बुधवार, २७ जून, २०१८

एक अधुरी प्रेमकहाणी (भाग ५)

गणपती मंदिराजवळ झालेली छायाची भेट दिनेशच्या विस्मरणात जाणारी नव्हतीच. तिचं आपल्यावर किती प्रेम आणि विश्वास आहे, याची जाणीव त्याला त्या भेटीनं झाली होती. घरी भेटायला गेल्यावर कधी व्यक्त न होणारी ती काही मिनिटांतच व्यक्त होऊन आपल्या सर्वस्व मानून बसली होती. तिच्या प्रेमाला, तिच्या विश्वासाला आपण पात्र आहोत की नाही, याचा शोध आता दिनेश घेऊ लागला होता.  तसं पाहिलं तर दिनेश एकाच वेळी दोन परीक्षा देत होता. एक विद्यापीठाची तर दुसरी प्रेमाची. पहिली परीक्षा त्याच्यासाठी  सोपी होती. पण दुसऱ्या परीक्षेतलं गणित सोडवणं त्याला तितकंच कठीण होतं. त्याची ही सत्वपरीक्षाच होती. तसं पाहिलं तर लग्न म्हणजे काही भातुकलीचा खेळही नव्हता. तासभर मांडला नि मोडून काढला! पण छायाला प्रियकर आणि पतीच्या रूपात दिनेशच हवा होता, याची प्रखर जाणीव त्या भेटीनं झाली होती. छायानं  दिनेशलाच आपलं सर्वस्व मानलं होतं. पण पुढे काय? यक्षप्रश्न दिनेशला भेडसावू लागला होता. पहिली परीक्षा उत्तीण झाल्यानंतर दुसऱ्या परीक्षेचा अध्याय सुरू करायचा, या निर्णयापर्यंत तो पोहोचला.छायानं उद्याच हात मागण्यासाठी घरी बोलावलं असलं तरी परीक्षेच्या काळात तरी दिनेशला ते शक्य नव्हतं. तो या काळात भाऊ किंवा वडिलांकडं लग्नाविषयी बोलला असता तर त्याला खेटराचा मार मिळणार होता, हे नक्की होतं. त्यामुळं छायाचीच काही दिवसांसाठी समजूत काढावी, असाही दिनशनं निर्णय घेतला. 'जे होईल ते पुढे बघू'  या निर्धारापर्यंत तो पोहोचला.
दिनेशचे दोन पेपर झाले होते. तीन बाकी होते.  तिसऱ्या पेपरला आणखी तीन दिवसांचा अवधी असल्यानं तो सकाळीच नाष्टा करून छायाच्या घरी पोहोचला. गेली काही दिवस तो तिच्या घरी गेला होता. छायाच त्याला भेटायला आली होती. किमान तिच्या घरचं वातावरण तरी कळेल या उद्देशानं तो तेथे पोहोचला होता. रामरावांची ऑफिसला जाण्याची तयारी होती. आशाबाई घर आवरून नुकत्याच बसल्या होत्या. दिनेशनं मायाच्या प्रकरणात मदत केल्यानं रामरावांचं त्याच्याविषयी चांगलं मत झालं होतं. दिनेशला बघताच त्यांनी हसतमुखानं 'ये दिनेश बस.. अाशा दिनेशला नाश्ता दे गं..' असा पहिलाच संवाद त्यांनी साधला. पण दिनेशनं घरीच नाश्ता केला असल्यानं 'नको काकू.. मी खाऊनच आलो घरून ' आशाबाईंना थांबवलं. थोडावेळ गप्पा मारून रामराव ऑफिसला गेले. तर बाकीची भावंडं खेळण्यात तर कुणी टीव्ही बघण्यात रमली होती. मायाही पलगावर पडून कसलं तरी पुस्तक वाचत होती. छाया मात्र एकटी उदासपणे एका कोपऱ्यात बसून पुस्तकाची पानं चाळण्याची चेष्टा करत होती. दिनेशला बघून तिनं केवळ एक स्मित दिलं. पण पुन्हा चेहऱ्यावर गंभीर भाव आणून ती पुस्तकाशी खेळत बसली.
'तू पुस्तक वाचतीस की फाडतीस?' छायाची मस्करी करत दिनेश म्हणाला. आशाबाईंनीही छाया पुस्तकाची पानं रागा रागानं उलटत असल्याची नोंद घेतली होती.
'अगं खरच पुस्तक फाडणार आहेस का?' आशाबाईंनीही प्रश्न केला.
'माझं पुस्तक आहे.. फाडीन नाही तर खाईन.. तुम्हाला काय करायचं?' छायानं अनपेक्षितपणे उत्तर दिलं. तिच्या या उत्तरानं आशाबाईंनी थोडे डोळेही वटारले. पण छाया खाली मान घालूनच पुस्तक फाडण्याच्या म्हणजे त्याच्याशी चाळा करण्याच्या मूडमध्ये होती. त्यामुळं आशाबाईंनीही तिच्याकडं दुर्लक्ष केलं.
'जाऊ दे रे तिला.. तू सांग तुझे पेपर कसे गेले?' आशाबाईंनी आस्थेवाईकपणे दिनेशकडे चौकशी केली.
'आत्ता कुठं दोनच झाले. बरे गेले!' दिनेशनं थोडक्यात उत्तर दिलं.
'माझं सोडा.. हिनं काय दिवे लावले? छायाकडे बघत दिनेशनं विचारणा केली.
'चांगले गेले.. पण माहीत नाही काय होते तं?' आशाबाईंनी स्पष्टं केलं.
'बारावीनंतर काय करायचं ठरवलं हिनं?' दिनेशचा प्रश्न होता.
'मरायचं ठरवलं!' छाया मध्येच बोलली. पण तिचं बोलणं ऐकून आशाबाई मात्र खवळल्या.
'मर गं बाई.. आमचं काय जाते? तीन दिवसांपासून कारटीचं टकोरं खराब झालंय. बाप सोडला तर कुणाशीच नीट बोलेना' अशाबाई तक्रारीच्या सुरात बोलल्या.
'खरं सांगा काकू... ही अशी का वागतेय?' दिनेशनं उत्सुकतेनं विचारलं.
'तू तिलाच विचार...?' म्हणत आशाबाईंनी चर्चेला विराम दिला.
'तिचा मूड दिसत नाही. तुम्हीच सांगा हिला काय झालं ते?' दिनेशनं आशाबाईंना बोलतं करण्याचा प्रयत्न केला.
'काय झालं काय माहीत.. पण ते पाहुणे येऊन गेल्यापासून ही डोक्यावर पडल्यासारखी वागत आहे.' आता मात्र आशाबाई मुद्द्याचं बोलल्या होत्या.
'कोण पाहुणे?' दिनेशनं चटकन विचारलं.
'हिला बघायला आले होते... पोरगाही चांगला शिकलेला आहे. डीएड झालेला आहे. सध्या संस्थेवर नोकरी करतो. पगारही बरा आहे... पण आमच्या बयेला आवडला नाही.' आशाबाईंनी एका झटक्यात सर्व चित्र स्पष्ट करून टाकलं. पण 'हिला कसा नवरा पाहिजे?' असा प्रश्न दिनेश करू शकत नव्हता. याचं उत्तर छायानं तीन वर्षापूर्वीच दिलेलं होतं. ते उत्तर दिनेश आणि छाया यांनाच ठाऊक होतं.
'अरे व्वा.. चांगल स्थळ आलंय की हिला!' दिनेश खोडी काढत बोलला.
'मग तू करना त्याच्याशी लग्न!' छाया चवतळाूनच बोलली होती.आशाबाईंना मात्र छायाचं बोलणं आवडलं नाही.
'अगं याच्याशी तरी नीट बोलशील का? तुझ्या जिभंला हाडच उरलं नाही. ' आशाबाई रागात बोलल्या. तशी छाया शांत झाली.
'मग तुमचं काय ठरलंय काकू?' दिनेशनं मुद्दामच आशाबाईंना प्रश्न केला.
'ठरलं आमचं.. तोच मुलगा हिच्यासाठी ठीक वाटतो. तिच्या बाबांनाही तो आवडला. पाहुण्यांनीही कालच पसंतीचा निरोप धाडला. ' आशाबाईंनी स्पष्टपणे सांगितलं.
'मग बाबांनाच..' छाया बोलता बोलता थांबली.
'कधी करताय हिचं लग्न?' दिनेशनं चित्र आणखी स्पष्ट होण्यासाठी प्रश्न फेकला.
'तसं अजून काही ठरवलं नाही. पण बघू पावसाळा संपला की..' आशाबाई म्हणाल्या.
'सुटलो बुवा..' दिनेश स्वत:शीच बोलला. म्हणजे दिनेश आणि छायाच्या हाती अजून चार-पाच महिन्यांचा अवधी होता. दिनेशलाही थोडं हायसं वाटलं. छायाच्या चेहऱ्यावरही थोडं हसू उमटलं होतं. पण रुसण्याच्या सोंगातून बाहेर यायला तयार नव्हती.
'छाया तू त्या दीपालीकडं गेली नाहीस का? कालच ती भेटली होती बघ.. तू भेटतच नाहीस, अशी तिची तक्रार होती. ये ना कधी तिकडं' दिनेशनं छायाला सूचक इशारा केला होता.
'जाईन उद्या दुपारी... ' छाया लाजून पण चेहऱ्यावर कोणतेही भाव न उमटू देता बोलली.
'हं पण ती दुपारी दोनच्या आधीच तुला घरी भेटेल बघ.. कसला तरी क्लास लावलाय वाटतं तिनं. ती दररोज  अडीचलाच घरातून बाहेर पडताना दिसते. ' दिनेशनं दुसरा संकेत देत छायाला दोन वाजता भेटण्याचा क्लू दिला.
'हो ना.. मी भेटेन तिला उद्या दोन वाजता!' म्हणत छाया पुन्हा पुस्तकाशी खेळू लागली. त्यातलं तिन एक अक्षरही वाचलं होतं की नाही, हे कोणालाच ठाव नव्हतं.
दिनेश दुसऱ्या दिवशी दीड वाजता गणपती मंदिरामागच्या झाडाखाली जाऊन बसला. त्याची नजर रस्त्यावरच खिळली होती. वारंवार तो मनगटी घड्याळाकडं बघत होता. अर्धा तासही त्याला अर्ध्या दिवसासारखा जड वाटत होता. वातावरण शांत असल्यानं त्याला घड्याच्या सेकंद काट्याची टिकटिकही ऐकू येत होती. अजून दोन वाजायला काही मिनिटे बाकीच होती. घड्याळ बघून दिनेशचे नजर पुन्हा रस्त्यावर पडताच त्याला छाया लगबगीनं येताना दिसली. वारा मंद होता. तरी तिची ओढणी, केसांच्या बटा हवेशी गप्पा मारत होत्या.  अर्ध्या रस्त्यापर्यंत पळत जाऊन अलगदपणे छायाला बाहुपाशात घ्यावं, असं दिनेशला वाटलं. पण असा मूर्खपणा परवडणारा नाही, याची जाणवही त्याला त्याच क्षणी झाली. त्यामुळं ती जवळ येईपर्यंत शांत बसण्याशिवाय त्याच्याकडं पर्याय नव्हता. ती जवळ यायला किमान तीन मिनिटे तरी लागणार होती. पण एवढाही संयम त्याच्याकडे नव्हता. जादूची कंडी फिरवावी आणि छम्म म्हणून उभी राहावी, असं स्वप्नंही एक क्षण त्याच्या डोळ्यासमोरून तरळलं होतं. तीन मिनिटेही त्याला जड चालली होती. ती येण्याआधीच तो जागेवरून उठला.
'अगं किती उशीर...‌' दिनेशनंच बोलायला सुरुवात केली.
'आधी तुझं घड्याळ दुरुस्त करून घे! मी दोनच्या आधीच आले' छाया लाडीवाळपणे म्हणाली.
'अरे हो की... माझं घड्याळ तासभर पुढे आहे... बघबघ..' म्हणत दिनेशनं घड्याळ दाखवलं. छाया घड्याळात डोकावत असतानाच दिनशनं तिच्या गालावर चुंबन घेतलं. लाजाळूची पानं स्पर्श होताच लाजेनं थिजून जावीत तशी छाया थिजून गेली होती.  दिनेशनं  हात हाती घेताच तिचं अंग अंग शहारून आलं. गुरुत्वीय शक्तीनं झाडाचं गळालेलं फळ भूमीकडे ओढलं जावं तसं ती नकळतच दिनेशकडे ओढली गेली. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून  'आय लव्ह यू' म्हणत ती एकजीव झाली. पण हे ठिकाण प्रणयाचं नव्हतं, याचं भान लगेच दोघांना आलं. क्षणात ते एकमेकांपासून दूरही झाले.
'तर मग असं आहे!' एक मोठा श्वास घेऊन दिनेशनं बोलायला सुरुवात केली.
'हो ना.. आता तूच सांग मी काय करायला पाहिजे.?' छाया लाडातच बोलली.
'त्या मास्तरशी लग्न!' दिनेशनं खोडी काढली. तसा छायानं एक धप्पा त्याच्या छातीवर मारला.
'मेलो मेलो...हिनं माझा कलेजा खल्लास केला... वाचवा वाचवा..' दिनेश पूर्णपणे खोडी काढण्याच्या मूडमध्ये होता.
'ऐ तुझा चावटपणा खूप झाला हं.. आधी काय करायचं ते सांग?' छायाचा स्वर गंभीर होता. दिनेशनं अजून एक दीर्घ श्वास घेतला.
'काही नाही लग्नच...!' दिनेश अश्वासित सुरात बोलला.
'हो पण माझ्या घरच्यांचं काय करायचं?' छाया आणखी गंभीर होत म्हणाली.
'त्यांना गोळी घालू..' पुन्हा चावटणा करत दिनेश उत्तरला.
'तू आयुष्यात कधी तरी सिरियस झालास का?' छायानं रागातच विचारलं.
'हो जन्मलो तेव्हा! मी अर्धा तास रडलोच नव्हतो. तेव्हा माझे आईवडील सिरियस होते.. आज मी हसतोय तू सिरियस झालीस! ' दिनेशची अशी खोडकर सवयच होती. पण हसत असतानाच तो सिरियस म्हणजे गंभीर झाला. त्या मास्तरचं भूत कसं पळवून लावायचं याचा तो विचार करू लागला. कारण त्यांच्याकडून होकार आलाच होता. रामराव काकाही हत्तीवरून साखर वाटण्याच्या तयारीत होते. मात्र त्या हत्तीच्या पायाखाली छाया आणि दिनेशचं प्रेम चिरडलं जाणार होतं. बराच वेळ मेंदूवर भार देऊन दिनेश बोलला.
'हे बघ..  एक काम कर..तू त्या मास्तरचीच परीक्षा घे.. त्यात तो पास झाला तरच लग्नाला हो म्हण.' दिनेश युक्ती लढवत होता.
'काय करू ते तर सांग..' उतावीळ होत छायानं प्रश्न केला.
'त्याला भेटायला यायचा निरोप धाड.. आपण दोघंच त्याला भेटू! मग बघ कसा पाय लावून पळेल तो?'  दिनेशनं युक्ती सांगितली.
'मला नाही कळलं?' छाया म्हणाली.
'अगं माऊली त्याला तुझ्याशी एकांतात बोलायचं म्हणून इथंच घेऊन ये..मीही येतो... त्याला सगळं खरं सांगून टाकू. तो पाय लावून नाही पळाला तर नाव बदल माझं!'
'माझा बाप तुझ्या मागं लागला तर कुठं पळशील? आला मोठा खरं सांगणारा!' दिनेशला वाकडं लावत छाया बोलली.
'मग तूच सांगना मी काय करू?' दिनेश असह्यपणे बोलला.
'तू तुझ्या भावाला नाही तर वडलांनाच घरी घेऊन ये..सगळ्यांसमक्ष साक्षमोक्ष लावून टाकू!' छाया आत्मविश्वासानं बोलली.
'अगं पण माझी परीक्षा सुरू आहे.. कसं जमेल इतक्यात. त्यासाठी आणखी बारा दिवस तरी थांबावं लागेल.', दिनेशनं अडचण उपस्थित केली.
'ठीक आहे.. बारा तर बारा दिवस..पण मी म्हटलं तस झालं तरच आपलं खरं.. नाही तर माझ्या हाती खडू नि डस्टर!' छाया विनोदानं बोलली.
'ठरलं तर.. अजून बारा दिवस.. तेराव्या दिवशी तुझ्या बापाचं तेरावं....' खोडी काढून दिनेश बोलत असतानाच छायानं त्याला जोरात चिमटा काढला.
दिनेशची परीक्षा संपली होती. आता त्याला ठरलेल्या आराखड्यानुसार कृती करायची होती. पण वडील आणि भावाला सांगायचं तर कसं? हा मोठाच प्रश्न होता. तशी भावाला या प्रकरणाची पुसटशी कल्पना होतीच. पण आपल्या तोंडानं भावासमोर लग्नाचं बोलायची हिम्मत मात्र तो जुटवू शकत नव्हता. पण बोलण्याशिवाय पर्यायही नव्हता. जशी संधी मिळेल तसं भावासमोर बोलून मोकळं व्हायचंच, अस दिनेशनं ठरवलं. तो फक्त भावासोबत बोलण्याचं निमित्त शोधत होता. (क्रमश: )




