि त्यात दामूच्या मायचं जोरजोरानं ओरडणं ऐकू येत होतं. पाचच मिनिटांत सगळे जण खोरीच्या शेतात गेले. त्यांच्याबरोबर हातात रुमणं घेऊन मीही पळत सुटलो होतो. खोरीत पोहोचलो तर काय, तिथं कुत्र्यांची कवंडळ लागलेली आणि दामूची माय ती कवंडळ सोडवण्यासाठी ओरडत होती. चोरवगैरे कोणीच नव्हते. धावलेल्या तरुणांनी त्या म्हातारीलाच चार शिव्या हासडून गाव गाठलं. उत्तर रात्रीला भजनाचा कार्यक्रम संपला. अंग टाकताच मला मेल्यासारखी झोप लागली. दिवस निघल्यावर धृपतबाईनंच चहा घेण्यासाठी आवाज दिला अन डोळे उघडले.  उठताच रात्रीचं चित्र पुन्हा डोळ्यांसमोर तरळलं. दाम्याच्या मायनं पोरांची केलेली फजिती आठवली अन हसतच मी पांघरून बाजूला सारलं.

बुधवार, २८ मार्च, २०१८

खोटं बोलण्याची शिक्षा


माणूस खोटं बोलायला लागला की तो कधी तरी अडचणीत सापडतो, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. काही जण आयुष्यात कधी कधी तर काही जण नेहमीच खोटं बोलतात. अनेकांचा खोटारडेपणा कुणाला कळतही नाही. एखादी मारलेली थाप सहज पचून जाते. पण प्रत्येक थाप पचतेच, असा मात्र नियम नाही. खोटं बोलण्यापायी एखाद्याला मारही खावा लागतो. तो मी खाल्लाय, म्हणून खोटं बोलण्यापायी मारही खावा लागतो, असं विधान मी इथे अगदी आत्मविश्वासानं करतोय. ग्रामीण भागात 'खोट्याच्या पदरी गोटे' अशी म्हण आहे. माझ्या पदरी गोटे पडले नसले तरी पाठीवर लाकडी दांड्याचे फटके पडले, हे विनम्रपणे सांगायला मला लाज वाटत नाही.
शाळंला बुट्टी मारणं हा अनेकांचा छंद असतो. काही जण पोट दुखल्याचा बहाणा करून तर काही जण मास्तर रागावतो म्हणून घरीच रडूनपडून शाळंत जाणं टाळतात. तर काही जण घरून शाळंसाठी निघतात पण शाळंत जात नाहीत. लहानपणी मी या तीनपैकी तिसऱ्या गटात मोडत होतो.  खरं तर मी एकटाच या गटात नव्हतो. जयश्री, सुधा, यशवंता, गौतम अाणि मी असा आमचा पाच जणांचा गट. आम्ही पाचही जण चौथीत शिकत होतो.  जयश्री आणि सुधा मात्र शाळा बुडवायला घाबरत होत्या. पण आम्हा तिघाचं बहुमत असल्यानं या दोघींचं महिलाराज चालणं अवघडच होतं. जंगलाचा रस्ता असल्याने या दोघी आम्हाला सोडून शाळंत जाण्याची हिंमतच करू शकत नव्हत्या. घरून शाळंत जाण्यासाठी निघायचं आणि शाळंच्या वेळेपर्यंत जंगलात हिंडायचं, असा महिन्यातून  तीन-चार वेळा आमचा  बेत असायचा.
एका दिवशी ठरलेल्या वेळी आम्ही शाळंत जाण्यासाठी निघालो होतो. त्याच्या आदल्या दिवशी मास्तरनं गणित आलं नाही म्हणून माझा कान पिळून उद्या तयारी करून ये, असं फर्मान साेडलं होतं. बरं मास्तरनं कान पिळला म्हणून एखाद्या सज्जन पोरानं घरी गेल्यावर गणिताची तयारी तरी केली असती ना. पण मास्तर गेला उडत, म्हणत त्यादिवशी बेफिकीरपणे मी गावात गोट्या खेळत बसलो. दुसऱ्या दिवशी शाळंत जाण्याआधी मात्र मास्तरनं पिळलेल्या कानात त्याचीच वाणी ऐकू येऊ लागली. तेव्हा मात्र आज मार खावा लागणार, याचा साक्षात्कार झाला. मग आज शाळंत जायचंच नाही, असा प्रस्ताव मी आमच्या गटातील सभ्य मंडळीसमोर मांडला. हा प्रस्ताव पाच विरुद्ध तीन मतांनी संमतही झाला. दोन पोरींनी विरोधी पक्षाची भूमिका चोख बजावली. पण बहुमतात नेहमीप्रमाणंच आम्हीच होतो.  मग काय, शाळंला बुट्टी मारून जंगलात हुंदडायचा एक कलमी कार्यक्रम हाती घेतला गेला. पण संध्याकाळच्या पाच वाजेपर्यंत करायचे काय, असा तारांकित प्रश्न गौतमने उपस्थित केला. त्यावर मोहोळ शोधायचं, आवळे खायचे, तळ्यावर जायचं असे विविध प्रस्ताव मी सदनासमोर मांडले. हे सर्व प्रस्ताव अविरोधपणे मंजूर झाले.
ठरल्याप्रमाणं आम्ही प्रथम शाळंचा रस्ता बाजूला ठेवून तळ्याला जाऊन मिळणाऱ्या ओढ्याच्या कडंनं मोहोळ शोधत निघालो. थोडं पुढं जाताच गावातल्या दोन बाया (महिला) ओढ्यावर धुणं धुत असताना दिसल्या. आपली चोरी पकडली जाणार या भीतीनं आम्ही एकमेकांच्या तोंडाकडं बघत होतो. पण त्या बाया एकमेकींत गप्पा मारण्यात इतक्या मश्गुल होत्या की, त्यांचं आमच्याकडे लक्षही नव्हतं. त्यामुळं आम्ही हळूच एका झुडपाआड लपलो. यशवंता हळू आवाजात म्हणाला 'अरं त्या सासूच्या चुगल्या करत असतील.' यशवंत्याच्या या बोलण्यावर आम्ही सगळेच फिदीफिदी हसू लागलो. त्यामुळं त्या बायांना आमची चाहूल लागलीच. एकीनं मोठ्यानं आवाजात 'कोण हाय रं तिकडं', अशी हाक मारली. तेव्हा मात्र आम्ही सगळे मसनवट्यात शांत बसावं तसं गप्प झालो. पायाचा आवाज न येऊ देता आम्ही दुरून पुढचा टप्पा गाठला. आता मात्र आम्ही दाट झाडीत शिरलो होतो. आम्हाला दोन मोहोळं सापडली.  पण गौतमच्या ओठाला एक मधमाशी चावली. त्यामुळं त्याचा ओठ सुजला होता.  मनसोक्त मध खाऊन झाल्यावर आम्ही आवळे तोडले. पाण्यात खेळलो. तळ्याजवळ जाऊन त्यात दगडं मारले.
