रविवार, १७ डिसेंबर, २०२३

अंधभक्ती


देशी अप्सरांसाठी इंद्रपुरीतून खाली उतरलेल्या राजा इंद्राने पृथ्वीवरआटपाटनगरात स्थापन केलेले राज्य चांगले  सुरू होते. त्याचे  पृथ्वीतलावर आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्याचे प्रयत्न सुरूच होते. आटपटनगरातील राजधानी त्याने बडनगरला हलवली होती. पण त्याचे मन तिकडे रमेना.. कारण अद्याप त्याला तिथे देशी अप्सरा मिळाल्या नव्हत्या. प्रजा तशी आनंदी होती. पण इंद्र आणि त्याचा अंधभक्त सहायक किशनला (हा स्वत पृथ्वीतलावरील सर्वात बुद्धिमान व्यक्ती समजतो)  हा आनंद बघवेना झाला. जनता इतकी खूश का आहे, सगळे बंधूभावाने कसे वागत आहेत, याचेही या दोघांना कोडे पडले. आटपाटनगरातील  जनता आपल्याविरोधात बंड तर पुकारत नाही ना? आपले महत्त्व कमीहोऊन सेनापती वरचढ तर ठरत नाही ना? असे एक नव्हे अनेक प्रश्न इंद्राला पडले. या संशयातून त्याचे आटपाटनगरातील फेरफटके वाढले. कुणी आपल्याविरोधात बंड तर केले नाही ना, याची शहानिशा करण्यास किशनला आदेशित केले. किशनला आपल्या ( नसलेल्या) बुद्धिमत्तेवर गर्व होताच. त्याने दोन दिवसांतच इंद्राला आटपाटनगरातील सद्यपरिस्थितीचा अहवाल देण्याचे मान्य केले. इंद्राच्या चुकीच्या निर्णयांचेही कट्टर समर्थन करणाऱ्या  किशनला अहवाल देण्याचे काम सोपे वाटले.  पण किशनला इंद्राच्या चाकरीशिवाय दुसऱ्या एका प्रांतातील दिवाबत्ती आणि शेतसारा वसुली अधिकारी म्हणूनही नियुक्ती मिळालेली होती. या कामासाठी किशनला बराच वेळ द्यावा लागत होता. अनेकदा दुसऱ्या प्रांतात किशनला मुक्कामी जावे लागत होते.  किशन दुसऱ्या प्रांतातील कामगिरीवर गेल्यावर इंद्राच्या आटपाटनगरातील फेऱ्या जास्तच वाढत असत. अनेकांना राजा इंद्राला राज्याची व प्रजेची खूप काळजी आहे, असे वाटत होते. मात्र गुपित वेगळेच होते. ते किशनलाही माहीत नव्हते. किशनची अर्धांगिनी (कविता) देशी अप्सरांपैकीच एक होती.  इंद्र आटपाटनगरीत येण्याची ती सारखी वाट पाहायची. त्याच्या आगमनासाठी ती प्रचंड अतुर राहत असे.  इंद्र आटपाटनगरीत आल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर जो आनंद, जे हास्य खुलायचे ते स्वर्गप्राप्तीच्याही पुढचे होते...  मात्र ही बाब आटपाटनगरातील जनतेच्या निरीक्षणातून सुटली नव्हती. मांजर कितीही डोळे मिटून दूध प्यायले तरी ते जनतेला दिसतेच, याचा विसर त्या देशी अप्सरेला पडला होता.

तिकडे दोन दिवसांऐवजी महिनाभरात किशनने अहवाल सादर केला. इंद्र खूश होईल, असाच अहवाल त्याने दिला. जनता नव्हे पण आपला सेनापतीच तुमच्याविरोधात बंड पुकारत असल्याचे त्याने अहवालात नमूद केले. इंद्र खवळला. त्या सेनापतीला पदावरून कसे दूर करायचे, असा विचार इंद्राच्या मनात आला. पण सेनापती काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता.  जनताही राजाइतकीच सेनापतीलाही मानायची.  सेनापतीचा शब्दही पाळला जायचा. त्यामुळे सेनापतीला सहज पदावरून दूर करणे इंद्रासाठी तेवढे सोपे नव्हते. तसे केले तर प्रजेची नाराजी पत्करावी लागली असती. तसेही सेनापतीची नियुक्ती दिल्ली दरबारातून झालेली होती. अशा स्थितीत सेनापतीला हटवणे सोपे नव्हतेच. पण सेनापती स्वत:हून पद सोडेल, असे काही तरी केले पाहिजे, असा विचार इंद्राने केला. यासाठी मानसिक त्रास देण्याचे अस्त्र तो चालवू लागला. चालताबोलता अपमानित करून सेनापतीला आटपाटनगरी सोडायला भाग पाडायचे, असे इंद्राने किशनच्या मदतीने ठरवले. दरबार भरल्यानंतर स्वत: केलेल्या चुका इंद्र सेनापतीवर थोपवू लागला. किशन अंधभक्तीतून त्याला जोरदार समर्थन करू लागला. तर इंद्राची दासी जनतेत सेनापतीविषयी अफवा पसरवू लागली.  स्वत:च्या चैन-विलासासाठी आटपाटनगरातून मिळणारा महसूल तिजोरीत जमा न करता त्याची परस्पर विल्हेवाट लावण्याचे काम इंद्राने अनेकदा केले. पण त्याचे खापरही सेनापतीवर फोडण्याचे षडयंत्र त्याने रचले. दरबारातील काही लोकांना यासाठी हाताशी धरले.  दरबारातील काल्पनिक कथा बाहेर सांगण्याचे काम दासीवर सोपवलेले होते.  मात्र, आपल्याविरोधात षडयंत्र रचले गेलेय, याची जाणीव सेनापतीला कधीच झाली होतीङ  सेनापतीही तितकाच ताकदवान. सेनापतीचा भर दरबारात अपमान करूनही तो काही पदावरून हटायला तयार नव्हता. शेवटी त्यालाही प्रजेची काळजी होती. इंद्र फक्त स्वत:च्या फायद्यासाठी आणि विलासासाठीच इंद्रपुरीतून खाली आला, हे सेनापतीला पक्के माहीत होते. त्यामुळे इंद्राचे मनसुबे खरे होण्यात अडचणी येऊ लागल्या.   

इकडे पृथ्वीतलावर तंत्रज्ञानाने मोठी झेप घेतली होती. चोरी, दरोडे, खून अशा घटनांची उकल करण्यासाठी जनता आणि सुरक्षा यंत्रणांना तंत्रज्ञानरूपी एका तिसऱ्या डोळ्याची मोठीच मदत होत होती. इंद्राच्या आटपाटनगरीतही हे तंत्रज्ञान पोहोचले होते.  या तिसऱ्या डोळ्यामुळे मात्र त्याच्या विलास आणि प्रणयात बाधा येण्याची भीती निर्माण झाली. यापूर्वी इंद्राने हे तंत्रज्ञानच आटपाटनगरीत पोहोचू नये, यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. पण जनतेच्या प्रबळ इच्छेसमोर इंद्राला नाइलाजाने हे तंत्रज्ञान आटपाटनगरीत लागू करावे लागले. मात्र, आपल्या परवानगीशिवाय हे या तंत्रज्ञानाचा वापर करता कामा नये, असा आदेश दरबारात मांडून तो पारित करून घेतला. 

इंद्राने दरबारात तंत्रज्ञानावर मर्यादा आणण्याचा घेतलेला निर्णय जनतेला कळाला आणि कानोकानी गप्पा सुरू झाल्या. मांजरीने अनेक वेळा डोळे मिटून दूध प्यायल्याचे जनतेने उघड्या डाेळ्यांनी बघितले होतेच. पण इंद्र आणि त्या मांजरीला याची खबर नव्हती. पण लपून दूध पिण्याचे कारस्थान हा तिसरा डोळा बघतच होता. इंद्र आटपाटनगरीत आल्यानंतर देशी अप्सरा उर्फ मांजरीला आवर्जून भेटत असे.  शिवाय अधूनमधून  तिच्या मैत्रिणीसह दासीलाही भेटल्याशिवाय कधीच बडनगरला परतत नव्हता. पण या भेटीगाठी जनतेला पुरावा स्वरूपात मिळू नये, याची खबरदारी म्हणून इंद्राने तो तिसरा डोळा इतरांनी बघूच नये, यासाठी मर्यादा आणल्या. इंद्राला आणि त्याच्या अंधभक्ताला तिसऱ्या डोळ्याची भीती का वाटते, हे किंबहुना सर्वांनाच कळून चुकले होते. पण किशन या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ होता. फक्त इंद्र म्हणतो म्हणून त्याचा या तिसऱ्या डोळ्याला विरोध होता.  या तंत्रज्ञानाचे फायदे कमी आणि तोटे कसे जास्त आहेत, हे किशनच्या अंधभक्तीने ग्रासलेल्या मनावर बिंबवण्यात इंद्राला आधीच यश आले होते. वास्तविक इंद्राने किशनच्या अंधभक्तीचा पूर्वीही लाभ घेतला होता आणि तो बडनगरला गेल्यानंतरही अधूनमधून घेणे सुरूच होते.  पण अंधभक्तीची पट्टी डोळ्यांवर बांधल्याने त्याला काहीच दिसत नव्हते. इंद्र सेनापतीचा तिरस्कार करतो म्हणून किशनही सेनापतीचा तिरस्कार करू लागला. पण यात एकट्या इंद्राचेच सर्व बाजूंनी फावत होते, हे किशनच नव्हे तर दरबाऱ्यांच्या लक्षातही येत नव्हते.  . 


मोरल ऑफ द स्टोरी : अंधभक्ती ही काही काळापुरतीच लाभदायक असते. पण सर्वकाळ त्यामुळे तोटाच होतो. म्हणून डोळसपणे जगाकडे बघितले पाहिजे.  



शनिवार, ८ जुलै, २०२३

गलिच्छ राजकारण

 सध्या राजकारणाने सर्व पातळ्या ओलांडल्या आहेत. नैतिकच नव्हे तर सामाजिक पातळीवरही राजकारणाचा स्तर घसरला आहे. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत गलिच्छ राजकारणाची प्रचिती सर्वांनाच येत आहे.  असे नैतिकता गमावलेले राजकारणी उजळमाथ्याने नैतिकचे पाठ पढवताना दिसत आहेत. यांना ईश्वर, अल्ला, देव यांची भीती तर नाहीच, पण जो मतदार आपल्याला मते देऊन आपले भाग्य  घडवतो, त्यांच्याशी बेइमाने करण्याचे धाडसही त्यांच्या अंगी आले आहे. काही राजकारण्यांच्या नैतिकतेचे इतके पतन झाले की ते सत्तेसाठी काहीही करू शकतात. आपल्या घरची इभ्रत वेशीवर टांगण्यासही कचरत नाहीत. समाजात ही भिणलेली घाण कसी साफ करायची, याचे उत्तर सध्या तरी कोणाकडेच नाही. 

एक उदाहरण सांगतो. लोकांना नैतिकतेचे पाठ शिकवण्याचा ठेका एका ठेकेदाराने स्वत:हून घेतला. काही लोक त्याचे ऐकतात, तर काही ऐकून सोडून देतात. फक्त या ठेकेदाराचे वय इतरांपेक्षा अधिक म्हणून त्याच्या वयाचा मान ठेवून लोक त्याचे ऐकून घेतात. पण या ठेकेदाराला लोक आपले ऐकतात, असा मोठाच गैरसमज झालेला. आयती लेकुरवाळी महिला घरात आणून ठेवत ती पत्नी असल्याचे तो सांगत आहे, असे त्याच्याच गटातल्या एका महिलेने हा भंडाफोड केला. ही वार्ता तिने कानोकानी पसरवली. विरोधी पक्षाच्याही हाती ही बातमी लगल्याचे ठेकेदाराला कळाले. त्याचे तोंड बंद करण्यासाठी  विरोधीपक्षाचा नेता माझ्या खिडकीपर्यंत पोहोचला. तो माझ्या घरात डोकावून पाहत आहेत. अशा स्वरूपाचे खालच्या स्तराचे आरोप तो करत सुटला. हाही वार खाली गेला तर तो त्याही पुढे जाऊन अमूक व्यक्तीने माझ्या बायकोचा विनयभंग केला, असा आरोप करायलाही तो मागे-पुढे पाहणार नाही. आरोप काय करावेत, हेही या ठेकेदाराला कळले नाही. 

असे हे गल्लीतील राजकारणच दिल्ली असो वा मुंबई सगळीकडेच दिसून येते. काही ठिकाणी आरोपांची पद्धत बदलते. कोणी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करतो तर कुणी काही.   राजकारण करताना या लबाडांकडून अनेक थोरांची नावे घेतली जातात. काही आम्ही धार्मिक असल्याचेही भासवतात. कोणी नमाज अदा करणारे तर कोणी देवळात घंटा वाजवणारे. विकासाचे राजकारण सोडून विरोधकांचे हाल कसे होतील, याचे मनसुबे आखण्याचे काम हे गलिच्छ राजकारणी २४ तास करतात. त्यांची सर्व ऊर्जा असाच विचार करण्यात क्षीण होते. लोकांच्या प्रश्नांकडे बघायला, सोडवायला वेळ अजिबात नसतो. शेवटी मराठीत म्हणच आहे, 'रिकामे डोके, सैतानाचे घर.' 

बुधवार, २८ जून, २०२३

बुवा तेथे बाया


 देवभोळ्या लोकांचा, भाबड्यांचा आणि मूर्खांचा फायदा कसा उठवायचा या कलेत अनेक जण निपुण आहेत. हे कलाकार अलगद लोकांना ठगवतात. गुण गायीचे अन वाण कसायाचे या वृत्तीचे हे लोक असतात. आपल्या अवतीभोवती असे नमुने आढळून येतात. आचार्य अत्रे यांनी 'बुवा तिथे बाया' ही अजरामर नाटक 50 वर्षापूर्वी लिहिले आहे. यातील बुवा किती चतुराईनेे बाया बापड्यांना आपल्या जाळ्यात ओढतो याचे सुंदर वर्णन या नाटकात आहे. 

पन्नास वर्षानंतरही हे लिखाण आजही अनेकांना जसेच्‍या तसे लागू पडते. त्‍याच पद्धतीने गंडवणारे, लोकांना फसवणारे, त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेणारे, वाण गायीचे अन गुण खाटकाचे असलेले बाबा, बुवा, भय्या, काका, दादा यांच्या रूपात आजही अस्तित्‍त्‍वात आहेत. लोकही त्‍यांच्‍यावर अंधपणे विश्‍वास ठेवतात . विजय चव्हाण, प्रदीप पटवर्धन, किशोरी अंबिये, जगन्नाथ लवंगारे या कलावंतांनी हे नाटक मंचावर आणून ते अजरामर ठरवले.

आज हे आठवण्याचे कारण म्हणजे अशाच एका बुवाला मी जवळून बघतोय. आपल्या गोड बोलण्यातून तो बाया बापड्यांना सहज गंडवू शकतो. 'मी नाही त्यातली, कडी...' या पठडीतल्या बाया आणि स्वतःच्या बुद्धीचा कधीच वापर करायचाच नाही, अशी शपथ घेतलेले बापडे बेमालुमपणे त्याच्या प्रभावाखाली येतात. हा बुवा घरातून बाहेर पडला की त्याच्याभोवती पाच-सहा बायाबापडे फिरतात. आपले बुद्धिचातुर्य आणि गोड बोलून हा बुवा त्यांच्याकडून नकळत आपले इप्सित साधून घेतो. हा बुवा तसा घरंदाज वगैरे नसला तरी त्याच्या राहणीमानाचाही या बाया-बापड्यांवर प्रचंड प्रभाव पडतो. वैवाहिक जीवनात पुरता अपयशी ठरलेला हा बुवा स्वत:ला व्यावसायिक जीवनात यशस्वी आहोत, हे पटवून देण्यात मात्र यशस्वी ठरला. बरं व्यवसायही कोणता तर आठ आण्याची वस्तू घेऊन बारा आण्यांना विकायची. अशा या स्वयंघोषित लक्षाधिशाच्या  हॉलपर्यंतचा प्रवास त्याच्या बेडरूमपर्यंत कधी पोहोचला हे एका बयेला तर कळलेच नाही. या बुवाला बापडे नसले तरी चालेल पण बाया अवतीभोवती लागतातच. तसं बघितलं तर हा बुवा या बायांना बहीण म्हणून बोलावतो. पण हे त्याचे बाहेरचे संबोधन. घराच्या आत नाते बदलून जाते. 

हा बुवा नुसता दांभिकच नव्हे तर तितकाच कपटीही आहे, हे मात्र अजून या बायाबापड्यांना कळालेले नाही. दुसऱ्यांचा फायदा आपल्या स्वार्थासाठी कसा करून घ्यायचा, याचे कसब या  कसाबच्या अंगी चांगलेलच आहे. मुळात तोकडे ज्ञान असलेला हा प्राणी केवळ वक्त्तृवाच्या बळावर खोटंही खरं असल्याचे सिद्ध करू शकतो.  कुणाला राम ठरवायचे आणि कुणाला रावण, अशा डावपेचातही हा गडी तरबेज. त्याच्या कटकारस्थानांची पोलखोल करू पाहणाऱ्यांना कुठे कसे बदनाम करता येईल, याचे ए आणि बी प्लॅन त्याच्याकडे तयार असतात. या योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी स्वीकारायला एक बापडी २४ तास सज्जच असते. 

मंडळी सांगायचे तात्पर्य असे की, लोकांच्या भोळेपणाचा फायदा घेत स्वत:चा स्वार्थ साधणाऱ्यांचे पितळ कधी ना कधी उघडे पडतेच. त्यांचा बुरखा कधी ना कधी फाटतोच, जसा बुवा तिथे बायामधील दांभिक बुवाचा फाटला. अनेकांच्या आजूबाजूला असे बुवा वावरत असतात. खरी गरज आहे ती त्यांना ओळखण्याची आणि वेळीच बायाबापड्यांनी सावध होण्याची...

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२

आम्ही सगळे फुकटे..

भारतात सल्ले  फुकट दिले जातात. देणाऱ्यांची संख्याही विपुल आहे. पण आपला भारत नुसत्या सल्ल्यावरच नाही. इथं बऱ्याच गोष्टी फुकट मिळतात आणि त्याचे लाभार्थीही असंख्य आहेत. 

आता फुकट विषयावर मी फुकटपणे का लिहितोय याचे संदर्भ मात्र वेगळे आहेत. हे लिहिण्यामागील कारण म्हणजे मी काही वर्षांपूर्वी द. मा. मिरासदार यांचा "फुकट" हा कथासंग्रह वाचला होता. राम गणेश गडकरी, श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर, पु. ल. देशपांडे यांचा विनोदी लेखनाचा वारसा जोपसणारे द. मा. आपल्यात नाहीत. पण त्यांचे साहित्य अजरामर झाले आहे. मिरासदारांचा "फुकट" हा कथासंग्रह मला प्रामुख्याने भावलेला. आता प्रामाणिकपणेच सांगतो की, मी हा कथासंग्रह फुकटच वाचला. अर्थात पैसे न मोजता! एक मित्र पदरचे पैसे खर्चून पुस्तके खरेदी करताे आणि वाचनाचा छंद भागवताे. तो तंगीतही पैसे खर्च करून पुस्तके विकत घेतो.. म्हणजे त्याचा व्यासंग अफाटच म्हणायचा. पण  माझ्यासारख्या फुकट्याने त्यांच्याकडून हे पुस्तक फुकट वाचायला घ्यावे, याला काय म्हणायचे.. पण या फुकटच्या माळेतला मी एकटाच मणी नाही. माझ्यासारखे शेकडो, हजारो, लाखो लोक आपली वाचनाची हौस अशीच भागवतात. मी एकटाच या जगात फुकट्या नाही.. हा विचारच मनाला समाधान देऊन जातो. पण एक गोष्ट तेवढ्याच प्रामाणिकपणे सांगतो, मी पुस्तके फुकट वाचत असलो तरी तेवढीच विकतही घेतो आणि दुसऱ्यांनाही फुकट वाचायला देतो. त्यामुळे वाचन चळवळीत माझा फुकटचा वाटा तसा मोठाच म्हणा..

तर हा फुकटचा प्रपंच पुढे नेऊ या... 