मंगळवार, २६ जून, २०१८

एक अधुरी प्रेमकहाणी (भाग ४)

छायानं अजून प्रेमाची कबुली दिली नसली तरी दिनेशला तीनं पूर्ण संकेत दिले होते. पण चित्र पूर्ण स्पष्ट झालं नव्हतं. दिनेशनंही आपल्या मनातलं बोलण्याऐवजी अनेक संधी दवडल्या होत्या. आज मात्र त्यानं कोणत्याही परिस्थितीत मनातलं बोलायचं ठरवलं. पण छायाच्या घरी जाऊन असं काही बोलणं जमणार नव्हतं. तिला कॉलेजातच गाठलं पाहिजे, असा विचार करून तो आपलं कॉलेज बुडवून तिच्या ज्युनिअर कॉलेजच्या दिशेनं निघाला. तो कॉलेजच्या प्रवेशद्वारावच थांबून तिची वाट पाहू लागला. बराच वेळ झाला तरी छाया काही दिसेना. तासभर वाट पाहिली तरी ती आली नाही. म्हणून दिनेशनं तिच्या घराकडे मोर्चा वळवला. छायाच्या घरात सर्वच हजर होते. पण स्मशान शांतता पसरली होती. रामराव काका डोक्याला हात लावून बसले होते. अाशाबाई रडक्या चेहऱ्यानं दाराकडं बघत होत्या. मुलं एका कोपऱ्यात चिडीचूप बसली होती. हसतमुखानं छायाच्या घरात शिरलेल्या दिनेशला त्या दिवशी 'ये दिनेश बस' असं म्हणायलाही कोणाचं तोंड उघडलं नाही. सगळ्यांचे चेहरे गंभीर होते. त्यामुळे त्यांच्याकडे बघून दिनेशच्या मनात एकाच वेळी अनेक प्रश्नांनी गर्दी केली. 'माझ्यामुळं तर घरात काही घडलं नाही ना', असा पहिलाच प्रश्न त्याला पडला. 'नाही नाही मी तर अजून कुणाला काहीच बोललो नाही',  'काका-काकूचं भांडण तर झालं नाही ना', दुसरा प्रश्न. छाया तर त्यांना काही बोलली नसावी ना, तिसरा प्रश्न. अशा अनेक प्रश्नांच्या चक्रव्युहात सापडलेल्या दिनेशनं आशाबाईंकडं बघत 'काय झालं काकू? तुम्ही सगळे असे शांत का?' असे एकाच वेळी दोन प्रश्न केले. 'काही नाही रे.. तू बैस सांगते सगळं' म्हणत आशाबाईनं दिनेशला खुर्चीवर बसण्याचा इशारा केला. 'आज कॉलेजला गेला नाही का?'  आशाबाई हळू स्वरातच बोलल्या. 'नाही काकू कंटाळा आला' एवढं उत्तर देऊन दिनेश आशाबाई पुढे काय बोलतात याची दिनेशला उत्कंठा लागली होती. बराच वेळ कोणी काहीच बोलले नाही. त्यामुळं गूढ आणखीच वाढलं होतं.
  'आज सगळे असे शांत का?' दिनेशनं शांतता मोडली. 'अरे मायानं आमचं नाक कापलं रे' आशाबाईंच्या आवाजात कंप होता. 'म्हणजे..' दिनेशनं दचकून विचारलं. 'तुला काय सांगू.. आमचं नशिबच फुटकं!' एक दीर्घ उसासा टाकत आशाबाई बोलल्या. सस्पेन्स अजून कायमच होता. पण मायानं काही तरी भानगड केली, हे आशाबाईंच्या बोलण्यावरून दिनेशला कळून चुकलं होतं. पण दहावीत शिकणाऱ्या मायानं केलं तरी काय, हा प्रश्न अनुत्तरीत होता. 'काय झालं काकू सांगाना?' दिनेशनं प्रतिप्रश्न केला. 'तुला सांगून काय फायदा रे..' रामराव काका मध्येच गुरगुरले. दिनेश जागीच थंडावला. कारण तो रामराव काकांना खूप घाबरायचा. दिनेश शांतच बसला. अचानक रामरावांनीच पुढे बोलायला सुरुवात केली. 'अरे दिनेश तुझे मामा पोलिस खात्यातच नोकरीला आहेत ना.? मला त्यांची मदत हवी आहे.' 'हो काका' एवढंच उत्तर देऊन दिनेश रामराव काकांकडे उत्सुकतेनं बघू लागला. अजून त्याला काय घडलं ते नीट कळालं नव्हतं.
'मायाला त्या अशोकनं पळवून नेलं रे..' रामराव काकांनी बॉम्ब टाकावा तसा सस्पेन्स फोडला.  या बॉम्बस्फोटानं दिनेशही दचकला. 'काय सांगताय?' दिनेशच्या तोंडून अपसुकच शब्द फुटले. 'माया पळाली त्याच्यासोबत..' रामराव काकांनी तीनच शब्दांत सर्व चित्र स्पष्ट करून टाकलं.  'मग आता?' दिनेश चिंतातुर होत बोलला. 'पोलिसांनी पकडलं दोघांनाही', रामरावांनी आणखी स्पष्ट केलं. 'त्या अशक्याला जेल झाली पाहिजे. पण माझी पोरंगी सुटली पाहिजे..' रामरावांनी मोठा श्वास घेत पुढे काय करायचं ते सांगितलं.'हो काका.. मी आत्ताच मामांना बोलतो.. तुम्ही चलता का माझ्यासोबत ठाण्यात?' दिनेशनं विचारणा केली. 'चल जाऊ' म्हणत रामराव जागेवरून उठले. 'दोनच मिनिटं हं.. ' म्हणत रामराव बाथरुमकडे गेले. तोपर्यंत छायाकडं बघून दिनेश घराबाहेर पडला. या प्रकरणामुळं छायाही अबोल झाली होती. दिनेश आणि तिच्या प्रवासात या प्रकरणानं अडथळा आला होता. आजही तो छायाला मनातलं बोलू शकला नाही.
माया ही छायाच्या पाठीवर जन्मलेली लहान बहीण.. ती छायासारखीच दिसायला सुंदर होती. दिनेशप्रमाणंच अशोकचीही रामरावांच्या घरी ये-जा होती तो दिनेशचाही मित्र होता. अशोक तसा वयानं दिनेशच्याच बरोबरीचा. छाया आणि दिनेशमध्ये नजरानजर होत असल्याचे अशोकच्या नजरेतून सुटलं नव्हतं. त्यानं दिनेशशी स्पर्धा न करता मायाला जाळ्यात ओढलं होतं. माया  छायापेक्षा दोन-अडीच वर्षांनी लहान होती. पण तिनं छायापेक्षाही लांब उडी घेतली होती. तिचं अशोकवर प्रेम असेल, असं दिनेशलाच काय तर कोणीही स्वप्नातही असा विचार करू शकले नसते. पण हे वास्तव होतं. नववीत शिकणारी माया त्याच्या प्रेमात गुरफटून पळून जाण्याएवढं मोठं पाऊल उचलू शकते, हा विचारच करून दिनेश थक्क झाला होता. तो छायावर प्रेम करत असताना अजूनही उघडपणे एक शब्दहू बोलू शकला नव्हता. त्याचं हे अबोल प्रेम व्यक्तच होत नव्हतं.
रामराव आणि दिनेश ठाण्यात पोहोचले होते. दिनेशनं ठाण्यात पोहोचताच मामा बसत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या खोलीत प्रवेश केला. दिनेशनं त्यांना काम असल्याचं सांगत बाहेर आणलं. रामरावांची भेट घालून देत 'माझ्या मैत्रिणीचे वडील' अशी ओळख करून देऊन सर्व प्रकरण त्यांच्या कानावर घातलं. ठाण्यातल्या एका कोपऱ्यातच माया आणि अशोक अपराधी म्हणून बसले होते. काल रात्रीच दोघे पळून जाताना छोट्या भावाने बघितले होते. त्यानं आशाबाईला वर्दी दिल्यानं अाशाबाई आणि रामरावांनी पोलिसांना कळवले आणि पोलिसांनी सहा तासांतच म्हणजे मध्यरात्रीला दोघांना पकडून आणले होते. हे प्रकरण अजून चौकशीवर होतं. सकाळी रामराव एकदा मायाला भेटूनही आले होते. पण मायानं घरी येण्यास नकार दिल्यानं रामराव घरी येऊन आशाबाईंशी खल घालत होते. एका वकिलाचाही त्यांनी सल्ला घेतला होता. रात्रीतून एवढं रामायण घडलं होतं, याचा दिनेशला थांगपत्ताही नव्हता. अंतिम निर्णयासाठी रामराव दिनेशसोबत ठाण्यात गेले होते. मुलगी अल्पवयीन असल्यानं त्यांना कायदेशीर लग्नाची परवानगी मिळूच शकत नसल्याचं मामानं रामरावांकडे स्पष्ट केलं होतं. प्रश्न होता तो तिला घरी नेण्याचा आणि अशोकचं काय करायचं एवढाच. वरिष्ठ पोलिस अधिकारी, वकील, दिनेशचे मामा आणि रामराव यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. अशोकवर अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची केस करण्याचा आणि मायाचा ताबा रामरावांकडे देण्याचा निर्णय झाला. पण माया अशोकला सोडायला तयार नव्हती. 'मी मेले तरी चालेल पण मला अशोकसोबतच राहायचं' अशी तिची ठाम भूमिका होती. त्यामुळं रामरावांची मोठीच पंचाइत झालेली होती. हिला समजवायचे कसे, हाही यक्ष प्रश्न होता. तिला समजावण्याची जबाबदारी वकिलानं घेतली. वकिलानं मायाला सांगितलं की आता अशोक अनेक वर्षे जेलात राहणार आहे. त्याची सुटका होणारच नाही. तुलाही जेलमध्ये राहायचे का? बर तुम्हाला सोबत एका जेलमध्येही ठेवणार नाहीत. तो जेलमधून सुटला अन तू वयाची अठरा वर्षे पूर्ण केली की पोलिसच तुमचं लग्न लावून देतील, अशा शब्दांत समजावल्यानं ती रडतच रामरावच्या गळ्यात येऊन पडली. तिचं हे प्रेम अधुरं राहील.
माया पळून गेल्याची वार्ता अख्ख्या कॉलनीत झाली होती. त्यामुळं रामराव, आशाबाईसह छायाला घराबाहेर पडणं अपमानास्पद वाटू लागलं. रामरावरही चार दिवस ड्युटीला गेले नाही. छायाही कॉलेजला गेली नाही. अधूनमधून दिनेशच्या त्यांच्याकडं जायचा. मायाची मोठीच भानगड झाल्यानं दिनेश आत्ता काही दिवस तरी आपल्या प्रेमाविषयी बोलूच शकत नव्हता. दिवसांमागून दिवस लोटत गेले. छायाच्या घरचे वातावरण सामान्य झालं होतं. मायाही झालं गेलं विसरून नियमित शाळेत जाऊ लागली. पण शाळेत ती शांत शांत राहू लागली. तिची शाळा दूर असल्याने तिच्या कृत्याची शाळेतील कुणालाही भनक लागली नव्हती. त्यामुळं सगळं सुरळीत होतं.