पाहता पाहता दिवस कलू लागला होता. संध्याकाळ होत चालली होती. शाळा सुटायला थोडाच वेळ बाकी असंल असा अंदाज बांधून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. आपापले दप्तर पाठीवर घेऊन आलो त्याच रस्त्यानं आम्ही घरी परतलो. नेहमी घरी पोहोचण्याची तीच वेळ होती. त्यामुळं आम्ही शाळंत गेलो होतो की मसनात, हे कोणाला काहीच कळायचं काम नव्हतं. घरात दप्तर फेकून मी हातपाय, तोंड धुतलं. दुरडीत ठेवलेली एक भाकर घेऊन तिला तूप लावून गपागप हाणली. माय अन् बापू अजून शेतातून आले नव्हते.  देवळीत ठेवलेल्या गोट्या घेऊन पाराजवळ खेळायला जाणार तेवढ्यात लहाना दादा डोक्यावर दळणाचं चुंगडं घेऊन दारावर उभा होता. गावात पिठाची गिरणी नसल्यामुळं आमची शाळा असलेल्या गावी  दळणासाठी जावं लागायचं. नाही तर घरी जात्यावर दळण दळावं लागायचं. दादानं उभ्या उभ्याच 'काय शिकवलं रं आज शाळंत?' असा प्रश्न केला. 'काही नाही.. मास्तरनं कविता शिकवली. अकरा ते १९ पर्यंत पाढे पाठ करून घेतले,' असं खोटं उत्तर मी त्याच्या प्रश्नावर देऊन टाकलं. दादानं शांतपणे माझं उत्तर ऐकून घेतलं. दळणाचं चुंगडं त्यानं खाली ठेवलं. त्यानं दुसरा कोणताच प्रश्न विचारला नाही म्हणजे आपली थाप पचली, या भ्रमात मी होतो. पण काही वेळातच माझा भ्रमाचा भोपळा फुटला. त्यानं चुंगडं खाली ठेवलं तसं बाजूला पडलेलं लाकडाचं दांडकं उचललं. मी आपला थाप पचल्याचा मनोमनी आनंद साजरा करत असतानाच ढुंगणावर रप्पकन दांडकं पडलं. तसं मी मेलो मेलो.. म्हणत जागेवर नाचू लागलो. तसे आणखी दोन तीन दांडके पाठीवर अन् ढुंगणावर पडले. अंगाची आग उठल्याने पाराच्या दिशेने धूम ठोकली. दादा मागे अन् मी पुढे, असा पाच मिनिटं खेळ रंगला. 'अजून पळालास तर जिवानं मारीन' अशा शब्दांत दादा खेकसला.  तरीही जिवाच्या आकांतानं शेताच्या दिशेनं पळ काढला. कारण दादाच्या तावडीतून मायच सुटका करू शकत होती. बापूकडं गेलो तर त्यानंही तुडवलं असतं, हे मला ठाऊक होतं.  दादानं का मारलं याचं उत्तरही मला मिळालं होतं. बहुतेक आपली थाप पचली नाही, याचा साक्षात्कार मला झाला होता. मी मार खात असल्याचं पाहून गौतम आणि यशवंताही घरातून निसटले होते. कदाचित आपला बापही आपल्याला असाच सोलून काढंल, याची त्यांना भीती होती.  मी पळतच शेत गाठलं दादा काही अंतरापर्यंत मागे लागला. पण मी जरा जास्तच जोरात पळाल्यामुळं तो माघारी फिरला होता. तो माघारी फिरल्याचं पाहून मी मार पडलेला भाग चोळत चोळत आणि रडत रडत शेत गाठलं. सुदैवानं या मारानं माझी कापडं ओली झाली नव्हती.
शेतात पोहोचून मायला मोठ्यानं आवाज दिला. सुदैवानं बापू आणि माय बऱ्याच अंतरावर काम करत होते. माझा रडण्याचा आवाज ऐकून मायला घाबरायला झालं. तिनं 'काय झालं बाबा.. कामून लडायला' असा प्रश्न केला. दादानं मारल्याचं सांगून मी मायला बिलगलो. 'कामून मारलं?' असा तिचा दुसरा प्रश्न होता. पण तिच्या प्रश्नाचं खरं उत्तर माहीत असूनही मी देऊ शकत नव्हतो. 'लडू नको.. लडू नको..' असं म्हणत ती माझं सांत्वन करत होती. तरी मी घंटाभर भेकांड पसरलं होतं. मी रडत असल्याचं बघून बापूही जवळ आला. त्यानंही कारण विचारलं. पण माझं रडणं थांबत नव्हतं. तसा 'मर' असं म्हणत बापू परत कामाला लागला.  मायनं लगबगीनं काम आटोपलं. 'चल घरी जाऊ' म्हणत तिनं टोपलं, विळा, न्याहारीचा पालव, भांडेकुंडे जमा केले. आम्ही घरी गेलो. बापू शेतातच थांबला होता. मायच्या मागं दडत  मी घरापर्यंत गेलो. मायनं दादाला पहिलाच प्रश्न केला. 'कामून मारलं रं लेकराला?' दादा म्हणाला 'आये माय हे पाेरं आज शाळंतच गेले नाहीत. मी दळण दळून झाल्यावर शाळंत गेलो होतो. मास्तरनं आमदरीचं एकही लेकरू आज शाळत आलं नाही असं सांगितलं. आता तूच इचार त्याला ते कोठं होतं?' दादा शाळंत गेला होता, हे कन्फर्म असल्याने आता मात्र मायसुद्धा मला हाणते की काय, याची भीती वाटत होती. पण मायनं  'जाऊ दे एक दिस गेला नाय तर काय व्हईल,' असा मला दिलासा देणारा प्रतिप्रश्न केल्याने सुटलो बुवा, म्हणत मी सुटकेचा श्वास घेतला. दादा रागात होता. तरी मायसमोर तो आणखी मारणार नाही, याची मला खात्री पटली. मायनं अंगावरचं शर्ट आणि चड्डी काढून मला किती मार लागला, हे बघितलं. तिनं माझ्या अंगावर उमटलेल्या वळांवरून अलगद हात फिरवला. तिच्या हातानं आणि मायेनं मलमाचं काम केलं होतं. अंगाच्या होणाऱ्या आगीवर तिनं मायेची फुंकर घातली होती. माझं दुखणं थांबलं होतं. या घटनेनंतर शाळंला दांडी मारण्याचं मला लागलेलं दुखणंही कायमचं बरं झालं होतं.

मंगळवार, २७ मार्च, २०१८

प्रेम म्हणजे प्रेम असतं..


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

काय म्हणता ?
या ओळी चिल्लर वटतात?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?

असल्या तर असू दे,
फसल्या तर फसू दे !