या फुकटच्या प्रपंचाला आज द. मा. मिरासदारांची आठवण कारणीभूत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १९२७ मध्ये जन्मेले द. मा. मिरासदार आपल्याला ऑक्टोबर २०२१ म्हणजे दहाच महिन्यांपूर्वी सोडून गेले. त्यांची साहित्य संपदा खूप मोठी असली तरी फुकट हा कथासंग्रह माझ्या लक्षात राहिला. तोही मी फुकट वाचला म्हणून... या देशाला फुकट्यांची मोठी परंपरा आहे. आम्ही ज्या स्वातंत्र्यात राहतो तेही आम्हाला आमच्या स्वातंत्र्यसेनानींनी फुकटच दिले आहे. निसर्गानेही सर्व गोष्टी आम्हाला फुकटच दिल्यात. एवढेच काय तर पाच-पन्नास लोकांना डोंगुर, झाडी, हाटीलही फुकटच मिळते. देवा शपथ खरं सांगतो, फुकट हा शब्द ऐकूनच मनाला किती हायसं वाटते. काहीही फुकट मिळाले की ते ओरबडल्याशिवाय कोण राहतो?  

आता फुकटाचं एक उदाहरण सांगतो... माझा एक नातलग आहे. (अगदी जवळचा) त्याचे वडील नोकरीत होते. त्यांना नोकरीतून घरी वेळच देता येत नव्हता.  हा गडी त्यांचा ज्येष्ठ चिरंजीव आणि एकुलता एक. आईनेही लाड केले. हा लाडोबा कसाबसा शिकला. नाही शिकला म्हणून नोकरीपासून हुकला. घरी सर्वच सुविधा मिळत असल्याने जीवन अगदी आरामात जगू लागला. पण पाेरगा कामधंदा करत नाही, याची आईवडिलांना सल होती. बायको आल्यावर हा कामधंदा करेल, म्हणून त्याचे लग्नही उरकले. रात्री सज्जा आणि दिवसभर मज्जा, असेच सुरू राहिले. बाप नोकरीतून निवृत्त झाला. ज्येष्ठ चिरंजीव आता तरी काम करतील, या त्यांच्या अपेक्षेची या चिरंजीवांनी उपेक्षाच केली. हे चिरंजीव, त्याची तीन लेकरं, सून आणि आपली पत्नी अशा सात जणांच्या संसाराचा गाडा हा थकलेला बाप निवृत्तीवेतनावर आजही ओढत आहे. चिरंजीवाला लागलेल्या फुकटच्या सर्व सवयी आजही कायमच आहेत...

हिंदीत एक म्हण आहे, "मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन." या म्हणीची तुम्हाला जागोजाग प्रचिती येईल. रेल्वे आणि बसमध्ये अनेक जण फुकट प्रवास करतात.  मित्राच्या पार्टीत फुकट खायला मिळाल्यावर पोट फुटेपर्यंत खाल्ले जाते.  लग्न समारंभात नवरदेव नाही तर नवरीचे नातलग बनून जाणारे आणि तेथे फुकटात येथेच्छ ताव मारणारे हजारोंच्या संख्येने आहेत. एवढेच काय तर एखाद्याची गाडी म्हणजे कार म्हणा की बाईक पेट्रोल न टाकता वापरावयास मिळाली तर त्याचा आनंद मानणारे महाभागही कमी नाहीत. त्याचप्रमाणे दुसऱ्यांनी निर्माण केलेल्या संसाधनांचा, सुविधांचा, वास्तूंचा फुकट वापर करणारेही बरेच आहेत. तुम्ही अशी उदाहरणे शोधली तरी एक दोन नव्हे तर शेकडो उदारहणे सापडतील. तुम्ही राहत असलेल्या सोसायटी किंवा नगरातही अशी उदाहरणे दिसतील. 

मराठीत एक म्हण आहे, "आयजीच्या जिवावर बायजी उदार'. या म्हणीतील बायजी हे नेहमीच आयजींच्या  ताकदीवर, त्यांच्या पैशांवर, त्यांच्या संपत्तीवर, प्रतिष्ठेवर उड्या मारत असतात. आयजींनी आपल्या बुद्धीने, श्रीमाने हे मिळवलेले असते. त्यासाठी त्यांना आपला पैसाही ओतावा लागलेला असतो. पण बायजी हे सर्व माझंच, असे सांगायला थोडंही लाजत नाही. याचाच अर्थ असा की हा बायजी फुकट्याच असतो.. माझ्या बघण्यात असे बरेच बायजी आहेत. त्यांना फक्त स्वार्थ साधायचा असतो. परमार्थाशी तर यांचा दूरपर्यंत संबंध दिसत नाही. आयत्या पिठावर रेघोट्या मारण्यात ते नेहमीच सज्ज असतात. भारतात दिल्लीपासून ते शहरातील सोसायट्यांपर्यंत अशा आयजींचा राबता आहे. त्यांना सर्व काही फुकट हवे असते. आपला पैसा दडवून ठेवत दुसऱ्यांच्या पैशांवर मौज करायची असते. दुसऱ्यांच्या सुविधांचा लाभ घेताना हे बायजी बनतात. निर्लज्जपणे आणि उजळमाथ्याने देशभरात आणि शहरात वावरतात. अशा फुकट्यांना निर्लज्ज असेही म्हणता येईल. माझ्यासारखे फुकटे अगदी गल्लोगल्ली आणि सोसायट्यांतही आहेत बरं का!
.. समाप्त...

वैधानिक इशारा : फुकटाची सवय नसलेल्यांनी मनाला लावून घेण्याची गरज नाही. 

चला तर तुमचं फुकट विषयावर आणखी मनोरंजन..

पुढील लिंक कॉपी करून जरूर बघा...

https://www.youtube.com/watch?v=vJT_3OU2D3I

https://www.youtube.com/watch?v=eGq7Hnn8voc

शनिवार, १९ जून, २०२१

चाचा नेहरू तुम्ही चुकलात!


www.molitics.in च्या सौजन्यानेॅ

आज भारतात बेरोजगारी, गरिबी, महामारी अशा एक नव्हे तर डझनभर समस्या उभ्या आहेत. देशाची आर्थिक स्थिती ढबघाईला आली आहे. जीडीपी गटांगळ्या खात आहे. या सर्व परिस्थितीला चाचा नेहरू तुम्हाला आणि तुमच्या काँग्रेसला का जबाबदार धरू नये? स्वातंत्र्योतर भारताच्या निर्मितीत तुम्ही खूप मोलाचं योगदान दिलं, हे आम्ही पुस्तकांतून वाचलं. तुमचाच पक्ष असलेल्या काँग्रेसनं ७० वर्षे सत्ता उभोगली. तुम्ही आणि काँग्रेसच्या पुढच्या सर्व सरकारांनी देशात मोठमोठे हॉस्पिटल उभारले, आयआयटी, एम्स, विमानतळं, बंदरं, डोंगर-दऱ्यांतून लांबच लांब रस्तेही बनवले. तुमचे ‘व्हिजन’ खूप चांगले होते, असेही आम्ही ऐकले, वाचले. तरीही चाचा तुम्ही चुकलातच.  तुमच्या ‘व्हिजन’मध्ये २०१४ नंतरच्या भारतातील प्रगतीचा ‘मॅप’ नव्हताच. तुम्ही फक्त तुमच्या सत्ता काळापुरताच विचार केला. तुम्ही आणि तुमची काँग्रेस जोपर्यंत सत्तेत होती तितक्याच काळासाठी विकास करायचा, असं कुठं असतं का. आजच्या पिढीसाठी तुमचे एम्स, आयआयटी, एनडीए, विमानतळं काय कामाची. यातून आम्हाला ‘विवेक’ मिळालाच नाही.  

तुमचा कुचकामी विकास पाहूनच आम्ही आमचा आधुनिक उद्धारकर्ता सत्तेत आणला. 

चाचा जी, इंदिरा जी, राजीव जी आणि त्या नंतरच्या सर्व काँग्रेसी सरकारांनी या ७० वर्षे केलेला विकास आज काय कामाचा? भावी पिढीसाठी तुम्ही काय कमावून ठेवलं? आज आम्हाला हॉस्पिटलमध्ये गेलो तर ऑक्सिजन मिळत नाहीत. बेड मिळत नाहीत. रेमडेसिविर नावाचं इंजेक्शनही मिळत नाही. काय चाटायचीत का तुमची एम्स, हॉस्पिटलं आणि गावखेड्यापर्यंत बांधलेली आरोग्य केंद्रे न रुग्णालये! चाचा जी तुम्ही आणि तुमच्या काँग्रेसनं अशा टोलेजंग इमारतींवर पैसा व्यर्थ घालावला. तुम्ही ‘विकासा’च्या नावावर, जगद्गुरू बनण्याची स्वप्न दाखवून आमची मनं प्रसन्न ठेवली असती तरी आमचा आज श्वास गुदमरला नसता. आज धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचीही आम्हाला भीती वाटली नसती. तसं पाहिलं तर आमच्या बापजादांनीच चूक केली. ते  ७० वर्षांपासून तुमच्या काँग्रेसला मतदान करत होते. तुम्ही केलेल्या तोकड्या विकासावर ते समाधानी होते. तुम्ही मर्यादित स्वरूपातच देशाचा विकास केला, हा माझा दुसरा आरोप. देशभरात रुग्णालयांचे जाळे निर्माण करताना तुमच्या दूरदृष्टीला आज कोरोना कसा दिसला नसेल? तुम्ही त्याच वेळी भारतातील सर्व जनता भरती होऊ शकेल अशी रुग्णालये का उभारली नाहीत. पुरून उरेल एवढ्या ऑक्सिजनची निर्मितीचे प्लांट का उभारले नाहीत?  तुमच्या या विकासावर आम्ही कायम असमाधानी राहिलो, 

म्हणूनच आम्ही आमचा आधुनिक उद्धारकर्ता सत्तेत आणला. 

इंदिरा गांधीना आपले शत्रू राष्ट्र असलेल्या पाकिस्तानचे दोन तुकडे करत बांग्लादेश निर्माण करून अशी मोठी जखम देण्याची कायच गरज होती? पाकिस्तानसोबत युद्ध करण्याचीही काही गरज नव्हती. हा पराक्रम आमच्या काय उपयोगी? आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही पाकिस्तानचे इतके सैनिक मारले, तितके अतिरेकी खल्लास केले, अशी ओरड केली असती तरी आम्ही आज आहोत तितकेच आनंदी राहिलो नसतो का? उगीच युद्धावर पैसा आणि आमच्या सैनिकांचे बलिदान व्यर्थ घालवले. १९७४ मध्ये पोखरणला अणुचाचणीची काय गरज होती. नुसती ‘आम्ही शत्रूंना घरात घुसून मारू’ अशी गर्जना केली असती तरी ती पुरेशी होती. आर्थिक समानतेला चालना देण्यासाठी १९६९ मध्ये भारतातील प्रमुख १४ बँकांचे राष्ट्रीयकरण करण्याची काय गरज होती. खासगी मालकीच्या या बँकांनी सामाजिक हिताऐवजी स्वत:चे हित साधले असते तरी आमच्या बाजजाद्यांनी तुम्हाला नाही म्हटलेच नसते. तुम्हाला सामाजिक हितासाठी या बँकांच्या विलिनीकरणाची गरजच का जाणवली? कदाचित यात तुमचाच काही स्वार्थ होता, असा आमचा समज आहे. 

म्हणूनच आम्ही आमचा आधुनिक उद्धारकर्ता सत्तेत आणला. 

राजीव गांधींनी २१ व्या शतकातील आधुनिक भारताची स्वप्नं देशवासीयांना का दाखवली.  त्यांनी पंतप्रधान असताना माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासाची योजना का आखली. आम्ही आज आनंदानं सर्व तंत्रज्ञान, यंत्र सामुग्री, मोबाइल, लॅपटॉप, मोठमोठ्या यंत्रांचा वापर भलेही करत असू, पण त्यामुळे देशाचं काही अडणार थोडीच होतं. राजीव गांधींनी दिलेल्या वैज्ञानिक दृष्टीचा आम्हाला काय लाभ झाला? आम्ही आजही आमच्या अंधश्रद्धा पाळून आनंदी आहोतच ना! भारतात विदेशी गुंतवणुकीला चालना, पंचायत राजमध्ये ‘पावर टू द पीपल’, सत्तेचे विकेंद्रीकरण असे जनमाणसाच्या हिताची उदारमतवादी धोरणं राबवली असली तरी आमच्या पिढीला त्याच्याशी काय? आम्ही हाती पैसा आणि सत्ता नसतानाही आनंदी आहोतच ना! 

म्हणूनच आम्ही आमचा आधुनिक उद्धारकर्ता सत्तेत आणला. 

खरं सांगू चाचा जी... भारताच्या स्वांतत्र्यानंतरचा ९० टक्के विकास हा काँग्रेसने केला, असं आम्ही वाचलं, ऐकलं. पण मला तर यावर अजिबात विश्वास नाही. चाचा जी तुमच्या पक्षाची २०१४ मध्ये सत्ता गेल्यानंतर संपूर्ण भारतवासी किती आनंदी आहेत, हे तुम्हाला आता केसे सांगू. सिकंदर जसा जग जिंकायला निघाला तसा आमचा नेता जगाची मनं जिकायला निघाला आहे. आम्हाला तुमच्या काळात जशी युद्ध लढली गेली तशी युद्ध लढायची गरजच नाही. ‘आमच्या नेत्यानं सांगितलं आणि आम्ही ऐकलं’ असाच आम्ही परिपाठ सुरू ठेवलाय. आम्हाला खरं काय नि खोटं काय, समजून घेण्यात काहीच स्वारस्य नाही. उगीच का यात ‘एनर्जी’ वाया घालवायची. दोन जातींमध्ये भांडणं लावण्याचा आनंदच काही औरच असतो. आनंदापेक्षा जगात मोठे काय आहे, सांगाना चाचा जी? संत, महात्म्यांनी समस्त जगाला आनंदी राहण्याचा संदेश दिला. जो आनंदी आहे तो सुखी आहे, हे संतांनी सांगितलं सूत्र तपासलं तर आज आम्ही सुखी आहोत, हा माझा दावा आहे. कारण चाचा जी... आमच्या पिढीवर कशाचा काहीच परिणाम नाही. देशाची अर्थव्यवस्था बुडाली काय आणि उभरली आहे, याचं आम्हाला काहीच देणं-घेणं नाही. आम्ही नुसता विकास शब्द कानी पडला तरी प्रचंड ‘आनंदी’ होतो. भारत जगाचं नेतृत्व करीत आहे, असे चित्र तरळून जातं. चाचा जी.. असं आनंदी राहणाऱ्यांची संख्या अधिक आहे बरं का! आज कोरोना-बिरोनाला जुमानत नाही. आम्ही गोमुत्र पिलं  आणि अंगाला शेण माखलं तरी आमचे आजार १०० टक्के पळून जातात. चाचा जी अशा वेळी तुम्ही आणि तुमच्या काँग्रेसनं उभारलेली रुग्णालयं काय कामाची? आमचं नेतृत्व आम्हाला देवाचा, धर्माचा आणि जातीचा कधीच विसर पडू देत नाही. त्यामुळं आम्ही आनंदी आणि सुखीच आहोत. तुम्ही विकास केला असेल किंवा नसेल ते माहीत नाही. पण आमची पिढी प्रचंड आशावादी आहे. आज आम्हाला नुसता ‘विकास’ शब्द ऐकला तरी आमचा आनंद गगनात मावेनासा होतो.  चाचा जी कुणी तुम्हाला शिव्या दिल्या तरी आम्हाला आनंदाची प्राप्ती होते.  असा आनंद लुण्यासाठीच ....

आम्ही आमचा आधुनिक उद्धारकर्ता सत्तेत आणला. 

आमचे अजोबा, वडील शिकून मोठा हो, असं म्हणायचे. पण आम्हाला या शिक्षणाचा उपयोग तो काय? न शिकता ही आमचं नेतृत्व आम्हाला आत्मनिर्भर बनवत आहे. नाल्याच्या गॅसवर स्वयंपाकाचं तंत्र आम्ही येथेच शिकलो ते ही कोणत्याही विद्यापीठाची डिग्री न घेता. कोणतीही डिग्री न घेता आम्ही देशाच्या सर्वोच्च पदावरही जाऊ शकतो, हे ही आम्हाला कळून चुकले. तेव्हा आमच्या बापजाद्यांनी शिकून मोठं होण्याचा सल्ला दिलाच कसा? यावर मंथन व्हायला नको का? काही शिकलेल्या लोकांच्या मते आम्ही २०१४ नंतर दारिद्र्याच्या गर्तेत ढकलले जात आहोत. आजच्या शिकलेल्या पिढीकडे चांगले-वाईट जाणून घेण्याची बुद्धी नाही वगैरे वगैरे आक्षेप येत आहेत. आम्ही पकौडे विकून आत्मनिर्भर होऊन आनंदी होत असू तर तर शिकण्याची गरज ती काय? हे सगळे आक्षेप निखालस चुकीचे आहेम. मला तर वाटते काही मूठभर लोकांचा आमच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा हा डावच आहे, असं माझं मत आहे. आम्ही आमच्या बुद्धीनुसारच ना भूतो न भविष्यती अशा प्रचंड बहुमतावर आम्ही आमचा उद्धारकर्ता निवडला. आम्ही आनंदी आहोत, यातच सर्व सौख्य सामावलेलं आहे. अशा स्थिती हे आक्षेप आपोआपच खोटे ठरतात, नाही का? लोकशाहीत जे बहुमत तेच सत्य असते ना. मग यांना आमच्या बुद्धीवर शंका घेण्याचा अधिकारच नाही. पेट्रोल महागलं, जीडीपी तळाला गेला, बेरोजगारी वाढली, कोरोनात उपाययोजना केल्या नाहीत, हुकमी पद्धतीनं राज्यकारभार चालवला जातो, यांना फक्त सत्तेची लालसा आहे, असे अनेक आरोप होत असले तरी आम्ही बहुमतानं निवडलेलं सरकार चुकीचं असू शकतं. ‘विकास’ हा इतका चमत्कारी शब्द आम्हाला आमच्या नेतृत्वानं दिला. या शब्दामुळं आमच्या दु:खांचे हरण होतेय. चाचा जी तुमच्या नि तुमच्या काँग्रेसने ७० वर्षांत केलेल्या भारताच्या ९० टक्के विकासानंतरही आम्हाला आनंद मिळाला नाही. पण गेल्या सात-अाठ वर्षांत मिळणाऱ्या आनंदाच्या अनुभूतीमुळं आम्ही धन्य झालो आहोत. २०१४ ते २०२० या काळात आम्हाला याच आनंदाची चटक लागली. म्हणूनच  दुसऱ्यांदा...

आम्ही आमचा आधुनिक उद्धारकर्ता सत्तेत आणला.   



रविवार, २ मे, २०२१

वाघीण आणि कुत्रे

 छायाचित्र सौजन्य : https://barkpost.com/discover/gsd-tigers/


एका जंगलात एक वाघिणीची सत्ता होती. जंगलात लोकशाही असल्याने पंचवार्षिक निवडणूक लागली होती. जंगलावर वाघाची किंवा सिंहाची सत्ता असती तर एक वेळ चालेल पण वाघीण आपल्यावर सत्ता गाजवते म्हणजे काय, असा एक विचार एका शु-भोंदू नामक लांडग्याच्या स्वार्थी मनाला चाटून गेला. त्याने वाघिणीशी गद्दारी करत तिची सत्ता उलथून लावण्याचा विडा उचलला. यासाठी तो इतर जंगलातील लांडग्यांना जाऊन भेटला व त्यांची मदत घेण्याचे ठरवले. भोंदू लांडग्याच्या मदतीला दोन मोठे लांडगे सर्व शक्तिनिशी धावून गेले. दोन मोठ्या लांडग्यांनी काही कुत्रेही आपल्यासोबत नेले. या कुत्र्यांवर वाघीण ज्या मार्गाने जाईल त्या मार्गावर 'जय जंगलराज' अशी घोषणा देण्याचे काम सोपवले गेले. कुत्रे इमानेइतबारे आपले काम चोख बजावू लागले. वाघीण दिसली रे दिसली की 'जय जंगलराज' अशा घोषणा निनादू लागल्या. इकदा तर घोषणाबाजी करत या कुत्र्यांनी अचानक वाघिणीवर हल्लाही केला. शेवटी कुत्रेच ते.. त्यांना काही वाघिणीच्या नरडीचा घोट घेता नाही आला. तिच्या पायाला चावून कुत्रे पसार झाले.  वाघिणीचा पाय जायबंदी झाला. याचा फायदा घेत ते दोन मोठे लांडगे वाघिणीची सत्ता असलेल्या जंगलात पाय रोवून बसले. जंगलातील प्राण्यांना वाघिणीचा राज्य कारभार कसा अन्यायी आहे, किती भ्रष्टाचारी आहे हे पटवून देऊ लागले. पण आपल्या जंगल संभांना हजर राहण्यास या जंगलातील इतर प्राणी फारसे उत्सुक नाहीत हे पाहून दोन लांडग्यांनी आपल्या स्वत.च्या जंगलातील प्राणी या जंगलात घुसवले. यातही बहुतांश लांडगे आणि कुत्र्यांचा समावेश अधिक होता. आता मात्र त्या दोन मोठ्या लांडग्यांच्या सभांना गर्दी दिसू लागली होती. ही गर्दी पाहून वाघिणीच्या जंगलातील काही प्राणीही सभांना हजेरी लावू लागले. मग काय आळीपाळीने दोन्ही लांडगे प्राण्यांचे कान भरू लागले. आम्ही आमच्या जंगलात प्राण्यांसाठी किती सुविधा दिल्या, किती विकास केला याची उदाहरणे लाळ गळेपर्यंत सांगू लागले. विकासाच्या मोठमोठ्या थापा मारल्या जाऊ लागल्या. या लांडग्यांनी वाघिणीला सळो की पळो करून सोडले. पण वाघीणही हार मानणारी नव्हती. तिनेही लबाड लांडग्यांचे इरादे ओळखून ते कसे ढोंगी आहेत हे आपल्या   जंगलातील प्राण्यांना पटवून दिले.