बरेच दिवस लोटले. पण दिनेश आणि छायाचं अबोल प्रेम जागीच थिजलं होतं. तीसुद्धा पूर्वीप्रमाणं दिनेशशी मोकळेपणांनं बोलत नव्हती. जणू मायाच्या प्रेमप्रकरणामुळं यांच्या प्रेमाला द्रिष्ट लागली होती. छायाही मनातून दिनेशसाठी झुरत होती. पण मायानं दिलेला आघात वडिलांसाठी मोठा होता. त्यातच आपणही असं काही केल्यास त्यांच्यावर काय गुजरेल, या विचारानं ती अबोल झाली होती. तद्वतच दिनेशचीही अवस्था होती. आपल्यामुळेही छायाच्या आईवडिलांना त्रास होऊ शकतो, याची त्याला जाणीव झाली होती. तरीही तो छायाला विसरू शकत नव्हता. काही तरी मार्ग सापडेल, अशी दोघांनाही आशा होती.. परंतु सध्या तरी सर्व मार्ग बंद होते.
विद्यापीठानं पदवी, पदव्युत्तर परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. परीक्षा २० दिवसांतच सुरू होणार होत्या. दिनेशचं पदवी परीक्षेचं अंतिम वर्ष होतं. अभ्यास म्हणावा तसा झालेला नव्हता. त्यामुळं त्यानं आता तरी अभ्यास करायलाच पाहिजे, असा गांभीर्यानं निर्णय घेतला. घरी अभ्यासात अडथळा होतो म्हणून घरापासून जवळच असलेल्या नदीपलीकडच्या शेतात एका झाडाखाली नियमित जाऊन बसू लागला. छायाच्या घरीही तो क्वचितच जाऊ लागला. छायाची परीक्षा सुरू होती. त्यामुळं तीही अभ्यासत व्यग्र झाली. बरेच दिवस त्यांची एकमेकांची भेट नव्हती.
 छायाची परीक्षा संपली होती. मात्र दिनेशची परीक्षा आत्ताकुठे सुरू झाली होती. त्यामुळे तो छायाच्या घराकडे फिरकलाच नाही. त्यामुळे छाया अस्वस्थ होती. बऱ्याच दिवसानंतर सकाळीच ती दिनेशच्या घरी पोहोचली. दिनेश नेमकाच उठला होता. रात्री उशिरापर्यंत अभ्यास केल्यानं अजूनही त्याच्या डोळ्यांत झोपेची धुंदी होती. छायाला समोर बघताच झोपेची धुंदी उडाली. दिनेशची चौकशी करून ती घरात शिरली. काकू म्हणजे दिनेशच्या वहिनीशी बोलत बसली. वहिनीलाही माया प्रकरण कानी पडले होते. थोडक्यात हे प्रकरण छायानं स्पष्ट करून आता सगळं व्यवस्थित असल्याची ग्वाही दिली. काही वेळातच 'येते काकू' म्हणत ती घरातून बाहेर पडली. पण जाताना तिनं दिनेशला  'गणपती मंदिराजवळ ये' असं हळूच सांगून पाखरासारखी दिसेनाशी झाली. ताबडतोब तोंड धुवून दिनेश गणपत्तीबाप्पाच्या दर्शनाला पोहोचला. हे गणपती मंदिर छायाच्या घरापासून जवळच पण निवांत स्थळ होतं. छायानं मैत्रिणीकडे जाऊन येते असं सांगून दिनेशच्या घरी पोहोचली होती.
छाया गणपती मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या झाडाखाली बसली होती. दिनेश लगबगीनं तेथे पोहोचला. उन्हाळा सुरू झाला असला तरी हवा सुटलली होती. हवेमुळं तिच्या केसांची बट वारंवार डोळे आणि नाकावर येत असल्यानं ती एकसारखी ती बाजूला सारत होती. दिवसा चांदणं दिसावं तसं भर उन्हातही तिचं रूप चकाकत होतं. वेळ वाया न घालवता दिनेश तिच्या शेजारी जाऊन बसला.
 'कशाला बोलावलंस इथं?' दिनेशनं पहिलाच प्रश्न केला. 
'आता खूप झालं!' छाया एकदम पुटपुटली.
'काय झालं?  इतकी का वैतागलीस?' दिनेशनं चौकशी केली.
'काय सांगू तुला? तुला काहीच कळत नाही!' छाया रागातच बोलली.
'मी काय केलं? काय कळत नाही मला?' दिनेशचा चेहरा प्रश्नार्थक होता.
'तू माझ्यावर प्रेम करतो ना? करतोस ना....?' छायानं शब्दांवर जोर देऊन विचारलं.
'न न न.. हो.. पण?' दिनेश जागीच अडखळला.
'हो की नाही एवढच बोल?' छाया चिडूनच बोलली.
'अग हो... पण आज..'  दिनेशचं बोलणं अर्ध्यावरच थांबवून
'आजच तू माझ्या घरी ये.. भावाला आणि वडिलांना घेऊन!' छायानं फर्मान सोडलं.
'अरे पण कशासाठी?' दिनेश कोड्यात पडला.
'लग्न करू आपण!' छायानं थेट सांगून टाकलं.
'तुला कळतंय ना...दिनेश तू मला खूप आवडतोस.. माझे वडील माझ्यासाठी स्थळ शोधताहेत रे..खरचं तुला कळतंय ना मी काय म्हणते ते?' छाया बोलत होती, पण दिनेश विचारांत गढला होता.
'हे बघ लवकरात लवकर तू माझ्या वडलांना आईला बोल.. बघ नाही तर उशीर होईल.. येते मी..' म्हणत छाया निघाली. दिनेशनं क्षणातच तिचा रस्ता अडवला.
'हे बघ थोडा विचार करायला वेळ तर देशील ना? अचानक लग्न म्हणजे?' दिनेश भावना व्यक्त करण्याआधीच छायानं त्याला थांबवलं.
'तुझं प्रेम नाहीच माझ्यावर... ठीकय.. मी करते दुसरा नवरा!' छाया रागनं लाल होत बोलली.
'अगं मी कधी म्हटलं प्रेम करत नाही म्हणून! पण तू कधीच बोलली नाहीस!' दिनेश व्यक्त झाला.
'मी काय गावभर दवंडी देऊन सांगायचं होतं का?तुला कसं कळलं नाही? मी तर तुला तीन वर्षापूर्वीच तूच नवरा पाह्यजे म्हणून सांगितलं होतं ना?' छाया शांत होत म्हणाली.
'अगं पण तेव्हा तू केवढी होतीस?' दिनेश समजावण्याच्या सुरात बोलला.
'मी तेव्हाही मोठी होते आताही आहे. सगळे मला लहान का समजतात?' छायाचा प्रश्न दिनेशला न उलगडणार होता.
'बरं ठीक आहे.. तू म्हणशील तसं.. पण लग्न एवढ्या घाईत होत असतं का?' दिनेश पुन्हा समजूतदारपणे बोलला.
'आता नाही तर कधीच होणार नाही.. तू लक्षात ठेव..' असं ठणकावत ती पुन्हा वळली. पुन्हा दिनंशनं तिला थांबवलं.
'थांब.. आजच काय तो निर्णय घेऊ.. तू थोडी शांत हो..' म्हणत दिनेश पुन्हा झाडाखाली जाऊन बसला. छायाही सावलीसारखी ताच्या मागेच गेली. दोन मिनिटे दोघेही स्तब्धपणे बसले. दोघांच्याही डोक्यात विचारांचं वादळ उठलं होतं. हळूच दिनेशनं तिचा हात हाती घेतला. तशी ती झाडाला वेली बिलगावी तशी दिनेशला बिलगली. नकळतच दोघांच्याही डोळ्यांतून आश्रूंच्या धारा होत्या. त्यांचं अबोल प्रेम आश्रूंच्या रूपानं व्यक्त होत होत. दोघेही एकमेकांची आश्रू पुसू लागले तसे ते आणखी दाटून येऊ लागले. त्यांच्या भावनांचा जणू बांध फुटला होता. तीन वर्षांत एकमेकांना स्पर्शही न करणारं हे युगुल भरदिवसा एकमेकांना बिलगून बसले होते. एकमेकांच्या श्वासही त्यांना जाणवत होता. काही वेळासाठी दोघेही अबोल झाले. वेळ कसा कापरासारखा उडून निघून जात होता, दोघांनाही कळले नाही. संदीपला समोर बघूनच दोघे भानावर आले. संदीप म्हणजे छायाचा लहान भाऊ. तो समोर दिसताच विजेचा धक्का बसावा तशी छाया दिनेशपासून दूर झाली.
 'ऐ ताई तू इथं दिनूदासोबत काय करतीय. आई तिकडं बोंबलतीय ना तुझ्या नावानं' मला शोधायला पाठवलं तिनं! एका श्वासात संदीप बोलून गेला.छाया मात्र मेल्याहून मेली झाली. पहिल्यांदाच ती  दिनेशला चोरून भेटली अन् तिची चोरी संदीपनं पकडली होती. संदीप सातवीलं पोर.. पण अशा गोष्टी त्याला त्याला त्या वयातही कळत होत्या. त्यामुळं छायाची पाचावर धारणा झाली. संदीप घरी सांगण्याची तिला प्रचंड भीती वाटली. तिचा भेदरलेला चेहरा पाहून दिनेशनच पुढाकार घेतला.
'संदीप एैक.. तू काहीच बघितलं नाहीस.. आजच आम्ही भेटलो रे.. तू बाबांना सांगशील तर सगळा गोंधळ होईल. आत्ता कुठं ते मायाच्या भानगडीतून सावरले. तू लहान आहेस पण समजदार आहेस. सर्वच गोष्टी घरी सांगायच्या नसतात. आम्ही अशोकसारखं करणारच नाही. तू फक्त काही दिवस चूप रहा. तू लहान असला तरी तुझी माफी मागतो बघ.. तुझी ताई मंदिरात दर्शनाला गेली होती म्हणून आईला सांग! ' दिनेशच्या प्रवचनानं संदीप पिघळला.
'बरं दिनूदा नाही सांगत.. ताई चल ना..' म्हणत संदीप घराकडं पळत सुटला.  दोघांच्याही चेहऱ्यावर संकटातून सुटल्याचा आनंद होता. जड अंत:करणाने छायानं दिनेशचा निरोप घेतला. ती घरी गेली. पण घरचं वातावरण सामान्य होतं. संदीपनं झाकली मूठ झाकूनच ठेवली होती. त्यानं दिनेशनं जसं सांगितलं, तसंच आईला सांगून दोघांना अभय दिलं होतं. (क्रमश:)

गुरुवार, २१ जून, २०१८

एक अधुरी प्रेमकहाणी (भाग 3)