तरीसुद्धा
तरीसुद्धा,

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

मराठीतून इश्श म्हणून
प्रेम करता येतं;
उर्दुमधे इश्क म्हणून
प्रेम करता येतं;
व्याकरणात चुकलात तरी
प्रेम करता येतं;
कोन्वेंटमधे शिकलात तरी
प्रेम करता येतं ! 
असं कविवर्य मंगेश पाडगावकरांनी लिहून ठेवलंय. त्यांची ही कविता प्रचंड गाजली. प्रत्येक साहित्य संमेलनात, कविसंमेलनात या कवितेला भरभरून दाद मिळायची. पाडगावकरांच्या लेखी  सर्वांचं प्रेम सेम असलं तरी त्यांनीच एका कवितेतून प्रेम करण किती कठीण आहे, हेही सांगून टाकलं.
प्रेम करणं सोपं नसतं...
सर्व करतात, म्हणून करायच नसतं..
चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं...
पुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतं...
तर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतं...
कारण प्रेम करणं सोपं नसतं...
शाळा कॉलेजांत असच घडतं...
एकमेकांना बघीतलं की मन प्रेमात पडतं...
अभ्यासाच्या पुस्तकात मग तिचंच रूप दिसतं...
जागेपणी ही मग प्रेमाचं स्वप्नं पडतं...
ज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतचं घडतं...
करीयरचं सत्यानाश तर आयुष्याचं वाटोळं होतं...
सहाजीकच मग आईवडिलांच्या ईच्छांवर पाणी पडतं...
कारण प्रेम करणं सोपं नसतं... 
असं सांगून त्यांनी प्रेमाचे इफेक्ट आणि साईड इफेक्टही सांगून टाकले.  मराठीत इश्श म्हणून प्रेम करणारे आणि ऊर्दूत इश्क म्हणून प्रेम करणारे या प्रेमाच्या नादात आयुष्याचं मातेरं करून बसले. कारण प्रेम काय, असतं हेच त्यांना नीट कळलं नसावं, असा माझा त्यामागील तर्क. एखादी तरुणी आवडली म्हणजे बस्स झालं प्रेम, असं समजणाऱ्या मजनूंची संख्या पावसाळ्यात उकिरड्यावर उगवणाऱ्या छत्र्यांपेक्षाही जास्त आहे. माझा मित्र गणेश याला एक मुलगी खूप आवडली. तो सारखा तिचा पाठलाग करू लागला. एकटक तिच्याकडे पाहणे, काही तरी निमित्त करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणे, असे त्याचे प्रयोग सुरू होते.  पण ती या पठ्ठ्याला कशातच मोजेना. गणू हैराण, परेशान झाला. एके दिवशी त्यानं तिच्याजवळ आपल्या प्रेमाची कबुली दिली. तशी तिनं त्याच्या कानशिलात लगावली. पण त्या अॅक्शनवर रिअॅक्शन न देता त्याने मोठ्या समजूतदारपणाने तेथून खसकणेच पसंत केले. आमच्यातीलच एका मित्रानं हा नजारा उघड्या डोळ्यांनी बघितला होता. थोड्याच वेळात रडकंमडकं तोंड घेऊन तो आम्हा मित्रांकडे आला. त्याच्या आधी आलेल्या मित्रानं हा सर्व वृत्तांत टीव्ही रिपोर्टरप्रमाणे अगदी एडिट करून आम्हाला सांगितला होता.  त्याच्या तोंडावर पाच बोटांचे ठसे उमटल्याने त्याच्या प्रेमाचे बारा कधीच वाजले होते,  हे  आम्हाला बाराच्या आधीच कळले होते.  तरी आमच्यातीलच एकानं गंमत म्हणून त्याच्या दुखऱ्या भागावर बोट ठेवलंच. 'काय रे तुझ्या थोबड्यावर बारा का वाजले', असा ठेवणीतला प्रश्न केला. पण त्याने हकिकत लपवली.  'काही नाही रे रात्रीपासून दाढ खूप दुखतेय', असे खोटे उत्तर देऊन त्याने वेळ मारून नेली. पण त्याच्या चेहऱ्यावरील भूगोल पाहता त्याने सांगितलेला इतिहास खोटा होता, हे  सर्वांना ठाऊक होतं. त्यामुळे त्या खबऱ्या मित्राने त्याने सांगितलेल्या खोट्या इतिहासाची पाने अधिक न चाळता, सर्वांना भूतकाळात म्हणजे थोड्या वेळापूर्वी काय झाले, याची वर्तमान स्थिती सांगून टाकली. त्यामुळे तो पूर्णपणे ओशाळून गेला. 'यार मी तिच्यावर खरं प्रेम केलं. पण तिनं माझ्या प्रेमाचा अपमान केला. याचा बदला मी जरूर घेईन', असा संताप व्यक्त करून तो रागाने फणफणतच निघून गेला. काही जणांनी त्याचं सांत्वन करण्याचा प्रयत्नही केला. पण तिची चापट त्याच्या गालावर नव्हे तर जिव्हारी लागली होती. 
पुढील दोन दिवस हा घायाळ मजनू आमच्यात मिसळलाच नाही. आम्हालाही त्याची काळजी वाटू लागली. एका मित्रानं तर आपणच त्या मुलीला गणूच्या प्रेमाबद्दल बोलून तिचं मतपरिवर्तन करावं का, असा प्रस्ताव आमच्या मित्र पंचायतीत मांडला. पण आपलाही त्या बयेनं पोपट केला तर आपली पंचाईत होईल, या शक्यतेनं मी एकाद्या राजकीय पक्षातून बाहेर पडावं तसं बाहेर पडलो. त्याचं कारण म्हणजे मला गणूला त्या मुलीविषयी मोठे आकर्षण होतं, हे त्याच्या बोलण्यातून अनेकदा जाणवलं होतं. जगातली प्रत्येक चांगली वस्तू आपल्याकडे असावी, हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं. तसंच स्वप्न गणूनं पाहिलं होतं. चारचौघींत देखणी असलेली ती तरुणी आपली व्हावी, ही त्याची ओढ स्वाभाविक होती. पण परिस्थिती तशी नव्हती. आमचा गणू दिसायला कादर खान होता तर ती परवीन बाॅबी! ती राजाभोजची एकुलती एक मुलगी होती तर हा आमचा गंगू तेल्याचं तिसरं  अपत्य. तिला शिकून सवरून मोठं व्हायचं होतं तर आमचा गणू दरवर्षी काठावर पास होणारा. दोघांत प्रेम होण्यासाठी काही तरी कुठं तरी थोडी तरी समानता असायलाच हवी ना. एखाद्याची सतत ओढ लागणं, दिवस रात्र त्या व्यक्तीचा विचार करणं, या विचारात अन्नपाणी गोड न लागणं, जिवाला सारखी हुरहूर लागणं, हे प्रेमात पडण्याचं लक्षण मानलं तरी हे मुळात प्रेम नसतंच, ते आकर्षण असतं,  हा धडा गणूच्या एकतर्फी प्रेमानं आम्हा मित्रांना शिकवला होता. गणू चुकला होता, असे म्हणण्याचे धाडस मी येथे करणार नाही. कारण त्या भाबड्याला प्रेम आणि आकर्षण यातील सुईच्या टोकाइतके अंतर कळले नव्हते.  शेवटी
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं ! असं आपण म्हणत असलो तरी
प्रेम करणं सोपं नसतं...
सर्व करतात, म्हणून करायच नसतं..
चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं...
पुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतं...
तर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतं...
कारण प्रेम करणं सोपं नसतं... 
असं पाडगावकरच आम्हाला सांगून गेले.  