 एकदाची निवडणूक पार पडली आणि निकालाचा दिवस उजाडला. सकाळपासूनच कोल्हेकुई सुरू झाली. हे जंगल आत्ता आपलेच अशा आविर्भावात लांडगे आणि त्यांच्यासोबतची कुत्रे भुंकून सांगू लागले. मात्र, जसजसे वाघिणीचे संख्याबळ वाढताना दिसले तसतसा लांडगे आणि कुत्र्यांनी पळ काढायला सुरुवात केली. वाघिणीला तीन आकडी संख्याबळ गाठता आले. पण जंगलातील काही प्राणी दोन लांडग्यांच्या भूलथापांना बळी पडले आणि त्यांचे संख्याबळही दोन आकड्यांवर आले. हा पराभव जिव्हारी लागल्याने उंदरं बिळात लपावेत तसे ते दोन लांडगे आणि त्यांची कुत्र्यांची फौज लपून बसली. 

मोरल ऑफ द स्टोरी : लोकशाहीवर ज्याचा दृढ विश्वास आहे, त्याला सत्तेतून कोणीच वंचित करू शकत नाही. अनेक वेळा भूलथापांना काही प्राणी बळी पडतीलही मात्र विजय नेहमीच सत्याचा आणि चांगल्या भावनांचाच होतो.  आणि हो... वाघीण वाघीणच असते. लांडगे आणि कुत्रे तिचे काहीच बिघडवू शकत नाहीत.  


रविवार, १७ जानेवारी, २०२१

इंद्राचा सामाजिक न्याय

छायाचित्र सौजन्य : https://www.alamy.com/

सामाजिक न्याय देण्यासाठी सत्ता असणे गरजेचे नाही. पक्ष किंवा संघटनेचे काम करतानाही आपण सामाजिक न्याय देऊ शकतो, हे अनेकदा सिद्ध झाले आहे.  आता हेच बघाना इंद्राने त्याची ह हा हि ही हु हू पार्टी  सत्तेत नसतानाही अनेकांना सामाजिक न्याय दिला आहे. किंबहुना इंद्राने स्वत:ला सामाजिक न्यायासाठीच वाहून घेतले आहे.  अनाथ मुले, विधवांना इंद्राने सामाजिक न्याय दिला.  त्यांना राजाश्रयही दिला. आपल्या एकमेव द्वितय अशा ह हा हि ही हु हू पार्टीत त्यांना मानाची पदे दिली. इंद्राचा सामाजिक न्याय एवढ्यावरच थांबत नाही. प्रेमभंग झालेल्या महिलांनाही इंद्र तेवढ्याच आपुलकीने वागवतो. याचे सर्वोत्तम उदाहरण कविता भाभी.

 ह हा हि ही हु हू पार्टीची राष्ट्रीय प्रवक्ती असलेल्या नारदीने दिलेल्या माहितीनुसार, कविता भाभीचे आपल्या नात्यातीलच एका रांगड्या तरुणाशी प्रेम जुळले होते. कविता भाभीचा पती अत्यंत सोज्वळ माणूस. पण कविता भाभीला  रांगडा तरुण आवडला म्हटल्यावर काय?  पतिदेव कामावर गेल्यानंतर कविता भाभीला अख्खे आटपाट नगर मोकळे होते. त्या रांगड्याची  कविता भाभीच्या घरी नेहमीची उठ-बैस सुरू असायची.   'जिकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे' असे वातावरण.  कविता भाभीला त्या तरुणाची संगत कायम हवी हवीशी वाटत होती. त्याच्या दुचाकीवर मागे बसून अनेक दिवस ती भटकत राहिली.  पण दुसऱ्याच्या बागेतील फळे किती दिवस चोरून खायची. आपलीही बाग असावी, या उद्देशाने त्या रांगड्या तरुणाने आपली स्वत:ची बाग उभारण्याची  म्हणजे लग्न करण्याचा विचार केला. त्याचा एका सुंदर तरुणीशी विवाह जुळला. पण ही गोष्ट कविता भाभीला खटकू लागली. कारण त्याने लग्न केले तर त्याची साथ सुटेल, अशी कविता भाभीला पक्की खात्री होती. त्यामुळे त्याने लग्नच करू नये, यासाठी कविता भाभीचा आटापिटा सुरू झाला. तिने त्याला लग्न करण्याच्या इच्छेपासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्नही केला. त्याला फोन करून धायमोकलून रडलीही. कविता भाभीचा कोणताच फंडा कामी नाही आला.  पण त्या रांगड्याने लग्नाच्या बेडीत अडकायचेच अशी पक्की खूणगाठ बांधल्याने कविता भाभीच्या जाळ्यातले सावज जाळ्यातून निसटले.  शेवटी तो एका सुंदर बागेचा धनी झाला. त्याच्या लग्नाला कविता भाभी काळजावर दगड ठेवूनच उपस्थित राहिली होती. कविता भाभीच्या प्रेमभंगाची खबर नारदीने इंद्रापर्यंत कधीचीच पोहोचती केली होती. इंद्रच नव्हे तर तिने ही वार्ता गावभरही पसरवली. 

रांगड्या तरुणाची साथ सुटल्यानंतर कविता भाभी अस्वस्थ झाली. तिचा प्रेमभंग झाला. अशा वेळी इंद्र आणि नारदीलाच तिची दया आली. इंद्राने सामाजिक न्यायाच्या भूमिकेतूनच कविता भाभीला आपल्या ह हा हि ही पार्टीत सामील करून घेतले. इंद्राच्या पार्टीत पहिल्या दिवसापासून नारदी प्रवेशकर्ती झाली होती. तिने कविता भाभीचे मन हलके व्हावे, तिला रांगड्या तरुणाचा विरह जाणवू नये, यासाठी तिला आपल्या हे है हो हौ हं ह: क्लबचे सदस्यत्व दिले. क्लबचा गप्पांचा फड, कविसंमेलने, शेरो-'शायरी आणि हास्यजत्रेत कविता भाभीचे मन रमून गेले. तिला त्या रांगड्या तरुणाचा हळूहळू विसरही पडला. 

ह हा हि ही हु हू पार्टी आणि हे है हो हौ हं ह: क्लबच्या कार्यक्रमांना नियमित हजेरीमुळे कविता भाभी इंद्राच्या खास बैठकीतील पदाधिकारी बनली होती. घराला कोणता रंग द्यावा इथपासून ते सकाळच्या नाश्त्यात काय पदार्थ असावेत तिथपर्यंतचा सल्ला कविता भाभी इंद्राकडून घेऊ लागली. इंद्र नेहमीच सामाजिक न्यायाच्या भूमिकेत वावरणारा असल्याने तो ही दिलखुलासपणे कविता भाभीला सल्ले देत होता. कदाचित कविता भाभीला छोटे बाळ असते तर त्याचे डायपर कोणत्या ब्रँडचे असावे, साईज काय असायला हवी असे विचारायला कविता भाभी मागे हटली नसती. एरवी परपुरुष भुतासमान मानणारी कविता भाभी इंद्राशी एकट्यात बोलण्यासही संकोच करत नव्हती. गोडबोल्या इंद्रालाही कविता भाभीचा सहवास जणू आवडू लागला होता.

इंद्राच्या देशाची राजकीय गादी सांभाळण्याच्या इच्छेला कविता भाभी तन, मन आणि धनानेही साथ देत होती. तर नारदी तन आणि मनाने प्रचंड स्फूर्तीने कामाला लागली होती. घरची आणि दारची कामे झाली नाही तरी चालतील पण इंद्राचा प्रत्येक शब्द खाली पडला नाही पाहिजे याची ती प्रचंड दक्षता घेऊ लागली. पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते समर्पित भावनेतून पक्षाचे कार्य पुढे रेटत असल्याने इंद्र जाम खूश होता. तो त्यांना आपल्या धनाच्या जोरावर खूश ठेवू लागला. इंद्रासारखा दुसरा कोणीच नाही, असा प्रचार संपूर्ण आटपाट नगरीत सुरू  झाला. त्यामुळे इंद्र तर आणखीच हुरळून गेला होता. पक्ष कार्यालयात नियमित बैठकांचे सत्र सुरू होते. सामाजिक न्याय मंत्री ज्या प्रमाणे जनता दरबार भरवतात अगदी तसाच दरबार इंद्रही भरवू लागला. महिला पदाधिकाऱ्यांसोबतच त्यांच्या पतिराजांचाही इंद्राला जोरदार पाठिंबा मिळू लागला. नारदीकडे तर पक्षाचे मोठेच पद होते. त्यामुळे ती स्वत:ला आटपाट नगराची नगराध्यक्ष असल्याच्या तोऱ्यात वावरू लागली.  नारदी आणि कविता भाभीने तर इंद्रावर जीवच ओवाळून टाकला होता. सामाजिक न्यायात उणिवा राहू नयेत, याची इंद्रही मोठी काळजी घेत होता. त्याने   आपल्या पक्ष पदाधिकाऱ्यांना कधीच कशाची झळ पोहोचू दिली नाही. नारदी आणि कविता भाभीची बाजू खरी असो वा खोटी, इंद्र त्यांच्या प्रत्येकच गोष्टींसाठी त्यांच्या मागे उभा ठाकला होता.

नारदीला अख्ख्या आटपाट नगरातील खबरी असायच्या. थोडक्यात नारदीला अ ला काना आ असे भलेही वाचता येत नसले तरी तिची कल्पनाशक्ती प्रचंड होती. रस्त्याने एखादा तरुण आणि तरुणी सोबत जात असतील आणि ते नात्याने भाऊ-बहीण असले तरी ते प्रेमियुगुलच असावे, इतकी प्रचंड तिच्या कल्पना शक्तीची भरारी होती. आनंदीबाईनी राजकारणात ध चा मा केल्याचे इतिहास सांगतो. पण नारदीने अख्खी बाराखडीच बदलून टाकली. कुठले उकार कुठे आणि इकडची वेलांटी तिकडे देऊन इतिहासाचा भूगोल करून टाकला. कविता भाभीच्या प्रेमभंगाचे प्रकरण नारदीने अख्ख्या आटपाट नगरात व्हायरल करून टाकले. फक्त बॅनर, होर्डिंग लागणेच बाकी राहिले होते. पण बिच्चाऱ्या कविता भाभीला नारदीच्या या अफाट कर्तृत्वाची काडीमात्रही कल्पना नाही. नारदीचे हे कर्तृत्व इंद्राला ठाऊक होते. पण आपली पार्टी फुटेल, देशाची राजगादी सांभाळण्याचे स्वप्न धुळीला मिळेल म्हणून तो नारदीला मोठ्या अंत:करणाने सहन करत होता. 'प्यार और जंग मे सब जायज हे' या उक्तीनुसार आणि सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून इंद्र सर्व गोष्टी 'नजरअंदाज' करत होता.. करत राहणार... कारण सामाजिक न्याय!


शनिवार, ९ जानेवारी, २०२१

ह हा हि ही पार्टी

छायाचित्र सौजन्य : http://brandhights.com/

पृथ्वीतलावर आलेल्या इंद्राचा देशाच्या राजकारणातील रस खूपच वाढला होता. त्याला देशातील 'आदरणीय' लोकांसारखे राजकारण जमत नसले तरी तो राहत असलेल्या आटपाट नगरातच राजकारणाचे फंडे अजमावू लागला. कदाचित स्थानिक राजकारणातून इंद्राला देशाची राजगादी सांभाळण्याची इच्छा असावी. या राजकारणासाठी त्याने आपला भक्त वर्गही तयार केला आणि 'ह हा हि ही हु हू' पार्टी स्थापन केली.  तसेही गोड बोलून आपला कार्यभाग साधण्याची किमया इंद्राला चांगली अवगत होतीच. या कामी त्याला नारदीची (स्त्री रुपातील काडीखोर  व्यक्तिमत्त्व) तेवढीच भक्कम साथ मिळाली होती. आटपाट नगरीतील सर्व घटना व घडामोडी, बातम्या नारदी इंद्राला तेल-मीठ आणि मालमसाला लावून सांगण्याचे काम  करत होती. त्यामुळे इंद्रही कधी नारदीला नाराज करत नव्हता. तिच्या चांगल्या वाईट कृत्यांना त्याचे पूर्ण समर्थन होते. किंबहुना तशी तिला फूसही लावत असे.  'ह हा हि ही हु हू' पार्टीचा अध्यक्ष असलेल्या इंद्राने नारदीला आपल्या पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्तेपद बहाल केले. इंद्राची पार्टी स्थानिक असली तरी नारदी मात्र राष्ट्रीय स्तरावरील हालचालींवर नजर ठेवून असे. आटपाट नगर म्हणजे आपलीच मालमत्ता, अशा आविर्भावात ती वावरत असे. नारदीने ह हा हि ही हु हू पार्टीच्या समर्थनासाठी 'हे है हो हौ हं ह:' क्लबची स्थापना केली. क्लबची मंडळी वेळ मिळेल तेव्हा गप्पा पार्टी करू लागली.  त्यांची कविसंमेलनेही नियमित भरू लागली. कधी कधी कथाकथनही व्हायचे. आटपाट नगरातील कथांवर निरुपणे होऊ लागली. कोण कुठे जातो, कुणाच्या घरी कोण येतो, कुणाच्या घरातून काय आवाज निघतात, कोणी कसे कपडे घातले, कोण कसे दिसत होते, कुणी कुणास काय म्हटले अशा सर्वच गोष्टींवर 'हे है हो हो हं ह:' क्लबमध्ये चर्चांचे फड रंगू लागले. मात्र प्रत्येक कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी नारदीच असणार हे गणित ठरलेले. कारण क्लबच्या कार्यक्रमासाठी आवश्यक मानसिक पाठबळ म्हणा किंवा किरकोळ निधी इंद्राकडून मिळवण्याची जबाबदारी नारदीच घ्यायची. अगदी क्लबच्या कोणत्याही सदस्याचा वाढदिवस असो वा त्यांच्या लेकरांचा, इंद्र प्रत्येक ठिकाणी पुळका दाखवत असल्याने इंद्र त्यांच्यासाठी पूजनीय झाला होता. दुसरी गोष्ट म्हणजे नारदीचे आटपाट नगरात गणगोतही मोठेच. त्यामुळे आपण तिची राष्ट्रीय प्रवक्तेपदि केलेली निवड किती योग्य आहे, यावर इंद्राला गर्व वाटत होता. नुसता गर्वच नाही तर त्याची छाती गर्वाने ५६ इंचापेक्षाही जास्त म्हणजे ६१-६२ इंचापर्यंत फुगत होती.

नारदीच्या क्लबचे सदस्यत्व आटपाट नगरातील कविता भाभी, सुनीता ताई, रंजना ताई, स्नेहल ताई अशा काही पुढारी गुण असलेल्या महिलांनी स्वीकारले होते.  एवढेच काय तर  इंद्राने त्यांना आपल्या पार्टीतही सहभागी करून घेत त्यांना पदे बहाल केली. कविता भ्राभीला कार्याध्यक्षपद दिले. सुनीता मावशी सरचिटणीस, स्नेहल ताई कार्याध्यक्ष झाली. रंजना ताईच्या मागे अधिक कौटुंबिक व्याप आणि नोकरीचा ताण असल्याने तिला खजीनदार म्हणून नियुक्ती दिली गेली. यातील काही पदाधिकारी महिला इंद्राच्या 'जिवा'भावाच्या बनल्या. यात कविता भाभीचे स्थान अव्वल. कविता भाभी तशी पुरुषद्वेष्टी पण याला एकमेव इंद्र अपवाद होता. 'इंद्रदेवा तुमच्यासाठी काय पण', इथपर्यंत कविता भाभीची तयारी. त्यामुळे कविता  भाभी आपला पक्ष कधीच सोडणार या विश्वासातून इंद्राने तिला कार्याध्यक्षपद बहाल केले होते.  तसाही  कविता भाभीचा स्वभाव  गूढ होता. तिच्या ओठांत काय आणि पोटात काय, हे इंद्रालाही कळू नये, असे तिचे व्यक्तिमत्त्व. त्यामुळे असा गुण असलेल्या व्यक्तींना इंद्राने आपल्या पार्टीत प्राधान्याने स्थान दिले होते.

  राजकारणातील यशासाठी  इंद्र आपला खजिना मुक्त हस्ते उधळू लागला. पण अपेक्षित यश काही त्याच्या पदरी पडत नव्हते.  त्यामुळे इंद्र आतून प्रचंड खवळलेला होता. इतर पक्षातील मातब्बरांना जेरीस आणले तर... अशी आयडिया त्याच्या डोक्यात आली.  राजकारणातील यशासाठी नारदीच आपल्याला तन आणि मनाने मदत करू शकते, याचा त्याला पूर्ण विश्वास होता. तसेही नारदीकडे तन आणि मन या दोनच गोष्टी होत्या. धनाचा आणि तिचा कधी फारसा संबंध नव्हता. नारदीच्या मदतीने इंद्राने प्रतिस्पर्धींना नामोहरम करण्यासाठी व्यूहरचना करण्यास सुरुवात केली. 

आटपाट नगरात आपल्याचा नावाचा डंका वाजला पाहिजे यासाठी  इंद्राने विरोधकांना सळो की पळो करून सोडण्याचा डाव रचला. साम, दाम, दंड, भेद नीतीचा अवलंब करण्याचे ठरवले. यासाठी आपली अतिविश्वासू नारदीसोबत चर्चा करून सर्वात आधी विरोधकांना बदनाम करण्याचा डाव रचला. सर्वात आधी आपल्या राजकीय प्रवासात आड येणाऱ्यांना आडवे करण्याचा इंद्र आणि पार्टीने चंग बांधला. विरोधकांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले तर तो विरोध करणे थांबवेल आणि राजकारणातील अपेक्षित ध्येयापर्यंत पोहोचता येईल, असे इंद्राला वाटू लागले. नारदीच्या मदतीने इंद्राने विरोधकांच्या खासगी आयुष्यातील काही घटनांची माहिती मिळवत त्यांचा अपप्रचार करण्याचे नारळ फोडले. विरोधातील कोण्या व्यक्तीने सहजपणे एखाद्या माता-भगिनीकडे पाहिले तरी इंद्र आणि पार्टी विरोधक व्यक्ती महिलांकडे वाईट नजरेने पाहतो, असा प्रचार करू लागली. विरोधक कुणाशी बोलला तर या प्रचाराला आणखीच वेग येई. भारदस्त आवाजाची धनी असलेल्या नारदीला लाऊड स्पीकरचीही गरज नव्हती. ती सहज बोलली तरी आठ-दहा घरांपर्यंत आवाज पोहोचावा अशी तिची वाणी होती. इंद्र आणि पार्टीच्या या प्रचाराचा विरोधकांना त्रास होणे सुरू झाले. एका भगिनीच्या पतिदेवांनी या पार्टीच्या अपप्रचाराला बळी पडून एका विरोधकाशी भांडणही उकरले. या भांडणात शिष्टाई म्हणून इंद्राने 'मोठेपणा' दाखवत समेट घडवून दिला. पण मात्र एक विरोधक अत्यंत व्यथित झाला. पण  इंद्राचा आनंद पृथ्वीतलासह स्वर्गलोकातही मावत नव्हता.  इंद्र आणि नारदी आपला अपप्रचार करताहेत, हे सुरुवातीला विरोधी पक्षनेत्याच्या लक्षात नव्हते आले. पण नंतर या कारस्थानात 'अपाक' शक्तीचाच हात असल्याची त्याला खात्री पटली आणि इंद्राने रचलेला चक्रव्युह एकदाचा भेदून काढायचा अशी तयारी त्याने केली.  