दिनेशच्या छायाच्या घराकडील घिरट्या वाढल्या होत्या. एव्हाना त्याची सारखी ये-जा आशाबाईंनाही खटकू लागली होती. पण दिनेश-छायाची जुनीच मैत्री असल्यानं त्या उघडपणे काहीच बोलल्या नाही. कॉलेजला जाण्याआधी दिनेश त्यांच्या घरी टपकला होता. न राहवल्याने आशाबाईंनी त्याला थोडे डिवचले. 'काय रे दिन्या कॉलेजला जातो की नाही? अभ्यास वगैरे काही दिसत नाही?' दिनेश काहीच बोलला नाही. 'यांना माझ्या अभ्यासाची काय चिंता पडलीय. आधी पोरीचं बघ म्हणावं!'  तो मनातल्या मनात पुटपुटला. 'काय रे मी काय म्हणतेय. अभ्यास करतो की नाही?' आशाबाईंनी पुन्हा प्रश्न केला. 'हो ना काकू.. करतो ना!' दिनेश हळू आवाजात बोलला. 'अभ्यास केला तर चांगल्या मार्कांनी पास होशील. पुढं चांगली नोकरी मिळंल. नंतर चांगली बायकोही मिळंल. नाही का?' आशाबाईंनी आपली वाक्ये पूर्ण केली. 'हो काकू!' दिनेशचं एवढंच उत्तर होतं. 'आज कॉलेज नाही का तुला?' आशाबाईंनी प्रश्न केला. 'जायचंय ना..' एवढंच तो म्हणाला. 'बरं बैस थोडा वेळ.. मी गिरवणीवरचं दळण घेऊन येते. अन् छाया तू तेवढे कपडे धुवून घे मी येईपर्यंत', एवढं बोलून आशाबाई घराबाहेर पडल्या. पीठाची गिरणी तशी हाकेच्या अंतरावरच होती. पण तिथं गर्दी होती. आशाबाईचं दळण अजून दळलेलं नव्हत. त्या तेथेच ओळखीच्या बाईशी गप्पा मारत थांबल्या. दिनेशसाठी हीच संधी होती. घरातील चिल्लर पार्टी शाळंत गेली होती. घरात एकटी छाया आणि दिनेश एवढेच... पण छाया न्हाणीत कपड्यांना साबण मळत होती.
'छाया मला तुझ्याशी काही बोलायचं आहे...' दिनेशने अर्जव केली. 'हं बोलना..'  कपड्यांवर पाणी शिंपडत छाया म्हणाली. 'इकडं ये ना..' दिेनेशची दुसरी अर्जव. हातातला कपडा टाकून छाया दिनेशजवळ आली. 'हं बोल.. काय म्हणतोस..' असं म्हणत ती दिनेशच्या डोळ्यांत डोकावली. पण तिच्या या कटाक्षानं दिनेशला कसं तरी वाटलं. सुरुवात कशी करावी हे त्याला कळेना. 'अरे बोलना पटकन.. आई येतच असेल.' छायानं टोकलं. पण दिनेशच्या तोंडून शब्दच फुटेनात. सुरुवातच करायची म्हणून तो म्हणाला. 'तुझे बाबा सकाळी लवकरच जातात नाही?' तो उगीच बोलला. 'हो रे.. काही काम होतं तुझं त्यांच्याकडं?' छायाचा प्रश्न. 'नाही नाही.. सहज विचारल!' बुचकाळ्यात पडत दिनेश म्हणाला. 'मग काय?' छायानं प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडं बघून विचारलं. 'तुला काय बोलायचं ते नंबर बोल. आधी मला कपडे धुवू दे. आई रागावेल माझी!' असं म्हणत ती न्हाणीकड वळत असतानाच दिनेशनं तिचा हात धरला. तशी छाया हिरमुसली. 'सोड.. आई आली!' असे उद्गार तिच्या तोंडून निघाले. त्याच क्षणी दिनेशची पकड ढिल्ली झाली आणि छाया हात सोडवून घेत न्हाणीत शिरली. तिनं गंमत केली होती. आशाबाई अजूनही गिरणीवरच होत्या. दिनेश स्वत:वरच चिडला. 'मी किती घाबरलो गं.. तू ना..' असं म्हणत तो छायाच्या मागे धावला. पण तोपर्यंत छायानं हातात साबण धरला होता. 'हिच्याशी कधी बोलावं..' थोडं डोकं खाजवत दिनेश विचारात गढून गेला. आजच्यासारखी संधी परत मिळणार नाही. याच संधीचं सोनं केलच पाहिजे, असा त्यानं ठाम निर्धारच केला होता. 'अगं माझ्याशी दोनच मिनिटे बोल.. नंतर तुझं काम कर..' अशी विनंतीच त्यानं छायाला केली. एक कपडा पाण्यात बुचकळून छाया पुन्हा उठली. दोघेही आशाबाई येताना दिसेल, अशा दिशेने समोरासमोर उभे राहिले. 'पटकन बोलना.. कशाला वेळ खातोस?' छायानेच सुरुवात केली. 'तू लग्न करणार आहेस का?' दिनेशनं विचारलं. 'कुणाशी?' छायाचा प्रतिप्रश्न होता. 'मी सहज विचारलं?' दिनेश बोलला. 'बारावी झाल्यावर करायचं आहे.. पण मला नाही हं आईला.' छाया बोलून मोकळी झाली. 'आयला.. तुझी आई लग्न करतेय व्हय..!' दिनेशला मध्येच खोडी सूचली. 'ए येड्या माझंच म्हणतेय...आई पुढच्या वर्षी करायचं म्हणतेय.. पण मला करायचं नाही. कळलं ना?' छाया त्वेशानं बोलली. 'हो गं बाई.. तुझंच...तुझ्या आईला आता कोण पसंद करणार?' दिनेशनं दुसरी खोडी काढली. पण आता छाया संतापली होती. 'तुला असंच बोलायचं असेल तर निघ आता!' म्हणत छाया दुसऱ्यांदा न्हाणीकडे वळली. 'थांब कुठं निघालीस? तुला माझ्यासारखा नवरा हवा होता ना?' दिनेशनं थेट मुद्द्यालाच हात घातला. तसे छायाचे पाय जागीच थांबले. तिनं आशाळभूत नजरेनं दिनेशकडं बघितलं. दोघे पुढे काही बोलायच्या आतच दारात आशाबाई येण्याची चाहूल लागली. तशी छाया न्हाणीत जाऊन कपडे बडवू लागली. दिनेश जागीच पुतळ्यासारखा उभा होता. घरात शिरताच आशाबाईंनी दिनेशकडे बघत 'काय रे उभा का आहेस? बैस!' अशी अज्ञा केली. 'येतो काकू... किती वेळचा एकटाच बसलो.. कंटाळा आला म्हणून उभा राहिलो. छाया किती कपडे धुतेय माहीत नाही?' असं म्हणत तो उगीच न्हाणीकडे वाकून बघण्याची चेष्टा करू लागला. 'छाया ऐ छाया.. दिनेश निघाला गं..' आशाबाईंनी आवाज दिला. 'आले आई.. ' म्हणत छाया न्हाणीतून बाहेर आली. 'दिनेश तू इथेच होता. मला वाटलं तू केव्हाच गेला?' बाहेर येताच छायानं नाटक केलं. छायाच्या बोलण्यावर मात्र आशाबाईच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्या काही बोलायच्या आतच 'येतो काकू... बाय छाया..' म्हणत दिनेश दारातून बाहेर पडला.
(क्रमश:)

मंगळवार, १९ जून, २०१८

एक अधुरी प्रेमकहाणी (भाग 2)

आता मात्र दिनेशच्या हृदयात छायानं घर केलं होतं. पण खरंच ती माझ्यावर प्रेम करत असेल का? असा प्रश्न त्यानं स्वत:लाच विचारला. प्रेम करत नसती तर तिनं 'मला तुझ्यासारखाच नवरा पाहिजे..तूच पाहिजे' असं म्हटलंच नसतं. छाया सहज आपल्या मनातलं बोलून गेली. पण तिचं प्रेम व्यवहार्य, उचित आहे का. तिच्या प्रेमासाठी मी पात्र आहे का? तिचे वडील, माझा भाऊ, वडील, आई राजी होतील का? अशा एक नव्हे तर अनेक प्रश्नांच्या चक्रव्युहात दिनेश अडकला होता.  त्याचं अभ्यासातूनही मन उडालं होतं. छायाला खरंच मी इतका कसा आवडतो. आत्ताच नाही तर ती  तीन वर्षांपूर्वीही 'मला की नाही तुझ्यासारखाच नवरा पाहिजे!' असं अल्लडपणात बोलून गेली होती. तसं तर ती तेव्हा लहानच होती. अजूनही ती तशी लहानच. पण तिला तेव्हा प्रेमाचा अर्थ उमगला होता का? ती तेव्हापासूनच तर माझ्यावर प्रेम करीत असावी का? अशा प्रश्नांच्या गर्दीतच तो हरवून गेला होता. घरातही तो कुणाशी फारसा बोलत नव्हता. भाऊ-भावजयीनंही त्याच्या वागण्यातील बदल हेरला होता.
त्या दिवशी दिनेशच्या आवडीचं जेवण घरात बनलं होतं. त्याला बेसणवड्या खूप आवडायच्या. त्याची  आई दोनच दिवसांपूर्वी मधल्या मुलाकडून इकडं आली होती. आईनं त्याला 'बाळ दिनू जेवून घे रे', असा आवाज दिला. पण तिचा आवाज त्याच्या कानवरून निघून गेला. मुलाचा काहीच प्रतिसाद मिळत नसल्यानं थकलेली आई तो पहुडलेल्या खोलीत गेली. दिनेश शून्यात गेला होता. डोळे उघडे मात्र तो स्वप्न आणि विचारांत रमला होता. त्याच्या डोळ्यांसमोर फक्त छायाच होती. आईनं खोलीत शिरताच दुसऱ्यांदा आवाज दिला. पण दिनेश भान हरवून छायाच्या आठवणींत रमला होता. आई त्याच्या खाटेजवळ उभी राहिली. हे कारटं बहिरं झालं काय, असं एक क्षण तिला वाटलं. पण त्याचे तर सताड उघडे होते. हा छताकड का टकलावून पाहतोय म्हणून आईनं एकदा छतावरही नजर मारली. तिकडं जाळी, जळमट आणि लाल कौलारू एवढच चित्र होतं. आई शेजारील उभी राहून त्याचा चेहरा न्याहाळत उभी होती. दिनेशच्या चेहऱ्यावरील भाव क्षणाक्षणाला बदलत होते. त्याच्या चेहऱ्यावर कधी गंभीर तर कधी हास्य छटा होत्या. 'बाप रे... हे पोरगं येडंबिडं तर झालं नाही ना?' आई स्वत:शीच पुटपुटली. खरंच हा वेडा होतो की काय चिंतेनं तिनं दिनेशला गदागदा हलवलं. 'आरं पोरा.. बहिरा झालास की काय? केव्हापासून तुला आवाज देतेय. आहेस कुठे?' आई चिडली होती. दिनेश भानावर आला. 'क क काय गं?' अलगदच त्याच्या तोंडून शब्द फुटले. 'अरं माझ्या लेका जेवून घे... त्या छतावरच्या काय कातीन मोजू लागला का ' आई पुटपुटली. 'मला भूक नाही.. नंतर जेवीन. तू जेव.' म्हणत दिनेश खाटेवरून उठला. आई त्याला दोन घास तरी खा म्हणत त्याच्या मागे लागली तरी दिनेश घरात थांबला नाही. सरळ त्याची पावले छायाच्या घराकडे पडू लागली.
छायाचं घर उघडंच होतं. तिची आई आणि वडिलांचं कुठल्या तरी कारणावरून वाजलं होतं. छायासकट सर्व भावंडं एका कोपऱ्यात चिडीचूप बसले होते. छायाचे वडील शांत स्वभावाचे. पण चिडल्यावर हिटलरही घाबरावा असा त्यांचा अवतार व्हायचा. दिनेश आल्याचं त्यांच्या लक्षात आलं नव्हतं. छायानं हळूच दिनेशला इशारा करून तिथून निघून जाण्याचा इशारा केला. काही तरी गडबड झालीय, हे हेरून दिनेशनं तिथून काढता पाय घेतला. छायाच्या आई-वडिलांची बराच वेळ कुरबूर सुरू होती. शेवटी त्या दोघांत तह झाला आणि घर शांत झालं. इकड दिनेश भारीच टेंशनमध्ये होता. आपल्यामुळं तर त्यांच्या घरात भांडणं झाली नसावीत ना, ही शंका त्याला सतावत होती. काही अंशी ही शंका खरीही होती. छायाच्या अभ्यासावरून पहिल्यांदाच तिचे वडील चिडलेले होते. पोरगी अभ्यास न करता का इकडं-तिकडं हिंडत राहते. वारंवार का दिनेशच्या घरी जाते, असा त्यांचा सवाल होता. पण छाया आणि दिनेशमध्ये सध्या काय सुरू आहे, याची त्यांना कल्पना नव्हती. कारण त्यांचं प्रकरण म्हणावं तेवढं पुढं गेलेलं नव्हता. पण दिनेशला उगीचच भीती वाटत होती. छायालाही तसंच वाटत होतं. पण दोघांची भीती त्यावेळी तरी निरर्थक होती.
दिनेश सकाळीच उठला. पण रात्री बराच वेळ विचारात गढून गेल्यानं त्याला नीट झोप लागली नव्हती. त्यामुळं डोळ्यांवरची झोपेची झापड पूर्ण गेली नव्हती. चिपडं पुसतच त्यानं भिंतीच्या घड्याळीवर नजर टाकली. सकाळचे ७ वाजले होते. एरवी सूर्यनारायणाचा हा भक्त साठेआठ नऊशिवाय झोपतून उठणारा नव्हता. पण काल छायाच्या घरी काय रामायण-महाभारत घडलं, याची उत्कंठा त्याला लागलेली होती. ब्रश करून तो थेट बाथरुमध्ये शिरला. भडाभड  पाणी सांडवून पाचच मिनिटांत बाहेरही आला. कपडे घालून तो बाहेरच्या जाण्याच्या तयारीत असतानाच भावाने त्याला हटकले. 'साहेब आज सकाळी सकाळीच कुठं निघालात?' मोठ्या भावाच्या पहिल्याच प्रश्नावर दिनेश गांगरून गेला. 'कुठ नाही... जरा मित्राकडं जाऊन येतो' दिनेश दबक्या आवाजातच बोलला. 'मित्राकडं की मैत्रिणीकडं',  भावानं त्याची विकेट घेतली होती. भाव्या या गुगलीनं दिनेश थोडा चपापला होता. पण 'कोण मैत्रिण..? काही पण का दादा ?' दिनेश मी त्या गावचा नाहीच, या अविर्भावात बोलला. 'तीच रे छाया...' भावानं अचूकपणे बॉल टाकला होता. पण तो टोलवून लावण्याची ताकद दिनेशला झाली नाही. 'मी जाऊ का?' म्हणत तो भावासमोरून गायब झाला. भावानंही त्याला थांबवलं नाही.फक्त त्याला पाठमोरा बघून तो गालातल्या गालात हसला.
अजूनही आमच्यात काहीच घडलं नाही, अजूनही आम्ही एकमेकांना कोणतीही गोष्ट स्पष्टपणे बोललोही नाही तरीही  आमच्या घरचे असे का बोलू लागलेत, याचा दिनेशला अंदाजच येत नव्हता. मित्राकडे जातो म्हणून घरातून बाहेर पडलेल्या दिनेशने आपला मोर्चा मैत्रिण छायाच्या घराकडेच वळवला होता. छायाच्या घरातील वातावरण सामान्य होतं. तिची भावंडं सकाळीच शाळेत गेली होती. तिची शाळा अकरानंतर असल्यानं ती आईला मदत करत होती. दिनेश थेट घरात शिरला. त्याला बघून छायाची आशाबाई यांनीच  बोलायला सुरुवात केली. 'काय रे दोन दिवस झाले आलाच नाहीस?' आशाबाईंनी चौकशी केली. 'कालच आलो होतो. पण तुमच्या घरातून गरम हवा येत होती म्हणून पळालो?' खोडी करत दिनेश म्हणाला. 'तूना दिनेश आगाव झालास बघ? ' आशाबाई प्रेमानं रागावल्या. 'काय झालं होतं काकू काल?' दिनेशनं उत्सुकतेनं विचारलं. 'काही नाही रे हिचं आता बारावीचं वर्ष आहेना. ती अभ्यासात मागे पडत असल्यानं तिच्या बाबाचं टाळकं सरकलं होतं?' आशाबाईंनी स्पष्टीकरण दिलं. त्यांच्या स्पष्टीकरणानंतर दिनेशनं मात्र सुटकेचा श्वास घेतला. 'मग ही अभ्यास का करत नाही?' असा खोचक प्रश्न त्यानं छायाकडं बघत केला. 'तू काय बारावीला मेरिटमध्ये आला होतास का रे?' छायानं चेंडू टोलवला. तसं दिनेशच्या तोंडाला कुलूप लागलं. थोडा वेळ दोघींशी गप्पा मारून त्यानं आपलं घर गाठलं. काल झालेल्या काकू-काकांच्या ताणतणावाचं कारण कळल्यानं दिनेश रिलॅक्स झाला होता. आपल्यावर कोणतंच बालंट आलं नाही, याचा त्याला आनंद वाटला.
छाया आपल्याला पसंद करते, याची त्याला पूर्णपणे खात्री झाली होती. परंतु पुढे करायचं काय? एकदा मनातलं सगळं बोलून टाकयचं, असा निर्धार दिनेशनं केला होता. पण कधी, कुठं व्यक्त व्हावं, हा यक्षप्रश्न होता. छायाच्या घरी किंवा आपल्या घरी या विषयावर बोलणं परवडणारं नव्हतं.  आपल्या भावाला संशय आला असणार याची जाणीवही त्याला झाली होती. मग तिच्याशी बोलायचं कुठं, या संधीच्या शोधात तो होता.
(क्रमश:)