रविवार, २५ मार्च, २०१८

हळूवार स्पर्श




कोणत्या तरी गावची जत्रा होती.हे गाव औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपासचेच असावे.  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अर्थात एसटीने या यात्रेसाठी जादा बस सोडल्या होत्या. मी ही या बसने प्रवासाला निघालो. ख्यातीनुसार बस खडखट वाजत निघाली. काही अंतरापर्यंत चकचकीत रस्ता होता. जसे बसने वळण घेतले तसा खडाखडाट वाढला. रस्ता अत्यंड खड्डेमय होता. रस्त्यात खड्डे होते की खड्ड्यात रस्ता होता, हेच प्रवाशांना कळेना. बस ताशी २० कि. मी. वेगाने धूळ उडवत निघाली होती. रस्याच्या आजूबाजूला हिरवीगार शेती होती. एका बाजूला नदी वजा मोठा नालाही वाहत होता. त्यामुळे सभोवताली हिरवेगार वातावरण होते. बसमध्ये खच्चून प्रवासी बसलेले होते. तीन-चार प्रवासी तर चालकाच्या केबिनमध्ये ठाण मांडून होते. चालक अधूनमधून शेजारच्या सिटकडे एकसारखा बघत होता. मी आपला धक्के खात दरवाजाजवळील दुसऱ्या वा तिसऱ्या पायरीवर श्वास रोखून उभा होतो. गर्दीमुळे प्रवाशांच्या अंगाला घाम फुटला होता. त्याचा असह्य दरवळी सुटल्याने मी एका हाताने बसच्या टपाला लावलेला स्टिलचा बार तर दुसऱ्या हाताने नाकाला रुमाल लावून उभा होतो. मला उभ्या उभ्या चालक सारखा बाजूच्या सिटकडे का बघत आहे, याचा अंदाज येत नव्हता. कारण माझ्या शेजारी धिप्पाड आणि उंच शरीरयष्टीचा प्रवासी उभा होता. त्यामुळे चालकाच्या शेजारील सिटवर नेमके कोण होते, हे दिसत नव्हते. अचानक बस एका मोठ्या खड्ड्यात आदळली तसा धिप्पाड माणूस बाजूला सरकला. तसे मला चालकाच्या बाजूच्या सिटवरील व्यक्तीचे दर्शन घडले. त्या सिटवर साधारणत: पस्तीशीतील एक महिला बसलेली होती. गव्हाळ वर्णाची ती महिला होती. सरळ नाक, लांबट चेहरा आणि मोठ्या कपाळावर मोठी बिंदी असे काही क्षणापुरतचे तिचे घडलेले दर्शन मलाही तिच्या मोहात पाडणारे ठरले. त्यामुळेच की काय बसचालक सारखा बस चालवताना तिच्याकडे कटाक्ष टाकत होता.
बस हळूहळू गावाच्या दिशेने पुढे सरकत होती. रस्त्याच्या बाजूने जत्रेला जाणारी आणि परतणारी मंडळीही खिडकीतून नजरेस पडत होती. पण मला या माणसांकडे पाहण्याची अधिक रुची नव्हतीच मुळी.. मलाही रस्त्यावर कधी खड्डा येतो आणि ती धिप्पाड व्यक्ती बाजूला सरकून त्या पस्तीशीतल्या महिलेचे दर्शन कधी घडते, याची प्रतीक्षा लागून होती. त्या खड्डेमय रस्त्याने अशी तीन-चार वेळ संधी दिलीही. पण मन भरत नव्हते.  या जत्रेच्या मार्गावर एक छोटेसे गाव लागले. वाहकाने दोरी ओढून एकदाची घंटी वाजवली. तशी ती धिप्पाड व्यक्ती दोघा-तिघांना धक्के मारत एकदाची दारातून बाहेर पडली. त्याच्याबरोबर आणखी एक माणूसही खाली उतरला. वाहकाने खाडकन दरवाजा ओढला नि टन टन असा घंटीचा आवाज काढताच बस पुढे मार्गस्थ झाली. तो जाड्या उतरल्याचा मला किती आनंद झाला होता. एक तर बसमधील गर्दी थोडी का होईना कमी झाली होती. दुसरे महत्त्वाचे म्हणजे मला चालकाच्या केबिनमध्ये बसलेल्या त्या सुंदरीकडे थेट बघता येत होते. पण ती थोडी पाठमोरी असल्यामुळे तिचा संपूर्ण चेहरा न्याहाळता येत नव्हता. तरी मी जितकी मान तिरपी करून तिचा चेहरा पाहता येत होता तेवढा पाहत होतो. शेजारीच उभा एक प्रवासी मात्र माझ्या मनातील खलबते जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता. एक वेळ मान वाकडी करताना माझ्या डोक्याने त्याच्या नाकाचा वेध घेतला होता. त्यामुळे तो थोडा रागातच होता. मी एक कटाक्ष त्यावर टाकला तेव्हा मात्र मला चपापल्यासारखे झाले. काही वेळ तरी मी माझी मान ताठ ठेवली. शेजारच्या त्या प्रवाशासह इतर कोणी माझ्याकडे बघतेय का, याचा मी अंदाज घेत होतो. पण तो सोडला तर इतर कोणीही माझे निरीक्षण करत नव्हते, याची मला खात्री पटली. त्याचा काही गैरसमज होऊ नये म्हणून मी उगीचच त्याच्याशी बोलण्याची चेष्टा केली. 'काय साहेब कुठं जायचंय' असा पहिला प्रश्न मी त्याच्यावर फेकला. तो काही तरी चांगले उत्तर देईल अशी माझी भाबडी आशा होती. पण पठ्ठ्याने 'तुम्हाला काय करायचे? असा प्रतिप्रश्न करताच मी पुरता गारद झालो. याच्याशी बोलून काहीच फायदा नाही, हे माझ्या सुज्ञ मनाला तात्काळ पटले. आता याच्याशी बोलून काही हशील होणार नाही, याची पूर्ण कल्पना आल्याने मी उगीच खिडकीबाहेर डोकावू लागलो. पण लोकांच्या गर्दीमुळे बाहेरचेही फारसे बघता येत नव्हते. त्या सुंदरीकडे बघावे तर शेजारचा तो बाबा माझ्याकडे मी जणू त्याचा सात जन्माचा वैरी असल्याच्या भावनेने बघत होता. त्यामुळे मरू दे, काय पडलंय त्या बयेत, अशी मनाची समजूत काढून मी तिच्याकडे आता बघायचेच नाही, असे मनोमन ठरवले. बस गचके खात एकदाची जत्रेच्या ठिकाणी पोहोचली. मी दाराजवळच उभा असल्याने दोन जणांच्या मागून बाहेर पडलो. जवळपास तासभर उभे राहून पाय गळून आले होते. त्यामुळे थोडे बाजूलाच जाऊन मी उभा राहिलो. माझ्या शेजारी उभा तो माणूसही बाहेर पडला. कैदेतून बाहेर पडावे, तसे प्रवासी आपापले सामान, थैले, बॅगा हाती घेऊन बसमधून बाहेर पडत होते. शेजारचा तो माणूसही माझ्याच शेजारी उभे राहून बसच्या दरवाजाकडे टक लावून होता. मी आपली नजर इकडे तिकडे भिरभिरत तिरप्या नजरेने बसच्या दाराकडे पाहत होतो. ती कधी उतरते याची मला उत्कंठा होती. तशी ती एकदाची उतरली. ती खाली उतरताच माझ्या शेजारी उभा माणूस 'ए चल.. किती वेळ लाला उतरायला.' असे म्हणत तिच्या हातातली थैली घेण्यासाठी पुढे सरसावला. आता मात्र सर्व चित्र स्पष्ट होते. तो तिचा नवराच होता, यावर शिक्कामोर्तब झाले. आता मात्र तेथे थांबण्यात मजा नव्हती. अजून तिच्यावर एक नजर जरी टाकली असती तर मी संकटात येणार होतो, याची मला जाणीव झाली. मी तरातरा ज्या देवस्थानाची जत्रा होती, तो रस्ता पावलांनी मोजू लागलो.
जत्रेला जाणारी माणसं झपाझप पावले टाकत होती. तरी परतणारी माणसं दमल्यासारखी एक एक पाऊल टाकत निघाली होती. काही टारगट मुले जत्रेतून विकत घेतलेल्या पुंग्यांतून कर्कश आवाज काढत निघाले होते. एकाने तर माझ्या कानाजवळच भों भो असा आवाज काढला. त्याच क्षणी त्याच्या कानाखाली आवाज काढण्याची इच्छा माझ्या मनात जागृत झाली. पण ती टारगट मुले टोळक्याने होती. त्यामुळे त्याच्या कानाखाली आवाज काढण्याची हिंमत मी जुटवू शकलो नाही. अशा प्रसंगी तलवार म्यान केलेली बरी, हे थोरांचे विचार मी जपले.