राजकारणात शह-काटशह कसा द्यायचा असतो हे विरोधी नेत्याला ठाऊक होते. पण घाणेरडे राजकारण करायचे नाही, हा त्याचा नियम होता. मग त्यानेही आपल्या पद्धतीने इंद्र आणि पार्टीची बारीक-सारीक माहिती घेण्यास सुरुवात केली आणि त्याच्या हाती इंद्र आणि त्याच्या भक्तांचा  कच्चाचिठ्ठाच लागला. नारदी आपली अत्यंत विश्वासू आहे, असा इंद्राचा (गैर) समज होता. पण केवळ तन आणि मन असलेली नारदी स्वत:च्या फायद्यासाठी विरोधकांनाही आपल्या पार्टीतील काही 'राज'कीय गोष्टी सांगते, याची इंद्राला अजिबात कल्पना नव्हती.  इंद्राच्या आयुष्यातील काही चमत्कारी घटनांचा भांडाभोड या नारदीनेच केला. नारदी आपल्या स्वार्थासाठी कधीकधी पार्टी बदलते हे इंद्राला माहीत नाही. नारदी अनेकदा इंद्राविषयी विरोधकांकडे बोलतच होती. त्यावरून लोकांना नैतिकतेचे धडे देणारा इंद्र किती पाण्यात आहे, याची पूर्ण कल्पना विरोधकांना आली. शिवाय इंद्राशी भेट होण्यापूर्वी नारदीनेही काय काय दिवे लावले याचीही माहिती विरोधकाला मिळाली होतीच.  

नारदीने इंद्राचा असा केला भंडाफोड 

इंद्रपुरीत इंद्रानेच विवाह पद्धती लागू केली.  सूत्रांच्या माहितीनुसार एकापेक्षा जास्त बायका करण्याचीही त्याने परवानगी दिली. तसा इंद्रानेही विवाह केलेला होताच. पण इंद्रच म्हटल्यावर तो कितीही बायका करू शकतो हे ओघानेच आले.  सर्वसामान्य माणूस एकाच बायकोत हैरान, परेशान होतो, तिथे दुसरी म्हटल्यावर काय होणार? पण इंद्राला कशाची झळ बसणार. त्याच्याकडे मोठा खजिना होताच. नारदीच्या कथनानुसार  इंद्र आटपाट नगरात प्रकट होण्यापूर्वी  एकदा पृथ्वीतलावरील एका जिल्ह्यात प्रकटला होता. तिथे त्याचा एका महिलेवर जीव जडला. तसे पाहिले तर ही महिला इंद्रपुरीतील अप्सरा, मेनका, रंभा, उर्वशी यांच्याप्रमाणे सुंदर नव्हती. पण जीवच जडला म्हटल्यावर काय? त्याने महिलेसमोर प्रस्ताव मांडला आणि ती महिलाही इंद्राच्या एका शब्दात त्याची झाली. इंद्र त्या महिलेच्या प्रेमांत आकंठ बुडाला. आपल्या पार्टीच्या लोकांना तो तिची 'अर्धांगिनी' अशी ओळख करून देऊ लागला. इंद्रदेवाची अर्धांगिनी म्हटल्यावर या वहिनींभोवतीही ह हा हि ही हु हू पार्टीचे पदाधिकारी आणि सदस्य गोंडा घोळू लागले.  पण वास्तव तर याही पेक्षा वेगळेच निघाले. त्या महिलेच्या प्रेमात बुडालेल्या इंद्राकडे आपसुकच त्या महिलेच्या दोन लेकरांचे 'बाप'पण आले. विनाकष्ट तो बाप बनला होता.  अनिच्छेने का होईना इंद्राला या दुसऱ्या खटल्यापाई बाप म्हणून कन्यादानही करावे लागले.  इंद्राच्या पहिल्या पत्नीला त्याच्या दुसऱ्या प्रपंचाविषयी माहिती मिळाल्याने तिचा तिळपापड झाला तो वेगळाच. तिच्या विरोधामुळेच इंद्राला इंद्रनगरी सोडून आटपाट नगरात ठाण मांडावे लागले, इत्यादी गोष्टी नारदीच्या मुखातून विरोधकांपर्यंत पोहोचल्या. मात्र,  याची पुसटशी कल्पनाही  इंद्राला नव्हती.  तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून राजकारणाचे डावपेच आखू लागला. नारदीवरील विश्वास तसूभरही कमी झाला नव्हता. उलट त्याने नारदीला आटपाट नगरच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरही विरोधकांचे बदनामी सत्र सुरू करण्यास अनुमती दिली.  पण घाणेरडे राजकारण करायचे नाही, हा विरोधकांचा बाणा असल्याने सध्या तरी ते शांत आहेत. ते शांतपणेच या चोरांच्या उलट्या बोंबा ऐकून घेत आहेत. पण राजकारणातही बुद्धिबळाप्रमाणे शह आणि काटशह देता येतो, याची कदाचित इंद्राला जाणीव नसावी!  

(पुढील भाग सवडीनुसार देऊ )

(अस्वीकरण :  या राजकीय कथेतील पात्र, घटना, स्थळ, प्रसंग पूर्णत: काल्पनिक आहेत. याचा कोणतीही व्यक्ती, देवदेवता, पक्ष, संघटना, धर्म वा पंथाशी संबंध नाही. तरीही कुणाला या कथेशी साम्य वाटत असेल तर हा निव्वळ योगायोग समजावा )

शनिवार, २८ नोव्हेंबर, २०२०

पद्मश्री कंगनाची टिवटिव

 
छायाचित्र सौजन्य : https://www.cinejosh.com/

गेल्या काही महिन्यांपासून कंगना हिने मीडियात विशेषत: गोदी मीडियात विशेष स्थान मिळवले आहे. कोराेना विषाणूची वळवळ सुरू होण्यापूर्वीच काही प्रसिद्धीपिपासूंची वळवळ सुरू झाली होती.  त्यातीलच एक म्हणजे कंगना. तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने वादाला तोंड फुटले. त्याचबरोबर कंगनाचेही तोंड सुटले.  कंगनाने सुशातसिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केल्याने सरकारी   रोषालाही तिला सामोरे जावे लागले. तिच्या मुंबईतील बंगल्याचा एक भाग अतिक्रमण म्हणून बीएमसीने पाडला. त्यानंतर कंगनाचे जे तोंड सुटले ते अजून बंद झालेले नाही. तिला गोदी मीडियाने चांगलेच उचलून धरले. कंगना शिंकली तरी त्याचे कव्हरेज गोदी मीडियात यावे, इतपत या मीडियाने तिला 'गोद' घेतले. 

विषय कुठलाही असो कंगना बोलणार हे गणित पक्के झाले. मग अमेरिकेत जे बायडेन सत्तेवर येवोत की तिकडे 
कर्नाटकमधील आयपीएस डी. रुपा यांचा फटाक्यांसंदर्भातील वाद असो, कंगना ट्विटरवर फटाके फोडणार हे ठरलेलेच. एवढेच काय तर जल्लीकट्टू या मल्याळम सिनेमाला २०२१ च्या ऑस्कर पुरस्काराचे नॉमिनेशन मिळाल्यावरही कंगना बोलली. तिने जल्लीकट्टूच्या टीमचे अभिनंदन करतानाच बॉलिवूडच्या निर्मात्या, अभिनेत्यांवर तोंडसुख घेण्याचा मोह टाळला नाही. शेवटी बॉलिवूडवाल्याने मैदान रिकामे केले आणि ज्युरींना आपले काम करू दिले. भारतीय सिनेमाचा अर्थ केवळ ४ कुटुंब नव्हे. मुव्ही माफिया आपल्या घरात बसले आहेत. आणि ज्युरींनी आपले काम केले आहे, असे ट्विट कंगनाने केले. 
अमेरिकेचे नूतन अध्यक्ष जो बायडेन यांना गझनी उद्देशून कंगनाने अकलेचे तारे तोडले. तिने आपल्या ट्विटमध्ये मी गझनी बायडेनबाबत आश्वस्त नाहीय, ज्यांचा डाटा प्रत्येक ५ मिनिटांना क्रॅश होतो. इतकी सारी औषधे त्यांच्यात इंजेक्ट झाली आहेत की ते एक वर्षपासून जास्त टिकू शकणार नाही. एक मात्र निश्चित की कमला हॅरिस याच शो पुढे नेतील. जेव्हा एखादी महिला उठते तर ती दुसऱ्या महिलांसाठीही मार्ग तयार करत असते, असे ट्विट तिने केले. 
कंगना कुणाविषयी काहीही बोलू शकते, हे तिने एकदाचे सिद्ध केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकेरी बोलण्यापासून ते अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांना गझनी म्हणेपर्यंत तिची मजल तर गेलीच आहे. उद्या न जानो आमच्या आदरणीय पंतप्रधानांविषयीही ती काही बोलली तर नवल वाटायला नको. तसे पंतप्रधानाविषयी असं आचरटपणे बोलण्याची शक्यता कमीच आहे. कारण त्यांचे चेलेचपाटे कंगनाचेही भक्त आहेत, हे येथे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. दिल्लीत कान फुंकल्यानंतरच कंगना मुंबईला पीओके म्हणतेय, असा सर्वांनाच संशय आहे.  
बॉलिवूडमधील अनेक आदरणीय, सन्माननीय लोकांविषयीही कंगना सुसाटपणे बोलत सुटलीय. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कोर्टात कंगनाविरुद्ध अपराधिक स्वरूपाची तक्रार दाखल केली. कंगनाने टीव्हीवरील  मुलाखतीत आपल्याविरोधात मानहानीकारक आणि निराधार टिपण्णी केल्याचे जावेद अख्तर यांनी याचिकेत नमूद केले. कंगनाने सुशातसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आपलेही नाव घेतले, असेही याचिकेत म्हटले. 
कंगना बॉलिवूड, राजकारणी मंडळीवर बोलूनच थांबली नाही तर तिचा आरक्षणविरोधी चेहराही भारतवासीयांना बघायला मिळाला. कर्नाटकमधील आयपीएस डी. रुपा यांनी फेसबुकवर दिवाळीत फटाक्यांवर बंदी आणल्यावर लोकांना काय अडचण आहे, असा प्रश्न उपस्थित केला होता. डी. रुपा यांच्या प्रश्नावर लोकांनी त्यांना इतर धर्माशी निगडित परंपरांबाबतही तुम्ही प्रश्न उपस्थित करणार का, असे प्रश्न करून डी. रुपा यांना चांगलेच ट्रोल केले होते. या वादातही कंगनाने उडी घेतली. डी. रुपा यांच्याबाबत तिने टिपण्णी करत हे आरक्षणाचे साईड इफेक्ट्स आहेत. जेव्हा अयोग्य लोकांना पॉवर मिळते तेव्हा ते काही ठीक करत नाहीत. केवळ इजा पोहोचवतात, असे टि्वट करत कंगनाने आरक्षणविरोधी भूमिकाही जाहीर केली. 
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्याविषयी बोलताना कंगनाने खालची पातळी गाठली. उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्न स्टार आहे, असे सांगून कंगनाने आणखी एका वादाला तोंड फोडले होते. 
एकूणच कंगना अभिनेत्री आहे, राजकारणी आहे, तत्वज्ञानी आहे की आणखी कोण? असे अनेक प्रश्न माझ्यासह अनेकांना पडणे साहजिक आहे. २००४ पासून बॉलिवूडमध्ये आलेल्या कंगनाला २०२० मध्ये इतकी ज्ञानप्राप्ती कशी झाली, हाही एक प्रश्न उपस्थित होत आहे. कंगनाला २०२० मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरवित केले. या पुरस्कारानंतर मात्र कंगना मीडियात सारखी झळकू लागली आहे. कंगनाच्या या बोलक्या  'अॅक्टिव्हिटी'चे गुपित पद्मश्री पुरस्कारात तर दडले नाही ना?
(वाचकहो मला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा)
 