रविवार, १७ जून, २०१८

एक अधुरी प्रेमकहाणी (भाग 1 )


दिवस उजाडला तरी दिनेश अंथरुणतून उठला नव्हता.  रात्री उशिरापर्यंत मित्रांसोबत टवाळक्या करून तो रात्री उशिरा झोपला होता. घरात उकडत असल्यानं तो अंगणातच खाटेवर झोपायचा. त्यामुळं मित्रांसोबत रात्री उशिरापर्यंत गप्पा मारण्याची सवड मिळायची. उन्हाळी सुट्या असल्यानं अभ्यासाचा लकडा लावणारंही कोणी नव्हतं. त्यामुळे उन्हाचे चटके बसेपर्यंत झोपण्याचा त्याचा नित्यक्रम. पण त्यादिवशी आजूबाजूला होणाऱ्या गलबल्यामुळं त्याची झोप उडाली. शेजारी राहणाऱ्या भावंडांत कुठल्यातरी कारणावरून वाद सुरू होता. झोपमोड झाल्यामुळं दिनेश तावातावानं उठला. 'अबे कोण बोंबलतय' म्हणत तो त्या लेकरांवर धावून गेला. पण छायाला बघून त्यानं राग आवरला. दोन भाऊ, तीन बहिणी अशा भावंडात छाया सर्वांत मोठी. ती नववीत शिकत होती. आपसात भांडणाऱ्या भावाबहिणीत तीच शहाणी होती. उरली चौघं भावंडं तिच्याकडे एकमेकांविरुद्ध कैफियत मांडत होते तर ती त्यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न करीत होती. पण त्यांच्यातील भांडण सुटता सुटत नव्हतं.  त्यामुळे हा गलका झालेला होता. दिनेश खवळल्यानं सगळेच शांत झाले. शेवटी हे भांडण दिनेशच्याच दरबारात आलं. दिनेश बारावीत शिकत होता. त्यामुळं तो वयानं छायापेक्षाही मोठा. त्यामुळं तिनच हा खटला दिनेशपुढे रेटला होता. 'दिनेश यांना तूच काही तर सांग. हे माझं ऐकतच नाहीत बघ' छायानं दिनेशसमोर प्रस्ताव मांडला. पण नेमकं काय झालं हे झोपेतल्या दिनेशला ठाऊक नव्हतं. 'अगं माऊली काय झालं ते आधी सांग. मगच या कारट्यांना बोलतो.' दिनेशनं सबुरीनं विचारलं. 'हे कारटे चॉकलेटसाठी भांडत आहेत. मी दुकानावर दूध घ्यायला गेले तेव्हा सहा चॉकलेट आणले. चौघांना एक-,एक चॉकलेट दिलं. मी एक खाल्लं. उरलेल्या एका चॉकलेटसाठी हे भांडण सुरू आहे. सगळ्यांनाच हे चॉकलेट पाहिजे'. छायानं खुलासा केला. प्रश्न तर बिकट होता. एक चॉकलेट चार जणांना कसं द्यायचं, हा छायाला पडलेला प्रश्न दिनेशलाही पडला होता. पण हुशार दिनेशनं हा प्रश्न चुटकीसरशी सोडवला. त्यानं आपल्या खिशातून दोन रुपयाचं नाणं काढलं आणि छायाच्या हातावर ठेवलं. 'एक काम कर.. हे दोन रुपये घे अन् आणखी चार चॉकलेट दुकानावर जाऊन आण. म्हणजे सगळ्यांना एक-एक चॉकलेट मिळंल.' झाले प्रश्नच मिटला.
दिनेशची ही हुशारी पाहून छायासह सगळेच प्रभावित झाले होते. छाया तर अधिकच प्रभावित झाली होती.  त्या पाच भावंडात पुढे काही वाद, समस्या निर्माण झाली तर ते दिनेशच्याच कोर्टात येऊ लागले. दिनेशही तेवढ्याच समजूतदारपणे त्यांच्या समस्येचे निराकरण करत होता. दिनेश मोठ्या भावाकडं शिकायला होता. तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. काही दिवसांनी भावाला सरकारी निवासस्थान मिळाल्यामुळं दिनेशही तिकडेच राहायला गेला. अधून-मधून त्याचं जुन्या घरी येणं होतच. त्या निमित्तान त्याची छायाशी भेट होत होती.
छाया तशी अभ्यासात कच्ची होती. तिचं अभ्यासात फारसं मन रमत नसे. तिची आई नेहमीच तिला 'तू शाळा शिकली नाहीस तर मॅट्रिक झाली की तुझं लग्नच करू देते.' अशा शब्दांत तिला खडसावत, घाबरवत होती. एकादिवशी तिच्या आईनं दिनेशसमोरच तिला अभ्यासावरून झापलं. तेव्हा मात्र ती ओशाळल्यागत झाली. हाच धागा पकडून दिनेश तिची थट्टा करू लागला. 'अभ्यास कर नाही तर तुला तुझी आई लंगडा नवरा करून देईल' असा तो तिला चिडवू लागला. त्यामुळं ती दिनेशवर थोडी नाराजही झाली. पण एकेदिवशी दिनेशनं तिला मस्करी करतच विचारलं 'सांग तुला कसा नवरा पाहिजे?.' दिनेशच्या प्रश्नावर छायानं अनपेक्षितपणे उत्तर दिलं. 'मला की नाही तुझ्यासारखाच नवरा पाहिजे!' छायाच्या उत्तरानं दिनेश गोंधळूनच गेला. 'अे तू येडी झाली का ? माझ्यासारखा म्हणजे?' दिनेशनं जोर देऊन विचारलं. 'हो हो तुझ्यासारखाच.. अन् तूच!' छायाच्या या उत्तरावर दिनेश निरुत्तर झाला. त्यानं तिच्या नजरेला नजर भिडवली तेव्हा ती  खर बोलतेय, असं जाणवताच त्यानं तिथून काढता पाय घेतला. पण छायाचे ते शब्द दिनेशच्या मनात घर करून बसले. पण मुळातच छायाचं आणि दिनेशचंही लग्नाचं ते वय नव्हतंच. 
योगायोगानं छायाच्या वडिलांनाही ते ज्या खात्यात काम करत होते त्या खात्याचे निवासस्थान मिळालं. आणखी एक दुग्धशर्करा योग म्हणजे दिनेशच्या भावाचं आणि छायाच्या वडिलांचं निवासस्थान दहा मिनिटे पायी जाण्याच्या अंतरावरच होतंं. छाया दिसली की दिनेशला  ती बोललेले शब्द आठवत. पण या कारटीला अजून शेंबूड पुसायची अक्कल नाही आली आणि लग्नाच्या गोष्टी करतेय अशी मनाची समजूत घालून दिनेशनं तिचं बोलणं फारसं मनावर घेतलं नाही. तिला काहीच कळत नसावं म्हणून ती बोलली, असा त्याचा पक्का समज झाला. छाया, तिची आई, तिची भावंडं सर्वांचं दिनेशच्या घरी येणं-जाणं होतं.
बघता बघता दोन वर्षे लोटली. छाया अकरावीत तर दिनेश बीए च्या वर्गात गेला. नववीत शेंबडी पोर वाटणारी छाया आता पूर्वीपेक्षाही अधिकच सुंदर दिसू लागली होती. तिच्या बोलण्यात, वागण्यातही समजूतदारपणा आला होता. पण जुनीच ओळख असल्यानं ती दिनेशशी मनमोकळेपणानं बोलत होती. सुटीच्या दिवशी ती दिनेशच्या घरी आली. दिनेश ओसरीतच खाटेवर बसून पुस्तक वाचत बसला होता. दिनेशचा भाऊ नोकरीवर गेलेला तर भावजय काही तरी कामानिमित्त शेजारच्या बाईकडे गेली होती. घरात दिनेशच्या लहान पुतण्यांचा गोंधळ सुरू होता. छाया दबक्या पावलांनीच दिनेशच्या दिशेने आली आणि पुस्तक वाचण्यात रमलेल्या दिनेशला 'भॉ' असा आवाज करून घाबरवले. दिनेश दचकलाही. पण लगेच ही छायाच आहे, असे लक्षात येताच त्यानं तिला  खाटेवर बसण्याचा इशारा करत 'बैस.. तुला काय मी घाबरट वाटलो का? मी तुझ्यासारख्या लहान लेकराला घाबरणारा नाही.' दिनेशनं लेकरू म्हटल्याचा छायाला थोडा रागच आला. 'ऐ... मी काय आता लेकरू-बिकरू राहिले नाही. मी मोठी झाले. अकरावीत गेले म्हटलं!' छाया थोडी रागातच बोलली. 'बरं बाई.. तू म्हातारी झालीस..' दिनेशनं पुन्हा तिला छेडलं. 'जा मला तुझ्याशी बोलायचंच नाही. मी चालले.. ', असं म्हणत छाया माघारी फिरली. तेव्हा मात्र दिनेशला आपण उगीच हिची मस्करी करतोय, याची जाणीव झाली. त्यानं आपली चूक लगेच सुधारत 'बरं बाबा आता नाही म्हणणार म्हातारी! ये बस..' अस म्हणत तिला खाटेवर बसण्यास सांगितलं. छायाही आढेवेढे न घेता खाटेच्या दुसऱ्या टोकाला बसली. 'काकू काय करतायत?' अशी छायानं विचारणा केली. काकू म्हणजे दिनेशची वहिणी. 'तू काकूला भेटायला आली की मला?', दिनेशचा प्रश्न. 'नाही रे मी सहज विचारलं. कुठे गेल्या त्या?' छायाचा प्रतिप्रश्न. 'बाजूच्या काकूकडे गेल्यात!' दिनेशनं स्पष्ट केलं. 'बरं निघते मी' म्हणत ती खाटेवरून उठली. तसाच दिनेशनं पटकन तिचा हात धरला अाणि 'मी काय तुला खाऊन राहिलो का? बस मुकाट्यानं' असं म्हणत तिला पुन्हा खाटेवर बसवलं. तेव्हा मात्र छाया लाजली. 'मी नंतर येते..' असं म्हणतच ती अत्यंत गतीने खाटेवरून उठली नी रस्त्याला लागली. ती अशी का लाजली आणि लगेच का पळाली, याचं कोडं दिनेशला पडलं होतं.
दोन-तीन वर्षांपूर्वी बडबड करताना न थकणारी छाया आता बोलणं विकत घ्यावं तसं बोलत होती. कधी चिडवलं तर रागानं लालबुंद होऊन चिमटे काढणारी छाया आता दिनेशला स्पर्श करायला किंवा दिनेशचा स्पर्श झाला तरी लाजत होती. तिच्यातील हा बदल म्हणजे तारुण्यातील बदल होता, हे दिनेशच्या आजवर लक्षात आलं नव्हतं. पण ती 'मी नंतर येते' असे म्हणत चपळाईने रस्त्यावरून जाणाऱ्या छायाला बघितल्यानंतर त्याचं डोकं काम करू लागलं. 'अरेच्चा.. ही तर आता मोठी झालीय. मीपण तरुण आहे. ती कशी काय एकटी माझ्याशी बोलणार.' असं स्वत:शी पुटपुटत दिनेश गालातल्या गालात हसला.
दोन दिवसांनंतर दिनेशच छायाच्या घरी गेला. त्याला अंगणातच बघून छायाला गोड हसू आलं. तिची आई स्वयंपाकात व्यग्र होती. बहिणी व इतर भावंडं बाहेर खेळायला गेली होती. दिनेशचा पुसटसा आवाज ऐकून तिच्या आईनं 'कोण आलंय गं?' असा किचनमधूनच आवाज दिला. 'आई दिनेश आलं गं?' असा बाहेरूनच छायानं आवाज दिला. 'बसा हं.. मी आत्ता चार पोळ्या लाटून येते.' असं म्हणत तिची आई पुन्हा कामात व्यग्र झाली. 'घरात नको.. आपण अंगणातच ओट्यावर बसू' म्हणत दिनेशनं तिला बाहेरच बसण्याचा आग्रह धरला. 'अरे पण आई घरीच आहे ना!' छायानं दिनेशच्या अाग्रहाचं खंडण करत म्हटलं. 'मी काय तुला पळवून न्यायलो का?... भेटायलाच आलो ना!' असे अपसूकच शब्द दिनेशच्या तोंडून निघाले अन् छायाचं लाजेनं पाणी पाणी झालं. हा आणखी काही मोठ्यानं बोलेल म्हणून छायानं 'बाहेरच बसू' असा सामंजस्य करार करत घरासमोरील ओट्यावर ठाण मांडलं. दिनेशनं तिच्याकडं निरखून पाहिलं. ती अजूनही लाजरीबुजरी दिसत होती. या लाजेनं ती आणखीच सुंदर दिसत होती. 'बस आता..' म्हणत तिनं ओट्यावरची धूळ हातानं झटकत दिनेशला जागा करून दिली. दिनेश अज्ञाधारकपणे तिने ऑफर केलेल्या जागेवर बसला.
'कसा काय आलास?' छायानं पहिलाच प्रश्न केला. 'काही नाही.. आपलं सहज..' दिनेश सहज बोलला. 'तू मलाच भेटायला आलास ना.. मला माहीत होतं येशीलच म्हणून!' छाया उद्गरली. 'मी तुला नाही... तुझ्या आईला भेटायला आलोय!' दिनेश म्हणाला. 'आईकडं माझा हात मागणार आहेस का?' छायानं मुद्दाम खोडी काढली. 'हो.. आज मागतोच' दिनेशही खोडकरपणावर आला. पण त्याच्या या खोडकरपणामुळे छायाच्या चेहऱ्यावर गंभीरतेचे भाव आले. 'हात मागितलास तर बरंच होईल. तसंही मला तुझ्यासारखाच... नाही तूच नवरा पाहिजेस', छाया अत्यंत गंभीरपणे बोलली. तेवढ्यात तिची आई अंगणात आली. 'काय चाललंय रे दिनेश तुझं? ताईंच काय चाललय?' छायाच्या आईनं बाहेर येताच प्रश्न केला. 'क क का काही नाही... मजेत.. वहिणीही मजेत..तुम्ही कशा आहात क क काकू!' दिनेश अडखळत बोलू लागला. 'तू बोबडा कधीपासून बोलू लागला?' आईनं लगेच प्रश्न केला. दिनेशनं स्वत:ला सावरत 'नाही नाही.. तोंडात फोड आलाय ना म्हणून स्पष्ट बोलता येत नाहीय'. दिनेशनं स्पष्टीकरण दिलं. 'बरं बाबा.. जेवलास का? बस आमच्याबरोबर', म्हणत तिच्या आईनं दिनेशला जेवण ऑफर केलं. 'नाही काकू मी जेवलो. तुम्ही आरामात जेवा.. मी येतो..!', असं म्हणत दिनेशनं धूम ठोकली. छाया पाठमोऱ्या दिनेशला बघून मनोमन आनंदी होती.
'हात मागितलास तर बरंच होईल. तसंही मला तुझ्यासारखाच... नाही तूच नवरा पाहिजेस' हे छायाचे शब्द दिनेशभोवती पिंगा घालत होते.                             (क्रमश:)