खरे तर ही जत्रा सप्टेंबरमधील असावी. पावसाळा पुरता संपलेला नव्हता. आभाळात ढगांची गर्दी होती. त्यामुळे वातावरण दमट होते. काही वेळातच पाऊस येईल, याचा मला अंदाज आला. पण जत्रेचं ठिकाण आणखी अर्धा किलोमीटर दूरवर होते.  पन्नास मीटर चालत गेलो तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली. आता भिजण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. कुठे आडोसा घ्यावा म्हटलं तरी बायाबापड्यांनी आधीच त्या जागा रिझर्व्ह केल्या होत्या. विचार करेपर्यंत पावसाचा जोर वाढला. खरेच आपण छत्री आणली असती तर.. असा विचार मनात डोकावत असतानाच डोक्यावर आपोआप छत्री आली. मी थोडा दचकलोच. पाहतो काय तर बसमधील तीच ललना माझ्या शेजारी डोक्यावर छत्री धरून सोबत चालत होती. एकाच छत्रीतून चालताना तिचा माझ्या खांद्याला खांदा लागताना माझे अंग अंग शहारून येत होते. वाऱ्यामुळे तिचे भिरभिरणारे केस माझ्या गालावर मोरपंखासारखे स्पर्शून जात होते. तिचे रूप अंबा आणि अप्सरेलाही लाजवणारे वाटत होते. तिच्याशी काय आणि कसे बोलावे, हेच मला सुचत नव्हते. फक्त मी तिच्याबरोबर चालत होतो. एखाद दोन पावसाचा थेंब अधूनमधून माझ्यावर अंगावर पडत होता. हवेत गारवा सुटला होता. मातीचा गंध सगळीकडे पसरला होता. आजूबाजूला कोण आहे, कोण येतेय, कोण जातेय याचे काहीच भान नव्हते. बस्स मी तिच्यासोबत चालत होतो आणि चालत होतो. माझ्यावर पावसाचा एक थेंबही पडू नये, याची ती काळजी घेत होती. पण कोण होती ती...
अचानक माझे पाय थकबले. मी चटकन मागे वळून बघितले. बसमधला तो माणूस मागे तर नाही ना, याची खात्री करण्यासाठी मी मागे बघितले होते. पण तो कोठेही नव्हता. तेव्हा कुठे माझ्या जिवात जीव आला. पण माझ्यासोबत आहे ती होती तरी कोण. तिचे नि माझे नाते तरी काय? हा प्रश्न मात्र डोक्यात वारंवार घोळत होता.  ती कोणीही का असेना, पण तिचा सहवास मला सुखावत होता. तिचे व माझे जन्मो जन्मीचे नाते आहे, असाच भास मला होऊ लागला. पण तिची तर ओळख आत्ताच झाली होती. मग तिचे नि माझे नाते तरी काय, या चक्रव्युहात मी पुन्हा सापडलो.
पाऊस थांबला होता. डोक्यावरची छत्रीही तिने कधीच मोडून ठेवली होती. तिचा हात माझ्या हातात होता. म्हणजे तिनेच माझा हात घट्ट अावळून धरला होता. आम्ही ज्या रस्त्याने निघालो तेथे जत्राबित्रा काहीच नव्हती. निसर्गाने नटलेला तो सुंदर रस्ता होता. आम्ही जणू काश्मिरातल्या रस्त्यावरून भ्रमंती करत होतो. काही मिनिटांतच आम्ही हसू खिदळू लागलो. ती मला अरे कारे आणि मी तिला अगं तुगं बोलत होतो. मागचे सर्व भास अभास आता निखळून गेले होते. मी तिच्यासाठी ती माझ्यासाठीच या धरतीवर आल्याचे जाणवत होते. पण मध्येच पण कोण ही? हा प्रश्न पाठ सोडत नव्हता.  पण ती कोणी का असेना सध्या तरी माझीच, असे मनाला समजावून तिच्याशी एकरूप होत गेलो. हळूहळू माझ्यात कामदेवाने प्रवेश करणे सुरू केले. त्या क्षणी तरी ती माझ्यासाठी रतीच होती. आता मात्र कुठे तरी एकांतात जावे, कुठला तरी अडोसा गाठावा, अशी इच्छा झाली. मी म्हणालो 'हे बघ आपण त्या दाट झाडीत जायचं का?' तिचे उत्तर होते, 'नाही गडे मला प्राण्यांची भीती वाटते!' त्यावर माझा उपाय तयार होता. 'मग आपण असं करू, ते डोंगराच्या कडेला मंदिर आहे ना तिथं जाऊयात' या उपायावर तिने लगेच होकार दिला. आमची पाऊले डोंगराच्या दिशेने झपाझप पडत होती. आज माझी तहान भागणार या एका विचारानेच मला स्वर्गीय आनंद मिळत होता. त्याच विचाराने माझी पावले पुढे पडत होती. मी चालतच होतो, चालत होतो. पण डोंगर काही जवळ येत नव्हता. ती माझ्यासोबत चालून पुरेशी दमली होती. न राहवल्याने तिने 'कधी येणार रे ते मंदिर' असा भाबडा प्रश्न केला. 'हे काय समोरच आहे', असे दिलासा देणारे उत्तर मी तिला दिले आणि डोंगराच्या दिशेने नजर टाकली. पाहतो तर काय, डोंगर आणखी किती तरी दूर दिसला. मी दचकून आजूबाजूला बघितले तर आम्ही एका गजबजलेल्या वस्तीत आलो होतो. पण या गजबलेल्या वस्तीत कामदेवाला रती मिळणार कशी होती? तो डोंगर अजूनही मला खुणावत होता. त्या डोंगरापर्यंत आणि मंदिरापर्यंत जायचेच, अशी खूणगाठ मी बांधलेली होतीच. 'अगं फार दूर नाही. चल पटपट' असे म्हणत मी तिला अक्षरश: ओढत नेऊ लागलो. खरे तर चालून चालून माझेही पाय जड पडले होते. पण अंगात शिरलेला कामदेव काही पावलांना थांबू देत नव्हता. अंगात वारे भिनल्यासारखे आम्ही डोंगराच्या दिशेने पळत सुटलो होतो. आता डोंगरही जवळ आला होता. त्याच्या कुशीतले मंदिरही स्पष्ट दिसत होते. बस्स आधी मंदिराच्या पायऱ्यांवर काही क्षण बसू आणि नंतर मंदिराच्या मागच्या झाडांमागे जाऊन तृप्त होण्याची माझी योजना फलस्वरूपात येण्याची शक्यता काही मिनिटांवरच येऊन ठेपली होती.  आमचे पाय मंदिराच्या पायऱ्यांजवळच जाऊन थांबले. एक मोठा उसासा दोघांनीही घेतला. चालून चालून दमल्याने ती मंदिराच्या पहिल्या पायरीवरच मटकन बसली. तसा मीही एक जोराचा श्वास घेऊन तिला बिलगून बसलो. चालून चालून लागलेली धाप जाईपर्यंत एकमेकांच्या डोळ्यांत डोळे घालून आम्ही श्रमपरिहार केला. आता मंदिराच्या मागे जायची घाई होती.
'चल आपण तिकडं मागे जाऊन बसूयात'  असे म्हणत मी शांततेचा भंग केला. तिनेही डोळे आणि मानेनेच होकार दिला. देव दर्शन बाजूला ठेवून आम्ही मंदिराच्या बाजूने खड्डे आणि दगडांच्या रस्त्याने वाट सर करू लागलो. माझ्या मनात काहूर माजलं होतं. तिच्यासोबतच्या भेटीचा सर्वोच्च आनंद देणारा क्षण माझ्या वाट्याला येणार होता. मनोमनी मी हुरळून गेलो होतो. ती धुंदीच अशी होती की, त्या डोंगराळ रस्त्यावरून चालायचेही भान मी हरवून बसलो होतो. चालता चालता माझा पाय एका गोल छोट्याशा दगडावर पडला आणि माझा तोल जाऊन मी धप्पकन चारीमुंड्या चीत व्हावा, तसा जमिनीवर आडवा झालो. त्याचक्षणी डोळे उघडले. माझ्याजवळ झोपलेल्या माझ्या लेकाराने मला झोपेत लाथ मारली होती. बाजूलाच माझी अर्धांगिनी जोरात घोरत होती. ती स्वप्नातली अप्सरा झोपेबरोबर कधीच उडून गेली होती. ना तेथे रती होती ना कामदेव.  होता फक्त स्वप्नांतला हळूवार स्पर्श!