शनिवार, २७ एप्रिल, २०१९

कविताभाभीचा प्रेमभंग

 (छायाचित्र सौजन्य : https://res-3.cloudinary.com )
*********************************************************************
रात्रीचे बारा वाजले होते. सगळीकडे शांतता होती. रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद-दोन वाहनांमुळे या शांततेचा भंग होत होता. पण पुरुषद्वेष्ट्या कविताभाभीला झोप येत नव्हती. तिचा देह अंथरुणावर होता. मात्र चित्त दुसरीकडेच होते.  कविताचा  पती मात्र  घोरत पडला होता. नोकरीवरून घरी परतताना त्याने  विदेशी औषध घेतलेले होते. त्यामुळे त्याला जगाची चिंताच नव्हती. पती शेजारीच झोपला असतानाही  कविता  इतकी अस्वस्थ का होती?. समाजात सोज्वळतेचा, पतीव्रतेचा बुरखा पांघरून वावरणारी, दोन लेकरांची माता कविता एका तरुणाच्या प्रेमात पडली होती. तो तिच्यापेक्षा २ वर्षांनी लहान. पण प्रेम हे आंधळे असते, या उक्तीनुसार कविता  आणि त्या तरुणाचे प्रेम कविताच्या लग्नानंतर जुळले होते. पण आता त्या तरुणाचे लग्न होणार होते. त्याचे लग्न होत असल्याने कविता अस्वस्थ होती. सकाळीच ती त्या तरुणाला फोनवर भांड भांड भांडली होती. रडून रडून डोळे सुजवून घेतले होते. पण त्या तरुणाचीही आपली स्वप्ने होती. त्याला कविताशिवाय आयुष्य आनंदात घालवायचे होते.  सुखी संसार थाटून कविताच्या प्रेमाच्या जोखडातून मुक्त व्हायचे होते. किती दिवस तो विवाहित कविताची ईच्छापूर्ती करणार होता?
कविता ज्या तरुणावर प्रेम करत होती तो कोणी बाहेरचा नव्हता. तो तिच्या मामाचा मुलगाच होता. कविताचा पती रोज मद्यप्राशन करून येत असल्याने आणि घरी येताच दोन घास पोटात ढकलून निद्रादेवीच्या आधीन होत असल्याने कविता सुखापासून वंचित राहत होती. ही उणीव भरून काढण्यासाठी तिने त्या तरुणाला म्हणजे अंगदला हेरले होते.  अंगद  कविताच्या प्रेमात कसा पडला हे त्यालाही कळाले नाही. 
खेड्यात राहणारा अंगद १२ उत्तीर्ण झाला होता. त्याला पुढील उच्च शिक्षण घेण्याची इच्छा होती. पण तो राहत असलेल्या गावात जेमतेम १२ वीपर्यंतच शिक्षणाची सोय होती. त्यामुळे अंगदने आपल्या  आईवडिलांकडे शहरात शिकण्यासाठी जाण्याची इच्छा व्यक्त केली. आईवडिलांनी त्याची इच्छा पूर्ण केली. त्यापूर्वी त्यांनी  जवळच्या नात्यातून असलेल्या व अंगदने ज्या शहरात शिकायला जाण्याची इच्छा व्यक्त केली त्याच शहरात राहणाऱ्या  कविताच्या कानावर ही गोष्ट टाकली होती. कवितानेही 'लेकराला शिकू दे मामी. इथं राहिला तर आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवू. वेळप्रसंगी पैशाची मदतही करू' असा शब्द दिल्याने अंगदला शहरात शिकायला पाठवण्याचा निर्णय पक्का झाला होता.
अंगदने  शहरात पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतला. हॉस्टेलला राहून तो तीन वर्षे शिकला. शिकत असताना त्याचे आठवड्यातून एक-दोन वेळेस तरी कविताच्या घरी जाणं-येणं असायचं. कविताचा पती काकासाहेब  सामाजिक जबाबदारी जाणणारा. पण काकासाहेबांना दारूचे व्यसन होते. काकासाहेब दारू प्यायला तरी त्याचा कुणाला तीळमात्र त्रास नव्हता. नोकरीवरून घरी परतताना रस्त्यातच बारची वारी करत असे. घरी गेल्यावर ना चिडचिड, ना कुणाला रागावणे. त्यामुळे काकासाहेबाचे मद्यपी असणे कुणासही त्रासदायक नव्हते.  काकासाहेब यानेही अंगदला आवश्यक ती शैक्षणिक मदत केल्याने अंगदचे शिक्षण विनाविघ्न पार पडले. आता ग्रॅज्युऐट झालेला अंगद नोकरीच्या शोधात होता. शिक्षण पूर्ण झाल्याने तो नोकरीच्या शोधात होता. काकासाहेबाने त्याला काही दिवसांसाठी आपल्या  घरी आश्रय दिला. काही दिवस तो नोकरीसाठी भटकला. एका ठिकाणी होकार मिळाला, पण   तुटपुंजा पगार ऑफर केल्याने अंगदनेच ही नोकरी नाकारली.
नोकरीच्या शोधात अंगदचा महिना लोटला होता.  कविता आणि काकासाहेबकडे किती दिवस राहायचे, या विचाराने तो बेजार झाला होता. एका ठिकाणी मुलाखत देऊन तो घरी (काकासाहेबच्या) परतला. दार उघडेच होते. पण घरात सामसूम होती. कविताची मुलं मित्राकडे खेळायला दार उघडेच ठेवून गेली होती. तो घरात शिरला. कागदपत्रांची फाईल टीपॉयवर ठेवून  खोलीत गेला.  शर्ट काढून तो थेट बाथरूमकडे फ्रेश होण्यासाठी वळला. त्याने बाथरुमचे दार ढकलले. पण बाथरुममधील दृश्य पाहून तो एकदम चमकला. काय बोलावे, हेही त्याला सुचेना. कविता  अंघोळीला गेेलेली होती. शॉवरच्या पाण्याच्या आवाजात कविताला अंगद घरात आल्याची कुणकुणही लागली नव्हती.  अंगदचे डोळे काही क्षण विस्फारून गेले. पण तो लगेचच भानावर आला.
'सॉरी ताई' म्हणत त्याने दरवाजा ओढून घेतला. एव्हाना अंगदने आपल्याला अंघोळ करताना बघितल्याची जाणीव कविताला झाली. तिनंही तातडीनं आतून कडी लावली.
कविता अंघोळीहून परतली. . 'काय रे अंगद कधी आलास?,  खोलीच्या दरवाजावर उभ्या कविताने केसांना टॉवेल गुंडाळत विचारले. ' आत्ताच आलो.' अंगद पुटपुटला. त्याला आपली जीभ जड झाल्यासारखे वाटले. 'झाला का इंटरव्ह्यू?' कविताने प्रश्न केला. जड जिभेने खाली बघत अंगद 'हो' एवढंच म्हणाला. त्याची कविताच्या नजरेला नजर भिडून बोलण्याची हिंमत हाेत नव्हती. मनोमनी त्याला अपराध्यासारखे वाटत होते. 'का रे एवढा शांत का?' कविताने विचारणा केली. 'काही नाही.. सॉरी बरं का ताई.. मला माहीतच नव्हतं तू अंघोळीला गेल्याचं..शप्पथ ताई!' कविताकडे क्षमायाचना करत अंगद बोलला. 'अरे त्यात काय.. मला तरी कुठं माहीत होतं तू येणार म्हणून. मी पण किती वेंधळी.. कडी लावायचेच  विसरले!' कविता सहज बोलून गेली. 'नाही पण ताई माझं चुकलच...' अंगद बोलला.  'ते जाऊ दे रे.. तू माझ्यापेक्षा मोठा असता तर मामानं माझं लग्न तुझ्याशीच लावून दिलं असतं',  कविता गमतीनं बोलली तसे अंगदवरच दडपण कमी झाले. 'तू फ्रेश हो, आपण चहा घेऊ', म्हणत कविता  किचनकडे वळली.  अंगद फ्रेश होऊन हॉलमध्ये येऊन बसला. चहा प्यायल्यानंतर तो फ्रेश झाला. आता त्याच्या मनावरील दडपण बरेच कमी झाले होते.
सकाळचे अकरा वाजले होते. रविवारचा दिवस होता. आज अंगदला कोठेही जायचे नव्हते. मंगळवारीच त्यानं इंटरव्ह्यू दिला होता.   टीव्ही सुरू करण्यासाठी रिमोटला हात लावताच दार वाजलं. कविता किचनमध्ये होती. अंगदनंच दार उघडलं. खासगी कुरिअरवाला दारात उभा होता. त्याने 'अंगद नरवडे कोण आहे?', अशी विचारणा करताच 'मीच' म्हणत अंगदने लिफाफा स्वीकारला. सोमवारी त्याने दिलेल्या इंटरव्ह्यूचे ते उत्तर होते. महिना १८ हजारांची नोकरीची त्याला ऑफर होती. ऑफर मंजूर असल्यास चार दिवसांत कंपनीत रिपोर्टिंग करायचे होते.  पत्र वाचून अंगदचा आनंद गगनात मावेनासा झाला. 'ताई मला नोकरी मिळाली', असे जोराने ओरडला. एव्हाना कविता  किचनमधून हॉलमध्ये आली होती. 'व्वा... अभिनंदन अंगद', म्हणत कविताने अंगदकडे शेकहँडसाठी हात पुढे केला. पण शेकहँडऐवजी अत्यंत आनंदित झालेल्या अंगदने कविताला कडाडून मिठी मारली. काही क्षण कविता त्याच्या मिठीत होती. तिचे अंग शहारले. पण काही क्षणांनी तिने अंग चोरून घेत  त्याच्या मिठीतून  सुटका करून घेतली. 'खरंच सांगतो ताई तुझी नि भाऊची मदत माझ्या आयुष्यासाठी कामी आली. तुम्हा दोघांचे खूप उपकार आहेत माझ्यावर. ते कसे फेडू सांग', अंगद कृतज्ञतेने बोलला. 'अरे उपकार कसले.. आम्ही जेवढी मदत करता येईल ती केली. यात काय?' कविताने उत्तर दिले. 'ताई तुझं हे मोठेपण आहे... खरंच मी आज खूप खूश आहे. माझ्या पहिल्या पगारावर मी तुला छान साडी घेईल बघ..' कविताच्या उपकारातून उतराई होण्याच्या सुरात अंगद बोलला. 'ठीक आहे.. तुला उपकार तर फेडावेच लागतील. मी म्हणेल तसं तुला वागावे लागेल.' असे म्हणत कविताने त्याला उपकाराच्या बंधनात अडकवले.
 अंगदला नोकरीला लागून महिना होत आला होता. सध्या तरी तो कविताच्याच घरी राहत होता. पहिला पगार मिळाल्यानंतर किरायाने खोली घेऊन राहण्याचा मनोदय त्याने कविता नि काकासाहेबकडे बोलून दाखवला होता. आता नोकरी लागली म्हटल्यावर अंगदला  आपल्या घरी ठेवून घेण्याचे कविता आणि काकासाहेबकडे औचित्यही नव्हते.
अंगदच्या हाती पहिला पगार पडला.   भोंगा वाजताच हातातले काम उरकून अंगद कंपनीतून बाहेर पडला. त्याने ऑटोरिक्षा पकडून थेट मार्केट गाठले. कवितासाठी त्याने लाल रंगाची साडी आणि काकासाहेबसाठी शर्ट खरेदी केला. मुलांसाठीही काही कपडे खरेदी करून थेट घर गाठून   सर्वांना नवीन कापड्यांची भेट दिली.
रात्र व्हायला आली होती. अंगदने दिलेली साडी कविताने नेसली. मुले अभ्यासाला लागली होती.  साडी नेसून कविता अंगदसमोर उभी राहिली. 'बघ मी कशी दिसते?' कविताने प्रश्न केला. 'ऐश्वर्या रायच...!' अंगदच्या तोंडून उत्स्फूर्तपणे शब्द निघाले. तशी कविता थोडी लाजली. 'चल चावट कुठला' कविताने शेरा मारला. 'अगं खरंच.. तू खूपच सुंदर दिसतीस', अंगद बोलला. 'असू दे... साडी मात्र मला खूप आवडली', कवितानं अभिप्राय नोंदवला. 'थँक्यू ताई' म्हणत अंगद खोलीकडे वळला.
...........................
जेवण करून सर्व मंडळी झोपेच्या तयारीत होती. पण काकासाहेबांचा अजून पत्ता नव्हता. घड्याळाचा काटा बाराला स्पर्श करण्यासाठी धडपडत होता.  कविता बेचैन होती. तिने चार ते पाच वेळा काकासाहेबला फोन केला. पण फोन बंद होता. त्यामुळे ती अंगदच्या खोलीत जाऊन बसली. कविताचा मोबाइल खणाणला. काकासाहेबाचाच फोन होता. कविताने चटकन फोन रिसिव्ह केला. 'हॅलो कविता.. ' काकासाहेबांचा आवाज हेलकावे खात होता. साहजिकच कविताने काकासाहेब पार्टीत आहेत, हे ओळखून घेतले.
'मी आज रात्री घरी येणार नाही. दोस्तांबरोबर पार्टीत आहे.'  काकासाहेबांनी बोलणे पूर्ण केले.
'अहो पण लवकर सांगायचं ना हे...तुमचा फोनही लागत नव्हता. किती काळजी वाटत होती आम्हाला. ' रागात पण लाडीवाळ सुरात कविता बोलली. 'आता सांगितलय ना.. आता गप्प.' काकासाहेबांनी रागावून फोन ठेवला. अंगद कविताच्या शेजारीच उभा होता. 'काय म्हणाले गं काकासाहेब?' अंगदने प्रश्न केला. "त्यांचं हे नेहमीचंच. बसलेत मित्रांबरोबर. त्यांना माझी काळजी ना लेकरांची. ' कविता चिडून बोलली. तिच्या डोळ्यांत अजून चिंता जाणवत होती. 'का काळजी करतेस ताई.. आम्ही सगळे आहोत ना.. तू आता शांत झोप बघू..' अंगदने कविताच्या खांद्यावर हात ठेवून दिलासा देत म्हटले.
...........................
रात्रीचे बारा कधी वाजून गेले होते. काकासाहेब नसल्यामुळे कविताला झोप लागत नव्हती. किंबहुना काळजीमुळे तिची झोपमोड झाली होती. अंगदही त्याच्या खोलीत एक मासिक चाळत बसला होता. अंगदने अलगदच खोलीचे दार ढकलले होते. ते पूर्ण लागले नव्हते. कविताला झोपच येत नसल्याने किचनमध्ये पाणी प्यायला आली. अंगद मासिकातली कुठलीतरी कथा वाचण्यात व्यग्र होता. अर्धवट उघड्या दारातून कविताला तो अजूनही झोपला नसल्याचे लक्षात आले. तिची पावले नकळतच अंगदच्या खोलीकडे वळली. तिने हलकेच दार ढकलले. तशी अंगदची वाचनातील तंद्री सुटली. 'अगं ताई तू झोपली नाहीस?' अंगदनंच पहिला प्रश्न केला. 'नाही रे झोपच येत नाहीये. काकासाहेब नसल्यानं बेड रिकामा वाटतोय.' कविता बोलली.
"आपण थोडा वेळ गप्पा मारू? ' कविता म्हणाली. 'हो' म्हणत अंगदने अनुमती दिली. गप्पांत बराच वेळ गेला. अंगदच्या डोळ्यांत झोप दाटली होती. पण कविता अंगदच्या बेडवरून उठायला तयार नव्हती. 'ताई तुला झोपायचं नाही का आज?' अंगदने प्रश्न केला. 'झोपमोड झालीय..पण तू मला का कटवत आहेस. मी काय तुझ्या बेडवर झोपणार नाही.. ' कविता विनोदाने बोलली. 'काय ताई.. हा बेड तुझाच आहे. मी काय खाली चटईवर झोपेन.', अंगद चातुर्याने बोलला आणि उलटे ठेवलेले पुस्तक डोळ्यांसमोर घेऊन वाचू लागला.  पण त्याचवेळी कविताच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक जाणवत होती. कविताने अंगदच्या हातातील पुस्तक हिसकावत 'मी इथं तुझ्यासमोर बसले अन् तू त्या पुस्तकात काय बघतोस?' कविता लाडीवाळपणे बोलली. 'अगं बोलतोय ना..  . शेवटच्या आठ-दहा ओळीच राहिल्या होत्या.' अंगद म्हणाला. 'बरं बोल बाई..' म्हणत अंगदने भिंतीला पाठ ठेकवली. 'थंडी वाढलेली दिसते', काही तरी बोलावं म्हणून अंगद बोलला. 'हो वाढलीय' कवितानं सुरात सूर मिसळला. 'काय विचार आहे तुझा?' कवितानं कोड्यात टाकणारा प्रश्न केला?' त्यावर प्रश्नार्थक नरजेने तो कविताकडे बघू लागला. 'अरे असा काय बघतोस माझ्याकडं..मला कधी बघितलं नव्हतं का?' कविताच्या दुसऱ्या अचानक प्रश्नानं अंगदने नजर दुसरीकडे वळवली. तेव्हा कविता गालातल्या गालात हसली. 'तू ना नुसता वेडपट आहेस..एक सुंदर स्त्री तुझ्यासमोर बसली असताना तू उन वारा, थंडीवर बोलत आहेस?' कविताच्या या संवादावर अंगद आणखी बुचकाळ्यात पडला. 'मला राजकारणावर बोलता येत नाही', अंगद विनोदाने बोलला. 'प्रेमावर तर बोलता येतं ना?' असं कविता म्हणताच अंगद दचकला. 'माझा तोही विषय कच्चा आहे', अंगद बळेच हसत बोलला. 'अंगद तू कुणावर प्रेम केलं का रे?' कवितानं मूळ प्रश्नालाच हात घातला तसा अंगद पुन्हा दचकला. 'न न नाही..' अंगदच्या तोंडून शब्द उमटले. 'चल खोटारडा कुठला... काल त्या प्रीतीकडे कसा डोळे फाडून बघत होता?' कवितानं मुळावरच घाव घातला. तशी अंगदची आणखी  बोबडी वळली. 'त त त ताई... क क क कोण प्रीती? ', अंगद म्हणाला. 'चल खोटे बोलू नको.. मी माझ्या डोळ्यांनी बिघतलं काल तुला..' कविताने अंगदची पोल खोलली. 'ताई खरंच तसं काही नाही. ती छान दिसते म्हणून बघत होतो.. पण प्रेमवगैरे काही नाही बरं का. चार-पाच दिवसांपूर्वीच किराणा दुकानावर तिची ओळख झाली होती. ' अंगद एका श्वासात सर्व बोलून गेला. 'माझ्यापेक्षा सुंदर आहे ती?' कविताचा ताबडतोब प्रश्न होता. 'छे.. तू खूप सुंदर आहेस गं कविता.. सॉरी.. ताई.' अंगद म्हणाला. 'ताई नाही कविताच म्हण..' पलंगावर थोडं अंगदच्या दिशेने सरकत त्याच्या खांद्यावर हात ठेवत कविता म्हणाली. 'नाही नाही.. चुकून तोंडातून तुझं नाव आलं.' अंगद स्पष्टीकरण देत बोलला. 'नाही तू आजपासून मला कविताच म्हणायचं... नाही तर मी तुझ्याशी बोलणार नाही.. ' कविता रुसव्या स्वरात बोलली. 'बरं ताई.. आय मिन कविता..' अंगद राजी होत बोलला. 'बरं.. त्या प्रीतीचं काय?' कविता पहिल्या मुद्द्यावर आली. 'अगं काय त त.. कविता..तू उगीच मला कोंडीत पकडत आहेस.  'बरं माझ्याविषयी तुझं काय मत?' कवितानं पुन्हा एकदा अंगदला कोड्यात टाकलं. 'तू खरंच सुंदर आहेस गं.. तू माझ्यापेक्षा लहान असतीस तर...'  अंगद बोलता बोलता थांबला. 'तर काय रे अंगद.. बोलना..' कविताचा प्रश्न. 'तर मी..' अंगद पुन्हा थांबला. 'माझ्याशी लग्न केलं असतं ना..' कवितानं वाक्य पूर्ण केलं. 'हो.. पण आता परिस्थिती वेगळी आहे. ' अंगद विनम्रपणे बोलला. 'काही वेगळी नाही.. तू मला लहानपणापासूनच आवडत होतास.. पण मी तुझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी अन् लवकर लग्न झाल्याने दोन लेकरं झाली. तेवढाच काय बदल. बाकी काहीच बदललं नाही. मी आजही तुझ्यावर...' बोलता बोलता कविता अडखळली. पण कविताच्या सर्व भावना अंगदपर्यंत पोहोचल्या होत्या. 'पण कविता आता या गोष्टींचा काय फायदा? तुझा संसार चांगला आहे. सोन्यासारखा नवरा.. दोन मुलं आणखी काय पाहिजे?' अंगद कविताच्या खांद्यावर हात ठेवत बोलला. 'हो अंगद मी सुखी आहे. पण.. ',  'पण काय?' अंगद मध्येच बोलला.  'हेच की सुख आहे.. पण पुरेसं नाहीरे.. काकासाहेब हल्ली दारूच्या खूप आहारी गेलेत. दररोज दारू लागते. घरी आले की दोन घास खाऊन गार होतात. मी त्यांच्या सुखासाठी झुरते. पैसा, दागदागिने अशी सर्व सुखं ते मला देतात पण.. त्या सुखाचीच उणीव भासते रे...' कविता डोळ्यांत पाणी आणून सांगत होती. 'पण कविता..' अंगद बोलण्याच्या प्रयत्नात असतानाच 'पण बिन काही नाही. तू मला ते सुख देशील अंगद?' कविता मनातलं बोलून गेली. अंगदला काय बोलावं नि काय नाही, सूचेना. तो स्तब्ध झाला. त्याची नजर शून्यात होती. डोक्यात विचारांचं थैमान होतं. कविता लहानपणापासूनच अंगदवर प्रेम करत होती हे त्याला आता कळलं होतं. अंघोळ करताना कविताला बघितलं होतं तेव्हा अंगदच्या भावना उफाळल्या होत्या जरूर. मात्र, तो तातडीनं सावरलाही होता. तो कविताकडे अशा भावनेतून बघूही शकत नव्हता. त्याला शिक्षण आणि नोकरीसाठी काकासाहेब आणि कवितानं आश्रय देऊन जे उपकार केले ते तो कसा विसरणार होता. पण आता कवितानं तर त्याला मोठ्या धर्मसंकटात टाकले होते. काय करावे काय नाही.. असे एक ना अनेक विचार त्याच्या डोक्यात घोंघावत होते. अंगदने डोळे मिटले. कविता जवळच होती. तिनं डोळे मिटलेल्या अंगदच्या ओठांवर ओठ टेकवताच अंगद भानावर आला. पण तिला तो त्या क्षणी तरी नाही म्हणू शकला नाही. उफाळलेल्या लाटा किनाऱ्यावर आदळल्याशिवाय शांत होणार नव्हत्या. अंगद जणू भावनाहिन झाला होता. तो त्या क्षणाला तरी होकारही देऊ शकत नव्हता आणि नकारही...
............................
अंगदनं  काकासाहेबांचं घर सोडलं होतं.  तो कंपनी परिसरातच खोली करून राहू लागला. तो नोकरीतही बऱ्यापैकी रुळला होता. कविताच्या ईच्छापूर्तीसाठी तो कधी तिच्या घरी जायचा तर कधी कविता त्याच्या खोलीवर जात असे. सुमारे वर्षभर हा सिलसिला सुरू होता. कविताची अंगदबरोबरची उठबैस एव्हाना ती राहत असलेल्या अपार्टमेंटमधील लोकांना खटकत होती. पण काकासाहेब यापासून अनभिज्ञ होता. कविताच्या मामाचाच मुलगा आहे शिवाय तिच्यापेक्षा लहान म्हणून काकासाहेबला कधी संशयाने शिवलेच नाही. अगदी काकासाहेबसमोर कविता त्याच्या बाईकवर बसून खरेदी किंवा इतर कोणत्याही निमित्तानं बाहेर पडायची.
अंगदचा सहवास लाभल्यापासून कवितात मोठाच बदल झाला होता. तिला अंगद आणि अपार्टमेंटमध्ये राहणारा एक  पुरुष सोडला तर इतर पुरुषांचा प्रचंड तिटकारा करू लागली. अंगद आणि ती व्यक्ती सोडली तर इतर पुरुष म्हणजे तिच्यासाठी खलनायक. 
............................
एका दिवशी सकाळीच अंगद काकासाहेबांकडे एक निरोप घेऊन आला. अंगदचे लग्न ठरले होते. साखरपुड्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण  देण्यासाठीच तो आला होता. कविताही घरीच होती. अंगदने कविता आणि काकासाहेब यांना लग्न ठरल्याचे सांगताच कविताच्या चेहऱ्यावरील सर्व रंग उडाले.  डोळ्यांत पाणी तरळलं. अंगदची साथ सुटणार या भीतीनं कविता हादरून  गेली. काकासाहेब बोलता बोलता चार वेळेस अंगदचं अभिनंदन करून बसले. पण कविताच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. 'तुम्ही दोघंही या नरसापूरला', असा निरोप देऊन अंगद बाहेर पडला तो कविताच्या आयुष्यात परत यायचे नाही याच निर्धाराने.... हेच कारण होते पुरुषद्वेष्ट्या कविताभाभीच्या अस्वस्थतेचे...

सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८

मिठू मिठू


पहाटेचे तीन वाजले होते. गण्या गाढ झोपेतही अंथरुणात बुळबुळ करत होता. 'मला माफ कर.. मी चुकलो.. ' असे काही तरी बरळत होता. त्याच्या हा असंबद्ध बोलण्यामुळे पत्नी मालतीला जाग आली. ती गण्याचा असा झोपेतला अवतार पहिल्यांदाच बघत होती. त्यांच्या लग्नाला २० वर्षे झाली होती. पण हा प्रकार तिला प्रथमच अनुभवायला मिळाला. गणू महाराज स्वप्नात असावेत, याची तिला खात्री पटली. म्हणून तिने गणूला आवाज न देता चुपचाप तो झोपेत काय काय करू शकतो, हे उत्सुकतेनं बघत होती. 'संध्या मला माफ कर.. मी खरंच चुकलो गं!', असे म्हणत झोपेतच हात जोडून गण्याने एक लोळण घेतली आणि धडाम करत तो पलंगावरून फरशीवर आपटला.  गण्याची झोप पुरती उडाली होती. पण मालतीच्या डोक्यात तारे चमकू लागले होते. गण्यानं झोपेत केलेल्या संध्याच्या उल्लेखामुळे मालतीच्या डोक्यात काजवे चमकू लागले होते.
'काय गणू महाराज! काय सुरू आहे तुमचं! आज तारे जमिनीवर कसे?' मालती फरशीवर लोळत असलेल्या गणूला म्हणाली.
मालतीनं आपल्याला फरशीवर पडल्याचं बघितलेलं दिसतं याची जाणीव झाल्यानं गणू ओशाळून गेला.
'संध्यानं धक्का दिला वाटतं?' मालती कुचितपणे बोलली.
'कोण संध्या? मी नाही ओळखत!' झोपेचे सोंग घेत गण्या बोलला.
'तीच हो.. आता तुम्हाला पलंगावरून धक्का देणारी!' मालती थट्टेच्या सुरात बोलली.
'अगं मी पलंगाच्या कडेवर झोपलो होतो. कुस बदलताना तोल गेला माझा!' गणू सावरासावर करत बोलला.
'असा कितीदा गेलाय तोल तुमचा?' मालती त्याचा पिच्छा सोडण्यास तयार नव्हती. मालतीला काय सांगावं, हेच त्याला सुचेना.
'आता मुकाट्यानं झोप.. सकाळी बोलू', म्हणत गण्या फरशीवरून उठला आणि पुन्हा पलंगावर अंगावर घेऊन झोपला. मालती त्याला बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण गण्या झोपेच्या सोंगात होता. त्याला आता उठवणं मालतीसाठी कठीण होतं.
दिवस उजाडला. किचनमधून आज भांड्याचा जरा जास्तच आवाज येत होता. मालती भांडी धुत होती की आपटत होती, हे गणूला कळत नव्हतं. रात्रीचं सोंग अजूनही सरलं नव्हतं. मालती भांडी अशी आपटत होती जणू ते गण्याचं डोकंच होतं. गणू अंगावरचं पांघरुण बाजूला सारून हळूच किचनमध्ये गेला. त्याची दोन मुलं दुसऱ्या खोलीत अजूनही झोपलेलीच होती.  संध्या रात्री आलेला राग सकाळी सकाळी भांड्यावर काढत होती, हे उघड होतं. गणू हळूच मालतीच्या मागे गेला आणि तिला अलगद मिठी मारली. पण मालतीच्या हातातल्या भांड्यानं गणूच्या हाताच्या कोपऱ्याचा अचूक वेध घेतला, तशी गणूची मिठी सैल झाली आणि तो वेदनेनं विव्हळू लागला.कोपरावर पडलेल्या भांड्याचा टण.. असा आवाज येताच गणूच्या हाताच्या मुंग्या मस्तकापर्यंत गेल्या.
'आई गं..मेलो..!' असा आवाज गणूच्या तोंडून निघाला.
'काय झालं बाबा..' गणूचा मोठा मुलगा प्रतीक यानं बाजूच्या खोलीतून आवाज दिला.
'अरे काही नाही बाळा तू झोप.. भिंतीचा कोपरा लागला!' गणूनं ओरडूनच सांगितलं.
'चहा बनवून देऊ की संध्या येणार बनवायला?' मालती  विक्रम-वेताळ्याच्या कथेतील वेताळासारखी अडून बसली होती.
'माझे आई सांगतो तुला सगळं..! पण आता नाही हं', मालतीच्या कपाळावर डोकावणारी बट बाजूला सारत गणू बोलला.
'हात नका लावू मला!' मालती खेकसली.
'कुठं लावला?' खांदे उडवत गणू बोलला.
'माझ्या केसांनाही नाही!' मालती पुन्हा खेकसली.
'बरं..'  विश्राम मुद्रेत असलेला गणू सावधान होत बोलला.
'बरं त्या संध्याचं काय?' मालतीची सुई पुन्हा संध्यावरच येऊन अडकली.
'अगं काही नाही... मी स्वप्नं बघितलं. संध्या नावाची माझी कॉलेजची मैत्रिण माझ्या स्वप्नात आली.आमची केवळ फ्रेंडशिप होती. अफेअर वगैरे काहीच नाही बरं का.' गणू सांगत होता.
'अफेअर नव्हतं तर ती स्वप्नात आलीच कशी?' मालतीनं वकिली पाॅइंट हाणला.
'अगं स्वप्नं काय मी रचलं होतं का?' गण्या चिडून बोलला.
'बघितलं तर तुम्हीच ना!' चिडक्या सुरात मालती बोलली.
'तू आधी नीट ऐकून घेणार असशील तर पुढचं बोलतो. नाही तर ती संध्याही गेली चुलीत अन् तुही जा', म्हणत गणू पाय आपटून वळला.
'बरं बरं... या इकडं.. मी नाही बोलत आता,' संध्यानं तह केला.
'अगं स्वप्नात मी तिच्यावर..',  अवंढा गिळून गणू थांबला.
'काय केलं तुम्ही..' मालती पुन्हा एकदा बोलली.
'तू थोबाड बंद ठेवलं तर मी उघडतो..!' गणू पुन्हा चिडला.
'बरं बाई.. नाही तरी तुम्ही पुरुष मंडळी बायकांना बोलूच कुठं देता!' त्रागा करत मालती बोलली.
'आता वीस वर्षांपासून तूच बोलतीना.. मी आज कुठे बोलतोय तर तोंड घालू नकोस मधेमधे', गणू वैतागून बोलला.
'बरं जाऊ द्या.. सांगाना  काय केलं तुम्ही...'
'अगं मी तिच्यावर बळजबरी केली..'
'अच्छा तर हे पुण्यकर्मही तुम्ही करता म्हणायचं!', मालती पुन्हा एकदा बरळली.
'अगं पूर्ण ऐकून तर घे...' गण्या वसकला.
'बरं बाई..' म्हणत मालती भांड्यावर हळूवार हात फिरवत बोलली.
'आम्ही पिकनिकला गौताळा अभयारण्यात गेलो होतो. संध्याला झाडावरचे पोपट दाखवत आम्ही इतरांना पुढे जाऊ दिले आणि मी तिचे तोंड दाबून अत्याचार केला. संध्या या प्रकाराविषयी कोणाला काहीच बोलली नाही. पण दुसऱ्या दिवशी ती माझ्या घरी आली. तिनं माझ्याकडे लग्नाचा प्रस्ताव मांडला. पण माझं आणि तुझं (गणू-मालती) अफेअर असल्यानं  मी लग्न करूच शकत असं सांगून स्पष्ट नकार दिला. तिसऱ्याच दिवशी तिनं तिच्या फेसबुक अकाउंटवर 'ME TOO' पोस्ट केली.  मी अकबर, नाना, अलोकबाबू यांच्या रांगेत जाऊन बसतो की काय याची भीती वाटू लागली. बरं मी एक चाकरमान्या माणूस. माझ्या दिमतीला ९० वकीलही येऊ शकत नाहीत. की मी संध्यावर कोट्यवधी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावाही करू शकत नाही. तरीही मी स्वत:ला दोषी समजून संध्याला फोन करून घरी बोलावलं.  मी तिला  मालतीवरच प्रेम करतो, असं बेंबीच्या देठापासून सांगण्याचा प्रयत्न केला. पणी ती माझ्याशी लग्न कर नाही तर तुला आत्ताच खल्लास करते, अशी धमकावत होती. मी शेवटी मेलो तरी चालेल पण तुझ्याशी लग्न करणार नाहीच, असं शेवटचं सांगून टाकलं. त्यावर तिनं पर्समधून पिस्तुल काढून माझ्यावर रोखलं.  जिवाच्या भीतीनं मी  'मला माफ कर.. मी चुकलो.. ' असं सारखं  विनवत होतो. पण तिनं एक गोळी झाडलीच. ती थेट माझ्या छाताडात घुसली. मी जमिनीवर कोसळलो. ती जमीन आपल्या घरातली फरशी होती गं.' गणूनं आपलं पूर्ण स्वप्न सांगून टाकलं.
'वाचले गं बाई...हे स्वप्नं होतं तर..', मालती  मोठा श्वास घेत बोलली.
'होय गं..' गणूही मोठा श्वास घेत बोलला.
मालतीचं आता पूर्ण समाधान झालेलं होतं. पण गणूला असं स्वप्नं पडण्याचं कारण काय? असा प्रश्न तिला भेडसावत होता. शेवटचं भांडं नळाखाली खंगाळून मालतीनं चहा मांडला. तिनं मुलांनाही चहा घेण्यासाठी आवाज दिला. सगळी मंडळी सोफ्यावर बसून चहाचा आस्वाद घेत होती. कधी पेपर न वाचणाऱ्या मालतीनं टी पॉयवर पडलेला पेपर हातात घेतला. त्यातील शीर्षकांवर ती नजर फिरवत होती. तिची नजर पेपरमध्ये छापून आलेल्या 'ME TOO' च्या तीन प्रकरणांवर नजर पडली आणि मालतीही भूतकाळात पोहोचली.  चहाचे घोट घेत ती सोफ्यावरून उठली. नकळतच गॅलरीत पोहोचली. घरामागील झाडावर बसलेला एक 'मिटू' तिला वाकुल्या दाखवत होता...

शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१८

तीन भवान्या (विनोदी)


ब्रह्मदेव दरबारात बसले होते.  'नारायण नारायण..' एैसा आवाज त्यांच्या कानी पडला. ब्रह्मदेवाच्या चेहऱ्यावर हास्याच्या छटा उमटल्या. दरबारात एंट्री करण्यापूर्वी नारदमुनी 'नारायण नारायण' असा गजर देत. त्यामुळे या वेळी नारदमुनी काही तरी वेगळी खबर देतील, हे ब्रह्मदेवाला ठाऊक होते. थेट ब्रह्मदेवासमोर नारदमुनी प्रकटले.
'वंदन करतो ब्रह्मदेवा..'  नारदमुनींनी वाकून ब्रह्मदेवाला नमस्कार केला.
'आयुष्यमान भव मुनीवर..' ब्रह्मदेवानं नारदमुनींना आशीर्वाद दिला.
'सांगा मुनीवर, काय खबरबात आणलीय आज? या वेळी आपल्या भेटीत एवढा खंड का? ' ब्रह्मदेवांनीच बोलायला सुरुवात केली.
'क्षमा मान्यवर.. या वेळी मी पृथ्वीतलावर गेलो होतो. त्यामुळे आपल्या भेटीत खंड पडला. पृथ्वीवर सध्या अनेक घडामोडींचे वादळ उठल्यानं तेथील परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो देवा.' नारदांनी स्पष्ट केलं.
'काय म्हणताय मुनीवर कळलं नाही.' ब्रह्मदेवानं मध्येच टोकलं.
' घटना घडामोडी प्रचंड आहेत. विशेषत: भारत देशात अधिकच आहेत. हे सगळं इथं सांगत बसलो तर खूप वेळ जाईल आपला. काही गोष्टी तर मलाही कळाल्या नाहीत. भारतात काही दिवसांपूर्वीच म्हणे तेथील न्यायदेवेतनं कलम ३७७ मधून समलैंगिकतेला वगळलेय. त्यानंतर काही दिवसांतच व्याभिचाराला गुन्हा ठरवणारं भारतीय दंड संहितेचं कलम ४९७  अवैध ठरवलं आहे. महाराज मला तर कायद्याचं अजिबात ज्ञान नाहीय. तुम्हीच जर हे विस्तारानं जाणून घेतलं तर बरं होईल ' नारदमुंनीनी आपलं बोलणं पूर्ण केलं.
कलम ३७७, ४९७ ही भानगड ब्रह्मदेवालाही कळाली नाही. ब्रह्मदेवाची उत्सुकता प्रचंड ताणली गेली. भारतात चालले तरी काय? हे जाणून घेतलंच पाहिजे, असा निर्धार ब्रह्मदेवांनी केला.
'मुनीवर... पुन्हा पृथ्वीतलावर जाण्याची तयारी करा. मी जरा फ्रेश होऊन प्रवासाची तयारी करतो.' ब्रह्मदेवाने आदेश केला.
'होय महाराज...पण एक परंतु आहे. भारतात जायचं असेल तर मोठा धोका पत्करावा लागणार आपल्याला.' नारदमुनी चिंतीत मुद्रेत बोलले.
'काय किंतू आणि परंतु.. कसला धोका मुनीवर?', ब्रह्मदेव तडकाफडकी बोलले.
'त्याचं काय महाराज भारतात सध्या मॉब लिंचिंग नावाचा एक विचित्र प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोणताही अनोळखी माणूस दिसला की भारतातले लोक अंगात सैतान शिरल्यासारखी मारहाण करतात. '
'बापरे.. हा काय प्रकार?' ब्रह्मदेवाच्या आवाजात भीतीचे कंपण होते.
'देवा हे तर काहीच नाही..  नोटबंदी, शेतकरी आत्महत्या, रफाल घोटाळा, शबरीमाला मंदिर अशा कितीतरी भानगडी मी भारतात बघितल्या. त्यामुळे आपल्याला सामान्य माणूस म्हणून भारतात जगता येणार नाही. थोडं हायफाय गेटअप करावं लागेल. '
'ठीक आहे मुनीवर.. तुम्ही म्हणाल तसं!', असे बोलून ब्रह्मदेव सिंहासनावरून उठले. जाताना त्यांनी सेवकांना 'माझी बॅग भरारे. वाहनही तयार ठेवा', असा आदेश दिला. नारदमुनीही अदृश्य झाले.
ब्रह्मदेवाची पृथ्वीवर अर्थात भारताकडे कूच करण्याची तयारी पूर्ण झाली होती. दैनंदिन गरजांसाठी लागणारं साहित्य त्यांनी आपल्या वाहनात कोंबले होते. ब्रह्मदेवांनी मनगटावरील घड्याळीकडं बघितलं. 'हे नारदमुनी ना कधीच वेळेत येत नाही.' असे स्वत:शी पुटपुटले. तेवढ्यात 'नारायण नारायण'चा गजर त्यांच्या कानी पडला. पुन्हा ब्रह्मदेवांच्या चेहऱ्यावर हास्यछटा उमटल्या. काही क्षणातच मुनी त्यांच्यासमोर प्रकटले.
'महाराज निघण्याची तयारी झालीय ना?' मुनींनी प्रश्न केला.
'होय मुनीवर...' ब्रह्मदेवाचे उत्तर.
'सोन्याची नाणी, माणिक मोती, पवळे हे सर्व सोबत घेतले ना?' मुनींनी प्रश्न केला.
'मुनीवर याची काय गरज?' ब्रह्मदेवाचा प्रश्न.
'महाराज.. भारतात पैशांची खूप गरज आहे. तेथील सरकार कधीही नोटबंदी करू शकते. सोन्याच्या बदल्यात नोटा आपल्याला सहज मिळवता येतील.शिवाय फोर व्हिलर, अॅपल नाही तर अॅन्ड्रॉईडफोन, थ्री बीएचकेडी घर इत्यादी इत्यादी खरेदी करण्यासाठी आपल्याकडे धन असणे गरजेचे आहे.' मुनींनी बोलणे पूर्ण केले.
'सेवक... त्या कुबेरजींना मुनी सांगितील तेवढे धन द्यायला सांगा!' ब्रह्मदेवाने आदेश दिला.
'जी देवा!' सेवकाने आदबीने होकार देत नारदमुनींना सोबत चलण्याचे संकेत दिले. थोड्याच वेळात एक मोठी पोटली घेऊन सेवक आणि मुनी परतले.
ब्रह्मदेव आणि मुनींचा भारतभूमीच्या दिशेने प्रवास सुरू झाला. अनेक ग्रहताऱ्यांचा प्रवास करत त्यांची स्वारी भारतभूमीवर प्रकटली. भारतभर पसरलेल्या 'सुलभ' नावाच्या संस्थेच्या एका स्नानगृहात अंघोळ करून देव आणि मुनींनी भरजरी वस्त्रांऐवजी भारतातील उच्च भ्रू मंडळी परिधान करतात तशी वेशभूषा केली. नंतर ते वास्तव्याचे ठिकाण शोधू लागले. अनेक वस्त्या, गल्ल्या पालथ्या घातल्यानंतर देव आणि मुनींनी आटपाटनगरातच वास्तव्यास राहणे पसंद केले. तेथेच त्यांनी सेकंड सेलचा वन बीएचके फ्लॅट खरेदी केला. कारण हे आटपाटनगर म्हणजे 'कोणीही यावे अन् राहून जावे', अशी ख्याती असलेले होते. या नगरीत अगदी हुशार माणसापासून ते बुद्धीचं दिवाळं निघालेल्या व्यक्तीही राहत होत्या, याची नारदमुनींनी आधीच कल्पना दिली होती. त्यामुळं 'वासरात लंगडी गाय शहाणी' असा आपल्याला दर्जा मिळू शकतो. शिवाय थोडी पैशांची फुशारकी मारली की काही बाई माणसं गोंडा घोळत मागे येतात, याचीही नारदमुंनीनी ब्रह्मदेवाला कल्पना दिली होती.  ब्रह्मदेवानं सोबत आणलेली पोटली आधी सुरक्षित ठिकाणी ठेवली. भारतात दरोड्याचे प्रकार खूप घडतात हे त्यांना नारदांनीच सांगितलं होतं. उर्वरित सर्व सामानसुमान नीटनेटकं लावून ब्रह्मदेव आणि मुनी अंथरुणात पहुडले. पण त्यांना त्यांच्या फ्लॅटच्या खाली कोणी तरी जोरात खिदळत असल्याचा आणि मोठ्यानं बोलत असल्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांचा निद्रानाश झाला. अशा शांत परिसरात रात्री अकरा वाजता कोण खिदळत असणार, याची देवांबरोबरच मुनींनाही उत्कंठा होती. त्यांनी स्लायडिंग विंडो उघडून बाहेर बघितले असता तीन महिला एकमेकींत खुसूरफुसूर करत मध्येच मोठ्याने खिदळत असल्याचे लक्षात आले. तिघींपैकी दोन महिला शरीराने प्रचंड असल्याचे आणि त्यातीलच एक आवाजानेही प्रचंड असल्याचे मुनींनी हेरले. एक महिला सर्वसाधारण अंगकाठीची होती, मात्र ती चेहऱ्यावरून प्रचंड धूर्त जाणवत होती. मंथारा, कैकयीलाही लाजवणारी तिची मुद्रा भासत होती. या नेमक्या काय बोलत असाव्यात याची मुनीवरांची उत्कंठा प्रचंड शिगेला पोहोचली होती.
'देवा...तुम्ही खिडकीतच थांबा मी आलोच' म्हणत नारदमुनी अदृश्य झाले. या तीन महिला जेथे बसल्या होत्या तेथील पिंपळाच्या झाडावर मुनीवर पोहोचले. मुनीवर सर्वसामान्य माणसाला दिसत नसले तरी ब्रह्मदेवाला मात्र दिसत होते. तेथे बसून मुनीवरांना तिघींचं बोलणं स्पष्ट ऐकू येत होतं. त्यांचं बोलणं ऐकून मुनीवरांना गरगरायला लागलं. तरीही ते कान टवकारून बोलणं ऐकत होते. लोकांची निद्रेची वेळ असताना या तिघींसाठी दिवस उगवला होता. त्यांचं बोलणं ऐकत असताना मुनींना कलम ३७७ ची आठवण झाली. सोमरसाच्या आधीन होत नवरे झोपी गेल्यानंतर या तिघींचा हाच दैनंदिन उपक्रम असावा, अशी पुसटशी शंका, मुनींच्या मनाला चाटून गेली. आता भोवळ येऊन पडायच्या आधी आपण देवांकडे जावे, असं ठरवून मुनी फ्लॅटमध्ये दाखल झाले. त्यांनी त्या तीन महिलांत काय खुसूरपुसूर चालली याचे वार्तांकन दिले. नंतर कानात कापसाचे बोळे घालून देव आणि मुनीवर झोपी गेले. अधूनमधून त्या प्रचंड महिलेचा खिदळण्याचा आवाज दोघांच्याही कानी घुमत होता. पण त्याची पर्वा न करता दोघेही शांत झोपले. दुसऱ्या दिवशी त्यांच्यासमोर अनेक कामं होती.
सकाळ झाली. देव आणि मुनीवरांनी योगासनं केली. सोबत आणलेले तहानलाडू-भूक लाडू खाऊन दोघांनी अदृश्य रूपात घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भारतात एखाद्या व्यक्तीच्या तोंडावर वेगळे आणि माघारी वेगळे बोलण्याची पद्धत असल्याचे त्या तीन महिलांच्या बोलण्यातून मुनी आणि देवाच्या लक्षात आले होते.
दुसऱ्या दिवशी नवरे घरी नसताना आलटून-पालटून या तिघी एकमेकींच्या घरी  ये-जा करताना दिसल्यानंतर मुनीवरांना कलम ३७७ आहे तरी काय, हे जाणून घेण्याची इच्छा झाली. ३७७ हे एक चावटपणावर बंधन घालणारं कलम आहे, हे एकूण अनुभवावरून दोघांच्याही लक्षात आलं. पण सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी दोघेही एका निष्णात वकिलाच्या शोधात निघाले.
काही वेळ शोध घेतल्यानंतर  नको तिथे घाण कर वकील सापडला. या वकिलानं समाजात घाण केली असली तरी तो हुशार  होता याची नारदांना कल्पना होतीच. या वकिलाची अपॉइंटमेंट घेऊन त्याने दिलेल्या वेळेत मुनी आणि देव हजर झाले.
'वकील साहेब कलम ३७७ आम्हाला सविस्तरपणे सांगाल का?' मुनींनी पहिलाच प्रश्न केला.
'हो सांगतो... पण त्या आधी माझी फी लागेल' वकील म्हणाला.
'हे घ्या', म्हणत ब्रह्मदेवाने एक सोन्याचं नाणंच वकिलाच्या हातावर ठेवलं.
'अरे बापरे... याची किमत तर लाखात आहे. एवढी माझी फी नाहीय हो.' डोळे विस्फारत वकील म्हणाला.
'असू द्या वकील साहेब..  आधी आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या'
'पुरुषाचे पुरुषाशी लैंगिक संबंध असतील तर त्यांना   ‘गे’ म्हटले जातं. तर स्त्रीचे स्त्रीशी लैंगिक संबंध असतील, तर अशा महिलांना ‘लेस्बियन’ म्हटलं जातं. काही पुरुषांना पुरुषांचेच आणि काही स्त्रियांना फक्त स्त्रियांचेच आकर्षण वाटते. त्यामुळे भारतीय समाज व्यवस्थेत हा गुन्हा मानला जात होता. त्यासाठीच कायदा करून त्यातील ३७७ कलमान्वये हा अपराध ठरवला गेला.' वकील साहेबांनी दोनच मिनिटांत हे कलम समजावून सांगितलं.
'असं व्हय...' सुस्कारा टाकत नारदमुनी म्हणाले.
'धन्यवाद वकील साहेब... एवढा किचकट विषय तुम्ही अगदी सोप्या भाषेत आणि आमचा वेळ न दवडता सांगितला.. पुन्हा एकदा धन्यवाद..' म्हणत ब्रह्मदेवाने नारदमुनींना पुढील मोहिमेवर निघण्याचा इशारा केला. नारदमुनींच्या डोळ्यांसमोर मात्र त्या तीन भटक भवान्या अर्थात दोन प्रचंड महिला आणि एक धूर्त महिलांच तरळत राहिल्या.
...........................
छायाचित्र सौजन्य : https://365psd.com