शनिवार, १६ जून, २०१८

भेट तिची नि माझी (दीर्घ कथा)


ती सध्या काय करत होती, याची दीपकला कल्पनाच नव्हती. तिचं तारुण्यातलं पदार्पण मात्र त्याला आठवत होतं. शिक्षणासाठी खेड्यातून शहरात गेलेल्या दीपकला तिनं भुरळ घातली होती. घराच्या बाजूने मुलींच्या हसण्याचा आवाज आला की दीपाली आली हे त्याला कळायचं. कारण दीपकच्या घराजवळूनच तिच्या शाळेचा रस्ता होता. ती दहावीत शिकत होती तर दीपक बी.ए. प्रथम वर्षात. तसं बघितलं तर दीपक वयात आलेला होता. पण दीपाली मात्र तारुण्याच्या उंबरठ्यावर होती. सर्वसामान्य तरुणांपैकी एक मात्र चार-चौघांत देखणा असलेल्या दीपकचे तिला आकर्षण हाेतं. प्रेमात पडण्याचं वय नसतानाही ती कदाचित त्याच्या प्रेमात पडली असावी. मैत्रिणींसोबत जाताना दीपकचं घर जवळ आलं की मुद्दाम मोठ्यानं हसणं हा दीपकसाठी ती आल्याचे संकेत होते.
दीपाली एका मध्यमवर्गीय ब्राह्मण  कुटुंबातील होती. वडील कुठल्या तरी सरकारी कार्यालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी. दीपाली हीच घरातील थोरली मुलगी. एक लहान भाऊ तिच्या पाठीवर होता. ती ज्या कन्या शाळेत शिकत होती त्या शाळेचा रस्ता दीपकच्याच घराजवळून जात होता. त्यामुळे ती आणि दीपक अनेकदा समाेरासमोर येत. पण ती वयानं लहान असल्यानं दीपकनं कधी तिच्याकडं वेगळ्या नजरेनं बघितलं नव्हतं. पण तिचं सौंदर्य डोळ्यांत भरण्यासारखं होतं. बऱ्याचदा तिनं दीपकच्या डोळ्यांत रोखून पाहण्याचा प्रयत्न केला. पण दीपक प्रेमाच्या गावचा नव्हताच.  एक-दोन वेळा तिनं मुद्दाम दीपकला बोलण्याचं निमित्त साधत 'किती वाजले?' असा प्रश्नही केला. पण शाळेला उशीर झाला असेल म्हणून तिनं वेळ विचारला असावा असा त्याचा समज होता. पण ती बोलण्याचं निमित्त शोधत होती, हे दीपकला कळलं नाही.
दुपारची वेळ होती.   घरात उकडू लागल्यानं दीपक घरासमोरील पिंपळाच्या झाडाखाली  कट्ट्यावर एकटाच बसला होता. समोरून दीपाली एकटीच रुमालानं घाम टिपत आली होती. दीपकला एकटं बघून तिनं संधीचं सोनं केलं. ती थेट दीपकजवळच गेली. 'मला ग्लासभर पाणी देना.. खूप तहान लागली?' असा आदेश केला.  ती दीपकसाठी नवखी नव्हतीच.  'हो देतो' म्हणत दीपक घरात शिरला. तांब्यात पाणी आणि ग्लास घेऊन तो परतला. दीपालीनं ढसाढसा दोन ग्लास पाणी पिलं. एक सुस्कारा टाकून 'तू आज कॉलेजला गेला नाही का?' असा प्रश्न केला.   'कंटाळा आला म्हणून गेलो नाही' असं उत्तर देऊन दीपक मोकळा झाला. 'पण तू आज एकटी कशी?' असं दीपकनं विचारलं. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर लॉटरी लागावी तसा आनंद झळकला. 'अरे आमच्या दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. मी सगळयांच्या आधी पेपर देऊन बाहेर पडले' असं उत्तर तिनं दिलं.  तिला दीपकशी बरंच काही बोलण्याची इच्छा असावी. पण ती पुढचं बोलण्याआधीच दीपक तांब्या नि ग्लास ठेवण्यासाठी घरात गेला. बाहेर येईपर्यंत ती तेथेच उभी होती. न राहवल्याने दीपकनं तिला  'आज तुला घरी जायचं नाही का?' असा प्रश्न केला. 'मी मैत्रिणीची वाट बघतेय' असं तिचं उत्तर होतं. 'ओके' म्हणत दीपक घराकडे वळत असतानाच 'ए थांबना..का माझ्यासोबत बोलायचं नाही का तुला?' या दीपालीच्या प्रश्नानं दीपक   हबकून गेला. उगीच लोकांचा गैरसमज होईल, अशी दीपकला भीती होती. तरीही का कुणास ठाऊक दीपकलाही तिच्याशी बोलावसं वाटत होतं. तरीही त्यानं आपण नंतर बोलू म्हणत तिला पाठ दाखवली. दीपक घरात गेला. दोन मिनिटांनी तो बाहेर आला. पण दीपाली तेथे नव्हती. ती तर मैत्रिणीची वाट बघणार होती. मग गेली कशी? असा प्रश्न त्याला पडला. पण ती मैत्रिणीसाठी नव्हे तर आपल्यासाठीच थांबली होती, असं उत्तरही त्याला  सापडलं. ती पेपरला जाण्याच्या वेळी दीपक तिच्या वाटेवर नजर ठेवून होता. ती घराजवळ आली की तो तिला कधी मानेनं तर कधी डोळ्यांनी खुणवायचा. तीसुद्धा स्मित हास्य देत  तितकाच प्रतिसाद द्याची. त्या दोघांचं हे मनोमीलन तिच्या मैत्रिणींना कळायला वेळ लागला नाही. त्यापण चावटपणानं 'बघ तुझा हीरो समोरच उभा आहे', असं चिडवत होत्या.
एका दिवशी दीपकची नजर दीपालीच्या रस्त्यावरच होती. पण बराच वेळ झाला तरी ती आलीच नाही. तीच काय तर तिच्या शाळेतील एकही मुलगी रस्त्यानं जाताना दिसली नाही. म्हणून दीपकनं शाळेकडं मोर्चा वळवला. शाळेचं गेट बंद होतं. एक चौकीदार तेवढा गेटच्या बाजूला तंबाखू मळत बसलेला दिसला. दीपकनं 'काय काका, आज शाळेला सुटी आहे की काय?' असा प्रश्न केला. 'बाबू सुट्या  लागल्यात ना.  परीक्षा झाली'. असं काकाचं उत्तर ऐकून दीपक निराश झाला. आता कुठं दीपालीविषयी त्याच्या मनात प्रेमभावना जागृत होत असताना मध्येच सुट्या कशा लागल्या, याचा त्याला प्रचंड राग आला. दीपाली कुठे भेटेल, केव्हा भेटेल, या प्रश्नांचं तेव्हा तरी दीपककडे उत्तर नव्हतं. कारण ती ज्या कन्या शाळेत शिकत होती ती शाळा दहावीपर्यंतच होती. पण एकदा दीपालीनं बोलता बोलता तिच्या घराचा पत्ता सांगितला होता, हे दीपकला आठवलं.
ऊन उतरलं होतं. दीपालीच्या घराचा पत्ता शोधणं, एवढंच काम दीपकच्या यादीत होतं.  सायकलवर टांग मारून  तो  दीपालीनं सांगितलेल्या वस्तीकडं वेगानं निघाला. वस्ती काही दाट नव्हती. त्यानं एका आजीकडे 'आजीबाई दीपाली जोशी' कुठे राहते हो? असा प्रश्न केला. आजीबाईनं बोट दाखवत 'ते लिंबाच्या झाडाला लागून असलेलं घर' एवढच उत्तर दिलं. दीपक थोडा पुढे गेला. पण घराला मोठं कुलूप लावलेलं होतं. ते पाहून 'सालं माझं नशीबच गांडू' असं स्वत:शी पुटपुटत पुन्हा आजीबाईजवळ गेला. 'आजी... घराला तर कुलूप आहे.. कुठं गेले जोशी काका?' आजीनं दीपकला खालपासून वरपर्यंत न्याहाळलं. 'तू काय त्यांचा पाहुणा हाईस का?  अरं बाबा त्या जोश्याची बदली झाल्याचं आईकलं व्हतं. गेला असंल घर सोडून' आजीचे ते शब्द ऐकून दीपकला आपल्या कानात कोणी तरी गरम पाणी ओतावं तसं वाटलं.  हताश होऊन तो घरी परतला. एक-दिवसा आड त्याच्या सायकलची चाके दीपालीच्या घराच्या दिशेने धावत होती. परंतु दरवेळी त्याला निराशच होऊ परतावं लागलं होतं. दीपालीच्या वडिलांची बदली झाली होती हे मात्र पक्कं होतं. ती कधीच भेटणार नाही, याची दीपकला जाणीव झाली. दीपक काही दिवस हताश, निराश राहिला. पण आयुष्याचे गाणे कधी न संपणारे आहे, याची त्याला जाणीव होती.
बघता बघता दोन वर्षे लोटली. दीपकने ग्रॅज्युएटची परीक्षा दिली.  सुट्यांत तो बहिणीला औरंगाबादला भेटायला गेला.  परीक्षेचा निकाल काय लागणार याची त्याला कल्पना होतीच. ऐन परीक्षेत तो आजारी पडल्यामुळे त्याचा एक पेपर हुकला होता.   वर्षच वाया जाणार यामुळे बहीण राहत असलेल्या शहरातच काही तरी काम करावे, असं त्यानं ठरवलं. बहिणीच्या मदतीने त्यानं चहा-नाष्ट्याची टपरी उघडली. त्याचा व्यवसायात चांगला जम बसला. ग्राहक नसेल त्या वेळी तो अभ्यास करू लागला. पुरवणी परीक्षा देऊन त्यानं आपलं पदवी शिक्षण पूर्ण केलं. पुढे शहरातच शिक्षण घेण्याचा मनोदय केला.  अर्धवेळ व्यवसाय आणि सायंकाळी दुसऱ्या पदवीचे शिक्षण असा त्याचा क्रम सुरू होता. व्यवसाय चांगला चांगला चालत असला तरी  स्वत:ची जागा नसल्याने हा व्यवसाय कधी ना कधी सोडावाच लागणार याची त्याला कल्पना होती. त्यामुळे शिकूनच  नोकरी करावी, असंच दीपकनं ठरवलं.   दीपक आपलं गाव, मित्र, मैत्रिणी यांना हळूहळू विसरत चालला होता. शहराच्या ठिकाणी त्याला नवे मित्र मिळाले होते.  दीपालीचाही त्याला विसर पडला होता.
दुपार झाली होती. रस्त्यावरची वाहतूकही विरळ होती. दीपक आपल्या कामात आणि ग्राहकांत अडकून पडलेला होता. अचानक त्याच्या टपरीसमोर एक ऑटोरिक्षा येऊन थांबला. त्याची टपरी हमरस्त्यावरच असल्याने दररोज शेकडो येणारे-जाणारे होते. पण हा ऑटोरिक्षा टपरीसमोरच थांबल्यानं दीपकचे लक्ष जाणं साहजिक  होतं. रिक्षात रुबाबदार, देखणी तरुणी होती. तिनं रिक्षाचालकाचं भाडं अदा करून रिक्षातून बाहेर पाऊल ठेवलं. तोवर दीपक बुचकाळ्यात पडलेला होता. हिला कुठं तरी बघितलय.. पण कुठं.. असा क्षणभर विचार त्याच्या डोक्यात घुमला. पण ती दीपालीच होती, हे कळायला त्याला वेळ लागला नाही. ती हसतमुखाने दीपककडे बघत होती. पण तिला अचानक बघून काय बोलावे नि काय नाही, हेच दीपकला सूचत नव्हतं. अखेर 'दीपाली तू..' एवढेच शब्द त्याच्या तोंडून फुटले. साधारणत: तीन वर्षांनंतर दीपाली त्याच्या पुढ्यात उभी होती. ती पूर्वीपेक्षा अधिकच सुंदर दिसत होती. अंगातही बऱ्यापैकी भरली होती. शाळेच्या गणवेशात पाहिलेली दीपाली  आज साडी नेसून होती. तिच्या व्यक्तिमत्त्वात जमीन-अस्मानाचा फरक पडला होता. जिच्यावर आपण तीन वर्षांपूर्वी जिवापाड प्रेम करत होतो तीच दीपाली आज समोर बघून दीपकच्या आनंदाचा ठावठिकाणा नव्हता. तिची भेट त्याला स्वप्नवत वाटत होती. बराच वेळ तो तिच्याकडे टक लावून पाहत राहिला. टपरीवर चहा ढोसत बसलेल्या ग्राहकांचा चहाचा घोट त्यांच्या नरड्यात अडकून पडावा तसे ते या दोघांकडे डोळे विस्फरून बघत होते. शेवटी दीपालीनेच "कसा आहेस तू" म्हणत शांततेचा भंग केला. दीपकनेही "मी बरा आहे.. तू इथे कधी, केव्हा आलीस. तू कशी आहेस', अशा अनेक प्रश्नांचा एकाच वेळी भडीमार केला. दीपकच्या प्रश्नांपुढे ती थोडी थबकली. 'अरे सांगते बाबा...बस म्हणशील की नाही', असं तिनं म्हणताच दीपक भानावर आला. 'सॉरी हं... बसना', असं म्हणत त्यानं तिला खुर्चीवर बसण्याचा इशारा केला. तिला ग्लासभर पाणी दिलं.  ती आरामात खुर्चीवर विसावली. दीपकच्या हातावर अजून दोन-तीन ग्राहक होते. 'तू बस.. अापण जरा या लोकांकडे बघतो'  असं म्हणत दीपकने ग्राहकांना जे हवं ते देऊन टपरी बंद करण्यासाठी आवराआवर सुरू केली. 'तू दुकान बंद करतोयेस का?' मध्येच दीपालीने प्रश्न केला. 'हो गं... दुकान सुरू ठेवलं तर तुझ्यासोबत एक मिनिटही बोलता येणार नाही मला. आपण कुठं तरी निवांत बोलत बसूयात ना.' त्यावर दीपालीनंही मान डोलावली.