शनिवार, २४ मार्च, २०१८

मायेची ऊब


सकाळीच माय जात्यावर दळण दळत होती. ती उंच स्वरात जातं ओढताना गाणं गात होती. ती कोणतं गाण गात होती, ते आठवत नाही. पण तिचा मंजूळ आवाज कानावर पडत होता. मी डोळ्याला आलेले चिपडं खरडत उठलो आणि जात्यावर दळण दळत असलेल्या मायच्या मांडीवर जाऊन झोपलो. मायनं गरगर फिरणारं जातं थांबवलं. हळूच माझ्या केसांत हात घातला. मायेनं बोटं फिरवली. तसा पुन्हा मी पेंगू लागलो. मी झोपल्याचं समजून मायचे हात जात्याचा खुंटा भराभरा गोल फिरवू लागला. ओठांवर पुन्हा तेच गीत गुणगुणू लागले. मी काही फार गाढ झोपलो नव्हतो. तिची गुणगुण ऐकत निपचित पडलो होतो. माझी झोप मोडू नये म्हणून तिनं हलक्या आवाजात गाणं गायला सुरुवात केली होती. तिचा मंजूळ आवाज एक वेगळाच आनंद देत होता. सगळं गाव शांत होतं. केवळ अधूनमधून एकाद दुसरी चिमणी चिवचिव करत होती. कदाचित मायला चिमण्यांच्या आधी जाग आली होती. जाग आलेल्या चिमण्या  जणू तिच्या सुरात सूर मिसळत होत्या. मला थंडी लागत होती. म्हणून मी माझे हातपाय आणि डोकं एकत्र जमवण्याचा प्रयत्न करत मायच्या मांडीवर पडून होतो. मला थंडी लागत असल्याचं तिला जाणवलं. तिनं हळूच खांद्यावरचा पदर काढून माझ्या अंगावर टाकला. तशी मला उब मिळाली. ही उब होती मायच्या पदराची आणि मायच्या मायेची. भरभर जातं ओढून मायला मात्र घाम फुटला होता. पण पदर माझ्या अंगावर होता म्हणून तिनं पदर उचलला नाही. बाजूलाच पडलेल्या कसल्या तरी चिंदकानं तिनं घाम टिपला. बघता बघता पायलीभर दळण तिनं दळलं होतं. मी अजूनही झोपलेलाच आहे असं तिला वाटलं. तिनं हळून मानेच्या खाली हात हात घालून माझं डोकं जमिनीवर ठेवलं आणि बाजूचा दळणाचा डबा घेऊन थेट चुलीकडं गेली. तिनं जसं माझं डोकं जमिनीवर ठेवलं तशी माझी झोप उडत गेली. असं वाटत होतं मायनं असंच अजून घंटाभर दळण दळत राहावं अन मी तिच्या मांडीवर असाच पडून राहावं. पण तिच्या पुढे कामाचा डोंगर उभा होता. माझं डोकं जमिनीवर अलगद टाकून ती उठली होती. दळणाचा डबा भानुसावर   ठेवून ती अंगणात काटकं मोडायला गेली. तुराट्या आणि वाळलेल्या लाकडांचा कटकट आवाज मला ऐकू येत होता. आता मात्र माझ्या डोळ्यांवरची झोपेची तंद्री पूर्णपणे उतरलेली होती.  तेवढ्यात बापूही उठला होता. लहाना दादाही उठला होता. त्याच्या मागं वहिणीही उठली होती. बापू खाकरतच अंगणात गेला. 'बहिरे झालं का दळण.लवकर भाकरी कर. कापसात लय तन झालं. रोजदार लावला. न्याहारीच्या येळंपर्यंत एक ढेलं झालं पायजे ', असं म्हणत बापू थेट घरासमोर बांधलेल्या गोठ्यात गेला. त्याच्या मागेच दादाही गेला. गोठ्याच्या दरवाजाजवळ ठेवलेलं टोपलं उचलून बापू  गोठ्यात शिरला. दादानं तुराट्यांच्या खराट्याने अंगणातला कचरा झाडायला सुरुवात केली. मी अंगणात आलो होतो. अंगणात एका कोपऱ्यात मी लघवी केली आणि अंगणात टाकलेल्या बाजंवर जाऊन बसलो. मायचं काटकं मोडणं झालं होतं. तशी ती पुन्हा चुलीजवळ गेली अन् चूल पेटवली. मी ज्या बाजेवर बसलो तिथंच स्वयंपाक घराची खिडकी होती. बका बका धूर खिडकीतून बाहेर येऊ लागला होता. माय स्वयंपाकाला लागली होती. तिने दोन चुली पेटवल्या होत्या. वहिणी सडा सारवण करत होती. मी हळूच जाऊन माय काय करत आहे, याचा कानोसा घेतला. मायनं एका जर्मनच्या डब्यात ठेवलेली तुरीची डाळ आणि एका कपड्यात बांधलेलं बसेणाचं पीठ काढलं होतं. मी उठलो हे बघून ती म्हणाली,  'बाबा तोंड धू...आता पिठलं अन् दाळ करतो'. तसा मी घराच्या बाजूलाच असलेल्या न्हानीकडं गेलो. तिथं एका खिडकीत ठेवलेली कुपी घेतली. त्यातलं काळं मंजन हातावर घेऊन दात चोळू लागलो. हे मंजन म्हणजे खास मायनं बनवलेलं. कोळसा कुटून अन् त्यात मीठ घालून तयार केलेलं हे मंजन. दात घासताना तोंडात जमलेला थुका मी अंगणात पचकन थुकत होतो. बापू गोठ्यातून गायी अन् बैलाचं शेण उचलून उकंड्यावर नेऊन टाकत होता. त्याच्या तीन-चार खेपा झाल्या होत्या. सगळं शेण उचलून त्यानं काल मायनं शेतातून आणलेला आणि गोठ्याजवळ ठेवलेला गवताचा भारा विस्कटून गायी आणि बैलांपुढे पसरला. तसे गायी व बैलं त्या गवतावर तुटून पडले. मी तोपर्यंत तोंड खंगळलं होतं. शर्ट वर करून तोंड पुसलं आणि न्हाणीतलं टंबरेल घेऊन हागणदारीत गेलो. पोट साफ करून घरी परतलो. टंबरेल उभ्यानेच फेकून घरात घुसलोङ स्वयंपाक घरात मायच्या पुढं जाऊन बसलो. एका चुलीवरची दाळ शिजत आली होती. मायनं विझत चाललेल्या लाकडावर फुंकर मारली तसा जाळ वाढला. दुसऱ्या चुलीवर माय भाकरी करत होती. एक एक करत तिनं भाकरीची उतरंड लावली. पकडीनं तवा उचलून तिनं बाजूला ठेवला. बाजूलाच ठेवलेलं भगोणं तिनं चुलीवर मांडलं. एक बारिक कांदा कापला. दोन-तीन लसणाच्या कळ्या आणि हिरव्या मिरच्या तिनं खलबत्त्यात कुठून पिठल्याला फोडणी दिली. दोन मिनिटांत पिठलं खदखद करून शिजलं.  