शुक्रवार, ५ ऑक्टोबर, २०१८

चारित्र्यवाण कविता भाभी


सकाळचे नऊ वाजले होते. मोहनराव अजूनही अंथरुणातच होते. आजूबाजूला कल्ला सुरू झाल्याने त्यांची झोप उडाली. त्यांच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये बच्चेकंपनीचा गाेंधळ सुरू होता. कुणी जोराने ओरडत होते तर कुणी किंचाळत होते. 'पकडा पकडा' अशी ओरडही त्यांच्या कानावर पडली. त्याच वेळी 'रंग बरसे भिगे चुनरवाली, रंग बरसे' हे अमिताभच्या आवाजातील सुरेल गीतही मोहनरावांच्या कानी पडली. आज होळीचा धुळवड सण आहे, हे त्यांना लगेच कळून चुकले. तसेही मोहनरावांचा आवडीचा सण मुळी नव्हताच. पण एखादा उत्साही मित्र त्यांना रंगवल्याशिवाय सोडत नव्हता. मित्रांच्या आग्रहाखातर ईच्छा नसतानाही गालावर नकोसा रंग लावून घेणे त्यांना भाग पडायचे.  तसेही शहरी धुळवडीपेक्षा त्यांना खेड्यात साजरी होणारी धुळवडच अधिक पसंद होती. शहरी धुळवडीत वापरले जाणारे केमिकलयुक्त गडद रंग ताेंडाला लावल्यास माकड तरी बरे दिसावे, अशी म्हणण्याची वेळ. त्यामुळे मोहनराव स्वत:हून या सणापासून चार हात दूरच राहणे पसंद करायचे. खेड्यात पळसाची फुले कुटून त्यापासून बनवलेला गुलाबी रंग खेळण्याची मज्जाच काही और असायची.
मोहनरावांची कन्या झोपेतून उठताच मैत्रिणींसोबत धुळवड खेण्यासाठी गेली होती. मोहनराव अंथरुणातून उठले. डोळेचोळत घड्याळीकडे पाहिले. नऊचा टोल पडण्यास काही मिनिटीचे उरली होती.
'छकुली.. ए छकुली...' मोहनरावांनी हातपाय ताठत हाडांचा आवाज येईपर्यंत शरीर ताणून आळस देतच आवाज दिला.
'अहो ती आत्ताच बाहेर गेलीय. मैत्रिणीकडे!' केशरचा किचनमधून आवाज आला.
'आयला.. सकाळीच पळाली का ही कारटी.. आता बघ भुतासारखं तोंड घेऊन घरी येणार ती..' मोहनराव पुटपुटले.
'जाऊ द्या हो. लेकरूच ते.. खेळेल मैत्रिणीसोबत. वर्षातून एकदाच तर होळी असते ना!' हातात लसणाचा गाठा घेऊन उभ्या केशरने मोहनरावांना समजावले.
'खेळू दे.. पण आजकालचे रंग चांगले नसतात गं. स्किन इन्फेक्शनची जास्त भीती असते. ' मोहनरावांनी एक जांभळी देत म्हटले.
'तुमचं आपलं नेहमींचंच... असो चहा घेताय ना?' केशरने मध्येच प्रश्न केला.
'चहा नको.. आज दारूचा मूड आहे  माझा!' मोहनरावांना थट्टा सूचली.
'हो का... कधी चमचाभर तरी प्यालात का?' केशरने बाऊन्सर टाकला. त्यावरच मोहनराव क्लिन बोल्ड.
'पित नाही म्हणून काय झालं.. आज घ्यावीच लागेल!' मोहनराव पुन्हा थट्टेच्या मूडमध्ये आले.
'ठीक आहे.. पप्पांनाच आणून द्यायला सांगते तुम्हाला खंबा', केशरने गुगली टाकली. यावर मात्र मोहनराव पायचित झाले.
'बरं बाई... बागुलबुवाचं नाव सांगून मला घाबरवण्याचं तू सोडणार नाहीसच ', म्हणत मोहनराव बाथरुममध्ये बंदिस्त झाले.
मोहनराव बाथरुममधून बाहेर येईपर्यंत केशरने अद्रकीचा चहा तयार ठेवला. दोघेही एकाच सोप्यावर चहाचे गोड घोट चाखत बसले.
'तुम्ही आज कुठे जाणार नाहीत ना?' केशरने प्रश्न केला.
'कुठे जायचेय?' मोहनरावांनी प्रतिप्रश्न केला.
'रंग खेळायला म्हणतेय मी!' केशरने स्पष्ट केले.
'लेकरं बाहेर... आपण घरातच खेळूत ना रंग!' मोहनरावांना पुन्हा थट्टा सूचली. 
'तुमच्या जिभेला काही हाड... ' केशर लाजून म्हणाली.
'मी रंगच खेळायचो म्हटलो.तुम्हा बायकांना ना कुठल्या वेळी काहीही सूचते!' केशरच्या डिवचत मोहनराव बोलले.
' तुमचं दादा कोंडक्यासारखं बोलणं कळते म्हटलं मला', केशरने मोहनरावांचा चावटपण ओळखत उत्तर दिले.
'असो.. कुणी मित्र आलाच तर लावून घेईन एखादा टिळा. बाहेर जाण्याचा बेत नाही. ' मोहनरावांनी स्पष्ट केले.
'आज जेवायला काय करायचं?' केशर म्हणाली.
'मटण आणतो की!',  मोहनरावांनी ताबडतोब उत्तर दिले.
'आणा.. मी कामं आवरून मसाला भाजते', म्हणत केशर चहाचे रिकामे कप घेऊन किचनमध्ये दाखल झाली.
पारोशा अंगातच मोहनरावांनी कपडे चढवून घर सोडले. थोड्याच वेळात ते मटण, कोथिंबीर आणि काही भाज्या घेऊन घरी दाखल झाले. सोबत आणलेली रंगाची पुडीही त्यांनी उघडली. 'औपचारिकपणे पत्नी केशरला 'हॅप्पी होली' म्हणत लाडीवाळपणे केशरच्या गालावर रंगाचा ठिपका लावला.  केशरनेही कोरडाच हात त्यांच्या गालावर फिरवून 'हॅपी होली डिअर' म्हणत प्रेमाचा चौकार लगावला.
 मोहनरावांनी अंगावरील शर्ट-पँट काढल्यानंतर केशरने त्यांना नेहमीप्रेमाणे अंघोळीला जाण्याचा सल्ला दिला. पण  एखादा मित्र टपकलाच तर तो रंगवणार असे गृहित धरून दुपारपर्यंत तरी अंघोळीची गोळी घेण्याचे मोहनरावांनी ठरवले होते. 
'केशर तो होम थिएटरचा छोटा रिमोट दिसलाय का तुला? मोहनराव टेबलवर शोधाशोध करत म्हणाले.
'तो काय खिडकीत! एवढे मोठे डोळे असून काहीच कामाचे नाहीत!' केशरने नेहमीचा डायलॉग फेकला.
'मी काय अंधळा नाही. पण दिसला नाही एवढंच!', खजील होत मोहनराव म्हणाले.
'आत्ता काय गाणे लावून साहेबांना नाचायचं की काय?' केशर मस्करी करत म्हणाले.
'नाचायचं नाही नाचवायचं आहे... खाली सोसायटीतले लेकरं जमलेत त्यांना नाचवायचंय!' मोहनरावांनी स्पष्ट केले.
'अच्च्छा तर घरातली वस्तू सार्वजनिक करायचीय वाटतं तुम्हाला.' केशर खोचकपणे बोलली.
'अग लावतो तासभर गाणी. रंग खेळत लेकरं नाचतील काही वेळ' मोहनरावांनी समजुतीच्या सुरात सांगितलं.
'तुम्ही माझे ऐकणार थोडी आहात. न्या ते होमथटर..' केशर मटणाची कॅरिबॅग पातलेल्या ओतत म्हणाली.
पुढे काहीच न बोलता मोहनरावांनी होम थिएटर, वायर वगैरे सर्व वस्तू कवेत घेत पार्किंग गाठले. शेजारच्या खोलीतून करंट घेऊन होम थिएटरवर गाणी वाजवायला सुरुवात केली. बच्चे कंपनी रंगात रंगत गाण्याच्या तालावर नाचू लागली.  थोडा वेळ मुलांचा डान्स बघून मोहनराव घरात परतले. तोपर्यंत केशरने मटण शिजायला घातले होते.
'मी काही मदत करू का तुला?', मोहनरावांनी केशरला विचारले.
'जास्त काम तर नाही.. पण मिक्सरवर मसाला वाटून दिला तर सोपं होईल.' केशर अज्ञेच्या स्वरात बोलली.
'भाजणं झाला ना मसाला.. दे तर..' म्हणत स्वत:च मोहनराव किचन ओट्याकडे गेले. थाळीत भाजून ठेवलेला मसाला मिक्सर पॉटमध्ये ओतला आणि मसाल्यात पाणी ओतून तो मिक्सरवर गरगरा फिरवला. नुसत्या मसाल्याच्याच वासाने मोहनरावांना जास्त भूक लागल्यासारखे झाले.
'भाजीला किती वेळ लागेल?' मोहनरावांनी प्रश्न केला.
'मटण शिजायलाच अजून पंधरा मिनिटे लागतील. तोपर्यंत मी पोळ्या करून घेते', म्हणत मळून ठेवलेला कणकीचा उंडा केशरने किचन ओट्यावर ठेवला.
'बरं मी खाली एक चक्कर मारून येतो. कारटे होम थिएटरमध्ये पाणी सोडायचे', असे सांगून मोहनराव घराबाहेर पडले. मोहनराव एकाच मिनिटात खाली गेले. पार्किंगमध्ये मुलांची धमाल सुरू होती. रंग खेळत नाचणाऱ्या एका मुलाची आई अर्थात कविता भाभीही उत्सुकतेने मुलांचे नृत्य बघत उभी होती.
ही कविता भाभी म्हणजे एक अजबच नमुना.. अंगकाठीनं शिडशिडीत. मात्र दिसायला सर्वसामान्यच. पण तिची स्पर्धा ऐश्वर्या रायशी होती. आपण दिसायला ऐश्वर्यापेक्षाही सुंदर आहोत, असा तिचा समज. तिचा नवरा अभिषेक नसला तरी तो सज्जन पुरुष. मात्र रात्र झाली की त्यालाही कविता भाभी ऐश्वर्याच काय तर एखाद्या अप्सरेपेक्षाही सुंदर वाटायची. त्याचे कारणही तसेच. ड्युटीवरून घरी येतानाच कविता भाभीच्या नवऱ्याचा एखाद्या बार अॅण्ड रेस्टॉरेंटमध्ये तासाभराचा थांबा असायचा.  बारमध्ये येथेच्छ ढोसल्यानंतर झिंग येताच तो घराकडे निघणार. घरी पोहोचल्यावर कविता भाभी त्याला ऐश्वर्याच वाटायची.
त्या दिवशी मोहनरावांना कुठून दुर्बुद्धी सुचली देव जाणे. बच्चेकंपनी 'रंग बरसे भिगे चुनर वाली' गाण्यावर बच्चेकंपनी नाचत असताना मोहनरावही थोडे रंगात आले. पाठमोऱ्या उभ्या कविता भाभीच्या समोर जाऊन अचानक त्यांनी 'हॅपी होली' म्हणत दुरूनच कविता भाभीला रंग लावण्याची अॅक्टिंग केली. वास्तविक मोहनरावांच्या हाताला ना रंग होता ना त्यांनी कविता भाभीला स्पर्श केला. चौकीदाराची बकुळाही बाजूलाच उभी होती. पण  दुरूनच हॅपी होली म्हणणे मोहनरावांना बाराच्या नव्हे तर तेरा-चौदाच्या भावात पडले. त्या क्षणी कविता भाभीनेही हसून मोहनरावांना प्रतिसाद दला. पण  हॅपी होलीचा तो क्षण चार तासांनंतर सॅड होलीमध्ये रूपांतिरत होणार हे मोहनरावांनाच काय तर ब्रह्मदेवालाही कळणारे नव्हते. कविता भाभीने मुलांची मौजमजा पाहत अर्धा तास घालवला. तासाभरानंतर ती घरीही गेली. शेजारच्या घरी होळीच्याच दिवशी आयोजित कार्यक्रमाला तिने  हजेरी  लावली. तेथे मिळालेली खीर मोहनरावांसमक्ष वरपली.शेजारपाजारच्या महिलांसोबत ती बराच वेळ खिदळत होती. जणू काही ती गोकुळात होती.
मुलांची धुळवड खेळणे संपले होते. मोहनरावांना होम थिएटर घरी घेऊन जायची आठवण झाली. त्यासाठी ते खाली गेले. पण तेथील नजारा वेगळाच होता. कविता भाभीच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. पदराने डोळे पुसताना तोंडावर लावलेला पावडरचा लेपही मिटत होता. मोहनराव दिसताच कविता भाभी त्यांच्याकडे डिवऱ्या म्हशीसारखी बघू लागली. चौकीदाराची बायको बकुळाही धावतच त्यांच्याकडे गेली.
'साहेब आता तुम्हीच भाभीला समजवा. तुमच्यामुळंच त्या रडू  लागल्यात बघा.'
बकुळाचे बोल मोहनरावांचे कान चिरतच मेंदूपर्यंत पोहोचले होते.
'काय.. काय म्हणतीस बकुळा', मोहनरावांचा कानावर विश्वास बसला नाही म्हणून त्यांनी पुन्हा विचारले.
'हो साहेब... तुम्ही मजाक केलेली भाभीला आवडली नाही. त्या अर्ध्या घंट्यापासून रडायल्यात बघा' बकुळानं पुन्हा मोहनरावांच्या कानात गरम तेल ओतलं.
काही क्षण तर मोहनरावांना बकुळा काय बोलतेय हे लक्षात येईना. कविता भाभीची आपण काय मजाक केली, हेही त्यांना आठवेना. कविता भाभीसोबत दोनच मिनिटे बोलल्याचे त्यांना आठवत होते. पण बकुळा तर 'मजाक' केल्याचे सांगत होती. या दोघी आपलीच तर 'मजाक' करीत नाही ना, असाही प्रश्न त्यांना पडला. पण कविता भाभीच्या एका डोळ्यातून गंगा तर दुसऱ्या डोळ्यातून जमुना वाहत होती. हे पाहून मोहनरावांना कोरड्या विहिरीत पडल्याचा भास झाला. तरीही कविता भाभी का रडतेय, हे जाणून घेण्याची मोहनरावांना उत्सुकता होती. ते भाभीजवळ गेले.
'काय झालं ताई?' मोहनराव भाबडेपणाने म्हणाले.
'भाऊ तुम्ही मजाक केली ते मला आवडली नाही' कविता भाभी अश्रू ढाळतच बोलली.
'मी काय मजाक केली बुवा', मेंदूला ताण देत मोहनराव म्हणाले.
'तुम्ही सकाळी मला हॅप्पी होली म्हणत मजाक केली ते...' जोराचा हुंदका देत कविता भाभीने आठवण करून दिली.
'हो.. म्हणालो होतो हॅप्पी होली.. मग काय बिघडलं', मोहनराव सहज बोलून गेले.
'मजाक करायच्या आधी तुम्ही मला एकदा विचारयचं तर ना..' गंगा-जमुनांचा पाट पदराने अडवत कविता भाभी बोलली.
'हॅप्पी होली म्हणणं मजाक वाटतेय तुम्हाला?', मोहनरावांनी प्रश्न करत खातरजमा केली.
'हो.. मजाकच.. मला नाही आवडली ती मजाक', भाभी रडक्या सुरातच बोलली.
मजाक शब्द वापरून कविता भाभी आपली क्रूरपणे थट्टा करत असल्याचा भास मोहनरावांना झाला. 'हॅप्पी होळी' म्हणणे कोणत्या अँगलने मजाक ठरू शकते, हे मोहनरावांच्या मेंदूलाच काय तर मनालाही पटेना. तरीही कविता भाभीसाठी हे दोन शब्द शिवी वाटत असावेत, अशी स्वत:ची समजूत करून त्यांनी भाभीची माफी मागायची ठरवले.
'हे बघा ताई.. तुमचं मन दुखावण्याचा किंवा तुमची मजाक करण्याचा माझा इरदा नव्हता. तरीही तुम्हाला इतकं वाईट वाटत असेल तर मला माफ करा', मोहनराव सडेतोडपणे बोलले.
'नाही तरी तुम्ही मजाक करायच्या आधी मला विचाराचं होतं!' कविता भाभीची सुई अजूनही तिथेच अडकून पडलेली होती.
'मी माफी मागतोय ना तुमची!' मोहनराव थोडे चिडूनच बोलले.
'मला नाही मजाक केलेली आवडत.. !' कविता भाभी एकाच सुरात गात होती.
'आता लोकं गोळा करून तुमची माफी मागू का? मी तुम्हाला एकट्यातही बोललो नाही. काय गं बकुळा.. मी काय वाईट वागलो ' मोहनराव भडकून बोलले.
'नाही साहेब.. तुम्ही काही वाईट बोलले नाही.. पण यांना तुमची मजाक आवडली नाही', बकुळानेही मोहनरावांची एकप्रकारे मजाकच केली.
'बरं ताई अजून एकदा माफी मागतो. तुम्हाला तुमचे मिस्टर काही बोलले असतील तर त्यांचीही माफी मागतो. त्यांना समजावून सांगतो', चिडलेले मोहनराव तेवढ्याच नम्रपणे बोलले.
'नाही पण.. तुमची मजाक..'
'नाही आवडली तर नाही आवडली. मी काही तुमच्या अंगाला हात लावला नाही की काही वाईट बोललो. तरीही एकदा नाही तिनदा माफी मागतो. त्यावरही तुम्हाला काय समजायचे ते समजा. मला अशा फालतू बाबींकडे लक्ष द्यायला आवडत नाही',  सविता भाभीचे बोलणे मध्येच तोडून मोहनराव बोलले.
आता तर गंगा-जमुनेला पूरच आला होता. या पुरात कोण वाहून जाणार होते, हे कोणालाही ठाऊक नव्हते. बकुळा चोमडेपणा करत कविता भाभीचे डोळे पुसत होती. मोहनरावांना आता तेथे थांबणे धोक्याचे वाटले. त्यांना बाई आणि बाटलीपासून काय धोका मिळू शकतो, याचा अंदाज होता. वेड्याच्या नादी लागलो तर दगड अंगावर येऊ शकतो, याची कल्पना आल्याने मोहनरावांनीही एकदा डिवऱ्या बैलासारखे चारित्र्यवाण भाभीकडे  बघत ते ठिकाण सोडले. घरी जाऊन मटणावर ताव मारत केशरसोबत मजाक करू लागले.

सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८

रंभेवर अत्याचार (उपहासात्मक कथा)

अस्वीकरण (disclaimer) : या उपहासात्मक कथेतील पात्र, प्रसंग काल्पनिक आहेत. याद्वारे कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीच्या, समाजाच्या किंवा धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नाही. कुणाला कथेतील एखाद्या पात्राचा स्वत:शी काही संबंध वाटला तरीही तो योगायोगच समजावा.)..................................................... 
इंद्रदेवाला स्वर्गलोकाचा कंटाळा आला होता. म्हणून तो पृथ्वीतलावर आला. साक्षात इंद्रदेवच पृथ्वीच्या दिशेने निघाले म्हणून रंभा, उर्वशी, मेनकेलाही  इंद्रासोबत पृथ्वीवर जाण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी इंद्राकडे आम्हालाही पृथ्वीतलावर न्यावे, असा विनंती अर्ज केला. पण इंद्राने यासाठी  टर्म्स आणि कंडिशन ठेवल्या.   पृथ्वीतलावर असेपर्यंत तुम्हाला मानव म्हणून वावरावे लागेल. पृथ्वीतलावर पोहोचल्यावर तुम्हाला एका सामान्य व्यक्तीशी लग्न करावे लागेल. कारण तेथे एकट्या स्त्रीला बरेच लोक वेगळ्या नजरेने बघतात. बलात्कार, किडनॅपिंग, विनयभंग अशा अनेक घटना घडतात. त्यामुळे सर्वांनी पुरुषाला भाऊ म्हणूनच संबोधावे. शिवाय त्या पुरुषालाही आपल्याला ताईच म्हणावे, असा आग्रह धरावा.  पृथ्वीवर पोहोचताच एक फ्लॅट विकत घ्यावा लागेल. तेथे तुमच्या पतीराजांना बोलण्याची मुभा नसेल. जो काही कारभार करायचा तो मी (म्हणजे स्वत: इंद्र) आणि तुम्हीच (म्हणजे रंभा, उर्वशी आणि मेनका)  करावयाचा आहे. आपापल्या पतीदेवांना सोमरसाच्या आधीन राहण्यास सांगितले तर अधिक चांगले. पृथ्वीतलावर  मी (म्हणजे इंद्र) आणि आपापले पतीदेव वगळता  इतर पुरुषांशी जास्त बोलायचे नाही, आपली ओळख लपवूनच पृथ्वीतलावर राहायचे. कोणत्याही प्रकारची तक्रार आली तर आधी माझ्याशीच डिस्कस करायची इत्यादी इत्यादी. या तिघींनी इंद्राच्या सर्व अटी क्षणार्धात मान्य करताच  इंद्रानेही विनंती अर्जावर 'ओके'चा शेरा मारला. इंद्रदेव आणि त्याचा लवाजमा भल्या मोठ्या  वाहनाने पृथ्वीतलावर दाखल झाला. पण पृथ्वीवर पोहोचताच इंद्र चक्रावून गेला. त्या नगरातील रस्ते अत्यंत छोटे होते. त्यामुळे स्वर्गलोकातून आणलेले वाहन त्या रस्त्यावरून चालणे कठीण होते. त्यामुळे त्याने ते वाहन रेल्वेस्टेशन शेजारी  पार्क केले. तेथे पावती पुस्तक हाती धरलेल्या एका काळ्याभोर  आणि धिप्पाड पोराने त्याला  १०० रुपयांची पावती दिली.
 'भाऊ हे १०० रुपये कशासाठी द्यायचे?'  इंद्राने विचारले.
'नवा आलास कारे? याला पार्किंग फी म्हणतात?'
'अरे पण ही तर जागा भारत सरकारची ना? तुला पैसे का द्यायचे?' इंद्राने प्रश्न केला.
'अे मुकुटवाल्या.. जास्त शहाणपणा करू नगंस.. नाही तर ठेवून देईन एक..' काळा पोरगा चिडला.
उगीचच अप्सरांसमोर अपमान नको म्हणून इंद्राने दोन हजार रुपयांची नोट काढून त्या काळ्या पोराच्या हाती दिली.
' ए मुकुटवाला... छुट्टा देने का? इथं श्रीमंती दाखवायची नाय..' काळा पोरगा पुन्हा भडकला.
इंद्रदेवाकडे सुटे पैसे नव्हते. त्यामुळे रंभाने पुढाकार घेत गुढ्याला खोवलेली शंभराची नोट काढून त्या काळ्या पोराच्या हाती दिली. बाडबिस्तरा उचलून इंद्राचा लवाजमा पुढे निघाला. इंद्रदेव स्टेशन परिसरावर नजर फिरवू  लागला. तेथे फुटपाथवर अनेक जण झोपलेले होते. इंद्राने चौकशी केली असता या लोकांकडे घरे नसल्याने ते दररोज येथेच झोपतात, असे सांगितले. त्यामुळे आपल्याला घर लवकर मिळेल की नाही, असा प्रश्न इंद्राला पडला. पण पृथ्वीवर खिशात पैसे असले की सर्व काही मिळते, हे इंद्राला नारदमुनीने सांगितले होते. त्यामुळे इंद्र निर्धास्त होता. रेल्वेस्टेशनच्या बाहेर पडताच इंद्राचा पाय पाणी तुंबलेल्या खड्ड्यात पडला. तसे घाणेरड्या पाण्याचे शिंतोडे त्याच्या वस्त्रांवर उडले. रस्त्यावरील खड्डे ही महापालिकेची देण असल्याचे लवकरच त्याच्या लक्षात आले. उगीच खाचखळग्यांच्या रस्त्यांवर हिंडण्यात अर्थ नाही. आपण जवळच घर बघू असे ठरवत इंद्र आणि त्याचा ताफा स्टेशनला लागूनच असलेल्या आटपाटनगरातील एका चार-पाच मजली इमारतीत पोहोचला. तेथे बरीच घरे विक्रीची असल्याचे त्याला एका रहिवाशाने सांगितले. इंद्राने तेथील मालकमंडळीशी बोलून चार घरे विकत घेतली. एक घर रंभा, दुसरे उर्वशीला आणि तिसरे मेनकेला दिले. चौथ्या घरात खुद्द इंद्र राहायला गेला.
इंद्राच्या ताफ्यातील या ललनांकडे पाहून अनेक जण लाळ गाळू लागले. तेव्हा इंद्राने घालून दिलेली अट त्यांच्या लक्षात आली. रंभा, उर्वशी आणि मेनकाने आपापले वर निवडून त्यांच्याशी संसार थाटला. इंद्रदेव आधीच अनेक बायकांचा दादला होता. तरीही त्याला येथेही लग्न करण्याचा मोह आवरला नाही. तसेही स्वर्गलोकात आणि पृथ्वीतलावर पुरुषांनी कितीही  लग्ने केली तरी चालतात, हेही नारदाने सांगितलेच होते. यासाठी त्याने अनुप जलोटा, शशी थरूर, आसाराम बापू, रामरहीम अशी काही नावेही सांगितली होती. त्यामुळे इंद्रानेही एक सामान्य महिलेशी विवाह केला.
काही दिवस लोटले. इंद्राने संपूर्ण शहराची माहिती करून घेण्यासाठी एक छोटे वाहन खरेदी केले. पण खड्डेमय शहरात फिरताना या वाहनातील पेट्रोल लवकर संपू लागले. अन्नधान्याची महागाई, जेथे जाईल तेथे पैसे लागत होते. त्यामुळे स्वर्गातून आणलेला खजिना संपू नये, याची त्याला चिंता होती. हा खजिना तसाच ठेवण्यासाठी  आणि पार्ट टाईम उत्पन्न मिळवण्यासाठी काय करावे, असा यक्षप्रश्न त्याला पडला. राजकारणात खूप पैसा मिळतो, हे नारदाने सांगितले होते. कोळसा घोटाळा, टेलिकॉम घोटाळा, चारा घोटाळा, बोफोर्स घोटाळा, राफेल घोटाळा असे कितीतरी घोटाळे पैसे मिळवण्याचे राजकारण्यांचे साधन ठरू शकतात, हेही नारदाने सांगितले होते. म्हणून राजकारणच इंद्राची फर्स्ट चॉईस ठरली. राजकारण प्रवेशासाठी त्याने धर्माच्या नावावर चालणाऱ्या एका पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. शेवटी तो इंद्रच... मानवापेक्षा त्याची बुद्धी श्रेष्ठच होती. काही दिवसांतच त्याने राजकारणावर मोठी पकड निर्माण केली. साम, दाम, दंड, भेद या सगळ्या नीतींसोबत 'डिव्हाइड अॅण्ड रुल्ड' म्हणजेच 'फोडा आणि राज्य करा' या अस्त्रांचा वापर केला तर राजकारणात आडवे येणाऱ्यांना आडवे करता येते, असे नारदमुंनीनी सांगितल्याचे इंद्राला आठवले. यासाठी इंद्राने इंग्रजांचे उदाहरण दिले होते. ही अस्त्रे वापरून इंग्रजांनी दीडशे वर्षे भारतावर कसे राज्य केले होते, हेही नारदमुनींनी इंद्राला पटवून दिले होते. या अस्त्रांच्या भरवशावर  आपण पृथ्वीतलावर राज्य करू शकतो, याची इंद्राला पक्की खात्री पटली होती. हळूहळू इंद्राची प्रगतीकडे वाटचाल सुरू होती. राजकारणावरही त्याने पकड निर्माण केली. देशातीलच काय तर तो राहत असलेल्या आटपाटनगरातील प्रत्येक समस्या निवारण्यासाठी लोक त्याच्याकडेच येऊ लागले. स्वर्गातील देव आता पृथ्वीवरील लोकांचाही देव बनला होता.  समस्या कुठल्याही प्रकारची असली तरी ती 'मीच सोडवणार', इतका इंद्राचा कॉन्फिडन्स वाढला होता. पण एका गोष्टीची त्याला सारखी उणीव भासत होती. ती म्हणजे  पृथ्वीतलावर त्यांच्यासोबत नारदमुनी आले नव्हते. पण त्यांची ही उणीव आटपाटनगरातीलच एका नारदीनं थोडी का होईना भरून काढली होती. नारदमुनी स्वर्ग, नरक, समुद्र, पाताळ, पृथ्वी अशा सर्वच ठिकाणची माहिती ठेवत होते. नारदमुनीएवढा या नारदीचा आवाका नसला तरी तिला  तरी आटपाटनगरातील सर्व खबरी असायच्या. नारदमुनी देवदेवदांत भांडणे लावण्यात कुशल होते, तर या नारदीला माणसामाणसात भांडणे लावण्याची कला अवगत होती. रंभेची उर्वशीकडे तर उवर्शीची रंभेकडे चुगली करण्यातही ही नारदी पटाईत. पण तिला इंद्रदेवाने देवीचा दर्जा दिल्याने या सगळ्या अप्सरा तिलाही मानाचेच स्थान देऊ लागल्या.  इंद्रदेवाने तर या नारदीला आपल्या खास लोकांत स्थान दिलेले होतेच. .
  इंद्रासमोर अनेक जण वेगवेगळ्या समस्या घेऊन येत. एकदा तर   खुद्द रंभाच समस्या घेऊन आली.
'महाराज.. महाराज... घोर अनर्थ झाला. मला न्याय द्या.. न्या द्या' रंभा ओरडतच आली.
घाबरलेल्या, बावरलेल्या रंभेला पाहून इंद्र काळजीत पडला. रंभेचा कोणी बलात्कार, विनयभंग तर केला नाही ना, अशी संशयाची पाल त्याच्या मनात चुकचुकून गेली.
'शांत हो रंभा.. काय विपरित घडलं ते शांतपणे सांग बघू', इंद्राने रंभाला शांत करत शांत स्वरात विचारले.
'कशी सांगू महाराज.. सांगायलाही जीभ वळेना. माझ्यावर अन्याय झालाय' असे म्हणत रंभा हंबारडा फोडून रडू लागली. रंभावर खरच अत्याचार झाला असणार, याची इंद्राला खात्री वाटू लागली. इंद्राने नारदीला आवाजा दिला.
'नारदे जो कोणी गुन्हेगार आहे त्याला आत्ताच्या आता हजर कर !' इंद्रदेव करड्या स्वरात बोलला.
'होय महाराज'  म्हणत नारदी तेथेून निघाली. चार पावले पुढे गेल्यावर पण हजर करायचे तरी कोणाला, हा प्रश्न नारदीला पडला. कारण इंद्रदेवावर अंधविश्वास ठेवणारी नारदी स्वत:च्या डोक्याने कधीच विचार करत नव्हती. पहिल्यांदाच तिला स्वत:चे डोके वापरावे लागले होते. ती माघारी फिरली.
'महाराज.. पण कोणाला हजर करायला सांगायचे?' तिचा इंद्राला प्रश्न होता.
'अरेच्चा ही तर गडबडच झाली. आरोपी कोण हे जाणून घेण्याआधीच मी त्याला हजर करण्याचा हुकूम कसा काय सोडला?  इंद्र स्वत:च्या डोक्यावरील पांढरे केस खाजवत स्वत:शी पुटपुटला.
'अगं रंभे काय घडलं ते आधी सांग बघू!' इंद्राने रंभेला प्रश्न केला.
'महाराज... तो मोहनभाऊ माझ्याशी बोलला.' आवंढा गिळत रंभेने सांगितले.
'तर मग.. काय केले त्याने तुला?' इंद्राचा पुढचा प्रश्न होता.
'नाही महाराज.. काहीच केले नाही त्याने!' रंभेने प्रश्नाचे उत्तर दिले.
'मग तुझ्यावर असा घोर अन्याय झाला तरी काय?' इंद्राने खोदून विचारले.
'त्याचं काय महाराज... माझ्या नवऱ्याला मी कोणाशी बोललेले आवडत नाही. मोहनभाऊशी बोलताना माझ्या नवऱ्याने बघितले तर गजहब होऊ शकतो.' रंभाने अकलेचे तारे तोडले.
 एखादा पुरुष स्त्रीसोबत बोलला तर काय गजहब होऊ शकतो. तसेही मोहन उच्च शिक्षित व्यक्ती आहे. तो मोहन आहे..मदनदेव थोडीच आहे. तो बोलला तर रंभेला एवढे आक्षेपार्ह वाटण्याचे कारण काय, असा प्रश्न इंद्रालाही पडला. पण मोहनपेक्षा रंभाच इंद्राला जवळची होती. रंभेला दुखवून कसे चालणार? तसेही मोहन आपल्या  राजकारणात कधीमधी आडवा येतो, याचा इंद्राला थोडाबहुत राग होताच. 'फोडा आण राज्य करा' हे अस्त्र आता अचूकपणे वापरता येऊ शकते, याची इंद्राला कल्पना आली.
'हो का? तो मोहन तुझ्याशी बोललाच कसा? त्याची एवढी हिंमत?' इंद्र खवळला.
'मलाच नाही महाराज.. तो उर्वशी आणि मेनकेलाही बोलतो. ' रंभाने होते नव्हते तेवढे अकलेचे तारे तोडले.
'नारदे.. आता जा बघू... त्या मोहनसगट उर्वशी आणि मेनकेलाही बोलावून आण.' इंद्राने हुकूम सोडला.
नारदीनं आपले काम चोखपणे बजावले. इंद्राचा न्यायनिवाड्यासाठी दरबार भरला. मोहन आरोपीच्या पिंजऱ्यात होता.
'मोहन.. खरं सांग.. तू रंभेला काय बोलला?' इंद्राने सभेचे कामकाज सुरू केले.
'काही नाही महाराज.. रंभाताईशी मी शहराच्या राजकारणावर बोलत होतो. शहरातील रस्त्यांवर किती खड्डे पडलेत. चार दिवसांआड शहराला पाणी मिळत आहे. कचऱ्याचे ढीग गल्लोगल्ली जमलेत. सत्ताधारी नगरसेवक काहीच करत नाहीत. त्यांना पदावरून हटवून महिलांनीच आता पुढाकार घेऊन पालिकेची सत्ता हाती घ्यायला हवी, असे विचार मांडत होतो.' मोहनने स्पष्टीकरण दिले.
'काय रंभे.. असेच बोलला का हा मोहन?' इंद्राने प्रश्न केला.
'होय महाराज...' रंभा उत्तरली.
सभेचे कामकाज सुरू होते. रंभेच्या आरोपामुळे मोहन व्यथित झाला होता. पण इंद्रदेवापुढे त्याचे काहीच चालेना. इंद्रदेवही रंभा, उर्वशी आणि मेनकेला प्रोटेक्ट करण्यासाठी मोहनला अकलेचे धडे देऊ लागला.
'अरे मोहन.. असे महिलांशी बोलू नये. अशाने त्यांचा संसार मोडेल ना!' इंद्र म्हणाला.
'कसा महाराज?' मोहनने प्रतिप्रश्न केला.
'हेच.. की तू या महिलांशी बोलताे म्हणून.' इंद्राने तोच मुद्दा पुन्हा रेटला.
'हो महाराज.. एखादा पुरुष परस्त्रीशी बोलला म्हणून आजवर किती संसार मोडले?' मोहनने पुन्हा प्रतिप्रश्न केला.
'ते मला माहीत नाही.. पण मोडेल ना रे!' इंद्र तेच तेच तुणतुणे वाजवत होता.
बराच वेळ सभेत आरोप प्रत्यारोप, दावे, प्रतिदावे झाले तरी निवाडा होतच नव्हता. मोहनकडून वैचारिक लढाई हारलो तर या भूतलावर आपल्याला कुत्रेही विचारणार नाही, याचा इंद्राला बहुदा साक्षात्कार झाला असावा. म्हणून तो या तीन देव्यांच्या बाजूनेच राहिला.
सभा सुरू असतानाच तिल्लोत्तमेचा पतिदेव प्रकटला. त्याने सभेत काय चालले याचा अंदाज घेतला. मोहनला आरोपी ठरवले जातेय, हे त्याला कळाले. दरबारात आपणही आपली अक्कल पाजळून आपली बुद्धिमत्ता सिद्ध करू शकतो, याचा त्याला साक्षात्कार झाला. इंद्राबरोबरच तोही मोहनला ज्ञानाचे डोज देऊ लागला. एवढावेळ शांतपणे रंभा, मेनका आणि उर्वशीच्या आरोपांचा सामना करणारा मोहन चीडला. त्यात तिल्लोतमेच्या पतीनेही तोंड घातले होते.  शेवटी मोहन मनुष्यप्राणीच.. तो काही ब्रह्मा, विष्णू, महेश किंवा बुद्धही नव्हता. राग हा मनुष्याचा प्राकृतिक स्वभाव. तो रागाने लाल झाला.
'महाराज.. मला एकाच प्रश्नाचे उत्तर द्या?' मोहन उद्गरला.
'बोल मोहन... काय प्रश्न आहे तुझा?'
'मी जर काही वाईट बोललो असेल तर मला याच क्षणी फासावर लटकवा. नाही तर तुम्ही फाशी घ्या?' मोहनची पुरती सटकली होती.
'काय बोलतो हा माणूस? अरे तुझ्या जीभेला हाड आहे की नाही? हे बघ मी तुला शंभर कोडे मारण्याची शिक्षा देईल!' इंद्रदेव खवळून बोलला.
'अंगाला हात तर लावून बघ..' मोहन अचानक संतापला.
इंद्र आणि मोहनमध्ये खंडाजंगी सुरू झाली. तेवढ्यात तिल्लोतमेच्या पतीने या खडाजंगीत पुन्हा नाक खुपसले.
'इंद्रदेव, मेनका, रंभा, उर्वशी खऱ्या बोलत आहेत. तू असे महिलांशी बोलायला नको. तू तिल्लोतमेसोबतही बोलताना  मी बघितले. '  तिल्लोतमेच्या पतीने दुसऱ्यांदा अकलेचे तारे तोडले.
' हो का? काय बोललो ते आधी विचार!' मोहनने तिल्लोतमेच्या पतीला प्रश्न केला.
'सांग गं काय बोलला हा?'  तिल्लोतमेच्या पतीने तिला प्रश्न केला.
'नाही बुवा.. मोहनभाऊ तर काहीच बोलले नाही. ते तर मला भावासारखे आहेत?'
तिल्लोतमेचं उत्तर एेकून इंद्र आणि तिच्या नवऱ्याचे सर्व दात घशातच अडकले. तरीही उसणे अवसान आणत तिचा पती माघार घ्यायला तयार नव्हता. मुद्दयाची वाट सोडून त्याचे विमान भलतीकडेच भरकटले. ते जागेवर आणण्यासाठी मोहनची एक जोराचा ठोसा त्याच्या कानशिलावर पडला आणि भरदिवसा त्याला तारे दिसले. गडबडीने इंद्राला दरबार बरखास्त करून सर्वांना आपापल्या घरी जाण्यास सांगावे लागले. इंद्रदेवाचे त्याच्या फॉलोअर मंडळीने ऐकलेही. मोहनच्या एकाच फटक्यात दरबार बरखास्त झाला...

 तर मंडळी... इंद्रदेव बुद्धिप्रामाण्यवादाने या खटल्याचा निवाडा देऊ शकत नव्हता. पण आटपाटनगरावर त्याचा जीव जडला होता. त्याला ही पृथ्वी सोडून स्वर्गात जायची इच्छाच राहिली नव्हती. आटपाटनगरातील राजकारण, रंभा, उर्वशी, मेनकाबरोबरच बऱ्याच महिलांनी त्याला देवत्व प्रदान केले होते. स्वर्गापेक्षाही इंद्राचे येथे जास्त फॉलोअर निर्माण झाले होते. रंभा, उर्वशी, मेनका, अप्सरा यांचे पतिदेव निमित्तमात्र आहेत. इंद्रदेव आणि नारदी यांचेच आटपाटनगरातील लोकांवर अधिराज्य.  खोट्या प्रतिष्ठेतच त्याला मोठेपणा वाटू लागला. इंद्र अजून पृथ्वीवरच आहे. पुढचा कोणता आणि कसा खटला त्याच्या दरबारात येईल, हे सध्या तरी खुद्द इंद्रालाही माहीत नाही.

अंधभक्ती

देशी अप्सरांसाठी इंद्रपुरीतून खाली उतरलेल्या राजा इंद्राने पृथ्वीवरआटपाटनगरात स्थापन केलेले राज्य चांगले  सुरू होते. त्याचे  पृथ्वीतलावर आपल...