तसं पाहिलं तर दीपकच्या बहिणीचं घर त्याच्या टपरीच्या लागूनच होतं. पण बहीण आणि मेव्हण्याला उगाच गैरसमज व्हायला नको म्हणून त्यानं तिला दुसरीकडे  बोलत बसण्याचं ठरवलं होतं. झपाट्यानं दुकानातील सामान, खुर्च्यांची आवराअवर केली. 'चल आपण बाजूलाच गार्डन आहे तिथं बसू' असं म्हणत दीपकनं तिला सोबत चालण्यास सांगितले. ती निमूटपणे त्याच्यासोबत चालू लागली. रस्याने चालताना दीपालीनं हळूच दीपकचा हात हाती घेतला तेव्हा त्याला अगदी शहारून आलं. अंगात वेगळाच कैफ संचारला. भर रहदारीच्या रस्त्यावर तिनं दीपकचा हात धरला होता. तो सोडवण्याचं बळ कधीच गळून पडलं होतं. हातात हात देऊन दीपालीनं जणू आपलं सर्वस्वच अर्पण केल्याची भावना दीपकच्या मनात निर्माण झाली होती. दोघांच्याही तोंडून शब्दही उमटत नव्हता.   पाचच मिनिटांच्या अंतरावर गार्डन होतं. ते गार्डनमध्ये शिरले. आपण इतरांना दिसू नये, अशी एक जागा निवडून दोघांनी बैठक मांडली.
  'तू कुठे होती इतके दिवस. मी तुझ्या घराकडे सारखा चकरा मारत होतो. अचानक कुठं गायब झाली होती.' दीपक बोलता झाला. 'माझ्या बाबांची बदली झालीय चंद्रपूरला. तिकडंच हाेते.' दीपाली उत्तरली. 'मग आज इथे कशी?' न राहवून दीपकने विचारले. 'ती एक मोठी कहाणी आहे. तुला निवांत सांगते. मी येथे दुसऱ्या कामासाठी आलेय. तुला जवाहर कॉलनी  माहिती आहे ना?' दीपालीने सर्व विषयांना बगल देत प्रश्न केला. 'हो.. पण तिथं कोण राहतं. तुझं काय काम?' दीपकनं उत्सुकतेनं विचारलं. 'अरे माझा एक मित्र तिथं राहतो. त्याला भेटायचंय.' दीपाली सहज बोलून गेली. पण तिचं हे बोलणं ऐकून दीपक थोडा दचकलाच. "म्हणजे?' दीपकने भुवया उंचावत उत्कंठेनं विचारलं. 'म्हणजे काय.. माझा कोणी मित्र असू नये का?' दीपालीचा हा उपरोधिक प्रश्न दीपकचे काळीज चिरून गेला. 'का नाही.. असू शकतो. पण तो कोण, कुठला काही तरी सांगशील ना?' दीपकने स्वत:च्या भावनांना आवर घालत प्रश्न केला. 'माझं त्याच्यावर प्रेम आहे. आमची महिनाभराखालीच भेट झाली होती. मला त्याला भेटायचंय', दीपालीनं स्पष्ट केलं.
दीपालीचं हे बोलणं दीपकचं काळीज चिरणारं ठरलं. थोड्याच वेळापूर्वी दीपालीनं हातात हात घातल्यानंतर दीपकला जो स्वर्गप्राप्तीचा आनंद झाला होता तो क्षणात नरकात गेला होता. तीन वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मिळालेलं प्रेम क्षणार्धात हिरावलं गेलं होतं.    दीपक निशब्द झाला. काय बोलावं नि काय नाही, हेच त्याला सुचेना. काही वेळापूर्वी चेहऱ्यावर उगवलेला अानंद कधीच अस्ताला गेला होता. तो एकटक तिच्याकडे बघत होता. दीपाली आपल्याच प्रेमापोटी इथे आली असावी, असं त्याला वाटलं होतं. पण ती  दुसऱ्या कोणासाठी आलीय, याचा उलगडा झाल्याने दीपकला स्वत:चाच भयंकर राग आला. पण राग येऊन तो करणार तरी काय होता. कारण तीन वर्षांपूर्वीची दीपाली आता राहिलेली नव्हती. सगळंच बदलून गेलेलं होतं. तिचं ते अल्लड प्रेम, शाळेत जातानाच्या खाणाखुणा आता सर्व पुसून गेल्या होत्या.   शिवाय दोघांपैकी कोणीही कोणाला प्रेमाची कबुली दिलेली नव्हती. मग मुळात प्रेम होतं की नाही, या पहिल्या पायरीच्या विचारापर्यंत दीपक पोहोचला. तो विचारांच्या तंद्रीत हरवलेला असतानाच दीपालीनं त्याच्या हातात हात देत 'दीपक सांगना.. माझी नि त्याची भेट घालून देशील का? तू माझा चांगला मित्र अाहेस ना' असं म्हणताच दीपक तंद्रीतून बाहेर आला. 'हो हो... बिल्कूल..  आपण आताच जाऊयात जवाहर कॉलनीत.', असं अाश्वासित करत दीपक जागेवरून ताडकन उठला. 'हो रे बाबा.. जाऊयात. पण थोडा बसना...मला तुझ्याशीही काही बोलायचं आहे. तू उगीच गैरसमज करून घेऊ नकोस..' दीपालीनं बसल्या जागूनच शांतपणे म्हणत दीपकचा हात ओढून त्याला पुन्हा जागेवर बसवलं.
दगडाप्रमाणं बसलेल्या दीपकसोबत अत्यंत शांतपणे दीपाली बोलत राहिली. 'दीपक खरं सांगू... तू मला खूप आवडत होता. पण बाबांची बदली झाली नि आम्ही तुझं गाव सोडलं. चंद्रपूरला गेलो. बाबांचा एका अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या जाण्यानं आम्ही पूर्ण कोलमडून गेलो. शिक्षणही पूर्ण करता आलं नाही. बाबांच्या पेन्शवर घर चालत होतं. आई सारखी आजारी राहत होती. लहान भाऊ अजून शिकतोय. मी नोकरी शोधत नागपूर, औरंगाबाद सर्व ठिकाणी फिरले. पण बारावीच्या शिक्षणावर मोठी नोकरी मिळत नव्हती. औरंगाबादला आले असताना माझी सुनीलशी ओळख झाली.' दीपाली तिच्या आयुष्यातील घडामोडी सांगत होती. त्या ऐकून दीपकला वाईटही वाटत होतं. पण तो काहीच न बोलता तिचं बोलणं ऐकत होता. दीपाली मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो, असे शब्द अनेकदा त्याच्या ओठापर्यंत येत होते. पण का उगीच तिचा अपेक्षाभंग करायचा म्हणून दीपक ओठापर्यंत आलेले शब्द आवंढ्यासोबत गिळून घेत होता. आता तिला नवी वाट, नवा जोडीदार मिळाला आहे. उगीच तिच्या आनंदावर विरजन घालायचे नाही, असं ठरवून दीपकनं स्वत:हून तिचा हात हातात घेत दिलासा देत म्हटलं, "दीपाली आधीचं सगळं जाऊ दे.. मित्र म्हणून मी तुला जी मदत लागेल ती करण्यास तयार आहे. चल आता.. आपण सुनीलच्या घरी जाऊयात. ', असं म्हणत जड अंत:करणाने उठला. दीपालीही त्याच्या हाताचा आधार घेऊन उठली.
दोघं गार्डनमधून बाहेर आले. समोरच तीन-चार ऑटोरिक्षा उभ्या होत्या. त्यापैकी एकाला आवाज देऊन दीपकने त्यांना जवाहर कॉलनीत जायचं, असं सांगितले. रिक्षाचालकानेही बसा म्हणत, रिक्षा सुरू केली. दोघे रिक्षात बसले. दीपाली दीपकला बिलगुनच बसली. एकदोन वेळा तिने पुन्हा त्याचा हात हाती धरला. जवाहर कॉलनीत पोहोचल्यानंतर दीपकनं दीपालीला सुनीलचा पत्ता विचारला. तिनं पुढच्या गल्लीतच घर आहे. मी रात्रीच्या वेळी आले होते म्हणून फारसं लक्षात राहिलं नसल्याचं सांगितलं. तिनं अंदाजानच बहुतेक पुढच्या गल्लीत घर असावं, असं रिक्षाचालकाला सांगितलं. रिक्षाचालकानं रिक्षा वळवला. तसं पुढचंच घर सुनीलचं असल्याचं तिच्या लक्षात आलं. तिनं रिक्षाचालकाला घरापासून ५० फुटांच्या अलीकडेच रिक्षा थांबवण्यास सांगितलं.  ती दीपकला म्हणाली, 'तू एक काम कर.. तूच त्याच्या घरी जा आणि सुनील आहे का विचार. मी रिक्षातच बसून राहते. तो घरी असेल तर त्याला इकडेच बोलव. त्याचे वडील किंवा आई असेल तर मी त्याचा मित्र आहे, असं सांग. ' दीपालीचं हे फर्मान दीपकला बुचकाळ्यात टाकणारं होतं. पण दीपाली बहुदा तिच्या आईवडिलांना घाबरत असेल असा समज करून तो सुनीलच्या घराकडे पायी निघाला. त्यानं दरवाजा ठोठावला. साधारणत: सत्तावन ते साठीच्या घरात असलेल्या सुनीलच्या वडिलांनीच दार उघडलं. दीपकनं सुनील आहे का, अशी विचारणा केली असता तो कामाला गेला. रात्री येईल, असं सांगितलं. 'पण तुम्ही कोण?' असा प्रश्न त्यांनी विचारलाच. 'मी दीपक.. औरंगाबादचाच आहे. मित्र आहे सुनीलचा. काम होतं. कधी येईल तो?' असा प्रश्न केल्यावर त्याच्या वडिलांनी साडेसातपर्यंत येईल, असे उत्तर देत नंतर या, असे म्हणत दार लावलं. त्या वडीलधाऱ्याचं वागणंही दीपकला थोडं खटकलं.
दोघंही रिक्षात बसले. पण आता जायचं कुठं. आता कुठं सायंकाळचे पाच वाजले होते. सुनील साडेसातला येणार होता. अडीच तास कुठे घालवायचे हा प्रश्न होता. बरं इकडं दीपकनं टपरीही बंद केली होती. ती पुन्हा उघडायची होती. दीपालीला थांबवायचं कुठं? हाही एक प्रश्न होता. शेवटी त्यानं दीपालीला आपल्या बहिणीकडेच थांबवावं. ती नातलगाकडे आलीय. पण त्यांच्या घराला कुलूप आहे. सायंकाळपर्यंत परततील, असं सांगण्याची कथा रचली. दोघेही बहिणीकडे परतले. पण पुन्हा साडेसात वाजता सुनीलला गाठायचे म्हणून आज टपरी बंदच ठेवायची, असा दीपकनं निर्णय घेतला. दरम्यान दीपाली  फ्रेश झाली. थोडा नट्टापट्टाही केला. फ्रेश झाल्यानंतर तर ती आणखीच सुंदर दिसत होती. तिला बघून दीपकच्या काळजात नुसती घालमेल सुरू होती. त्या सुनीलला मार गोळी अन् माझ्याशीच लग्न कर, असा विचार वारंवार त्याच्या डोक्यात घिरट्या घालत होता. पण दीपालीचं आपल्यावर प्रेम नाहीच मुळी,  हा एकटा विचार इतर विचारांवर मात करीत होता.