इकडे दाळी शिजली होती. लगेच तिनं जर्मनच्या ताटात एक भाकर मोडली. पिठलं घातलं आणि शिजलेली दाळ टाकून त्यावर मीठ टाकलं. इकडं पूर्वेला दिवस उगवण्याच्या मार्गावर होता. अंधाराला चिरत सूर्य वर येऊ पाहत होता. मी पिटलं भाकरीवर तुटून पडलो होतो. बकाबका मी दीड भाकर खाल्ली. मायनं अजून भाकर भाजी देऊ का, असं विचारलं. पण पोट डच भरल्यानं मी नको म्हणालो. ताटातच हात धुऊन मी तांब्याभर पाणी पिलं अन् जोरात ढेकर दिला. हे पाहून माय गालातल्या गालात हसली. माझं पोट भरल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर होतं. मी ओला हात मायच्या लुगड्याला पुसला अन् अंगणात गेलो. बापू शेणानं हात भरल्यामुळे अंघोळीला गेला होता. न्हाणीच्या बाजूची चूल धगधगत होती. त्यावर मोठ्या भगोण्यात ठेवलेलं पाणी वाफ देत होतं. बापू न्हाणीतून धोतर नेसून बाहेर येताच मी अंगातलं शर्ट अन् चड्डी काढून न्हाणीत शिरलो. भडाभड अंगावर पाणी ओतू लागलो. कारण मला शाळंची तयारी करायची होती.
सूर्य चार हात वर आभाळात आला होता. बापू गायी आणि बैलं घेऊन शेताकडं पांदीनं निघाला होता. मायनं पालवात भाकरी, एका चपटलेल्या भगोण्यात पिठलं, दुसऱ्या भगोण्यात वरण घातलं होतं. हे सगळं एका मोठ्या पालवात बांधून ठेवलं. घराची झाडझुड व सडासारवण करून माय आणि वहिनीनं घर आवरण्यापासून सर्व तयारी केली. माझा शाळंचा डब्बाही तयार होता. एका पालवात माझा डबा बांधलेला होता. सकाळचे आठ-साडेआठ वाजले असतील. मी शाळंला निघेपर्यंत मायचा पाय घरातून निघत नव्हता. माझीही शाळंची तयारी झाली होती. अंगणातूनच मी यशवंत्याला आवाज दिला. 'यशवंत्या चलना बे.. गोतम्या निघालं. चल बिगीनं' असं म्हणताच यशवंत्यानं 'हे पहा निघालोच' असा होकार दिला.
भिंतीत कोरलेल्या लाकडाच्या आलमारीतून मी दप्तर काढलं. दप्तर म्हणजे काय, तर कापसाच्या बियाणाची ती पिशवी होती. त्याला मायनं चिंदकाचे दोन नाडे लावून झोऱ्या तयार केलेला. मायनं पालवात बांधलेली भाकर आणि त्यात भाकरीत घातलेलं पिठलं असा डब्बा मी झोऱ्यात भरला. 'माय मी चाललो. तू वावरात जाय' असं म्हणत मी दप्तर पाठीवर घेतलं अन यशवंत्याच्या घराकडं निघालो. तसं मायनं 'दमानं जाय बाबा.. कोणाशी भांडण करू नको' असा सल्ला दिला. 'हो' एवढंच उत्तर देऊन मी पळतच यशवत्याचं घर गाठलं. तो तयारच होऊन बसला होता. तिकडं सुधी, गोतम्या,  जयश्री पाराजवळ येऊन थांबले होते. गावातल्या लोकांचीही वावरात जायची गडबड सुरू होती. कचरू काका दुसऱ्याच्या रोजानं जायला निघाला होता. त्यानं चावटपणा करत 'शाळंतच जा रे गाभडे हो.. नाही तर माळातच फिरत बसशाल' असा टोमणा मारला. आम्ही सगळ्यांनी त्याच्याकडं डिवऱ्या नजरेनं बघितलं. पण दात काढत काका निघून गेला होता.
आम्ही चौघं हागणदारीतून शाळेच्या वाटेला लागलो. बरेच लहान पाेरं रस्त्याच्या कडेला हागत बसले होते. एक पोरगं तर रस्याच्या मधोमध बसल्यानं यशवंत्यानं त्याला  ढकललं. तसं त्यानं भेकांड पसरल. त्याचा बाप मारंल म्हणून आम्ही सगळ्यांनी धूम ठोकली. पळता पळता यशवंत्याची चप्पल भरली. तसं त्याचं तोंड आणि नाक बघण्यासारखं झालं. त्यानं जेवढी जमली तेवढी घाण दगडानं खरडून काढली. शाळा गावापासून साडेतीन ते चार किलो मीटरवर होती. रस्त्यात लागणाऱ्या पाणवठ्यावर त्यानं चप्पल धुवून घेतली. चप्पल धुतानाही त्याचं तोंड वेडवाकडं होत होतं. वास त्याच्या जणू मस्तकात जाऊन बसला होता. त्याला कसं मळमळून येत होतं. आम्ही मात्र त्याला अरे रे याचा पाय गुव्हानं भरला.. असं चिडवत होतो. त्यामुळे यशवंत्या आम्हाला खाऊ की गिळू, या नजरंनं बघत होता. आता हा आम्हाला मारणार, असा अंदाज येताच आम्ही नमते घेतले आणि जंगलातून जाणारी शाळेची वाट तुडवत मार्गस्थ झालो.

शुक्रवार, २३ मार्च, २०१८

स्वप्नांचा जन्म


माझी आई विठाबाई नरबा पाईकराव हिच्या पुण्यस्मृतींना अभिवादन करून सोशल मीडियावरील माझ्या पहिल्या ऑनलाइन लिखाणाला आज २३ मार्च, २०१८ रोजी सुरुवात करीत आहे. 

तसे पाहिले तर सोशल मीडियामध्ये व्हॉट्सअॅपपासून ते फेसबुक, ट्वीटरपर्यंत अनेक मीडिया आहेत. परंतु ब्लॉग स्वरूपातील लिखाणालाच मी प्रथम प्राधान्य देऊ इच्छितो. त्याचे कारण म्हणजे हे लिखाण मला संग्रही ठेवता येणार आहे.
गेल्या २४ वर्षांपासून मी वृत्तपत्र क्षेत्रात काम करीत आहे. प्रशिक्षणार्थी वार्ताहर, प्रशिक्षणार्थी उपसंपादक,  उपसंपादक, रिपोर्टर, चीफ रिपोर्टर असा प्रवास करीत आता मुख्य उपसंपादक या पदापर्यंत कसाबसा पोहोचलो. हा कसाबसा शब्दच मी मुळात जाणीवपूर्वक वापरत आहे. कारण मुख्य उपसंपादक पदापर्यंत पोहोचण्यासाठी मला काय काय आणि किती संघर्ष करावा लागला, हे मलाच ठाऊक. पण हा संघर्ष मी रडतपडत केला नाही. या काळात माझ्यावर अनेक संकटेही आलीत. पण त्याचा सामना मी तेवढ्याच सामर्थ्याने केला, हे मला प्रामाणिकपणे नमूद करावेसे वाटते.  आजवरचे आनंदी आयुष्य मी  आत्मविश्वासाच्या जोरावरच जगू शकलो, याचा मला आनंद वाटतो.  आज आयुष्याच्या सामन्यातील हाफ सेंच्युरीसाठी  तीन धावांची गरज आहे. अर्थात निम्म्याहून अधिक गवऱ्या मसनात गेल्या, हे तर उघड आहे. मी विविध दैनिकांत काम केले. समाजात पत्रकार म्हणून मिरवलो.  मानमरतबही मिळाला.  या क्षेत्रातील मोठा अनुभवही पाठीशी आहे. पत्रकारितेचे जीवन आणि माझे खासगी जीवन जगताना मी माझ्याच टर्म्स आणि कंडिशन्सवर जगत आलो आहे. ज्या संस्थेच्या नोकरीत मला अधिक रुची वाटली नाही ती नोकरी मी सोडत गेलो. असे करत मी आजवर पाच-सहा दैनिकांच्या नोकऱ्या सोडल्या. गेल्या सहा वर्षांपासून भास्कर समुहाच्या 'दिव्य मराठी' या वृत्तपत्रात मी काम करीत आहे. येथे अजून किती दिवस, किती वर्षे राहणार, हे माहीत नाही. 
एकूणच या क्षेत्रात काम करताना मी शेकडो माणसे जोडली. अजूनही जोडतच आहे. यातील फार तर दोन किंवा तीनच व्यक्ती माझ्यापासून दुरावल्या. त्यांची नावे सांगणे येथे मला जमणार नाही. म्हणजे सांगणे उचित ठरणार नाही. माणसं जोडणे हा माझा छंद आणि त्याही पुढे जाऊन सांगायचे झाल्यास हा माझा धंदाच आहे. इतरांप्रमाणे मला हजारो किंवा लाखो माणसं जोडताही आली नसली तरी ज्यांच्याशी माझी नाळ जुळली, ज्यांचे विचार मला पटले, माझे विचार ज्यांना पटले अशा व्यक्ती माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये येणार म्हणजे येणार. 
असो.. पत्रकारितेच्या आयुष्यावर लिहिण्यासारखे खूप सारे आहे. पण या ब्लॉगची निर्मिती करण्यामागचे माझे वेगळेच स्वप्न आहे. होय स्वप्नच. या स्वप्नांनीच आज मला लिहिते केले आहे. मला कथा, कादंबऱ्या, सिनेमा या गोष्टींची आवड आहेच. पण लिहायलाही आवडत होते. पण बातम्या लिहिण्यापलिकडे मी लिखाणाला वेळ देऊ शकलो नाही, ही आजवरची माझी सर्वात मोठी खंत. मी काही तरी लिहावे, हेच माझे स्वप्न होते. काय लिहावे, याचे उत्तरही मला माझ्या स्वप्नांनीच दिले. होय स्वप्नांनीच. प्रत्येक व्यक्तीला स्वप्ने पडतातच. काही स्वप्ने आनंददायी तर काही भयावह असतात. मी आनंददायी गटात मोडणारा असल्याने भयावह स्वप्नांना थारा देणार नाही, हे स्पष्टपणे सांगतो. मग ही आनंददायी स्वप्नेच मी आपल्याशी यापुढे शेअर करणार आहे. ही स्वप्ने झोपेत बघितलेली असोत  किंवा उघड्या डोळ्यांनी.. शेवटी स्वप्नं ही स्वप्नंच असतात. काही प्रत्यक्षात उतरतात आणि काही शेवटपर्यंत स्वप्नंच राहतात. आज माझ्या स्वप्नांनी जन्म घेतला, एवढेच सांगून थांबतो आणि पुढील पोस्टपासून माझे एक एक स्वप्न जन्माला येईल... धन्यवाद.

अंधभक्ती

देशी अप्सरांसाठी इंद्रपुरीतून खाली उतरलेल्या राजा इंद्राने पृथ्वीवरआटपाटनगरात स्थापन केलेले राज्य चांगले  सुरू होते. त्याचे  पृथ्वीतलावर आपल...