सव्वासात वाजले. दीपालीला तिच्या नातलगांकडे (प्रियकराकडे) घेऊन जाण्याची वेळ झाली होती. दोघं घराबाहेर पडले. रिक्षा पकडून थेट सुनीलचं घर गाठलं. १५ मिनिटांच्या प्रवासात 'तू लग्न करणार आहेस का सुनीलसोबत' एवढाच एकच प्रश्न दीपकने दीपालीला विचारला. त्यावर तिचं 'बघूयात' एवढंच उत्तर होतं. 'बघूयात' हे उत्तरच मुळात गूढ होतं. म्हणजे दीपालीच्या मनात नेमकं काय आहे, याचा अंदाजच दीपकला लागत नव्हता. ही बया काय ठरवून इथं आली. तीन वर्षांपूर्वी रस्त्यावर स्मित हास्य देणारी,  खाणाखुणा करणारी, आपल्या एकतर्फी प्रेमात पडलेली पण प्रेमाविषयी चकार शब्दही न काढणारी दीपाली आत्ता हातात हात देतेय, बिलगून काय बसतेय, पण प्रेम सुनीलवर करतेय म्हणून सांगतेय. मुली एवढ्या बिनधास्त कशा असू शकतात, अशा चक्रव्युहात तो सापडला होता. रिक्षाचालकाने सांगितलेल्या ठिकाणी रिक्षा थांबवला. पुन्हा दीपालीने तूच जाऊ ये, असं सांगितलं. दीपक रिक्षातून उतरला. त्यानं दीपकच्या घराचं दार वाजवलं. या वेळी सुनीलच दारावर होता. 'आपण सुनीलच ना...' दीपकनं विचारलं. 'हो... पण आपण?' सुनीलचा प्रतिप्रश्न. 'मी दीपक.. औरंगाबादचाच आहे. दीपालीचा मित्र आहे. ती तुम्हाला भेटायला आलीय.' दीपकने वेळ वाया न घालता सांगून टाकले. दीपकचं सांगून होताच सुनीलच्या तोंडून 'काय.....?' एवढा एकच शब्द फुटला. त्याचा चेहरा एकदम उतरला. चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे जाणवू लागला. सुनीलनं दीपकला घरात न घेता चल आपण बाहेरच बोलू म्हणत दीपकच्या पाठीवर हात ठेवत त्याला ढगलतच घराच्या बाजूला नेलं. 'ती इथं कशाला आलीय. हलकट साली!' सुनीलनं पहिलीच तोफ डागली. त्याच्या चेहरा रागाने लाल झाला होता. दीपक त्याच्या चेहऱ्यावरचा प्रत्येक भाव टिपत होता. हे काही तरी वेगळंच घडतय याची त्याला स्पष्ट कल्पना आली. सुनीलच्या बोलण्यावर दीपकचा चेहरा प्रश्नार्थक झाला होता. हा काय सांगणार याचीच त्याला उत्कंठा होती. सुनील बोलू लागला. 'हे बघ दीपक.. तू चांगल्या घरचा दिसतोस. तुला ही अवदसा कुठं भेटली. तिचा अन् माझा काहीच संबंध नाही. तिला आत्ताच इथून जायला सांग!'  सुनील रागानं फणफणत होता. 'अरे पण ती तुझ्यावर प्रेम करते अन‌् तू?' दीपक त्वरेने म्हणाला. 'हे बघ मला आत्ता तुझ्याशी काहीच बोलता येणार नाही. मी तुला उद्या सर्व सांगतो. माझे आईवडील, भाऊ घरीच आहेत. उगीच लोचा नको. तू तिला घेऊन लागलीच जा. मी तुला उद्या भेटतो' सुनील घाईघाईत आणि दबक्या आवाजात बोलत होता. 'उद्या नाही.. आत्ताच काय सांगायचे ते सांग.' दीपकने आग्रह केला. 'बरं ठीक आहे... चल तू तिला आधी तुझ्या घरी सोड. आपण कुठं तरी बसू.' असं म्हणत तो घरात शिरला. दीपक जागेवरच पुतळा बनून उभा होता. काय होतंय ते त्याला उमजंना. पाचव्या मिनिटाला सुनील अंगात सदरा घालून बाहेर आला. त्याने दीपकला तुम्ही रिक्षानं पुढे चला, मी गाडीवर तुमच्या मागंच येतो, असं सांगून तो दुचाकीच्या दिशेने झेपावला.   प्रथम दीपकने दीपालीला बहिणीकडे सोडलं आणि दोघं दहाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या त्या गार्डनमध्ये जाऊन बसले. सुनील काय सांगणार, याची दीपकची उत्सुकता प्रचंड शिगेला पोहोचली होती.
'बोल काय भानगड आहे?' दीपकने पहिलाच प्रश्न केला. 'हे बघ दीपक थोडं समजून घे.. शांतपणे.. ती मला सिडको बसस्टॅंडवर महिनाभरापूर्वी भेटली होती.. रात्री बारा वाजता. ती एकटीच होती. त्यावेळी मी तेथील कॅन्टिनवर चहा प्यायला गेलो होतो. बसस्टँडवर दोन-तीनच लोक होते. ही सुंदर दिसली म्हणून मी तिच्याकडे बिघितलं. तीसुद्धा माझ्याकडंच बघत होती. मी तिला इशारा करून माझ्या मागं येण्यास सांगितलं आणि बाईकवर जाऊन बसलो. ती गाडीवर मागे येऊन बसली. मी तिला घरी घेऊन गेलो. माझ्या घरचे सगळे बाहेरगावी गेले होते. सकाळीच तिला मी बसस्टँडला आणून सोडलं. तिला नागपूरच्या गाडीतही बसवून दिलं. तिकीटही काढून दिलं होतं. तिला मी दोन हजार रुपयेही दिले. बस्स आमचा एवढाच काय तो संबंध'
सुनीलने सांगितल्या वास्तवामुळे दीपकच्या मेंदूला मुंग्या आल्या होत्या. मनापासून प्रेम करणाऱ्या दीपालीचा त्याला तिरस्कार वाटू लागला. कधी एकदा घरी पोहोचतो आणि दीपालीची खरडपट्टी काढतो, असं त्याला वाटू लागलं. पण तसं तो करू शकत नव्हता. ती त्याच्याकडं पाहुणी होती. शिवाय घरातील इतरांसमोर या गोष्टीचा तमाशाही झाला असता. सुनीलचा निरोप घेऊन दीपक घरी गेला. त्यानं दीपालीवर रागानेच एक कटाक्ष टाकला. पण दीपालीला काहीच वाटलं नाही. ती दीपकच्या बहिणीसोबत, भाच्यांसोबत चांगलीच मिसळली होती. सुनीलने भंडाफोड केला असणार याची तिला पूर्ण कल्पना होती. तरीही तिच्या चेहऱ्यावर तसूभरही तणाव नव्हता. रात्र झाली होती. जेवण झालं. तिच्यासाठी स्वतंत्र बेड लावला गेला. दीपक आणि दीपाली दोघेच हॉलमध्ये होते. घरची इतर मंडळी बेडरूमध्ये विसावली होती. दीपकचं डोकं बधीर झालं होतं. दीपालीला काय बोलावे नि काय नाही, हेच सूचत नव्हतं. न राहवल्याने त्यानं मूळ समस्येला हात घातला. 'तर तू असं काम करतीस नाही का? सुनीलनं सगळं सांगितलं मला'. दीपकच्या या बोलण्यावर दीपाली म्हणाली, 'होय.. मी हेच करते. पण तो मला माझ्याशी लग्न करणार आहे, असं म्हणाला होता. त्यानं माझी खूप तारीफ केली होती. पुन्हा भेटायला येण्याचा निरोपही दिला होता. त्यामुळे मी नशीब अजमावयला सुनीलकडे आले होते. दीपक मी तुझ्यावर प्रेम करते. तूसुद्धा करतोस हे मला माहिती आहे. पण मला तुला धोका द्यायचाच नाही. मला तुला उष्टी बोरं खाऊ द्यायची नाहीत. मी परिस्थिीसमोर हतबल झाले होते. आईच्या आजारासाठी पैसे कमी पडू लागले. त्यामुळे मी स्वत:हूनच हा नरक निवडला. आता आईही या जगात नाही. माझं विश्व हेच आहे.   मी उद्याच नागपूरला जाणार आहे.  तू खूप चांगला आहेस. असं म्हणत दीपालींनं तोंडावर पदर घेतला. तिच्या डोळ्यांत अश्रू होते. अधून-मधून ती सुस्कारे टाकत होती. ती अगदी मनातून रडत होती. रडतच ती निद्रेच्या आधीन झाली. पण दीपकचा डोळ्याला डोळा लागत नव्हता. रात्रभर तो कडा बदलत होता.
दिवस उजाडला. दीपकला पहाटेपहाटे झोप लागली होती. तोवर दीपालीनं आंघोळ करून बॅग तयार ठेवली होती. तिची परतीच्या प्रवासाची वेळ आली होती. बहिणीच्या आवाजाने त्याला जाग आली. तोही तयार झाला.  दीपालीला दुचाकीवरून बसस्थानकात नेले. बस लागलेलीच होती. दीपकनेच तिकीट काढून दिले. दीपालीच्या हातात पाचशे रुपयेही ठेवले. डबल बेल वाजली.. तशी गाडी धकली. खिडकीतून दीपालीने अलगद हात वर केला. आपोआपच दीपकनेही तिला प्रतिसाद दिला. गाडी मार्गस्थ झाली.
दीपाली  गेली. पण दीपकला तिची आठवणही येत होती. पण पहिली दीपाली आता राहिली नव्हती. तिचं विश्व वेगळं होतं.  अजून एकदा सुनीलला बोलून तिच्याशी लग्न करायला राजी करावं का? असा विचार त्याच्या मनात  घोळत होता. पण क्षणिक सुखासाठी त्यानं तिला आशेला लावलं होतं. शेवटी सुनील तरी कोण? तोही अय्याश. अशा वृत्तीमुळेच त्याची आणि दीपालीची भेट झालेली.  त्याचं लग्न लावून देण्याचा विचारही निरर्थकच होता. त्यामुळं दीपकनेही हे सर्व विचार टाकून द्याचे ठरवलं. तो सर्व विसरून आपला व्यवसाय, शिक्षणाकडे वळला.  हळूहळू या सर्व गोष्टींचा त्याला विसर पडला. अचानक एकेदिवशी त्याच्या टपरीसमोर रिक्षा थांबला. रिक्षात दीपालीच होती. सोबत आणखी दोन मुलीही होत्या.  पण या वेळी दीपकला तिच्या येण्याचा आनंद वाटला नाही. पण आश्चर्य जरूर वाटले. दीपाली रिक्षातून उतरून काही न बोलता खुर्चीवर विसावली. पण दीपक आता प्रेमाच्या गावचा नव्हताच. 'आता का आलीस परतून' एवढाच प्रश्न त्याने तिला केला. 'अरे मी आता औरंगाबादलाच राहायला आलेय. मी जवाहर कॉलनीतच राहतेय. पण सुनीलकडे नाही. आता माझाही स्वत:चा व्यवसाय आहे. ', एवढं बोलून ती पुन्हा रिक्षात बसली. दीपकनेही तिला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. ती जशी आली तशीच परतली. पुन्हा ती दीपकला कधीच भेटली नाही.  दीपकने टपरीचा व्यवसाय सोडून नोकरी पत्करली होती. तो चांगल्या हुद्द्यावर कामाला लागला होता. त्याच्या संसारवेलीवर दोन फुलेही उमलली. जवाहर कॉलनीच्या रस्त्यावरूनच त्याच्या घराचा रस्ता. पण दीपाली त्याला पुन्हा दिसलीच नाही.

अंधभक्ती

देशी अप्सरांसाठी इंद्रपुरीतून खाली उतरलेल्या राजा इंद्राने पृथ्वीवरआटपाटनगरात स्थापन केलेले राज्य चांगले  सुरू होते. त्याचे  पृथ्वीतलावर आपल...